ख्रिस्ती धर्मानेच ‘सहिष्णुते’चे थडगे बांधले आहे !

धर्मांतराच्या सूत्रावरून ख्रिस्ती आणि ख्रिस्तीधार्जिण्या विचारवंतांनी प्रचाराचा गदारोळ उठवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हिंदुत्वनिष्ठांवर हिटलरचे वारस असण्याचाही आरोप केला जात आहे. या आरोपात आकांडतांडवाच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. त्याच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावाही दिलेला नाही. ख्रिस्ती पंथाचा उगम आणि प्रसार यांचा इतिहास दडवून ठेवूनच हा आरोप केला जात आहे. ख्रिस्ती पंथ म्हणजे जणू धार्मिक सहिष्णुतेचा कळस असल्याचा आव आणला जातो. ज्या राष्ट्रातील लोकांचे धर्मांतर घडवून आणण्यात येते, त्या राष्ट्राच्या आत्म्यावर जो वार केलेला असतो, त्याची पुसटशी स्वीकृतीही घेतली जात नाही. ख्रिस्ती पंथाने ‘सहिष्णुते’चे थडगे कसे बांधले आहे, याचा ऊहापोह या लेखाद्वारे करत आहोत. ‘सहिष्णुता’ वा ‘असहिष्णुता’ यांवर चर्चा नवीन नाही.

१. ख्रिस्त्यांनी अनेकांचे धर्मांतर घडवून आणल्यावर त्यांना थांबवण्याचा अर्धवट प्रयत्न रोमन लोकांनी करणे

‘ख्रिस्ती पंथ म्हणजे जणू धार्मिक सहिष्णुतेचा कळस असल्याचा आव आणला जातो. ज्या राष्ट्रातील लोकांचे धर्मांतर घडवून आणण्यात येते, त्या राष्ट्राच्या आत्म्यावर जो वार केलेला असतो, त्याची पुसटशी स्वीकृतीही फादर दिब्रिटो यांच्या लेखात नाही; पण इतिहास काय सांगतो ? रोमन साम्राज्याचा इतिहास काय सांगतो ? रोमन राज्यकर्ते मुक्त विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. देवांचा कोणी अपमान केला, तर देवांनी त्याला बघून घ्यावे, असे रोमन सम्राट टायबेरियस याची अधिकृत भूमिका होती. त्यामुळे ‘आमचाच देव खरा, तोच एकटा संपूर्ण विश्‍वाचा अधिष्ठाता’ ही ख्रिस्त्यांची भूमिका रोमन लोकांना हेकटपणाची, असहिष्णु, समाजविरोधी, धोकादायक आणि विषारी वाटली, तरी रोमनांनी त्यांना प्रतिबंध केला नाही. पुढे विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अपलाभ उठवून ख्रिस्ती पंथाने अनेक गोरगरीब रोमन लोकांचे धर्मांतर घडवून आणले. तेव्हा ख्रिस्ती पंथाला प्रतिबंध करण्याचे अर्धवट प्रयत्न केले गेले; मात्र रोमनांच्या रोमारोमांत विचारस्वातंत्र्य भिनले असल्याने त्या प्रयत्नांमध्ये फारसा जीव नव्हता. (जे.बी. बेरी यांच्या ‘हिस्टरी ऑफ द फ्रिडम ऑफ थॉट’ या पुस्तकातून आणि चार्लस् गिबन यांच्या डिक्लाईन अ‍ॅन्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर पुस्तकातून)

२. ज्या देशात चर्चच्या हाती सत्ता असते, तेथे विचारस्वातंत्र्य नसतेच !

दुसर्‍या शतकातील अनेक ‘अपॉलॉजिस’ प्रसिद्ध आहेत. त्या वाचताच पहिली गोष्ट लक्षात येते की, ख्रिस्ती पंथाव्यतिरिक्त अन्य धर्मांची ससेहोलपट करण्यात येईल. एखाद्या ‘असहिष्णु’ पंथाच्या विरुद्ध कठोर कारवाई करायची, म्हणजे नेमके काय करायचे, याची कल्पना नसल्याने रोमन राज्यकर्त्यांनी गुळगुळीत उपाय योजले. कठोर कारवाई म्हणजे काय ?, याची कल्पना चर्चला होती. (संदर्भ : जुना करार – ड्युटरॉनॉमी) रोममध्ये सत्ता हाती येताच चर्चने विचारस्वातंत्र्य काढून घेतले. विचारस्वातंत्र्याच्या नावे यापैकी एकही बळी गेला नव्हता. ज्या देशात चर्चची सत्ता नसते, तेथे चर्च विचार आणि धार्मिक स्वातंत्र्य यांची मागणी करते; परंतु जेथे सत्ता चर्चच्या हाती असते, तेथे हे स्वातंत्र्य कदापि देत नाही. (जे.बी. बेरी यांच्या ‘हिस्टरी ऑफ द फ्रिडम ऑफ थॉट’ या पुस्तकातून आणि चार्लस् गिबन यांच्या ‘डिक्लाईन अ‍ॅन्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ पुस्तकातून)

३. ग्रीक आणि रोमन विचारवंत जे.बी. बेरी यांचे खिस्ती पंथाविषयीचे मत

३ अ. ‘मी परमेश्‍वराचा पुत्र म्हणून घेणार्‍याला शरण गेल्यासच परमेश्‍वराच्या राज्यात जागा मिळते’, ही ग्रीक आणि रोमन यांना भाकडकथा वाटणे

सुशिक्षित ग्रीक आणि रोमन नागरिक चिकित्सक विचारांचे मित्र होते अन् म्हणूनच उपजत सहिष्णुसुद्धा होते. स्वत:ला अस्खलनीय मानणारे ग्रीक आणि रोमन यांना ‘धार्मिक सत्तेच्या पायाशी अक्कल गहाण ठेवा’ वा ‘अमूक मताला’ किंवा ‘मी परमेश्‍वराचा पुत्र म्हणून घेणार्‍याला शरण गेल्यासच परमेश्‍वराच्या राज्यात जागा मिळते’, या कल्पना भाकडकथा वाटतात.

३ आ. कडवे ख्रिस्ती धार्मिक धोरण आणि त्याचे घोर परिणाम यांनी जातीवंत विचारवंतांना जागे करणे

ख्रिस्ती चर्चने कार्यवाहीत आणलेले कडवे धार्मिक धोरण आणि त्याचे घोर परिणाम यावर वैचारिक स्वातंत्र्याचा बौद्धिक आणि तार्किक आधार काय असू शकतो, या प्रश्‍नाने पुढे जातीवंत विचारवंतांना (कुठल्याही प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन विचार करत होते, अशांना) जागे केले. चर्चसमवेतच्या त्या लढ्यात चर्चने पेटवलेले सहस्रोजण आगीत जळून गेले. या सर्वांच्या आत्मबलीदानामुळे ग्रीक आणि रोमन विचारवंत यांच्या ग्रंथांमध्ये दडून बसलेला विचारस्वातंत्र्याचा आत्मा शेकडो वर्षांच्या अंध:कारातून सूर्यप्रकाशात आला.

४. हिटरललाही लाजवतील, अशा क्रूर प्रसंगांनी भरलेले ‘जुना करार ‘!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अनेकांनी टीका केली असून त्यापैकी एक म्हणजे फादर दिब्रिटो ! त्यांचा एक आरोप आहे की, संघ हिटलरचा आदर्श गिरवत आहे; मात्र ते नेमके काय करत आहेत, हे सांगण्याचे त्यांनी चलाखीने टाळले आहे. खुद्द हिटलरने जी रक्तपाती कृत्ये केली, त्याची उदाहरणे हिटलरला ‘जुना करार’ आणि ख्रिस्ती चर्चने ज्यू वा अरब यांना जी वागणूक दिली, त्यात मिळाली असण्याची दाट शक्यता आहे. माल्कम नावाचे कॅथोलिक इतिहासकार सांगतात की, वर्ष १०९६ मध्ये झालेल्या पहिल्या क्रुसेडचा प्रारंभ आणि शेवट ज्यू लोकांच्या रक्तपाताने झाला.

५. ख्रिस्त्यांनी ज्यू लोकांच्या केलेल्या अमानुष हत्या

लॉर्ड एक्टन हे दुसरे कॅथोलिक इतिहासकार लिहितात की, खांद्यावर क्रूस धारण करणार्‍यांनी प्रभु भोजनाचा (कम्युनियन) विधी आटोपताच दिवसाचा उरलेला वेळ ज्यू लोकांच्या माना तोडण्यात घालवला. त्या वेळी त्यांनी ६ सहस्र महिला आणि पुरुषांना ठार केले. गॉडफ्रे ऑफ बुईवा याने इ.स. १०९९ च्या उन्हाळ्यात जेरुसेलम काबीज केले. त्याने पुढचा संपूर्ण आठवडा रहिवाशांची हत्या केल्या. ज्यू लोकांना त्याने सभास्थानी (‘सिनेगॉग’मध्ये) बंद केले आणि नंतर त्याने ‘सिनेगॉग’ला आग लावली. गॉडफ्रे याने त्याच्या त्या कृत्याचे वर्णन करणारे पत्र पोपला पाठवले. त्यात त्याने म्हटले आहे की, आमच्या लोकांनी इतक्या सारसिनींना (ज्यू वा मुसलमान यांना) कंठस्नान घातले की, ‘सालोमनचे देऊळ आणि पोर्च एखाद्या घोड्याच्या गुडघ्याला लागेल, इतक्या उंचीपर्यंत केवळ मानवी रक्ताच्या डोहाने भरले होते.’

६. नाझी आणि ख्रिस्ती यांत भेद नाहीच !

माल्कम म्हणतात की, ‘क्रुसेडर्स’ आणि ‘इन्क्वीझिशन’वाले या दोघांत कानामात्रेचा भेद नव्हता. माणुसकीच्या अभावामध्ये ल्युथर, काल्विन, तसेच अन्य दुसरे सेंट (संतमहात्मे) यांच्यात डावे-उजवे करता आले नसते. (लेखक – वॉल्टर काफमन यांच्या ‘फेथ ऑफ अ हेरेटीक’ या पुस्तकातील, पृष्ठ ६९) ‘कमिटेड ख्रिश्‍चन’, ‘कम्युनिस्ट’, नाझी वा अन्य कुणी यांच्यात भेद करण्याचे कारण नाही. माल्कम हे यांचे ‘युरोप एन्ड द ज्यूज’ किंवा फुल्टन यांचे ‘फाईव्ह हंड्रेड इयर्स ऑफ ए रिलीजन’ (तीन खंड) ही पुस्तके ख्रिस्ती बांधवांनी आवर्जून वाचावी. ती न वाचणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात रहाण्यासारखेच आहे.

७. चर्चच्या फादरची सहिष्णुता (?)

आता चर्चचे फादर यांच्या सहिष्णुतेविषयी थोडेसे. माल्कम हे सांगतात की, सेंट अम्ब्रोज (इ.स.३३७ ते ३९७) म्हणत असे की, सभास्थान (सिनेगॉग) म्हणजे साक्षात पाप आणि अधर्म यांचे घर, दुष्टता आणि दुर्जन यांचे अधिष्ठान ! खुद्द देवानेच सभास्थानाला (सिनेगॉगला) पापी (कंडेम्ड) ठरवले आहे. सेंट अम्ब्रोज यांचे प्रवचन ऐकणार्‍यांपैकी काहींनी ते सभास्थान (सिनेगॉग) जाळून टाकले. तेव्हा महात्मा (?) अम्ब्रोज उद्गारले, ‘या सभास्थानाला (सिनेगॉगला) आग मीच लावली’, असे मी घोषित करतो. ‘ख्रिस्ताला ज्या ठिकाणी नकार दिला गेला, असे काहीही मागे शिल्लक रहाता कामा नये’, म्हणून सभास्थानाला (सिनेगॉगला) आग लावण्यात आलेली आहे.

८. ख्रिस्तभक्तांनी छोट्या-मोठ्या कारणांवरून केलेल्या सहस्रो ज्यूंच्या हत्या

साधारण १७ व्या शतकापर्यंत तरी एवढ्या तेवढ्या कारणांवरून ख्रिस्तभक्त ज्यू लोकांच्या हत्या करत. प्रभु भोजनाच्या प्रसंगी चर्चमध्ये पाव आणि ‘वाईन’ यांचा प्रसाद वाटला जातो. पाव म्हणजे प्रतीकरूपी ख्रिस्ताचा देह आणि ‘वाईन’ म्हणजे रक्त. ‘पाव आणि रक्त ग्रहण करणारा मेल्यावर स्वर्गात जातो’, अशी समजूत ख्रिस्तभक्तांमध्ये होती. एकप्रकारच्या बुरशीमुळे कधी कधी हा पाव लाल रंगाचा बनतो. पाव लाल बनला की, ‘कुणा दुष्ट ज्यूने ख्रिस्ताच्या देहात सुरा खुपसला’, अशी आवई उठे आणि पाठोपाठ शे-दोनशे ज्यूंचा जीव घेण्यात येई. ‘इन्क्वीझिशन’च्या काळात चेटकाच्या आरोपाखाली छोट्या-मोठ्या वयाच्या सहस्रो स्त्रियांना ‘क्रूस’ला बांधून जिवंत जाळण्यात आलेले होते.’ (लेखक – चार्ल्स मॅके यांच्या ‘एक्स्ट्राऑर्डिनरी पॉप्युलर डेल्युजन्स अ‍ॅण्ड मॅडनेस ऑफ द क्राऊड्स’ या पुस्तकातून)

Leave a Comment