आत्मनिवेदन भक्ती

साधनामार्गावर वाटचाल करतांना आपल्यासाठी प्राणप्रिय असणारा आपला सखा भगवंत ! मनातील द्वंद्व, विचार हे सर्व त्याच्याविना आपण सांगणार तरी कुणाला ना ? म्हणतात ना, मांजराच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा आवाज जर ईश्‍वरापर्यंत पोहोचू शकतो, तर आपला आवाज त्याच्यापर्यंत नाही का पोहोचणार ? त्याच्याजवळ मन मोकळे केले की, आपणही हलके होतोच. मग याला कुणी ‘देवाशी/भगवंताशी बोलणे’ म्हणतात, कुणी ‘देवाजवळ मन मोकळे केले’ म्हणतात, तर कुणी याला ‘आत्मनिवेदन’ असेही म्हणतात. आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.

सनातनचे साधकही भगवंताला प्रतिदिन आत्मनिवेदन करतात अन् तो समवेत असल्याची अनुभूतीही घेतात. आपणही देवाशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यालाही ‘भगवंत’ निश्‍चितच अनुभवता येईल. आत्मनिवेदन कशा स्वरूपात करावे, याची प्रातिनिधीक स्वरूपात दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

 

श्री. दादा दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

श्री. विनायक (दादा) दामले

‘देवा, मला तुझा मोक्ष वगैरे काही नको. मला फक्त गुरूंच्या ‘ईश्‍वरी राज्य स्थापने’चे कार्य करायचे आहे. त्यांच्या विजयाचा ध्वज त्रैलोक्यात फडकावयाचा आहे. त्यासाठी तू मला बळ दे. मी गुडघेदुखीमुळे १० पावलेही धडपणे चालू शकत नाही. तुझ्या पाठबळाविना मी काहीच करू शकणार नाही. माझी शारीरिक क्षमताही जवळजवळ ९८ ते ९९ टक्के इतकी संपलेली आहे. जी काही १-२ टक्केच शिल्लक आहे, ती देह असेपर्यंत असणारे प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठी शेष ठेव. मला बळ दे.

मला गुरुकार्य करण्यासाठी प्रेरणा आणि चैतन्य दे. आजपर्यंत झालेली साधना केवळ गुरुकृपेनेच झाली आहे. कर्ते-करविते तेच आहेत. मी त्यांच्या ऋणांतच राहू इच्छितो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आतापर्यंतची माझी व्यष्टी साधना झाली; परंतु समष्टी साधना करणे शिल्लक आहे. ती करण्यासाठी मी आणखी काय करू, याचे तूच मला मार्गदर्शन कर.’

 

श्रीमती रजनी साळुंके, सनातन आश्रम, गोवा.

श्रीमती रजनी साळुंके

‘हे गुरुदेवा, मी काहीच करत नाही, माझ्याकडून साधना नीट होत नाही. काही करण्याची कुवत नाही. तुमच्याजवळ काही मागण्यास पात्र नाही. असंख्य संकटातूनही जिवंत ठेवलेस. असे असूनही ‘मला सतत तुमच्या चरणांजवळ ठेवा, माझे बोट सोडू नका’, अशी प्रार्थना होते; परंतु तुम्ही माझे बोट घट्ट पकडावे, यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाहीत. मैलावरच्या दगडासारखी मी आहे तेथेच आहे. देवा, तूच मला सांभाळलेस, तूच जगवलेस. ‘माझी कसलीही योग्यता नसतांना तू माझा हात धरला आहेस, मला जवळ केलेस’, या विचाराने कृतकृत्य होऊन शरणागत होऊन प्रार्थना करते, ‘हे कृपाळू दयाघना, अनेक जन्मांचे हे दारिद्य्र संपव आणि या जिवाचा उद्धार कर !’

 

आत्मनिवेदनाचे महत्त्व !

‘जे होत आहे, ते सांगत रहावे. आत्मनिवेदन महत्त्वाचे आहे. त्यामुळे जे होत आहे, ते चूक कि बरोबर हे सांगता येते. नाहीतर ‘मला येते, मला कळते’, असे होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले.

 

आपण कोणीच नाही, हे आत्मनिवेदन !

आत्मनिवेदन म्हणजे देवास आपण अर्पण होणे. ‘मी कोण’, याचा विचार केल्यास ‘आपण कोणीच नाही’, हे समजणे. हे समजल्यावर आत्मनिवेदन सहज होते. ‘आपण कोणीच नाही, देव खरा आहे, देव आणि भक्त एकच आहेत’, हेच आत्मनिवेदन. हे समजल्याविना सायुज्य मुक्ती नाही. ही अविनाशी मुक्ती आहे.’ (श्री दासबोध, दशक ४)

Leave a Comment