
भाव कसा ओळखावा ?
‘साधकाचा ईश्वराप्रती खूप भाव असल्यास आणि तो व्यक्तही होत असल्यास त्याला ईश्वराची आठवण येऊन रडू येते. तो त्याच्या भेटीसाठी व्याकूळ होतो. त्याला ईश्वराचे अस्तित्व सतत जाणवते. सूक्ष्म-सुगंध, सूक्ष्म-दर्शने, सूक्ष्म-नाद इत्यादी अनुभूती येतात; परंतु या अनुभूती क्षणिक असतात. त्यामुळे साधकाचा भाव सातत्याने टिकून रहात नाही. साधक हा त्याच्या जीवनातील अनेक प्रसंगांत भावनेच्या पातळीवर राहूनच निर्णय घेत असतो आणि त्यानुसार कृती करत असतो.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.१२.२००४, सकाळी ८.४५)
व्यष्टी साधनेसाठी साक्षीभाव,
तर समष्टी साधनेसाठी शरणागत भाव आवश्यक
‘साधकाची आध्यात्मिक उन्नती झाल्यावर त्याची मायेकडे असणारी ओढ अल्प होते आणि इतरांकडून अपेक्षाही अल्प होतात. त्यामुळे अशा साधकात साक्षीभाव निर्माण होतो आणि तो प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पहाण्यास शिकतो. व्यष्टी साधनेच्या दृष्टीने साक्षीभाव असणे अत्यंत योग्य आहे; परंतु समष्टी साधना करण्यासाठी साक्षीभाव सातत्याने जोपासणे योग्य नाही. साक्षीभाव जोपासल्याने समष्टीच्या हितासाठी आवश्यक अशी सेवा साधकाकडून होणार नाही. यासाठी साक्षीभावाच्याही पुढे जाऊन साधकाने स्वतःचे कर्तव्य निरपेक्षपणे पूर्ण करणे ईश्वराला अपेक्षित आहे. (याला ज्ञानोत्तर कार्य म्हणतात.) समष्टीसाठी सेवा करतांना समाज आणि वाईट शक्ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होण्याचा संभव असतो. यासाठी साधकाने ईश्वराला पूर्णपणे शरण जाऊन समष्टी सेवा करावी. शरणागत भावामुळे अतिशय अवघड असे कार्य साधकांकडून सहजतेने होऊ शकते; कारण शरणागत भाव जोपासणार्या साधकाच्या माध्यमातून साक्षात ईश्वरच कार्य करतो. यासाठी साधकाच्या दृष्टीने मायेपासून अलिप्त रहाण्यासाठी प्रथम साक्षीभाव येणे आवश्यक आहे आणि त्यानंतर समष्टी साधना परिणामकारक करण्यासाठी शरणागत भाव येणे आवश्यक आहे.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २२.११.२००५, सकाळी ११.१५ ते ११.२०)
आध्यात्मिक उन्नतीचे टप्पे आणि व्यक्त अन् अव्यक्त भाव
‘व्यक्त भाव म्हणजे ईश्वराशी द्वैत आणि अव्यक्त भाव म्हणजे ईश्वराशी अद्वैत. साधकाला हळूहळू अव्यक्त भावाकडे जायचे आहे.
१. प्राथमिक टप्प्याच्या साधकाचा भाव जागृत झाला की, त्याला अनुभूती येते.
२. पुढच्या टप्प्याला साधकाचा भाव सातत्याने जागृत होऊ लागला की, साधकाचा भाव कधी नामजपातून व्यक्त होतो, तर कधी डोळ्यांसमोर दिसणार्या प्रकाशातून व्यक्त होतो.
३. आणखी पुढच्या टप्प्याला हाच भाव श्वासात व्यक्त होऊ लागतो. त्या वेळी साधकाचे लक्ष श्वासावर असते.
४. पुढे पुढे साधक व्यक्त भावातून अव्यक्त भावाकडे जाऊ लागतो. त्या वेळी त्याचा भाव ना नामातून ना श्वासातून, कशातूनच व्यक्त होत नाही आणि त्याला येणार्या अनुभूतींचे प्रमाणही हळूहळू घटते.’
– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.१२.२००३, दुपारी १२.३३)
व्यक्त भावाची लक्षणे
भाव व्यक्त होण्याची ८ लक्षणे असून त्यांना `अष्टसात्त्विक भाव’ असे संबोधिले जाते. ती लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. स्तंभ (स्तंभित होणे)
२. स्वेद (घाम येणे)
३. रोमांच
४. वैस्वर्य (स्वरभंग)
५. कंप
६. वैवर्ण्य (वर्ण पालटणे)
७. अश्रूपात
८. प्रलय-चेष्टा निरोध (मूर्च्छा येणे)
बहुतांशी साधकांना देवाच्या आरतीच्या वेळी अथवा गुरु / ईश्वर यांचे स्मरण झाले असता वा त्यांच्या संदर्भातील अन्य एखाद्या कारणामुळे डोळ्यांतून पाणी येते. हे भावाच्या वर दिलेल्या आठ लक्षणांपैकी ‘अश्रूपात’ हे लक्षण होय. आठही लक्षणे जेव्हा दिसून येतात, तेव्हा ‘अष्टसात्त्विक भाव’ जागृत झाला, असे म्हणतात.
व्यक्त भाव निर्माण होण्यासाठी करावयाचे काही प्रयत्न
१. पूजापाठ, आरती, धार्मिक विधी, नमस्कार यांसारख्या धर्माचरणाच्या कृती
२. प्रार्थना : प्रार्थनेत भक्ताची असमर्थता व्यक्त होत असते आणि तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.
३. कृतज्ञता : प्रार्थना याचा दुसरा अर्थ शरणागती आणि शरणागतीची प्रक्रिया कृतज्ञता व्यक्त केल्याविना पूर्ण होत नाही; म्हणून प्रत्येक कृती केल्यावर कृतज्ञताव्यक्त करावी.
४. नामजप : भगवंताशी सतत अनुसंधान ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याच्या नामाचा अखंड जप करणे.
५. देवाशी मध्ये मध्ये बोलणे : दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग, घटना घडत असतात. त्यांच्यामुळे आपल्या मनात येणारे विचार, प्रतिक्रिया, समस्या इत्यादी देवाला सांगाव्यात. ‘त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव’, असा भाव ठेवून प्रत्येक गोष्ट देवाला सांगितल्यामुळे देवाविषयीचे प्रेम वाढते आणि त्यामुळे देवाप्रती भाव वाढतो.
अव्यक्त (अप्रकट) भाव
व्याख्या
‘आपल्यातील भाव जागृत असतो; परंतु तो कोणतीही भावना, विचार किंवा कृती यांद्वारे व्यक्त होत नाही. आपल्या अंतर्मनात त्याचे अस्तित्व असते. असा भाव म्हणजे अव्यक्त भाव.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १९.३.२००५, दुपारी १२.३०) आणि ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २५.७.२००५, सायंकाळी ६ ते ६.०४)
अव्यक्त भाव निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे काही घटक
१. गुरुकार्याविषयी आत्यंतिक तळमळ असणे : ‘गुरूंच्या प्रत्यक्ष देहाची सेवा ही सगुणाची सेवा आहे, तर त्यांच्या समष्टी कार्याची सेवा (धर्मसेवा) ही निर्गुणाची सेवा आहे. साधकातील निर्गुणाच्या सेवेविषयी असलेल्या तळमळीतून अव्यक्त भाव निर्माण होतो.
२. प्रत्येक कर्म परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे : ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, म्हणजे ‘कर्म कौशल्याने, अर्थात परिपूर्ण करणे, हा योगच (साधनाच) आहे.’ केवळ सेवाच नव्हे, तर प्रत्येकच कर्म परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला की, अव्यक्त भाव लवकर निर्माण होतो.
३.‘दिसेल ते कर्तव्य’ या वचनानुसार समोर आलेले कर्म अपेक्षारहित भावाने चांगले होण्यासाठी प्रयत्न करण्याने अव्यक्त भाव निर्माण होतो.
४. अंतर्मनातून साधनेचे प्रयत्न असणे : साधना करतांना प्रत्येक कृतीतून मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग नकळत होत असणे, म्हणजे साधना अंतर्मनातून होत असणे होय.
संदर्भ : सनातन – निर्मित ‘भावाचे प्रकार आणि जागृती’
भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवावयाचे विविध भाव
१. समभाव
अ. आपल्या वयोगटांतील माणसांशी भाऊ किंवा बहीण यांप्रमाणे वागावे.
आ. वयाने मोठ्या असलेल्या माणसांशी त्यांच्या मुलांप्रमाणे वागावे.
इ. लहान मुलांबरोबर लहान मुलांप्रमाणे वागावे.
२ . आत्मीयभाव
सर्वांविषयी आत्मीयभाव असावा, म्हणजे सर्वांवर स्वतःप्रमाणेच प्रेम करावे.
३ . देवताभाव
आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.
४ . ईश्वरी भाव
भक्ताला सर्व प्राणिमात्रात आणि वस्तूतही ईश्वराची अनुभूती होते. त्यामुळे तो त्या तर्हेने वागतो.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९९०)