संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांना ध्यान लागण्याची प्रक्रिया

‘ध्यान लावण्यासाठी सर्वसाधारणपणे स्थिर बसणे, मन एकाग्र करणे इत्यादी प्रयत्न करावे लागतात. ‘संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांनाही ध्यान कसे लागते ?’, याची माहिती येथे दिली आहे.

 

१. संगीतातून ध्यान लागण्याची प्रक्रिया

१ अ. कलाकाराचे मन प्रथम संगीतातील शास्त्रनियमात
एकाग्र होणे त्यानंतर त्यातील भगवंतात एकाग्र होऊ लागल्याने ध्यान लागणे

‘ध्यान लावण्याच्या प्रक्रियेत प्रारंभी साधकाला चंचल मनाविरूद्ध वागावे लागते, उदा. स्थिर बसणे, मन एकाग्र करणे इत्यादी. तेव्हा ध्यानात थोडे थोडे मन एकाग्र होऊ लागते. संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो. गायकाचे मन प्रथम संगीताच्या शास्त्रनियमात एकाग्र होते. त्यानंतर एकाग्र मनाला शास्त्रनियमांतील सूक्ष्म अशा भगवंताची ओळख होते. तेव्हा कलाकाराचे मन आणखीन आणखीन सूक्ष्म होऊ लागते. परिणामी गायकाला गायन आणि वादकाला वाद्यांतील नाद यांद्वारे ध्यानाची अनुभूती येते. प्रथम गायकाची स्वरांशी ओळख होते आणि त्यात मन एकाग्र झाले की त्यातील तत्त्वाची, म्हणजे भगवंताची ओळख होते, त्याचप्रमाणे वादकाला वाद्यांतील नादाची ओळख होते आणि त्यानंतर नादाच्या निर्मात्याची, म्हणजे भगवंताची.

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

१ आ. कलाकाराची संगीतासंबंधीची प्रकृती भगवंतात एकाग्र होण्यास साहाय्यभूत ठरणे

संगीतात गायक अथवा वादक त्याच्या प्रकृतीनुरूप संगीताशी एकरूप होतो. प्रकृतीच्या विरूद्ध कार्य केले की, कार्याची परिणामकारकता न्यून होते. साधकाची संगीतासंबंधीची प्रकृती भगवंतात एकाग्र होण्यास साहाय्यभूत ठरते. प्रारंभी वाद्ये अथवा गायन यांतून काही काळाने साधकाचे हळूहळू ध्यान लागते. पुढे केवळ गायकाने एक स्वर उच्चारला किंवा वादकाने सतारीची एक तार छेडली, तरी कलाकार ध्यानमग्न होतो. यांमध्ये स्वरामधील नाद आणि तारेतील नाद हा कलाकाराला आत्मनादाला, म्हणजे भगवंताशी जोडतो. मनुष्याला भगवंताशी जोडण्याचे कार्य संगीत करते.

१ इ. निर्विचार स्थितीतून आत्मसंगीताला, म्हणजे आनंद मिळण्यास प्रारंभ होणे

संगीत निर्विचाराकडे घेऊन जाते. मग निर्विचारातून आत्मसंगीत, म्हणजे आनंदाचे संगीत चालू होते. त्या वेळी संगीत निमित्त होऊन साधकाला संगीताच्या माध्यमातून अल्प कालावधीतच आनंदाकडे वाटचाल करता येते.

 

२. नृत्यातून ध्यान लागण्यासंबंधीची प्रक्रिया

२ अ. शास्त्रीय रचना

नृत्याची शास्त्रीय रचना सात्त्विक असून ती आत्मसात करता करता कलाकाराचे मन सात्त्विक होऊ लागते. प्रारंभी कलाकाराचे चंचल मन नृत्याच्या शास्त्रनियमांत एकाग्र होऊ लागते.

२ आ. भावप्रधान नृत्य

नृत्यातील विविध प्रसंगानुरूप कलाकाराला अभिनय करावा लागतो. अभिनय करतांना तो त्या प्रसंगाशी एकरूप होऊ लागतो आणि त्याच्यात हळूहळू भावाची निर्मिती होऊ लागते.

२ इ. अव्यक्त अवस्था

कलाकाराची भावस्थिती वाढू लागली की, त्याचे मन सात्त्विक आणि सूक्ष्म बनू लागते. त्यानंतर त्याला नृत्यातून ध्यानाची अनुभूती येऊ लागते. एकतर शास्त्रीय रचनेशी एकरूप होता ध्यान लागते किंवा भावप्रधान नृत्यातून ध्यानाकडे वाटचाल होते. ‘कुठल्या मार्गाने ध्यानाची अनुभूती येईल’, हे साधकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.

शास्त्रीय रचना + अभिनय –> भावाची निर्मिती –> निर्विचार अवस्था –> कलाकाराचे ध्यान लागणे

या तत्त्वावर हे सूत्रे आधारित आहे.

 

३. अन्य कृती करतांनाही ध्यान लागण्यासंबंधीची प्रक्रिया

३ अ. संगीताद्वारे ध्यान लागणे

प्रारंभी कलाकाराला संगीत चालू असतांना ध्यानाची अनुभूती येते. अशा प्रसंगी चित्त माध्यमावर, म्हणजे संगीतावर एकाग्र होते. त्यानंतर त्याचे ध्यान लागते.

३ आ. संगीताच्या आलंबनाद्वारे ध्यान लागणे

दुसर्‍या टप्प्याला संगीत चालू नसतांना केवळ कलाकाराने संगीतास प्रारंभ केला, तरी त्याला ध्यानाची अनुभूती येते; कारण कलाकाराची शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धी अधिक असल्याने संगीताशी, म्हणजेच त्यातील अव्यक्त भगवंताशी तो लवकर एकरूप होतो आणि त्याला ध्यानाची अनुभूती येते. येथे संगीत ध्यान लागण्यासाठी निमित्त बनते.

३ इ. कृती करतांना ध्यान लागणे

कलाकराची संगीत-साधना पूर्ण होते, म्हणजे तो संगीताशी एकरूप होतो. त्या वेळी त्याला भगवंताच्या अनुसंधानाची अव्यक्त अवस्था प्राप्त होऊ लागते. संगीत-साधनेनुसार ही अव्यक्त अवस्था आणि त्यातून मिळणारा आनंद वाढू लागतो. त्याची परिणती म्हणून अन्य कृती करतांनाही जिवाला हे अनुसंधान टिकवून ठेवता येते. यालाच ‘संगीतातून सहज समाधी अवस्थेकडे वाटचाल’, असे म्हणतात.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

संगीताचे आध्यात्मिक महत्त्व !

१. संगीतातून शरीरशुद्धीची होणारी प्रक्रिया

‘संगीतातून नाद तरंग उत्पन्न होतात. शरिरात असंख्य पेशी असतात. नाद, शक्ती आणि संवेदनशीलता यांना पेशी पूरक असतात. पेशींना ‘नादाश्रयी’ असे म्हणतात. म्हणजे पेशी नादाचा आश्रय किंवा त्याच्याशी एकरूप होण्यास प्रयत्नशील रहातात. साधक नादाशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत शुद्ध संगीत, म्हणजे सत्त्वगुणामुळे शरीरशुद्धी होण्यास साहाय्य होते. शुद्ध नादामुळे ध्यानाची अवस्था साध्य होते.

२. वाद्यांचे महत्त्व !

कुठल्याही विषयाचे ज्ञान प्रथम मन आणि बुद्धी यांना होते. त्यानंतर ते अंतर्मनापर्यंत पोहोचते. वाद्यांतून उत्पन्न होणारा नाद हा थेट अंतर्मनापर्यंत पोहोचतो. त्यामुळे अध्यात्मात नादाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

३. गायनाचे महत्त्व !

कलाकार अथवा श्रोता यांचे मन गायनातील शब्द त्यांचा अर्थ, लय, ताल आणि सूर यांकडे लवकर एकाग्र होते. एकाग्र स्थितीत भावाची स्थिती लवकर साध्य करता येते किंवा जिवात गायनाद्वारे लवकर भाव उत्पन्न होतो.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीत (गायन), वादन आणि नृत्य या कलांचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्‍वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्य:स्थितीत ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयां’तर्गत या विविध कलांचा आध्यात्मिक स्तरावर अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधनाचे कार्य चालू आहे.

‘संगीत’ (गायन), ‘वादन’ आणि ‘नृत्य’ या कलांचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणार्‍या अन् या कलांचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी श्री. रूपेश रेडकर यांच्या नावे पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

भ्र.क्र. : ९५६१५७४९७२

Leave a Comment