हिंदु धर्मातील विविधांगी विचार जाणून न घेता त्यावर टीका करणार्‍यांचा कैवार घेणार्‍या पुरोगाम्यांचे ढोंग !

‘सध्या हिंदु धर्म हा स्वत:ला अत्याधुनिक समजणार्‍यांचा अर्थात् पुरोगाम्यांचा छद्मद्वेषाचा विषय झाला आहे. छद्म म्हणजे लपून, छपून, आडूनपाडून एखादी गोष्ट करणे. उघडपणे हिंदुद्वेष न करण्याची या लोकांची काही सोयीस्कर कारणे आहेत. त्यांची (तथाकथित) पुरोगामित्वाची झूल हे त्यातले एक कारण आहे. इकडे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारायच्या आणि मूठभर मियाँच्या हातभर दाढ्या कुरवाळत हिंदु धर्म कसा मागास आणि कालविसंगत आहे, याची माध्यमस्नेही चर्चा ‘घडवायची’ हा यांचा ‘आवडता उद्योग’! कधी पालट म्हणून गळ्यातला क्रॉस मिरवणार्‍यांच्या गळ्यात गळा घातला की, झाला सर्वधर्मसमभाव साजरा ! स्वत: ज्या समाजात जन्म घेतला, त्या समाजाचा धर्म आजही इतक्या विरोधात ठामपणे टिकून का आहे, परधर्मांना राजाश्रय मिळूनही ते या देशात केवळ रुजले; पण चहूबाजूंनी फोफावले का नाहीत ?, यावर गंभीरपणे खल करण्यापेक्षा ‘एका विशिष्ट’ (हिंदु) धर्मातील (कथित) चुकीच्या समजुती, चालीरिती, प्रथा यांवर तोंडसुख घेणे, हा यांचा (खरा) व्यवसाय.

 

१. अन्य पंथांतील त्रुटींसंदर्भात ‘अंतर्गत विषय’ म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष !

हिंदु धर्म अनेकेश्‍वरवादी, भिन्न भिन्न उपासनापद्धती मानणारा, सर्व विषयांत ‘एकमत’ नाही, यावर या तथाकथित पुरोगाम्यांचा विशेष भर असतो. अभ्यास न करता पांडित्य पाजळण्यात तर दाढीवाल्यांच्या दाढ्या कोणी धरू शकणार नाही. खोटारडेपणाचा काळाकुट्ट इतिहास असलेले काहीजण तरीही निलाजरेपणाने स्वत:ला ‘मानववादी’ म्हणत इतरांना ‘मनुवादी’ म्हणून शिवीगाळ करतात, तेव्हा यांची कीव कशी करणार ? वाद हा विषय हिंदु तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे अंग आहे. हिरीरिने आवाज चढवत वाद घातले, तरी ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:।’ हे भान हिंदू कधीच सोडत नाहीत; किंबहुना वितंडवादाला हिंदू कधीच उत्तेजन देत नाहीत. याउलट हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांवर दुगाण्या झाडतांना हेच दाढीवाले कोणी सप्रमाण आक्षेप घेतल्यावर तो आक्षेप सप्रमाण खोडण्याऐवजी आक्रस्ताळेपणाचा आश्रय घेतात. बाकीचे धर्म एकेश्‍वरवादी, निरीश्‍वरवादी म्हणवणारे असले, तरी त्यांच्यातही पंथभेद, उच्चनीचपणाच्या स्वरचित कल्पना आहेत. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी, निदान त्यावर प्रकाश टाकणार्‍या चर्चा करण्याऐवजी ‘तो त्यांचा धार्मिक, अंतर्गत मामला’, ‘व्यक्तीगत मत’, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हणून कानाडोळा करतात. यांचा वैचारिक संघर्ष ‘अल्पसंख्यांकांना दुखवायचे नाही’, ‘त्यांच्या भावना ‘जपायच्या’, या मतावर येऊन ‘भावनांचा उद्रेक’ आवरतो ! कि अडकतो, अडतो ?

 

२. हिंदूंच्या मूर्तीपूजेवर टीका करणारे क्रॉस, जिझस-मेरीची प्रतिके मानतात !

हिंदु धर्म अनेकेश्‍वरी विचारांचा आदर करतो. त्यामुळेच ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:।’ असं मान्य करतो. ‘सर्व देव नमस्कारा: केशवप्रति गच्छति।’, असे म्हणून परत एकेश्‍वरी विचारांवर येतो. हिंदु धर्माचे मूळ तत्त्वज्ञान एकेश्‍वरीच होते आणि आजही आहे; पण सर्वसमावेशक, बनण्याच्या खटाटोपात इतर धर्मियांना बळाछळाने ‘आपल्यात’ आणायचा शिरजोरपणा हिंदूंनी कधी केला ? तो तसा केला असता, तर शैव, वैष्णव, गाणपत्य, देवी हे उपपंथ आणि शंकराची, देवीची अनेक रूपे, श्रीविष्णुचे अवतार, श्री गणेशावतार यांचीच उपासना खिळली नसती का ? बुद्ध-जैन विचार शिल्लक राहिले असते का ? हिंदु मूर्तीपूजा करतात हा आक्षेप धरणारे – क्रूस, जिझस-मेरीच्या मूर्ती यांना केवळ प्रतिके समजतात का ?

 

३. हिंदु धर्मातील विज्ञान !

हिंदूंच्या तेवढ्या भाकडकथा, अ‍ॅडम आणि इव्ह म्हटले, की तो मानवी उत्क्रांतीचा उल्लेख आणि इतिहास मानता तुम्ही (तथाकथित) पुरोगामी ? शिवलिंगामध्ये स्त्री-पुरुष मीलनाचे प्रतीक पहाण्याइतकी विकृत दृष्टी बाळगणार्‍या तुम्हाला त्यात संपूर्ण विश्‍वाचे चित्र कसे आढळेल ? ती आजच्या हेलियम वायूची रेखाकृती आहे. ‘क्षीरसागरात शेषशायी असलेला विष्णु हे कशाचे प्रतीक आहे’, याची निदान विचारपूस करण्याची सिद्धता दाखवाल ? विश्‍वाच्या जगड्व्याळ स्वरूपाचे ते ‘मिनिएचर’ (लघुरूप) आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? विष्णु हे वाढीचे प्रतिकात्मक नाव आणि शेष म्हणजे शिल्लक वस्तुमान (मॅटर), क्षीरसागर म्हणजे विविध आकाशगंगांचा समूह हे तुमच्यासारख्या ‘बुद्धीमान’ बुध्दीनिष्ठांना आजवर कळले कसे नाही ? हे विश्‍व प्रसरण पावत आहे. (विष्णुरूप याचा व्यवहारातला अर्थ) ते निर्माण झाले, तेव्हा सर्वच्या सर्व वस्तु (मॅटर) वापरली गेली नाही. काही वस्तुमान मागे राहिले, शिल्लक राहिले, त्यालाच ‘शेष’ म्हटले आहे. हे या ‘सु’शिक्षित पुरोगाम्यांच्या गावी तरी आहे का ? कसे असेल ?

 

४. हिंदु धर्मातील वैज्ञानिक तथ्ये जाणून न घेता
त्यांचा आवाज दाबणारे दूरचित्रवाहिन्यांचे सूत्रनिवेदक !

दूरचित्रवाणीवरील चर्चेसाठी विषय एक सांगायचा. नंतर चर्चा दुसर्‍याच विषयावर आहे, हे आयत्यावेळी ‘आठवल्यासारखे’ सांगायचे, हे माध्यम-विलास करणारे तुम्ही ! वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची सोंगे करत एकाच एका ‘हिंदु तितुका बदडावा’ या सूत्राभोवती तथाकथित चर्चा फिरवणारे वागळे जर खरेच विज्ञानवादी असतील, तर यावर चर्चा घडवतील. पण त्यांना चर्चा हवीच कुठे ? ‘आपण या वाहिनीचे सर्वेसर्वा आहोत’, ‘आपण माध्यम ‘सम्राट’ आहोत’, याच गुर्मीत मस्त रहाणे वगळले, तर वागळे वेगळे दिसत नाहीत ! अमक्यांना बोलायला भरपूर वेळ देऊन त्यांची पुरेपूर टीका ‘यांना बोलू द्या’ म्हणत घोळवायची आणि हिंदु मत मांडायला आपणच बोलावलेल्यांची कुचंबणा करत, ‘कशी बोलती बंद केली’ यावर आपलीच पाठ थोपटून घ्यायची अन् म्हणायचे झाली चर्चा ! वागळेच का, कमी अधिक प्रमाणात सर्वच वाहिन्या अशाच प्रवाहाने दुथडी भरून वहातांना दिसतात. मारून-मुटकून, बडवून-बदडून हिंदुत्व संपणार नाही.

 

५. अन्य पंथांप्रमाणे हिंदूंमध्ये धर्मात घेण्याचा कोणता विधी नसतो, हेच त्याचे वेगळेपण !

हिंदुत्व तुमच्या अंगावरच्या वाहिनी-गणवेशासारखे वरवर पांघरलेले नाही. हिंदूंमध्ये ईश्‍वरवादी आणि निरीश्‍वरवादीही आहेत. त्यातही एकेश्‍वरी, अनेकेश्‍वरी पूजक आहेत. पूजकांमध्ये मूर्तीपूजक आहेत, तसेच मूर्तीपूजा न करता निसर्गतत्त्व पुजणारे आहेत. आकाराला पुजणारे, ॐकारालाही पुजतात ! वेद मानणारेही हिंदु आणि वेद न मानणारेही हिंदूच ! मुळात हिंदुत्व हे वैदिक परंपरा मानणारे, वेद हे मूळ आणि अभिजात वाङ्मय मानणारे अन् अवैदिक म्हणजे वेदांना पांढर्‍या कागदावरचे काळे अक्षर एवढीही किंमत न देणारे – या दोन टोकांच्या तीरांमधून वहात राहिले आहे. ‘आत्मा न मानणार्‍या, जे आहे, ते या देहाच्या भोगा-उपभोगातच आहे’, असे मानणार्‍या चार्वाकाला विरोध अवश्य झाला; पण सॉक्रेटिसप्रमाणे त्यांना विष प्यायला भाग पाडले गेले नाही. चार्वाक मताला आजही सन्मान मिळतो. वाहिन्यांचे वागळेपण आणि हिंदूंचे वेगळेपण येथे ठसठशीतपणे दिसते कि नाही ? इस्लाममध्ये ‘सुंता’ आणि ख्रिस्त्यांमध्ये ‘बाप्तिस्मा’ हा केवळ धर्मात येण्याचा (घेण्याचा ?) संस्कार असतो. हिंदु बालकाला ‘धर्मात’ घेण्याचा स्वतंत्र विधी नाही. इस्लाम आणि ख्रिस्त्यांत हे विधी मुद्दाम घातले गेले आहेत ! विशिष्ट नावगाव दिले नाही, तर आधीचा त्या हिंदु धर्माचा ठप्पा यांच्या कपाळी बसेल ! फूट पाडण्याचा खोडसाळ उद्योग करण्यासाठी हिंदुत्वविरोध, हिंदुत्वनिंदा यांचा व्यावसायिक ‘उद्योग’ जागतिक पातळीपर्यंत करतात. वाहिन्यांच्यामागे करोडोंनी पैसा वाहवतात. विरोधकांवर विचारविजय मिळविण्यासाठी त्यांना त्यांचे विचारमंडन करायला देऊन मग खंडण करायचे सोडून – ‘तुम्ही हा मुद्दा येथे आणू शकत नाही, हा प्रश्‍न तुम्ही मला विचारू शकत नाही, (कारण ‘मी संपादक-अँकर आहे’, हा माझा माज तुम्ही मान्य कराल, तरच तुम्हाला परत बोलावेन. नपेक्षा माझ्या अधिकारात तुमचा ‘पत्ता कट !’) ‘विचारांचा खून करणे’, ही तुमची प्रवृत्ती आहे.

या आधुनिक जाणत्यांनी (?) सनातन, विज्ञान, जात, निधर्मीपणा या शब्दांचे मूळ अर्थच पालटले आहेत.

 

६. पुरोगाम्यांना समजत नाही आणि जाणून
घेण्याची इच्छा नाही; म्हणून हिंदु धर्म आणि चालीरिती अगम्य !

‘धर्म’ या शब्दाचा मूळ अर्थ नैसर्गिक किंवा मूळ स्वभाव ! लज्जा हा स्त्रीधर्म, म्हणजे स्त्री स्वभावविशेष आहे. आदरातिथ्य हा गृहस्थधर्म, वात्सल्य हा मातृधर्म-पितृधर्म आहे. आता तुम्ही ‘निधर्मी’ आहात; म्हणजे नक्की काय ? तुमच्या आई-वडिलांविषयी, भाऊ-बहिणी, पत्नी, मुलेबाळे यांच्याविषयी जिव्हाळा प्रेम नाही तुम्हाला ? शेजारधर्म तुम्ही मानणार नाही; कारण त्यात ‘धर्म’ हा शब्द आहे, असे समजायचे ? पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, भगिनीधर्म, कन्याधर्म नाहीच का पाळणार तुम्ही ? तुम्ही धर्माचा संबंध शेंडी, नाक दाबून (!) केलेली पूजा, अगम्य (?) भाषेतले मंत्र, अवडंबर माजलेली तंत्रे यांच्याशी जोडणार ! अगम्य का, तर तुम्हाला समजत नाही म्हणून ! अवडंबर का, तर तुम्हाला त्यातला अर्थ समजावूनही घ्यायचा नाही. या जगात नवनवीन शिकून घेणार्‍याला काहीच अगम्य नाही. समजावून न घेता ‘जे आम्हाला अगम्य ते सर्वांना(च) अमान्य’, हा बकवास तरी बंद करा !  न पटणार्‍या विचारांचा निषेध करतांनाच त्यांचे अस्तित्व मान्य करणे, हे हिंदुत्व आहे.

 

७. ईश्‍वरीय निर्मितीवर श्रद्धा असलेले हिंदू,
तर स्वतःच्या तोकड्या बुद्धीवर भर असलेले पुरोगामी !

ईश्‍वरावर, त्याच्या कर्तेपणावर, त्याने आपल्याला निर्माण केले आहे, यावर अदम्य विश्‍वास ठेवाल, तर हिंदुत्व समजावून घेणे कठीण नाही; पण ईश्‍वराच्या अस्तिवावरच शंका घ्याल, तर मग तुमचे कठीण आहे. ही विचारधारा प्रेषित मानत नाही. स्वत: ईश्‍वराच्या इच्छेने त्याचे परमेश्‍वरस्वरूप जगाची विस्कटलेली घडी बसवायला अवतार घेते. हिंदु विचारधारा परमेश्‍वराच्या सत्तेला मानते. त्यामुळेच प्राचीन मुनी ‘ही अभिव्यक्ती ईश्‍वरीय आहे, परमेश्‍वरी कृपाप्रसाद आहे’, असे नि:संकोचपणे म्हणत ‘इदं न मम ।’ म्हणतात. आजकालचे ‘विचारवंत’ त्यांच्या टुकार मतांचं चार पानी चोपडं (?) सुद्धा स्वत:चे नाव ठळकपणे छापून प्रसिद्ध करतात. हा मानसिकतेतला भेद आहे. आपण ‘विचारवंत अमूक’ अशी स्वत:ची कंठाळी ओळख स्वत:च देत अनुयायी, साथी म्हणवणार्‍या आपल्या स्वजनांकडून लक्षलक्ष वेळा समाजाच्या कानठळी मारणार ! हिंदु विचारवंतांनी आणखी एक मुद्दा विचारात घेतला होता. व्यक्ती नाशवंत असते, मरते. कालांतराने तिचे नावही कोणाला आठवत नाही; पण विचार अमर्त्य असतो. त्याच्यावर व्यक्तीचे नाव कोरण्यापेक्षा तो अपौरुषेय विचार म्हणावा, ही भारतीय तत्त्वज्ञानाची सांगी आहे. पुरुष म्हणजे आत्मा. अपौरुषेय ते परमात्म्याकडून आलेले आहे. या जगड्व्याळ पसार्‍याला कोणीतरी निर्मिले आहे, हा पसारा कोणाकडून तरी चालवला जातो, काही कारणा-नियमांनी तो चालतोय. तो निर्मिक एका सूत्रानुसार ही व्यवस्था राबवत आहे. तिच्यामागे आखणी- रेखणी आणि सुनियोजित संचालन आहे.

सहिष्णुता म्हणजे दुसर्‍याच्या विचाराला आदरपूर्वक मान देऊन, त्याच्या वेगळ्या आचारांना अडथळा आणायचा नाही. चुकीचे समज, चुकीच्या रुढी या मानवी मानसाच्या त्रुटीतून येतात, काही काळ टिकतातही. जे कालाग्नीही जाळू शकत नाही, असे चिरंतन विचार भारतीय तत्त्वज्ञान म्हणून अमर होतात.’

– डॉ. विजय जंगम (स्वामी), कार्याध्यक्ष, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

पुरोगाम्यांनी केलेल्या सनातनवरील बंदीच्या मागणीवर शासनाने सद्सद्विवेक बुद्धी वापरून विचार करावा !

‘थोडे पुरोगामित्वाचार्य दाभोलकरांविषयी. त्यांचे यश जितक्या मिटक्या मारून ‘चर्चेत’ घेता, तितक्या प्रामाणिकपणे त्यांचे अपयश घ्याल का चर्चेत ? किती ठिकाणी त्यांचा लढाऊपणा टाकून ते पळाले ?, माघार घेऊन गेले ?, याचा पडताळा जगासमोर तुम्हीच आणाल, तर तुमचा प्रामाणिकपणा खरा ठरून झळालेल. नपेक्षा नि:पक्षपातीपणाची ढोंगबाजी यापेक्षा तुमच्या तथाकथित चर्चांना महत्त्व नाही !! पूर्वी काही घडले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदु महासभा ही पुरोगाम्यांची लक्ष्य बनत. सध्या रा.स्व.संघाबरोबर सनातन संस्था हे प्रमुख लक्ष्य आहे. ‘सनातन’ ही संस्था या लेखाच्या काही परिच्छेदांत वर्णन केल्याप्रमाणे धर्मप्रबोधनाचे काम करत आहे. ‘धर्मप्रसार आणि धर्म प्रबोधन यातील फरक जाणण्याएवढे शासन सुबुद्ध आहे’, अशी आमची श्रद्धा आहे. धर्माविषयी तर्कसंगत, बुद्धीला मान्य होणारे काम करणे, हा शासकीय रोष ओढवण्याचा गुन्हा नाही. तेव्हा ‘या संस्थेवर बंदी घाला’, अशी कितीही ओरड तथाकथित पुरोगाम्यांनी केली, तरी सुबुद्ध शासन आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरो, हीच आमची (आम्ही मानतो म्हणून) त्या परमेश्‍वर चरणी प्रार्थना !’

– डॉ. विजय जंगम (स्वामी), कार्याध्यक्ष, प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

 

Leave a Comment