श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी झालेला अविस्मरणीय दौरा !

Article also available in :

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक
यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती. २ सहस्र ३०० वर्षांपूर्वी राजा अशोकाची कन्या संघमित्रा हिच्यामुळे श्रीलंकेत बौद्ध पंथ आला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत. असे असले, तरी श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. वाल्मीकि रामायणात महर्षि वाल्मीकींनी जे लिहिले, त्यानुसार घडले असल्याचे अनेक पुरावे श्रीलंकेत आढळतात. श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. ‘या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी’, यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला.

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य

‘प्रवासवर्णनांचे अनेक लेख आणि ग्रंथ आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यांत स्थुलातील, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावरील लिखाणासह आवश्यक तेथे त्यांच्या पलीकडील सूक्ष्मातील, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरील परीक्षणे आहेत आणि चैतन्यही आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री. विनायक शानभाग
ॐ जनकजायै विद्महे रामप्रियायै धीमहि तन्नः सीता प्रचोदयात् ॥

अर्थ : त्या जनककन्येला आम्ही जाणतो. रामाला प्रिय असणार्‍या त्या देवीचे आम्ही ध्यान करतो. ती सीता आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

 

१. श्रीलंकेतील मध्य प्रांतातील अती उंच अशा पर्वतीय भागात सीतामातेने
अग्नीपरीक्षा दिलेले स्थान असणे आणि या स्थानाविषयी कुणालाच माहिती नसणे

‘श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. वाल्मीकि रामायणात महर्षि वाल्मीकींनी जे लिहिले, त्यानुसार घडले असल्याचे अनेक पुरावे श्रीलंकेत आढळतात. ‘सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेले स्थान’ हे असेच एक स्थान आहे. हे स्थान ज्या गावात आहे, त्या गावाचे नाव आहे ‘दिविरुंपोला’. श्रीलंकेतील मध्य प्रांतामध्ये उंचच्या उंच पर्वतांच्या ठिकाणी असलेल्या ‘नुवारा एलिया’ या शहरापासून हे गाव १८ कि.मी. अंतरावर आहे. श्रीलंकेतील ‘चिन्मय मिशन’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘रामायण इन लंका’ या पुस्तकातून आम्हाला या गावाविषयी माहिती मिळाली. श्रीलंकेतील अनेक हिंदूंनाही या स्थानाविषयी माहिती नाही. माहितीजालावरही याविषयी कोणतीही माहिती नाही.

 

२. श्रीलंकेत अनेक ठिकाणी हिंदु मंदिरांच्या बाजूलाच बौद्ध विहार
बांधले असून मंदिरे आणि विहार यांचे दायित्व २ – ३ बौद्ध भिक्कूंना दिले जाणे

गेल्या ३० वर्षांमध्ये अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच रामायणाशी संबंधित स्थानांच्या ठिकाणी हिंदु मंदिरांच्या बाजूलाच बौद्ध विहार (मंदिरे) बांधले आहेत. सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या या स्थानीही बौद्धांनी मोठे विहार (मंदिर) बांधले आहे. बौद्ध त्यांच्या मंदिरांना ‘राज महाविहारय’ असे म्हणतात. अशा ठिकाणी हिंदूंच्या मंदिराचे आणि बौद्ध विहाराचे दायित्व २ – ३ बौद्ध भिक्कूंना दिले जाते. सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या या स्थानी बांधलेल्या बौद्ध मंदिराला ‘दिविरुंपोला राजमहाविहारय’ असे नाव देण्यात आले आहे.

 

३. अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानाविषयी फलक नसणे

या विहाराच्या बाहेर ‘सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेले स्थान’, असा एकही फलक नाही.

 

४. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून
वृद्ध व्यवस्थापकाने ‘तुम्ही कुणीतरी दैवी स्त्री आहात’, असे वाटते’,
असे सांगणे आणि त्यांनी सद्गुरु काकूंकडून प्रवेश तिकिटाचे पैसे न घेणे

सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंच्या समवेत हे स्थान शोधत-शोधत गुरुकृपेने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बाहेर बौद्ध भिक्कू आणि त्या मंदिराचे वयोवृद्ध बौद्ध व्यवस्थापक आम्हाला भेटले. आम्ही त्यांना सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानाविषयी विचारल्यावर त्या बौद्ध भिक्कूने व्यवस्थापक आजोबांना सांगितले, ‘‘तुम्ही त्यांना ते स्थान दाखवा.’’ आजोबा सद्गुरु गाडगीळकाकू यांच्याकडे पाहून म्हणाले, ‘‘तुम्ही कुणीतरी दैवी स्त्री आहात’, असे मला वाटते. मी येथे गेल्या ५० वर्षांपासून काम करत आहे. आजपर्यंत आमच्याकडे तुमच्यासारखे कुणी आले नव्हते. तुमच्याकडून मी प्रवेश तिकिटाचे पैसे घेणार नाही. समवेत असलेल्यांचे तेवढे पैसे घेईन.’’ तेव्हा आम्ही आश्‍चर्यचकित झालो.

 

५. बौद्ध विहाराच्या आतील भिंतींवर संपूर्ण रामायण
चित्रित केलेले असणे आणि वृद्ध व्यवस्थापकाने रामायणातील काही
प्रसंग अन् सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेले स्थान यांविषयी विस्तृत माहिती सांगणे

आम्ही आनंदाने आजोबांच्या समवेत त्या परिसरात प्रवेश केला. आजोबांनी आधी बौद्ध विहार (मंदिर) दाखवले. त्या बौद्ध विहाराच्या (मंदिराच्या) आत बुद्धाचे २७ विग्रह (मूर्ती) होते. बौद्ध विहाराच्या आतील भिंतींवर संपूर्ण रामायण चित्रित केलेले आहे. बौद्ध असलेल्या आजोबांनी आम्हाला इंग्रजी भाषेत रामायणातील काही प्रसंग आणि सीतामातेने अग्निपरीक्षा दिलेले स्थान यांविषयी विस्तृत माहिती सांगितली.

 

६. सीतामातेने अग्निपरीक्षा दिलेल्या ठिकाणच्या मंदिराचे प्रवेशद्वार
बंद असणे, वृद्ध व्यवस्थापकाने ‘तुम्ही साक्षात सीतामातेसारख्या दिसता,
तुम्हीच ते कुलूप उघडा’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगून त्यांच्या हातात
मोठी किल्ली देणे आणि किल्ली हातात घेताच सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांची भावजागृती होणे

सीतामातेच्या मंदिराची किल्ली

यानंतर आजोबा आम्हाला सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या अश्‍वत्थ वृक्षाजवळ घेऊन गेले. त्या वृक्षाजवळ एक छोटे मंदिर होते. त्याचे प्रवेशद्वार बंद होते. त्याला दोन हातात मावणार नाही, एवढ्या मोठ्या आकाराचे जुने टाळे (कुलूप) लावलेले होते. आजोबा म्हणाले, ‘‘माताजी, तुम्ही मला साक्षात सीतामातेसारख्या दिसता. आजपर्यंत मी कुणालाही या मंदिराची किल्ली दिलेली नाही. आज या सीतामातेच्या मंदिराची किल्ली मी तुम्हाला देतो. तुम्हीच टाळे (कुलूप) उघडा.’’ आजोबांनी असे म्हणताच आम्हा सर्वांची भावजागृती झाली. आजोबांनी सद्गुरु गाडगीळकाकूंना ती किल्ली दिली. दोन हातांत धरावी लागते, एवढी मोठी ती किल्ली होती. किल्ली हातात घेताच सद्गुरु गाडगीळकाकूंना भावाश्रू आवरेना.

सीतामंदिरातील भिंतीवर रंगवलेला अग्नीपरीक्षेचा प्रसंग (सीतामाता अग्नीत प्रवेश करत असल्यामुळे सर्व शोकाकूल झाले असल्याचे चित्रात दिसत आहेत.)

 

७. सद्गरु (सौ.) गाडगीळ यांनी प्रवेशद्वार उघडल्यावर चंदनाचा
सुगंध येणे, आत सीतामातेची उभी मूर्ती असणे, तिच्या मागील भिंतीवर सीतामाता
अग्नीपरीक्षा देत असलेले चित्र असणे आणि तेथे सर्वांनी रामराज्य येण्यासाठी प्रार्थना करणे

सीतामंदिराचे द्वार उघडतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, मंदिराचे व्यवस्थापक आजोबा आणि सर्वांत मागे श्री. विनायक शानभाग

 

अग्नीप्रवेश करणार्‍या सीतामातेच्या मूर्तीच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

आम्ही मनोमन श्रीमहाविष्णूच्या श्रीराम रूपाला प्रार्थना केली आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. सद्गुरु गाडगीळकाकूंनी किल्लीने सीता मंदिराचे कुलूप उघडले. (छायाचित्र क्रमांक १ पहा) सद्गुरु काकूंनी प्रवेशद्वार उघडताच सर्वांना चंदनाचा सुगंध आला. आम्ही मंदिरात अर्धा घंटा होतो. तोपर्यंत आम्हा सर्वांना चंदनाचा सुगंध येत होता. त्या ठिकाणी सीतामातेची उभी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे भिंतीवर सीतामाता अग्नीपरीक्षा देत असलेले चित्र आहे. सद्गुरु गाडगीळकाकूंनी आणि समवेत असलेल्या सर्व साधकांनी त्या मंदिरात रामरक्षा स्तोत्र म्हटले आणि ‘पृथ्वीवर रामराज्य यावे’, यासाठी प्रार्थना केली. (छायाचित्र क्रमांक २ पहा)

 

८. सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी पूर्वीपासून अश्‍वत्थ
वृक्ष असणे आणि पूर्वी श्रीलंकेतील सर्व लोक हिंदूच असल्यामुळे त्यांना
या स्थानाविषयी पहिल्यापासून ठाऊक असल्याचे वृद्ध व्यवस्थापकांनी सांगणे

देवी सीतेने ज्या ठिकाणी अग्नीप्रवेश केला, त्या स्थानावरील अश्‍वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

या आजोबांनी नंतर आम्हाला मंदिराच्या मागे असलेल्या अश्‍वत्थ वृक्षाकडे नेले. आजोबा म्हणाले, ‘‘आताचा हा अश्‍वत्थ वृक्ष पुष्कळ जुना आहे; पण ‘याच्या आधीही येथे अश्‍वत्थ वृक्ष होता,’ असे माझे आजोबा म्हणायचे. माझे आजोबा हिंदू होते. कालांतराने आम्ही बौद्ध झालो, तरी ‘याच ठिकाणी सीतामातेने अग्नीपरीक्षा दिली’, असे या गावातील जुने लोक म्हणत. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून या स्थानाविषयी ठाऊक होते.’’ यानंतर सद्गुरु गाडगीळकाकूंनी त्या अश्‍वत्थ वृक्षाला ३ वेळा प्रदक्षिणा घातली. (छायाचित्र क्रमांक ३ पहा)

 

९. सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी
जाण्याचे आणि रामराज्य येण्यासाठी प्रार्थना करण्याचे भाग्य
मिळाल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता

असे म्हणतात, ‘जेथे राम-सीता आहेत, तेथे हनुमंत असतोच.’ ‘त्या आजोबांच्या रूपात साक्षात हनुमंतच आमच्या साहाय्याला आला’, असे आम्हाला वाटले. ‘भारतापासून सहस्रो मैल अंतरावर हे अनुभवणे, ही ‘रामनाथी’ या ठिकाणी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे’, यात शंका नाही. ‘अशा पवित्र ठिकाणी जायला मिळणे आणि रामराज्य येण्यासाठी तेथे प्रार्थना करायला मिळणे’, हे आम्हा सर्वांचे भाग्यच आहे. श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०१८)

Leave a Comment