भाव कसा अनुभवाल ?

अनुक्रमणिका

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावविश्‍वात रहाणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे पुढील लिखाण त्या संत आणि सद्गुरु होण्याच्या पूर्वीचे आहे. त्या कालावधीत प्रत्येक कृती करतांना त्यांनी ठेवलेला भाव सर्वांनाच शिकण्यासारखा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या त्यांच्या उत्कट भावामुळेच आज त्या सद्गुरुपदापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वच साधकांना त्यांच्या प्रयत्नांतून शिकता यावे, यासाठी त्यांच्या प्रयत्नांतील भावसूत्रे येथे दिली आहेत.

१. सकाळी उठणे : ‘मी प्रतिदिन सकाळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच उठते. त्यांच्या कृपेमुळेच मी जिवंत आहे.

२. वैयक्तिक आवरणे : ईश्‍वराला भेटायला जायचे आहे; म्हणून मी आवरत आहे.आवरण्यासाठी असणार्‍या वस्तू म्हणजे चैतन्य असून त्यांच्या माध्यमातून चैतन्यच मिळत आहे.

३. कोणत्याही खोलीचे दार उघडणे किंवा बंद करणे : मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतच जात आहे. तसेच माझ्या मनाची दारे उघडून मी माझ्या अंतर्मनात जात आहे.

४. लिखाण करणे : प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून लिहित आहेत. त्यांच्या सात्त्विक अक्षरांतून मला चैतन्य मिळणार आहे. तसेच त्यांनी सूक्ष्मातून आधीच लिहिले आहे. आता स्थुलातून माझ्या माध्यमातून ते लिहून घेत आहेत.

५. साधकांशी साधनेविषयी बोलणे : बोलणारा साधक आणि मी दोघांना चैतन्य मिळू दे.प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझ्या माध्यमातून बोलून घ्यावे. त्यातून आम्हा दोघांची साधना होऊ दे.

६. साधकांचे बोलणे ऐकणे : समोरच्या साधकाच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच माझ्याशी बोलत आहेत आणि माझ्या जागी बसून तेच ऐकत आहेत. त्या ऐकण्यातून मला चैतन्य मिळत आहे.

७. साधकांना पहाणे : साधकांमुळेच माझी साधना होते. त्यांचे गुण शिकणे शक्य होते.त्यांच्यात ईश्‍वर आहे. त्यांच्या माध्यमांतून देव मला साहाय्य करणार आहे. माझ्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच सर्वांकडे कौतुकाने पहात आहेत. त्यांच्या पहाण्यातूनही मला चैतन्य मिळत आहे.

८. बसणे : चैतन्याच्या गादीवर बसत आहे.

– कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर)

२. विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

अ. तोंडाला पावडर लावतांना ठेवलेला भाव

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो.

आ. जेवणाची भांडी धुतांना ठेवलेला भाव

जेवणानंतर मी माझे ताट, वाट्या आणि पेले धुतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेवण केलेली भांडी किंवा तिरुपती बालाजीला दाखवलेल्या नैवेद्याचे पात्र धूत आहे’, असे मला जाणवते आणि मन शांत होते.

इ. भांडी धुण्यासाठी ठेवलेल्या प्रक्षालनपात्र(सिंक)विषयी ठेवलेला भाव

‘भांडी धुण्यासाठी पाण्याने भरून ठेवलेली ३ प्रक्षालनपात्रे (सिंक) म्हणजे, अनुक्रमे गोपीकुंड, राधाकुंड आणि श्यामकुंड असून, भांडी म्हणजे, माझे मन आहे. त्यामुळे तीन कुंडांमध्ये स्नान करून माझे मन शुद्ध आणि पवित्र होत आहे’, असे मला जाणवते अन् आनंद मिळतो.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

३. भगवंताचे भावविश्‍व अनुभवण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य मार्गदर्शन !

‘आपण आपला भाव एवढा वाढवायला हवा की, देवाला आपल्याकडे यावेसे वाटले पाहिजे. आपण देवाकडे जायचे नाही.’

अ. सतत भावस्थितीत असल्यास सेवेत शरीर,
मन आणि बुद्धी साथ देत नसल्याविषयी विचार करू नका !

एक साधक : ‘जेव्हा सेवेत शरीर साथ देते, तेव्हा मन आणि बुद्धी साथ देत नाही. मन आणि बुद्धी साथ देते, तेव्हा शरीर साथ देत नाही.

प.पू. डॉक्टर : सतत भावस्थितीत असल्यास शरीर, मन, बुद्धी यांनी साथ देण्याविषयी अडचण येणार नाही. ‘भावजागृतीसाठी साधना’ सनातनने प्रकाशित केलेला ग्रंथ वाचून दिवसभर भावस्थितीत रहाण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यात भाव आहे. भाव असल्याने पुढे जाल. भावाची आणि आनंदाची अनुभूती येते, तर अजून काय हवे ? शब्दांत बोलून काय मिळणार ? आनंद आणि भावजागृती हेच चांगले आहे.

आ. बुद्धीने अध्यात्मातील काही शिकण्यापेक्षा भावाच्या स्थितीत रहाणे महत्त्वाचे

याचे कारण म्हणजे अध्यात्म बुद्धीच्या पलीकडील शास्त्र आहे आणि भावही बुद्धीच्या पलीकडील आहे.

इ. साधकाने भावावस्थेत रहाणे, हाच माझा आनंद !

प.पू. डॉक्टर (तीव्र त्रास असूनही अनेक वर्षांपासून साधनेत असणार्‍या आणि आता भाव निर्माण झालेल्या साधकाला उद्देशून) : तुम्ही भाव कसा निर्माण केलात ?

एक साधक : तुम्हीच सारे काही करवून घेता. भरभरून आनंद देता; पण देवा, तुम्हाला आनंद होईल, असे काहीच प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत.

प.पू. डॉक्टर : तुम्ही भावाच्या स्थितीत आहात, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद आहे.

(परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांची साधना व्हावी आणि साधक आनंदी व्हावे, यासाठी अखंड धडपडत असतात. त्यांची परतफेड आपण करू शकत नाही; पण त्यांनी सांगितलेले प्रयत्न सातत्याने आणि मनापासून करून, तसेच भावस्थिती अनुभवून तेवढा आनंद तरी त्यांना देऊ शकतो.’)

 

४. भावाचे महत्त्व

  • ‘भावात आनंद आहे. भावानंतर शांतीचा टप्पा आहे. भावाच्या स्थितीत जाणे अवघड असते. सतत शरणागत भावाने प्रयत्न करायला हवेत. भावाच्या स्तरावर असणार्‍या साधकांची प्रार्थना देव ऐकणारच ! भाव-भक्ती वाढली की, शक्ती वाढते.
  • साखरेची गोडी ज्याप्रमाणे शब्दातून सांगता येत नाही, तसेच भावही शब्दातून व्यक्त करता येत नाही. भगवंताच्या अनुसंधानात सतत रहाण्याचा जवळचा मार्ग म्हणजे सतत भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करणे.
  • ‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’

‘भाव’, म्हणजे देवाकडे जायचे पारपत्र (पासपोर्ट) !

 

Leave a Comment