कोची येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या परिसरात असलेल्या वनस्पतींविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

कोची येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राच्या परिसरात आंबा, औदुंबर, पारिजात आणि बेल अशी सात्त्विक झाडे आहेत. ज्या साधक कुटुंबाने ही जागा अर्पण केली, त्यांनी सेवाकेंद्र बांधण्याच्या अनेक वर्षांपूर्वीच ही झाडे लावली होती. सेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यानंतर साधक येथे निवास करू लागले. तेव्हापासून त्या झाडांकडे पाहिल्यावर ‘ती आनंदात आहेत’, असे वाटते. त्या वृक्षांविषयी तेथील साधिकांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहोत.

१. सेवाकेंद्र बांधल्यामुळे बेलाचा वृक्ष प्रसन्न होऊन त्याला फळे येणे

‘कोची येथील सेवाकेंद्राच्या परिसरात एक बेलाचे झाड आहे. अनेक वर्षांपासून या झाडाला फळे लागत नव्हती सेवाकेंद्रासाठी अर्पण केलेल्या या जागेत पूर्वी एक गोदाम होते. तेव्हा त्या झाडाला कधीतरी फळे लागायची. सेवाकेंद्राचे बांधकाम करण्यासाठी ते गोदाम पाडावे लागले. त्यानंतर ६ वर्षे तेथे सेवाकेंद्राचे बांधकाम करता आले नाही. त्या काळात त्या झाडाला फळे लागली नाहीत. वर्ष २०१२ पासून सेवाकेंद्राचे बांधकाम चालू झाले. तेव्हापासून त्या झाडाला फळे लागत आहेत. त्या पवित्र वृक्षाकडे पाहिल्यावर ‘सेवाकेंद्र बांधल्यामुळे तो प्रसन्न झाला आहे. त्यामुळेच त्याला फळे लागत आहेत’, असे वाटते. सेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यापासून झाडाची वाढ अजून झाली आहे. बेलाच्या फळाचा रसही अतिशय स्वादिष्ट आहे.’

२. लहान जागेतही अनेक वृक्षांची वाढ होणे

‘सेवाकेंद्राच्या परिसरात औदुंबर वृक्षाची अनेक रोपे येत आहेत. सेवाकेंद्राच्या परिसरात झाडे लावायला अधिक जागा नाही; मात्र १० ×  ६ फूट एवढ्या लहान जागेत बेल, पारिजात, नागवेल (विड्याच्या पानांचे वेल), गावठी गुलाब, मेहंदी इत्यादी झाडे आहेत. एवढ्या लहान जागेत एवढी झाडे पाहून वाटते की, आश्रमाच्या परिसरात आहेत; म्हणून ती वाढत आहेत. ती झाडेही आनंदी दिसतात.’

– कु. प्रणिता सुखटणकर आणि कु. रश्मी परमेश्‍वरन्, कोची, केरळ. (२८.०६.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment