सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन

जिवाची साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी त्याच्याकडून अधिकाधिक सात्त्विकता प्रक्षेपित होऊन त्याच्या संपर्कातील वस्तू, वास्तू आणि आसपासचे वातावरण चैतन्यमय बनू लागते. मंदिरे, संतांची समाधीस्थळे आणि संत रहात असलेले आश्रम चैतन्यमय झालेले असतात अन् सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण करत असतात. थोडक्यात साधनेमुळे व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात आणि त्याचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल, या उद्देेशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्या संदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास केला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना, वस्तू, वास्तू किंवा वातावरण यांतील असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे. गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात घडलेल्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यात आला. तो पुढे दिला आहे.

 

१. वैशिष्ट्यपूर्ण घटना

सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य असलेल्या गोवा येथील सनातन आश्रमाच्या कोटा लादीवर वर्ष २०१३ मध्ये काही ठिकाणी आपोआप ॐ उमटले होते. १५.१२.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण झाल्याची दिसली.

 

२. घटनेचा केलेला अभ्यास

लादीवरील ॐ भोवती बनलेल्या पांढरट वलयांची पुढील वैशिष्ट्ये लक्षात आली.

अ. वर्ष २०१३ मध्ये कोटा लादीवर काही ठिकाणी ॐ उमटल्याचे प्रथम लक्षात आले.

आ. आधी अस्पष्ट दिसणारे ॐ जसजसा काळ लोटत गेला, तसतसे अधिकाधिक स्पष्ट दिसू लागले.

इ. या ॐ भोवती साधारण २६ सेंटीमीटर व्यासाची पांढरट रंगाची वलये निर्माण झाली.

ई. या वलयांकडे पाहून सूक्ष्म-स्पंदने अनुभवू शकणार्‍या साधकांना चांगले जाणवते.

उ. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना या वलयांकडे पाहू नये, असे वाटते.

ऊ. लादीवर उमटलेल्या ॐ पासून साधारण अर्ध्या मीटर अंतरावर वाईट शक्तींनी एक तोंडवळा उमटवला आहे; पण या तोंडवळ्याभोवती असे वलय निर्माण झालेले नाही.

 

३. वैशिष्ट्यपूर्ण घटनेमागील अध्यात्मशास्त्र

३ अ. सनातन आश्रमातील चैतन्यामुळे तेथील लादीवर अनेक ठिकाणी ॐ हे सात्त्विक चिन्ह उमटणे

सनातन आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले, संत, साधक आदी सात्त्विक जिवांचे असणारे वास्तव्य आणि आश्रमात चालणारे धर्मकार्य यांमुळे तेथे पुष्कळ चैतन्य आहे. त्याचा परिणाम जसा आश्रमात रहाणार्‍या व्यक्तींवर होतो, तसाच तो आश्रमाच्या वास्तूवरही झाला आणि त्यामुळे आश्रमात अनेक ठिकाणी ॐ हे सात्त्विक चिन्ह उमटले आहे.

३ आ. कृत्रिम टाइल्सऐवजी नैसर्गिक कोटा लादीवर ॐ उमटणे

कोटा लादी म्हणजे एका विशिष्ट दगडाचे साधारण एकसारखी लांबी, रूंदी आणि जाडी असलेले तुकडे. कृत्रिमपणे बनवलेल्या टाईल्सपेक्षा दगडामध्ये चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे सनातन आश्रमात चैतन्यामुळे आपोआप उमटलेले ॐ टाईल्सऐवजी कोटा लादीवर आढळतात.

३ इ. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये का बनली ?

परमेश्‍वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे बनली आहेत.

 

४. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

या वलयांकडे पाहिल्यावर ही पवित्र भूमी नामजप करत आहे आणि त्या नामजपाचे चैतन्य वलयांद्वारे सर्वत्र पसरत आहे, असे जाणवले. ही वलये म्हणजे ॐ मधील चैतन्याची स्पंदने काळानुसार कार्यरत होत असल्याचे दर्शक असल्याचेही जाणवले. संत आणि द्रष्टे यांनी सांगितलेला आपत्काळ जवळ येत आहे. आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी ईश्‍वराने दिलेली ही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आहे.

थोडक्यात सांगायचे, तर सनातन आश्रमातील चैतन्यामुळे लादीवर ॐ उमटले आणि या ॐमधून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे त्याभोवती पांढरट वलये निर्माण झाली.

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.१.२०१८)

ई-मेल : [email protected]

 

तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

वस्तू आणि वास्तू यांसंदर्भातील आध्यात्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांविषयी अधिक संशोधन करून त्यामागचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये बनण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? अशा वलयांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ? या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment