दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकाला दिलेल्या आपट्याच्या पानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटर
फेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांमधील तेजतत्त्व अधिक प्रमाणात जागृत होत असल्याने त्या दिवशी आपट्याची पाने देण्याला विशेष महत्त्व आहे. वर्ष २०१६ मध्ये दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु पांडे महाराजांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आणि ६० टक्के पातळी असणार्‍या एका साधकाला आपट्याचे पान दिले होते. ‘दसर्‍यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीत वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (‘टेबला’वर) आपट्याचे पान ठेवण्यापूर्वी वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळची नोंद’ होय. त्यानंतर आपट्याचे सर्वसाधारण पान, प.पू. पांडे महाराजांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकाला दिलेले आपट्याचे पान आणि परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेले आपट्याचे पान एकेक करून पटलावर ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास

२. चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. प.पू. पांडे महाराज यांचा परिचय

प.पू. पांडे महाराज यांचे पूर्ण नाव श्री. परशराम माधवराव पांडे (वय ८९ वर्षे) आहे. ते मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील आहेत. नागपूर येथील प.पू. बापूराव महाराज खातखेडकर यांचे ते शिष्य आहेत. त्यांनी वेद, उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे. त्यांनी ‘श्री गणेश अध्यात्मदर्शन’ हा ग्रंथ लिहिला आहे.

२ आ. आपट्याची पाने

‘दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्र्रात आहे. या चाचणीतील १ ले आपट्याचे पान हे सर्वसाधारण पान आहे. ते तुलनेसाठी घेतले आहे. चाचणीतील २ रे आणि ३ रे आपट्याचे पान हे प.पू. पांडे महाराजांनी अनुक्रमे ६० टक्के पातळी असणार्‍या साधकाला आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दसर्‍यानिमित्त दिलेली आहेत.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाची ओळख’ आणि ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Mm3LT1 या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

३. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

३ अ. मूळची नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे

कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा ‘सनातन आश्रमा’त केलेली असल्याने ‘मूळच्या नोंदी’च्या वेळीही (चाचणीसाठी आपट्याचे पान ठेवण्यापूर्वीच्या) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

३ आ. आपट्याच्या सर्वसाधारण पानामध्ये सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक असणे

सध्याच्या रज-तमप्रधान काळात सर्वसाधारण वस्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. आपट्याचे पान मुळातच सात्त्विक असल्याने त्याच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण (६१ टक्के) नकारात्मक स्पंदनांपेक्षा (३९ टक्के) अधिक होते. याविषयी अधिक स्पष्टीकरण ‘सूत्र ४ अ’ मध्ये दिले आहे.

३ इ. प.पू. पांडे महाराजांनी ६० टक्के पातळी असलेल्या साधकाला दिलेल्या आपट्याच्या पानामुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण मूळच्या नोंदीतील स्पंदनांच्या तुलनेत पुष्कळ वाढणे

प.पू. पांडे महाराजांनी ६० टक्के पातळी असलेल्या साधकाला दिलेल्या आपट्याच्या पानाच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ७३ टक्के, म्हणजे मूळच्या नोंदीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदनांच्या (६५ टक्के) तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे या पानाच्या प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगाचे प्रमाण ४७ टक्के, म्हणजे मूळच्या नोंदीतील चैतन्याच्या (३५ टक्के) तुलनेत पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘या पानातून आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे म्हणता येईल. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४ आ’ मध्ये दिले आहे.

३ ई. प.पू. पांडे महाराजांनी परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आपट्याच्या पानामुळे वातावरणात पवित्रतेची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होणे

प.पू. पांडे महाराजांनी परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आपट्याच्या पानाच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ८२ टक्के आहे. या पानाच्या प्रभावळीतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्र म्हणजे त्यात चैतन्याचा पिवळा रंग (३५ टक्के) तर आहेच आणि त्यासह पवित्रतेचा निळसर पांढरा रंगही दिसत आहे अन् तो ३१ टक्के, म्हणजे पुष्कळ प्रमाणात आहे. त्यामुळे ‘या पानातून वातावरणात आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय लाभदायी अन् पवित्रतेची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे म्हणता येईल. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४ इ’ मध्ये दिले आहे.

४. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. ‘आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असणे आणि सूर्यकिरणांचा प्रभाव पडल्यावर त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होणे

अन्य वृक्षांच्या तुलनेमध्ये आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. ही पाने वाळली, तरी त्यांचा जो मूळ रंग असतो, त्यामध्ये अन्य वृक्षांच्या पानांच्या तुलनेत अधिक पालट होत नाही. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)

४ आ. ६० टक्के पातळीच्या साधकामध्ये सत्त्वगुण वाढलेला असणे आणि याचा परिणाम त्याच्या वापरातील वस्तूंवर होणे

गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना साधकाला अनेक आध्यात्मिक अनुभूती येतात. अनुभूतींमुळे त्याची श्रद्धा वाढीस लागते आणि तो सतत साधनारत रहाण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे कालांतराने त्याची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. साधकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याच्यातील स्पंदने अन् त्यांचे प्रमाण यांत चांगले पालट होऊ लागतात. ६० टक्के पातळी गाठलेल्या साधकामध्ये सत्त्वगुण वाढलेला असतो. त्यामुळे त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्याच्या नेहमीच्या वापराच्या वस्तूंवर, तसेच त्याच्या सभोवतालच्या वातावरणावरही होऊ लागतो.

या चाचणीतील साधकाची आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याने त्याच्यात सत्त्वगुण अधिक आहे. मूळच्या नोंदीच्या आणि सर्वसाधारण आपट्याच्या पानाच्या तुलनेत या साधकाला संतांकडून मिळालेल्या आपट्याच्या पानामध्ये सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात आढळली. याची दोन कारणे पुढीलप्रमाणे आहेत. पहिले कारण म्हणजे संतांच्या स्पर्शाने त्या पानाची सात्त्विकता वाढली आणि दुसरे कारण म्हणजे साधकामध्ये असलेल्या सत्त्वगुणाच्या आधारे त्या पानातील सात्त्विकता टिकून राहिली. साधकामध्ये सत्त्वगुण जेवढा अधिक असेल, तेवढे पानामध्ये सात्त्विकता टिकून रहाण्याचे प्रमाणही अधिक असेल.

४ इ. परात्पर गुरुपदावर आरूढ असणार्‍या संतांमध्ये पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा असणे आणि त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक पालट होणे

प.पू. डॉ. आठवले हे परात्पर गुरुपदावर असलेले संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा आहे. त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक पालट होतात. त्यांच्यातील उच्च प्रतीच्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे त्यांना संतांकडून मिळालेल्या आपट्याच्या पानामध्ये उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आढळल्याचे, या चाचणीतील निरीक्षणात दिसून आले.

४ ई. संतांचे आणि साधनेमुळे वाढलेल्या सात्त्विकतेचे महत्त्व !

प.पू. पांडे महाराज यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा आहे. तरीही ते प.पू. डॉक्टरांना गुरुस्थानी मानतात. त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव आहे. आपट्याचे पान मुळातच सात्त्विक असते, त्यात ते एका संतांनी दुसर्‍या संतांना दसर्‍यानिमित्त दिल्यामुळे त्या दोन्ही संतांचा त्यास (आपट्याच्या पानाला) परिसस्पर्श झाल्याने त्याची सात्त्विकता पुष्कळ वाढली आणि हे या निरीक्षणातूनही दिसून आले.

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा

ई-मेल : [email protected]

आपट्याच्या सर्वसाधारण पानातून थोड्या प्रमाणात, तर दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु पांडे महाराजांनी ६० टक्के पातळी असलेल्या साधकाला दिलेल्या आपट्याच्या पानातून पुष्कळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या पानातून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत, हे दर्शवणारी ‘पिप’ छायाचित्रे

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र  क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल व आपट्याचे पान यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात