पखवाजवादनाचा (मृदंगवादनाचा) वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘भारतीय चर्मवाद्यांत पखवाज (मृदंग) हे वाद्य प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय संगीतातील गायनाच्या साथीसमवेतच भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संगीत साथीतही पखवाजाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘पखवाज वाजवतांना प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक, यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. १७.१२.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी करण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

पखवाजवादन करतांना श्री. छवी जोशी

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पखवाजवादक श्री. छवी जोशी यांनी अर्धा घंटा पखवाजवादन केले. पखवाजवादन आरंभ होण्यापूर्वी आणि वादन पूर्ण झाल्यानंतर वाद्य (पखवाज), वादक (श्री. छवी जोशी), २ वनस्पती (तुळस आणि जास्वंद), २ पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असणारा एक साधक आणि आध्यात्मिक त्रास नसणारा एक साधक यांची ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर पखवाज वाजवल्याने प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा चाचणीतील घटकांवर (वाद्य, वादक आदींवर) होणारा परिणाम स्पष्ट झाला.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. साधक

तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असणारा एक साधक आणि आध्यात्मिक त्रास नसणारा एक साधक हे पखवाजवादनाच्या वेळी उपस्थित होते.

टीप – आध्यात्मिक त्रास

आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

२ आ. दोन पक्षी

एकाच प्रजातीचे हे दोन पक्षी गोवा येथील दोन साधक कुटुंबांकडील आहेत. त्यांना पखवाजवादनाच्या वेळी चाचणीच्या स्थळी ठेवले होते.

२ इ. दोन वनस्पती

पखवाजवादनाच्या वेळी चाचणीच्या स्थळी जास्वंदीचे रोप असलेली एक कुंडी आणि तुळशीचे रोप असलेली एक कुंडी ठेवली होती. आध्यात्मिकदृष्ट्या ‘जास्वंद’ ही एक सर्वसाधारण वनस्पती आहे, तर ‘तुळस’ ही सात्त्विक असल्याने वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे.

वाचकांना विनंती : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

३. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

३ अ. पखवाजवादनाचा वाद्य आणि वादक यांच्यावर झालेला परिणाम

३ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

३ अ १ अ. पखवाज या वाद्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा वादनापूर्वी अन् वादनानंतरही आढळल्या नाहीत.

३ अ १ आ. वादक श्री. छवी जोशी यांच्यात थोड्या प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पखवाज वाजवल्यानंतर पूर्णपणे नष्ट होणे

वादक श्री. छवी जोशी यांच्यामध्ये वादनापूर्वी ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी केवळ ‘इन्फ्रारेड’ ही ऊर्जा थोड्या प्रमाणात होती. त्यामुळे ‘यू.टी.एस.’ स्कॅनरने ६० अंशाचा कोन केला. (‘यू.टी.एस.’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) ही नकारात्मक ऊर्जा वादनानंतर पूर्णपणे नष्ट झाली.

३ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – पखवाजवादन झाल्यानंतर वाद्य आणि वादक यांमध्ये थोडी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

वादनापूर्वी वाद्य आणि वादक यांमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती; पण वादनानंतर त्यांच्यामध्ये थोडी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे वाद्याचे परीक्षण करतांना स्कॅनरने ४५ अंशाचा आणि वादकाचे परीक्षण करतांना स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला.

३ अ ३. वाद्य आणि वादक यांच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – वाद्य आणि वादक यांची प्रभावळ वादनानंतर वाढणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांची प्रभावळ साधारण १ मीटर असते. वादनापूर्वी पखवाज या वाद्याची प्रभावळ १.३३ मीटर होती. ती वादनानंतर १.७७ मीटर झाली, म्हणजे त्यात ४४ सें.मी.ने वाढ झाली. पखवाजवादनापूर्वी वादक श्री. छवी जोशी यांची प्रभावळ १.६९ मीटर होती. ती वादनानंतर २.०१ मीटर झाली, म्हणजे त्यात ३२ सें.मी.ने वाढ झाली.

यांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ५’ मध्ये दिले आहे.

३ आ. पखवाजवादनाचा वनस्पती आणि पक्षी यांच्यावर झालेला परिणाम

३ आ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

३ आ १ अ. सर्वसाधारण वनस्पतीमध्ये असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पखवाजवादनानंतर घटणे

सर्वसाधारण वनस्पतीमध्ये पखवाज वाजवण्यापूर्वी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी केवळ ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. तेव्हा स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला आणि तिची प्रभावळ १.२० मीटर होती. वादनानंतर ही नकारात्मक ऊर्जा घटली. तेव्हा स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला. त्यामुळे तिची प्रभावळ आली नाही. (‘यू.टी.एस.’ स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

३ आ १ आ. सात्त्विक वनस्पती आणि दोन्ही पक्षी यांमध्ये पखवाज वाजवण्यापूर्वी अन् नंतरही ‘इन्फ्रारेड’, तसेच ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

३ आ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

३ आ २ अ. सर्वसाधारण वनस्पतीमध्ये वादनापूर्वी आणि वादनानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ आ २ आ. सात्त्विक वनस्पतीमध्ये वादनापूर्वी असलेल्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वादनानंतर आणखी वाढणे

पखवाज वाजवण्यापूर्वी सात्त्विक वनस्पतीमध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. तेव्हा स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला आणि तिची प्रभावळ १.०४ मीटर होती. वादनानंतर ती १.१८ मीटर झाली, म्हणजे त्यात १४ सें.मी. वाढ झाली.

३ आ २ इ. वादनापूर्वी पहिल्या पक्ष्यामध्ये थोड्या प्रमाणात, तर दुसर्‍या पक्ष्यामध्ये पुष्कळ प्रमाणात असलेली सकारात्मक ऊर्जा वादनानंतर वाढणे

पहिल्या पक्ष्यामध्ये वादनापूर्वी थोडी सकारात्मक ऊर्जा होती. तेव्हा स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला. त्यात वादनानंतर थोडी वाढ झाली. तेव्हा स्कॅनरने १६० अंशाचा कोन केला.

दुसर्‍या पक्ष्यामध्ये वादनापूर्वी सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. तेव्हा स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला आणि त्याची प्रभावळ ८२ सें.मी. होती. वादनानंतर ती १.२३ मीटर झाली, म्हणजे त्यात ५१ सें.मी.ने वाढ झाली.

३ आ ३. प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – सर्वसाधारण वनस्पती आणि पहिला पक्षी यांपेक्षा अनुक्रमे सात्त्विक वनस्पती आणि दुसरा पक्षी यांची प्रभावळ वादनापूर्वीही अधिक असणे, तसेच वादनानंतर त्यांच्या प्रभावळींत झालेली वाढही अधिक असणे 

पखवाज वाजवण्यापूर्वी सर्वसाधारण वनस्पतीची प्रभावळ ७० सें.मी. होती. वादनानंतर ती ८९ सें.मी. झाली, म्हणजे त्यात १९ सें.मी.ने वाढ झाली, तसेच वादनापूर्वी सात्त्विक वनस्पतीची प्रभावळ १.५१ मीटर होती. वादनानंतर ती १.७३ मीटर झाली, म्हणजे त्यात २२ सें.मी. वाढ झाली.

पखवाज वाजवण्यापूर्वी पहिला पक्षी आणि दुसरा पक्षी यांची प्रभावळ अनुक्रमे १.४५ मीटर अन् १.२७ मीटर होती. वादनानंतर ती अनुक्रमे १.५५ मीटर आणि १.६८ मीटर झाली, म्हणजे त्यात अनुक्रमे १० सें.मी. आणि ४१ सें.मी. वाढ झाली.

यांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ५’ मध्ये दिले आहे.

३ इ. पखवाजवादनाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला
आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

३ इ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

३ इ १ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकात वादनापूर्वी नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा असणे आणि तिची प्रभावळ वादनानंतर घटणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये वादनापूर्वी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी केवळ ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. तिची प्रभावळ १.४५ मीटर होती. वादनानंतर ती १.०८ मीटर झाली, म्हणजे तिच्यात ४३ सें.मी. घट झाली.

३ इ १ आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये वादनापूर्वी आणि वादनानंतरही ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

३ इ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

३ इ २ अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकात वादनापूर्वी अन् वादनानंतरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ इ २ आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकात वादनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा असणे आणि वादनानंतर तिच्यात वाढ होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये वादनापूर्वी थोडी सकारात्मक ऊर्जा होती. तेव्हा स्कॅनरने १५० अंशाचा कोन केला. वादनानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. तेव्हा स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला आणि तिची प्रभावळ ८७ सें.मी. झाली.

३ इ ३. प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – वादनानंतर दोन्ही साधकांच्या प्रभावळीत वाढ होणे; पण त्रास नसलेल्या साधकाच्या तुलनेत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाच्या प्रभावळीतील वाढ अधिक असणे

वादनापूर्वी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांची प्रभावळ अनुक्रमे १.८६ मीटर अन् १.९४ मीटर होती. वादनानंतर ती अनुक्रमे २.१७ मीटर आणि १.९८ मीटर झाली, म्हणजे त्यात अनुक्रमे ३१ सें.मी. आणि ४ सें.मी. वाढ झाली.

यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ५’ मध्ये दिले आहे.

 

४. निष्कर्ष

थोडक्यात सांगायचे, तर पखवाज वाजवल्याने प्रक्षेपित झालेल्या सकारात्मक (आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक) स्पंदनांचा चाचणीतील सर्वच घटकांवर (वाद्य, वादक, साधक आदींवर) सुपरिणाम झाला. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा घटली, सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली आणि त्यांची प्रभावळ वाढली.

 

५. पखवाजवादनाच्या चाचणीतील घटकांवर
झालेल्या सुपरिणामामागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

५ अ. वादनातून सकारात्मक (आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक) स्पंदने निर्माण होण्यामागील कारणे

५ अ १. वाद्याचा सुपरिणाम

कलियुगातील सर्वसाधारण वस्तू रज-तमप्रधान असतात; पण पखवाज (मृदंग), तबला आदी चर्मवाद्ये ही रज-सत्त्वप्रधान आहेत, तसेच ‘पखवाज हे वाद्य भक्तीयोगाशी अन् विष्णुतत्त्वाशी संबंधित आहे’ (टीप), म्हणजे या वाद्यात मुळातच सत्त्वगुणाचे प्रमाण सर्वसाधारण वस्तूपेक्षा अधिक आहे.

टीप – संदर्भ : एक विद्वान, २३.८.२००७ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)

५ अ २. वादकाचा भाव

पखवाजवादक श्री. छवी जोशी हे गुरु-शिष्य परंपरेनुसार गेल्या १५ वर्षांपासून पखवाजवादन शिकत आहेत, तसेच त्यांनी ‘आपल्या कलेचे प्रदर्शन’ म्हणून किंवा अन्य कोणत्याही व्यावसायिक हेतूने नव्हे, तर ‘सेवा’ म्हणून पखवाजवादन सादर केले होते. त्यामुळे त्यांच्या वादनातून अनेक श्रोत्यांचा भाव जागृत झाला.

५ अ ३. भारतीय संगीतशास्त्रानुसार केलेले वादन – भारतीय संगीताचा पाया आध्यात्मिक असल्याने त्यातून सात्त्विक स्पंदने निर्माण होऊ शकणे

‘पाश्‍चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर भारतीय शास्त्रीय संगीतात अंतःकरणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे’, असे भारतीय शास्त्रीय संगीताविषयी म्हटले जाते. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्यात सात्त्विक स्पंदने निर्माण करण्याची क्षमता आहे. ते ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. असे संगीत श्रोत्यांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (संगीत विशारद)

५ आ. पखवाज वाजवल्याने निर्माण झालेल्या सकारात्मक
स्पंदनांचा चाचणीतील घटकांवर होणार्‍या अल्प-अधिक परिणामामागील कारणे

५ आ १. सात्त्विक घटकांमध्ये (व्यक्ती, वनस्पती, पक्षी आदींमध्ये) सर्वसाधारण घटकांपेक्षा सकारात्मक स्पंदने ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.

५ आ २. वनस्पतींपैकी तुळस आणि पक्ष्यांपैकी दुसरा पक्षी मुळातच सात्त्विक असणे

वनस्पतींमध्ये जास्वंदीपेक्षा तुळस अधिक सात्त्विक असल्याने आणि पक्ष्यांमध्ये पहिल्या पक्ष्याच्या तुलनेत दुसरा पक्षी अधिक सात्त्विक असल्याने त्यांनी पखवाजवादनामुळे निर्माण झालेली सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात ग्रहण अन् प्रक्षेपित केली. हे ‘सूत्र ५ आ १’ मधील आध्यात्मिक सिद्धांतानुसार झाले. त्यामुळे जास्वंदीच्या तुलनेत तुळशीची आणि पहिल्या पक्ष्याच्या तुलनेत दुसर्‍या पक्ष्याची सकारात्मक ऊर्जा अन् प्रभावळ यांतील वाढ अधिक आहे. (अधिक माहितीसाठी ‘सूत्र ३ आ’ पहावे.)

५ आ ३. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाचा भाव जागृत झाल्याने त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्याची प्रभावळ पुष्कळ वाढणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाचा पखवाजवादनातील ‘गणेशपरण’ आणि ‘श्रीकृष्ण तांडव’ आदी देवतांचे स्तुतीपर शब्द असलेले वादन ऐकतांना भाव जागृत झाला, तसेच पखवाज वाजवल्याने निर्माण झालेली सकारात्मक स्पंदने या साधकातील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्यासाठी वापरली गेली. त्यामुळे वादनानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली नाही, तर त्याच्यात वादनापूर्वी असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा मात्र घटली आणि साधकाची प्रभावळ वाढली. (अधिक माहितीसाठी ‘सूत्र ३ इ’ पहावे.)

५ आ ४. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकात मुळातच सकारात्मक ऊर्जा असल्याने आणि त्याला संगीताची जाण असल्याने तो वादनामुळे निर्माण झालेली सकारात्मक स्पंदने ग्रहण करू शकणे

आध्यात्मिक त्रास नसणारा साधक अनेक वर्षांपासून साधना करत आहे. त्यामुळे त्याच्यात मुळातच थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे, तसेच त्याला संगीताची आवड असल्याने तो गत १६ वर्षांपासून तबलावादन शिकत आहे. त्याला संगीताची चांगली जाण आहे. त्यामुळे पखवाज वाजवल्याने प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने त्याला अधिक प्रमाणात ग्रहण करता आली. (अधिक माहितीसाठी ‘सूत्र ३ इ’ पहावे.)’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. ई-मेल : [email protected]