कृतज्ञताभाव

‘ईश्‍वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्‍या ईश्‍वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

 

कृतज्ञताभावात राहिल्याने होणारे लाभ

१. देवावरील श्रद्धा वाढते.

२. मनाविरुद्ध घडणार्‍या प्रसंगामध्ये मनाची स्थिरता वाढते.

३. साधकांविषयी प्रतिक्रिया अल्प होऊन पूर्वग्रहही निर्माण होत नाही आणि शिकून पुढे जाता येते.

४. त्रास, प्रारब्ध, दोष आणि अहं यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारता येते अन् अहंविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते.

५. कृतज्ञताभावात राहिल्याने साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य येते आणि चिकाटी वाढून प्रयत्नांना गती मिळते.

६. देव देत असलेल्या प्रत्येक क्षणातून आनंद घेता येतो.

७. रज-तम असूनही दिवसेंदिवस वाढत जाणारे चैतन्य ग्रहण करता येते.

– कु. पूजा जाधव, जळगाव.

 

साधकाच्या प्रत्येक हालचालीत कृतज्ञता समाविष्ट होणे, हाच कृतज्ञताभाव !

संकल्पना आणि चित्रांकन : सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई

स्वयं मधुर असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांनाही अखिल सृष्टीकडे पहाण्याची मधुर दृष्टी दिली आहे. आज साधक
साधनेतील माधुर्य अनुभवत आहेत. यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

 

कृतज्ञतेचा भाव कसा निर्माण होतो ?

अ. ‘ज्ञानप्राप्तीची तळमळ एकदा वाढली की, जिवाच्या जिज्ञासेचेही श्रद्धेत रूपांतर होते, म्हणजेच ज्ञान मिळण्याविषयी ईश्‍वराप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो.

आ. कार्यात भावाचे सातत्य येऊन त्याचे अव्यक्त भावात रूपांतर झाल्याने कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो.’

– एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपणनावानेही लिखाण करतात. १६.२.२००६)

 

कृतज्ञता भाव जोपासल्याने साधकाचा अहं न वाढणे
आणि शेवटी अहंशून्य अवस्था (मोक्षप्राप्ती) गाठणे सोपे जाणे

‘कृतज्ञताभाव जोपासल्याने कोणत्याही कारणामुळे साधकाचा अहं वाढत नाही. कृतज्ञता भावात साधक संपूर्ण श्रेय गुरु किंवा ईश्‍वर यांना देत असल्यामुळे साधकात कर्तेपणाची भावना निर्माण होत नाही. कर्तेपणाचा भाव जितका अल्प राहील, तितका साधकाचा अहं न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे प्रत्येकाने कितीही आध्यात्मिक उन्नती केली, तरी गुरूंप्रतीचा कृतज्ञता भाव सोडू नये. यामुळे साधकाचा अहं न्यून होतोच, तसेच त्याला अहंशून्य अवस्था गाठणे सोपे जाते. अहंशून्य अवस्था गाठणे, म्हणजेच ‘मोक्षप्राप्ती होणे’ होय. यामुळे अनेक संत त्यांचे लिखाण, अभंग आणि इतर काव्य त्यांच्या गुरूंना उद्देशून किंवा गुरूंचा उल्लेख करून करतात. त्यामुळे या लिखाणाचा अभ्यास करणार्‍यांना त्या संतांपेक्षा त्यांच्या गुरूंची महती अधिक वाटते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.’ – कु. मधुरा भोसले, २५.९.२००५)

 

वस्तू वापरणार्‍या व्यक्तीचा वस्तूप्रतीचा
कृतज्ञतेचा भाव जितका जास्त, तितकी वस्तू चैतन्यमय असणे

‘वस्तू वापरणार्‍या व्यक्तीचा त्या वस्तूप्रती कृतज्ञतेचा भाव जेवढा जास्त, तितकी ती वस्तू चैतन्यमय बनून श्रीकृष्ण तत्त्वाशी एकरूप होते आणि साधकत्व प्राप्त करते.’ – सौ. स्मिता जोशी, १५.१.२००७)

 

कृतज्ञता म्हणजे काय ?

अ. ‘आपण ईश्‍वराला प्रार्थना करतो आणि त्याने साहाय्य केल्याने त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. येथे आपण केलेली ‘कृती’ (कृत) ही ईश्‍वराने करवून घेतली, याचे ज्ञान (‘ज्ञ’) होणे म्हणजे ‘कृतज्ञ’. थोडक्यात ‘कृतज्ञ’ म्हणजे कर्तेपणाचे खरे ज्ञान होणे. ‘कृत’ म्हणजे सत्य, म्हणजेच ईश्‍वर आणि त्याला केलेल्या प्रार्थनेमुळे आपले मनोरथ पूर्ण झाले, याचे ज्ञान होणे म्हणजे ‘कृतज्ञ’ !’

– श्री. संदीप नरेंद्र वैती, मुंबई.

आ. ‘श्रद्धा म्हणजेच कृतज्ञतेचा भाव आणि अव्यक्त भावाचा परिणाम म्हणजेच कृतज्ञतेचा भाव.’ – एक विद्वान ((सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपणनावानेही लिखाण करतात. १६.२.२००६)

 

कृतज्ञता आणि कृतज्ञतेचा भाव

२१.९.२००४ या दिवशी सकाळी ७.३० वाजता नामजप करतांना श्री गणपति आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना केली, ‘माझ्या हृदयात आपल्याप्रती कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव वाढू दे अन् तो प्रत्येक क्षणी जागृत असू दे.’ त्या वेळी मला ईश्‍वराने पुढील ज्ञान दिले.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. २१.९.२००४)

 

कृतज्ञताभावात राहिल्यास निराशा न येता
मन आनंदी होऊन साधना अधिक चांगली करता येईल !

‘साधक स्वभावदोषांची सारणी लिहितात. ते स्वभावदोष जावेत; म्हणून स्वयंसूचना देतात. साधकांनी इतकेच केले असते, तर ते योग्य झाले असते; पण बरेच साधक ते स्वभावदोष दिवसभर आठवतात आणि दुःखी होतात. काही साधक इतरांच्या गुणांशी किंवा प्रगतीशी तुलना करून ‘आपण त्यांच्या मागे आहोत’, हे आठवून दुःख करत रहातात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ‘महिना १० हजार, ५० हजार किंवा १ लक्ष रुपये मिळवणारे आपल्यापेक्षा जास्त मिळवणार्‍यांशी तुलना करायला लागले, तर ते नेहमीच दुःखी होतील. त्याऐवजी १० हजार रुपये मिळवणार्‍याने ‘मी नोकरी नसलेल्यापेक्षा अधिक सुखी आहे’, ५० हजार रुपये मिळवणार्‍याने ‘मी १० हजार रुपये मिळवणार्‍यापेक्षा अधिक सुखी आहे’, १ लक्ष रुपये मिळवणार्‍याने ‘मी ५० हजार रुपये मिळवणार्‍यापेक्षा अधिक सुखी आहे’, अशा प्रकारे विचार केला, तर ते दुःखी न होता आनंदी होतील.

साधकांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना मनुष्यजन्म दिला आहे, त्यांच्यात साधनेची आवड निर्माण केली आहे, त्यांना साधनेत मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यांची साधनेत प्रगतीही होत आहे. हे आठवल्यास ‘पृथ्वीवरील बहुसंख्य मानवांच्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या मनात देवाविषयी सतत कृतज्ञताभाव निर्माण होईल. स्वयंसूचना सत्रांच्या वेळी दोष आठवणे आणि ते घालवण्यासाठी स्वयंसूचना देणे, हे योग्य आहे. एरव्ही दिवसभर भावपूर्ण नामजप करावा किंवा कृतज्ञताभावात रहावे. ‘भाव तेथे देव’ असल्यामुळे त्या वेळी मनाला आनंदही मिळतो.

माझ्या उदाहरणावरून कृतज्ञताभावात राहिल्याने ‘सेवा कशी करता येते आणि मनाला कसा आनंद मिळतो’, हे लक्षात येईल. पूर्वी मी सर्वत्र सत्संग, अभ्यासवर्ग, जाहीर सभा इत्यादी घेण्यासाठी जात असे. आता कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी आतापर्यंत देवाने करून घेतलेली विविध कार्ये आठवली, तरी मला कृतज्ञताभावात आनंदात रहाता येते. खोलीत बसून ग्रंथलिखाणाची सेवाही रात्रंदिवस आनंदाने करता येते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

साधकांनो, साधनेत प्रगती होण्यासाठी कृतज्ञताभावात रहा !

‘साधकांना साधनेत प्रगती करता येत नसली, स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करता येत नसली, तर त्यांना ‘भावजागृतीसाठी प्रयत्न करा. भाव जागृत झाला की, साधनेतील बरेच अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल’, असे सांगण्यात येते. त्यासाठी त्यांना ‘भावजागृतीसाठी साधना’ या ग्रंथात दिल्याप्रमाणे प्रयत्न करण्यास सांगितले जाते. तेही बर्‍याच जणांना जमत नाही. अशांनी पुढील प्रयत्न केल्यास त्यांना भाव जागृत होण्यास साहाय्य होईल.

‘आपण एकटे राहू आणि जगू शकत नाही’, हे लक्षात घेऊन कुटुंबीय आपली घेत असलेली काळजी आणि आपल्याला देत असलेले प्रेम, इतर आपल्याला करत असलेले साहाय्य, तसेच भगवंताने आपल्याला दिलेले जीवन इत्यादी संदर्भातील दैनंदिन जीवनातील उदाहरणे पावला-पावलाला आठवल्यास कृतज्ञताभाव निर्माण होण्यास ५ – ६ आठवड्यांतच आरंभ होतो. पुढे तो वाढत जातो. त्यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘भावाचे प्रकार आणि जागृती’)

Leave a Comment