सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ध्यानमंदिरात पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण आरास

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती. ध्यानमंदिरातील आरासाची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी ।’ (अर्थ : दिव्याची ज्योत अगदी लहानशी असते; पण तिच्यात पूर्ण खोली उजळून टाकण्याचे सामर्थ्य असते.) त्याप्रमाणे सध्याच्या अंध:कारमय परिस्थितीत हे हिंदु राष्ट्ररूपी दिवे विश्‍वरूपी खोली उजळून टाकण्याची जणू प्रचीतीच देत आहेत !

दिव्यांचा प्रकाश आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे प्रत्यक्ष देवतांच्या अस्तित्वाचा अनुभव देणारे आश्रमातील ध्यानमंदिर. प्रत्येक दिव्याच्या ज्योतीतून प्रकाशकिरण बाहेर पडतांना दिसत आहे.
दीपलक्ष्मी
ध्यानमंदिराच्या बाहेरील अंगणात पणत्या लावल्याचे दिसत असले, तरी ते ध्यानमंदिरात लावलेल्या पणत्यांचे खिडकीच्या काचेत उमटलेले प्रतिबिंब (बाणाने दाखवले आहे) आहे.
एका रांगेत लावलेल्या पणत्यांतून वर्ष २०१६ मध्ये प्रक्षेपित होणारा लालसर प्रकाश
वर्ष २०१७ मध्ये लावलेल्या पणत्यांतून प्रक्षेपित होणारी निळसर गुलाबी प्रकाशवलये
वर्ष २०१६ मध्ये लावलेल्या पणत्यांची लालसर दिसणारी ज्योत आणि प्रकाश
वर्ष २०१७ मध्ये लावलेल्या पणत्यांतून प्रक्षेपित होणारी निळसर गुलाबी प्रकाशवलये

‘आश्रमातील चैतन्यामुळे आणि संतांच्या अस्तित्वामुळे आश्रमात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या किंवा विशिष्ट देवतेच्या लहरी आकृष्ट होऊन कार्यरत होतात. त्या लहरी कशा प्रकारे आकृष्ट होऊन कार्यरत होतात, याचे एक प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे दीपावलीच्या कालावधीमध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात लावण्यात येणार्‍या पणत्यांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश !

१. वर्ष २०१६ च्या दीपावलीच्या कालावधीमध्ये आश्रमात लावलेल्या पणत्यांच्या छायाचित्रांमध्ये पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे आश्रमाच्या भिंतीही लाल रंगाच्या दिसत होत्या.

२. वर्ष २०१७ च्या दीपावलीच्या कालावधीमध्ये आश्रमात लावलेल्या पणत्यांच्या छायाचित्रांमध्ये पणत्यांच्या ज्योतींतून वातावरणात गुलाबी आणि निळसर रंगांच्या वर्तुळाकार प्रकाशवलयांचे प्रक्षेपण होत असल्याचे दिसून येते.

दिव्याच्या प्रकाशात विशिष्ट रंग आणि विशिष्ट सूक्ष्म स्पंदने संयुक्तपणे कार्यरत झाल्यामुळे किंवा त्या वस्तूतून वातावरणात तिच्या स्पंदनांप्रमाणे त्या त्या रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत असते. काळानुसार आश्रमातील प्रकाशलहरींमध्ये आनंद आणि भक्तीची स्पंदने प्रबळ असल्यामुळे त्या स्पंदनांनुसार अनुक्रमे गुलाबी किंवा निळसर रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत होते.

अशा भक्तीदायी आणि आनंदस्वरूप वातावरणातील ही रोषणाई पाहण्याचा आनंद अनुभवूया !’

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने
लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या आणि लाल रंगाच्या दिसणे !

स्वागतकक्षातील यज्ञकुंड परिसरात लावलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या रंगात दिसत आहेत.
कलामंदिर परिसरात लावलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत आहेत.

‘दीपज्योतिःपरब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥

अर्थ : दिव्याचा प्रकाश परब्रह्मरूप आहे. दीपज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्‍वर आहे. दीपक माझे पाप दूर करो. हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

कु. प्रियांका लोटलीकर

या दुःखहारक दीपज्योतीच्या संदर्भात रामनाथी आश्रमातील साधकांना एक निराळी अनुभूती आली. ११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने आश्रमात सर्वत्र पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या पणत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमाच्या स्वागतकक्षाजवळ लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या, तर कलामंदिराकडे लावण्यात आलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्मविश्‍वविद्यालय, गोवा.

 

पणत्यांच्या ज्योती पिवळ्या अथवा लाल रंगाच्या दिसण्यामागील कारण

श्री. राम होनप

१. ज्ञानकण प्रक्षेपित करणार्‍या तारक स्वरूपातील पिवळ्या ज्योती !

१ अ. ‘अग्निनारायणाची दोन रूपे आहेत. पिवळ्या ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप तारक असते आणि लाल ज्योतीच्या स्वरूपात दिसणारे रूप मारक असते.

१ आ. पिवळ्या ज्योतीच्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी होते आणि त्यातून ज्ञानकण सर्वत्र पसरतात. त्यातील सत्त्वगुणाची वृद्धी होते.

२. धर्मलढ्यास साथ देणार्‍या लाल रंगाच्या ज्योती !

२ अ. लाल ज्योतीच्या माध्यमातून वातावरणातील अशुद्धी नष्ट होते, म्हणजे वातावरणातील रज-तम नष्ट होण्यास साहाय्य होते. या कार्यासाठी पणतीतून लाल ज्योतीचे प्रकटीकरण झाले.

२ आ. पणतीची ज्योत लाल रंगाची दिसणे, हे धर्मलढ्यास अग्नितत्त्वाची साथ मिळत असल्याचे दर्शक आहे. कालांतराने धर्म-अधर्माच्या लढ्यात पंचतत्त्वांच्या सहभागाचे प्रमाण वाढत जाऊन अंती त्याचे रूपांतर हिंदु राष्ट्रात होईल.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (३.११.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment