ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

 ‘सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला, तर खग्रास चंद्रग्रहण होते. हिंदु धर्मशास्त्रात ग्रहणकाळात पाळावयाचे नियम दिलेले आहेत. त्यांचा उद्देश ग्रहणाचा व्यक्तीवरील आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम न्यून करणे किंवा टाळणे, हा आहे. ३१.१.२०१८ या दिवशी खग्रास चंद्रग्रहण होते. ‘ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेला एक साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला एक साधक यांची ग्रहणापूर्वी, ग्रहणारंभानंतर (ग्रहणाचा आरंभ झाल्यानंतर), ग्रहणमध्यानंतर, ग्रहणमोक्षानंतर (ग्रहण संपल्यानंतर) आणि ग्रहण संपल्यावर धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सचैल (सवस्त्र) स्नान केल्यानंतर अशा एकूण ५ टप्प्यांवर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

(वाचकांच्या माहितीसाठी : ३१.१.२०१८ या दिवशी झालेल्या चंद्रग्रहणाच्या संदर्भातील सूत्रे २९.१.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.)

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq३ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

२ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ग्रहणारंभापासून ते ग्रहणमध्यापर्यंत वाढत जाणे आणि ग्रहणमोक्षानंतर अन् सचैल स्नानानंतर ती न्यून होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये ग्रहणापूर्वी ते ग्रहणानंतर स्नान केल्यावर अशा सर्वच निरीक्षणांत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतांना ‘यू.टी.एस्’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या ऊर्जेची प्रभावळ मोजता आली अन् ती पुढीलप्रमाणे होती.

अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये ग्रहणापूर्वी असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा ग्रहणारंभानंतर पुष्कळ वाढली आणि ग्रहणमध्य झाल्यावर ती आणखी वाढली.

आ. ग्रहणमोक्षानंतर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत थोडी घट झाली.

इ. ग्रहणानंतर सचैल स्नान केल्यावर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी घट होऊन ती ग्रहणापूर्वी जेवढी होती, तेवढी साधारण झाली. यावरून ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला तो साधक सचैल स्नानानंतर मूळ स्थितीला आला’, असे म्हणता येईल. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या या साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा ग्रहणापूर्वी नव्हती आणि ती ग्रहणामुळे निर्माणही झाली नाही.

२ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये ग्रहणापूर्वी अल्प प्रमाणात नकारात्मक स्पंदने असणे, ग्रहणकाळात त्यात थोडी वाढ होणे आणि सचैल स्नानानंतर ती पूर्णपणे नष्ट होणे 

निरीक्षणांमध्ये आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात असल्याने तिची प्रभावळ मोजता आली नाही. (‘यू.टी.एस्’ स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते.) ती निरीक्षणे पुढे दिली आहेत.

अ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या या साधकामध्ये ग्रहणापूर्वी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती. ग्रहणारंभानंतर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली.

आ. ग्रहणमध्यानंतर साधकातील नकारात्मक ऊर्जा तेवढीच राहिली.

इ. ग्रहणमोक्षानंतर साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन ग्रहणापूर्वी जेवढी होती तेवढी झाली.

ई. ग्रहणानंतर सचैल स्नान केल्यावर साधकातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली.

या साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यामध्ये ग्रहणापूर्वी, ग्रहणकाळात आणि सचैल स्नान केल्यानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि त्रास नसलेला साधक यांच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

२ इ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाची प्रभावळ ग्रहणकाळात वाढली आणि त्याने सचैल स्नान केल्यावर ती थोडी घटली. याउलट आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाची प्रभावळ ग्रहणकाळात वाढली आणि सचैल स्नान केल्यावरही आणखी थोडी वाढली.

३. ग्रहणाच्या झालेल्या परिणामाचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. ग्रहणकाळात अनिष्ट शक्तींचा संचार वाढत असल्यामुळे वातावरण दूषित होणे आणि त्याचा परिणाम म्हणून ग्रहणकाळात दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जेत वाढ झालेली दिसून येणे

ग्रहणारंभ झाल्यावर वातावरण अनिष्ट शक्तींना पोषक बनते. त्यामुळे वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार वाढतो. त्यांच्याकडून त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होत असल्याने वातावरण दूषित बनते. त्यामुळे ग्रहणकाळात वनस्पती, पशु-पक्षी, मानव, अन्न यांवर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होतो, तसेच व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्यास तिच्या त्रासांत वाढ होऊ शकते. चाचणीतील दोन्ही साधकांतील नकारात्मक स्पंदनांमध्ये ग्रहणकाळात वाढ होण्यामागील कारण यातून स्पष्ट होते.

३ आ. ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होणे, यांमागील कारण

ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान करण्याचे कारण म्हणजे ‘ग्रहणाचा अनिष्ट परिणाम व्यक्तीने घातलेल्या कपड्यांवर, तसेच व्यक्तीवर टिकून राहिला असेल, तर तो निघून जावा’, हे आहे. दोन्ही साधकांनी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार ग्रहणमोक्षानंतर सचैल स्नान केले. त्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकात ग्रहणामुळे वाढलेली नकारात्मक ऊर्जा न्यून झाली. तसेच आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये ग्रहणानंतर थोडीफार राहिलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट झाली. थोडक्यात सांगायचे, तर सचैल स्नानामुळे साधकांवर झालेला ग्रहणाचा अनिष्ट परिणाम दूर झाला.

३ इ. ग्रहणमोक्षानंतर सचैल (सवस्त्र) स्नान केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या प्रभावळीत घट होणे आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या प्रभावळीत वाढ होणे, यांमागील कारण

‘ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो. ग्रहणकाळात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. हे दोन्ही साधक अनेक वर्षांपासून नियमित साधना करत आहेत. ग्रहणकाळातही त्यांनी नामजप करणे, सत्सेवा करणे, या कृती चालू ठेवल्या होत्या. तसेच धर्मशास्त्रात ग्रहणासंबंधी सांगितलेल्या नियमांचे पालनही केले होते.

त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्यावर झालेला ग्रहणाचा अनिष्ट परिणाम दूर होण्यास साहाय्य झाले. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या प्रभावळीत ग्रहणाच्या परिणामामुळे निर्माण झालेली नकारात्मकता सचैल स्नानानंतर अल्प झाल्याने त्याची प्रभावळ थोडी घटली. असे असले तरी, येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे, त्याने ग्रहणकाळात केलेल्या साधनेमुळे त्याची प्रभावळ ग्रहणापूर्वीच्या तुलनेत वाढली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या प्रभावळीत ग्रहणकाळात, ग्रहणमोक्षानंतर आणि सचैल स्नानानंतर उत्तरोत्तर वाढ होत गेली. याची कारणे ‘त्याला आध्यात्मिक त्रास नसणे, तसेच ग्रहणकाळात केलेल्या साधनेचा त्याला पूर्ण लाभ मिळणेे’, ही आहेत. या निरीक्षणांतून ‘ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे का महत्त्वाचे आहे ?’, हे लक्षात येते.

साधना करणारा जीव ग्रहणाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ करून घेतो. सर्वसाधारण व्यक्ती साधना करत नसल्याने तिच्यावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी केवळ ग्रहणकाळातच नव्हे, तर इतर वेळीही साधना करण्याला पर्याय नाही !’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]