सनातनच्या साधकांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद ! – श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

मुंबई येथे श्री महास्वामीजींचा सुवर्णजन्म जयंतीमहोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !

मुंबई  – चेंबूर येथील श्री हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्णजन्म जयंतीमहोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी यांना विविध प्रकारचे पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यांचा सुवर्ण मुद्राभिषेक करण्यात आला. या मंगल प्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने श्री. अभय वर्तक यांनी श्री महास्वामीजींच्या चरणी कृतज्ञता पुष्प अर्पण करून त्यांना धर्मशिक्षण फलक हा सनातनचा ग्रंथ भेट दिला. या वेळी सुवर्णजन्म महोत्सवाचे मुख्य सल्लागार श्री. एम् चंद्रमौळीस्वरन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता सौ. विजयलक्ष्मी वेंकटरमणी, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, हे उपस्थित होते.

श्री महास्वामीजींनी सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही धीरोदात्तपणे कार्य करत आहात. तुम्हा सर्वांचा समर्पण भाव आणि श्रद्धा कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद आहेत. मी सनातन प्रभात कन्नड पत्रिका नियमितपणे वाचतो. तुमच्यावर किती आघात होत आहेत, तरीही तुमचे धर्मकार्य करणे चालूच आहे. मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एकदा येईन.

श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य संस्थान शकटपूरम विद्यापिठाचा इतिहास आणि कार्य !

१४ ते १५ व्या शतकातील विजयनगर राज्यातील ऐतिहासिक नोंदीवरून श्री जगद्गुरु बद्री शंकराचार्य संस्थान शकटपूरम विद्यापिठाविषयी पूर्ण माहिती मिळते. इसवी सन १३३८ च्या सुमारास परकीय आक्रमणामुळे जगद्गुरु श्री सत्यतीर्थ महामुनी बद्रीनाथ सोडून अध्यात्मसाधना आणि धार्मिक प्रसार यांसाठी अडथळा येणार नाही असे स्थान शोधत दक्षिणेस आले. त्यांनी यासाठी कर्नाटकातील तुंगा नदीच्या काठावर शकटपुरमची निवड केली आणि पीठ परंपरेच्या स्थापनेसाठी तीच योग्य जागा म्हणून निवडली. तेव्हापासून शकटपुरम हे साधना-तपश्‍चर्या यासाठी प्रसिद्ध झाले.

संस्थानाद्वारे वेद, वेदांत, शास्त्रे यांवर सभा होतात, विविध धार्मिक होम-हवन केले जातात. वेदपाठशाळा, गोशाळा, अन्नछत्रे, आदी धर्मकार्येही संस्थानाद्वारे पार पाडली जातात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment