गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.टी.एस्. उपकरण

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात; म्हणूनच आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. ईश्‍वरप्राप्तीसाठीच्या प्रयत्नांमध्ये, म्हणजेच साधनेतही प्रामुख्याने स्वभावदोषांचाच (षड्रिपूंचाच) अडथळा असतो. काम-क्रोधादी षड्रिपूंच्या प्रभावामुळे अनेक थोर तपस्वी मुनीश्रेष्ठांचे अन् पुण्यशील राजांचे परमार्थपथावरून पतन झाल्याची अनेक उदाहरणे पुराणांतील कथांमध्ये सापडतात. सच्चिदानंदमय ईश्‍वराशी एकरूप होणे, हे कोणत्याही योगमार्गानुसार साधना करणार्‍या साधकाचे ध्येय असते. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत (टीप १) स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया (टीप २) साधकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. साधकांनी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवल्यामुळे त्यांच्यातील स्वभावदोषांची तीव्रता लक्षणीयरित्या उणावते. त्यामुळे त्यांच्या आनंदात वाढ होते. देशविदेशातून अनेक साधक स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे कशी राबवायची ?, हे शिकण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येतात. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. ८.१२.२०१७ आणि ४.१.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

टीप १ – गुरुकृपायोगानुसार साधना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून काढलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर संगम झालेला आहे. तसेच यामध्ये स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती, अशी व्यष्टी अष्टांग साधना आणि समाजात साधनेचा प्रचार करायची समष्टी साधना, या साधना असल्याने साधकाची अल्प कालावधीत जलद आध्यात्मिक उन्नती होते. याची प्रचीती सनातनचे साधक घेत आहेत. याची सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ गुरुकृपायोगानुसार साधना यात दिली आहे.

टीप २ – स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया

स्वभावदोषांमुळे व्यक्तीवर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर दुष्परिणाम होतात. स्वभावदोषांमुळे होणारे हे दुष्परिणाम टाळून तिला यशस्वी आणि सुखी जीवन जगता यावे, यासाठी तिच्यातील स्वभावदोष दूर करून तिच्या चित्तावर गुणांचा संस्कार निर्माण करण्याच्या प्रक्रियेला स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया, असे म्हणतात. (संदर्भ : सनातनची स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया या विषयावरील ग्रंथमालिका)

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीमध्ये सहभागी झालेला एक साधक आणि एक साधिका काही वर्षांपासून गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत; पण त्यांनी या कालावधीत स्वतःतील स्वभावदोष घालवण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील स्वभावदोष त्यांच्या साधनेमध्ये अडथळे ठरत होते. या दोन्ही साधकांनी गोवा (रामनाथी) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया कशी राबवायची ?, हे त्या विषयातील तज्ञ आणि उन्नत साधिकांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेतले अन् ती गांभीर्याने राबवण्याचे प्रयत्न केले. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी त्यांची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. त्यांनी ही प्रक्रिया अनुमाने १ मास राबवल्यानंतर त्या दोघांची पुन्हा एकदा निरीक्षणे नोंद करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यावरून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे या दोन्ही साधकांना काय लाभ झाला ?, हे लक्षात आले.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील यू.टी.एस् उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण, घटकाची प्रभावळ मोजणे, परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq३ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे एक साधक
आणि एक साधिका यांवर झालेल्या परिणामांची निरीक्षणे अन् त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी साधिकेमध्ये पुष्कळ प्रमाणात असलेली नकारात्मक ऊर्जा प्रक्रिया राबवल्यानंतर पुष्कळ प्रमाणात न्यून होणे : स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी आणि प्रक्रिया राबवल्यानंतर साधकामध्ये इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हत्या.

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी साधिकेमधील इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा मोजतांना यू.टी.एस्. स्कॅनरने १८० अंशाचा कोन दर्शवला. या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.०९ मीटर होती. साधिकेने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यानंतर पुन्हा तिच्यातील नकारात्मक ऊर्जा मोजल्यावर ती पुष्कळ प्रमाणात न्यून झाल्याचे दिसून आले. तेव्हा स्कॅनरने केवळ ४५ अंशाचा कोन दर्शवला. त्यामुळे त्या ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही. (यू.टी.एस्. स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यानंतर दोन्ही साधकांमध्ये अल्प प्रमाणात असणार्‍या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी दोन्ही साधकांमध्ये सकारात्मक ऊर्जा अगदी अल्प प्रमाणात होती. तेव्हा स्कॅनरने दोन्ही साधकांसाठी ३० अंशाचा कोन दर्शवला. या दोन्ही साधकांनी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. तेव्हा स्कॅनरने साधक आणि साधिका यांच्यासाठी अनुक्रमे १२० अन् १०० अंशाचा कोन दर्शवला.

२ इ. साधकांच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यामुळे दोन्ही साधकांच्या प्रभावळीत वाढ होणे : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आरंभ करण्यापूर्वी साधक आणि साधिका यांची प्रभावळ अनुक्रमे १.५२ मीटर अन् १.५० मीटर होती. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यानंतर त्यांची प्रभावळ अनुक्रमे १.७४ मीटर आणि १.६० मीटर झाली, म्हणजे दोघांच्या प्रभावळीत अनुक्रमे २२ सें.मी. अन् १० सें.मी. वाढ झाली.

 

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. साधिकेतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात
न्यून झाल्याचे आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे कारण

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यापूर्वी या साधिकेची मानसिक स्थिती नकारात्मक होती. तिचा साधनेतील उत्साह उणावला होता. तिने सात्त्विक अशा सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात येऊन स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आणि ही प्रक्रिया १ मास प्रभावीपणे राबवून स्वतःतील नकारात्मक विचार करणे इत्यादी स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासंदर्भात तिला उन्नत साधक अन् संत यांचे मार्गदर्शनही मिळाले. आश्रमातील साधनेला पोषक अशा सात्त्विक वातावरणाचाही तिला लाभ झाला, तसेच तिच्यावर या सात्त्विक वातावरणामुळे आध्यात्मिक उपायही झाले. यांमुळे तिच्याभोवती असणार्‍या नकारात्मक स्पंदनांचे विघटन होऊ लागले आणि तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होऊ लागली. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यानंतर यू.टी.एस्. स्कॅनरद्वारे केलेल्या निरीक्षणातही या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाल्याचे आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे दिसून आले. या साधिकेच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या उन्नत साधिकेनेही या साधिकेने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया चांगल्या तर्‍हेने राबवल्याचे नमूद केले. साधिकेने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया चांगल्या तर्‍हेने राबवल्यामुळे तिचा उत्साह वाढला आणि तिला आनंद मिळू लागला. यावरून साधनेसाठी पोषक वातावरण मिळाले आणि साधकाने त्याचा लाभ करून घेऊन स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवली, तर त्याला आध्यात्मिकदृष्ट्या कसा लाभ होऊ शकतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून दिसून आले. आपल्यामध्ये तीव्र स्वभावदोष असतील, तर वातावरणातील वाईट शक्तींना आपल्यामध्ये स्थान निर्माण करून शिरकाव करणे सोपे जाते; म्हणून वाईट शक्तींचा त्रास होऊ नये, यासाठी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.

३ आ. साधकाने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवल्यावर त्याच्यामध्ये आरंभी नकारात्मक ऊर्जा नसूनही प्रक्रियेमुळे त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा साधिकेच्या तुलनेत अपेक्षित अशी न वाढणे आणि याचे कारण त्याचे साधिकेच्या तुलनेत स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे प्रयत्न अल्प होणे, हे असणे

चाचणीमध्ये सहभागी झालेल्या साधकानेही रामनाथी येथील आश्रमात येऊन स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया १ मास राबवली. आश्रमातील साधनेला पोषक अशा सात्त्विक वातावरणाचा त्याला लाभ झाला. त्यामुळे त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा वाढली; पण या साधकामध्ये चाचणीच्या आरंभी नकारात्मक ऊर्जा नसूनही त्याच्यामध्ये साधिकेच्या तुलनेत सकारात्मक ऊर्जा फारशी अधिक वाढली नाही. या साधकाच्या साधनेचा आढावा घेणार्‍या उन्नत साधिकेने चाचणीतील साधिकेच्या तुलनेत या साधकाचे स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे प्रयत्न अल्प झाल्याचे सांगितले. या साधकाने साधिकेप्रमाणे प्रयत्न केले असते, तर त्याला निश्‍चितच अधिक प्रमाणात लाभ झाला असता. यावरून साधनेसाठीच्या सात्त्विक वातावरणासह साधनेसाठी स्वतःचे क्रियमाण योग्य प्रकारे वापरण्याचे महत्त्वही लक्षात येते.

३ इ. साधिकेपेक्षा साधकाची प्रभावळ थोड्या अधिक प्रमाणात वाढण्याचे कारण

चाचणीच्या आरंभी साधिका आणि साधक यांची प्रभावळ एकसारखीच होती. चाचणीच्या आरंभी साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात होती. त्यामुळे साधनेमुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा तिच्यामध्ये असलेली त्रासदायक शक्ती नष्ट करण्यासाठी उपयोगात आली; म्हणून तिची प्रभावळही अल्प प्रमाणात वाढली.

याउलट साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती. त्यामुळे त्याने स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे प्रयत्न साधिकेपेक्षा अल्प प्रमाणात करूनही त्याला त्या साधनेचा पूर्ण लाभ झाला. त्यामुळे त्याची प्रभावळ साधिकेच्या तुलनेत थोड्या अधिक प्रमाणात वाढली.

३ ई. साधनेसाठी पोषक वातावरण मिळणे, हे पूर्वसुकृतावर अवलंबून असणे;
पण साधनेचे प्रयत्न करण्यासाठी स्वतःचे क्रियमाण पूर्णपणे वापरणे आवश्यक असणे

साधकाला साधनेसाठी सात्त्विक वातावरण मिळणे वा न मिळणे, हे त्याच्या पूर्वसुकृतानुसार अवलंबून असते; परंतु साधनेअंतर्गत सांगितलेले प्रयत्न करणे, त्यात सातत्य राखणे, उन्नत साधकाचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार तळमळीने प्रयत्न करणे, यांसाठी त्या साधकाने स्वतःचे क्रियमाण पूर्णपणे वापरणे आवश्यक ठरते. या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या साधिकेने प्रक्रिया राबवतांना जसे साधनेचे प्रयत्न केले, तसे प्रयत्न पुढेही केले, तर तिच्यातील नकारात्मक स्पंदने पूर्णपणे नष्ट होऊ शकतात आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्याचा सुपरिणाम तिच्यासह सभोवतालच्या वातावरणावरही होऊ शकतो. साधकामध्ये नकारात्मक स्पंदने मुळीच नसल्याने त्याने साधिकेप्रमाणे प्रयत्न वाढवले, तर त्याला साधनेच्या दृष्टीने लवकर लाभ होऊ शकतो.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.१.२०१८)

ई-मेल : [email protected]

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्‍लेषण)

Leave a Comment