सतीसावित्रीचा उपहास आणि मद्यपानाचेे महिलांवर होणारे दुष्परिणाम !

‘श्रुती’, ही भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी ! ‘बार’ विकृती (मद्यपान) अवलंबावी यासाठी पुरोगामी आणि आधुनिक म्हणवणार्‍यांनी तिच्यावर आणलेल्या दबावाविषयी ती माझ्याशी बोलली. मुले-मुली असलेला त्यांच्या महविद्यालयातील एक गट देहलीतील नाईट क्लबमध्ये गेला. या गटातील बहुतेक विद्यार्थी मद्यपान करत होते; परंतु श्रुती त्यापासून अलिप्त होती. त्यांनी तिला ‘सतीसावित्री’ असे हिणवले.

‘हे लोक तुम्हाला त्यांच्यापासून अलिप्त ठेवतात’, असे तिने तिच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर म्हटले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी तुम्ही त्यांच्यात मिसळून जाऊ शकत नाही. याला मी सावित्रीचा उपहास (‘Savitri shaming) म्हणते आणि हे वाळीत टाकण्यासारखेच आहे.

१. स्त्रियांनी मद्यपान करणे, हा
मद्यपान परंपरेचा भाग असे सांगणारे पुरोगामी !

पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते. त्यांना अतीमद्यपानामुळे बचतीची उधळण, घरगुती भांडणे, कुटुंबाची वाताहत होणे आदी दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. भारतातल्या शहरी भागात मद्यपान करणेे, ही एक फॅशन झाली आहे. पूर्वी या गोष्टींकडे वाईट नजरेतून पाहिले जात असे आणि सुशिक्षित घरातील व्यक्ती मद्यपान करत नसत. स्त्रियांनी मद्यपान करणे हा एक मद्यपान परंपरेचा भाग आहे, असे प्रसारमाध्यमे सांगत असतात. हे खरोखरच स्त्रियांच्या समान अधिकारांचे पुरस्कर्ते आहेत का ?

२. दारू पिणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक
धोकादायक ! – अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा निष्कर्ष

अभ्यासांती असे लक्षात आले आहे की, दारू ही पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक हानीकारक आहे. ‘दारू पिणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक धोकादायक आहे’, असा निष्कर्ष अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय आरोग्य संस्थेने’ (यू.एस्. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ) काढला आहे. ‘अ‍ॅडीक्शन अ‍ॅन्ड सबस्टन्स अ‍ॅब्यूज’ (व्यसन आणि पदार्थाचे अतीसेवन) या कोलंबिया येथील केंद्रात केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांपेक्षा महिलांना लवकर व्यसन लागते.

केंद्राचे संचालक सुसान फोस्टर यांच्या मतानुसार, पुरुषांच्या शरिराशी तुलना करता महिलांच्या शरिरात पाण्याचे प्रमाण अल्प असून चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये दारू शोषून घेण्याचे प्रमाण जास्त असते. महिलांमध्ये अल्कोहोलचे विघटन करणार्‍या, ‘अल्कोहोल डीहायड्रोजीनेज’ या ‘एन्झाईम’ची कार्य करण्याची शक्ती अल्प असते.

३. दारू पिण्यामुळे अमेरिकेतील
३ लक्ष ५० सहस्र महिलांच्या आरोग्याला धोका !

अल्प मात्रेमध्ये अल्कोहोल घेणार्‍या महिलांनाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते, तसेच ५५ वर्षांखालील महिलांचा हृदयविकारापासूनही बचाव होत नाही. अतीमद्यपान केल्यामुळे, यकृताचे आजार, कर्करोग, मेंदूचे, तसेच हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय आरोग्य संस्थे’ (एन्.आय.एच्.)च्या अहवालानुसार दारू पिण्यामुळे अमेरिकेतील ३ लक्ष ५० सहस्र महिलांच्या आरोग्याला धोका पोचला आहे. अतीमद्यपान हे पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक धोकादायक आहे. मद्यपान हे लैंगिक अत्याचाराचे प्रमुख कारण आहे.

४. मद्यपानामुळे लैंगिक अत्याचारांत प्रचंड वाढ
झालेल्या अमेरिकेच्या मद्यपरंपरेशी आपण स्पर्धा का करतो ?

पुराणमतवाद्यांनुसार अमेरिकेत २५ टक्के महिलांना लैंगिक अत्याचार आणि बलात्कार यांना सामोरे जावे लागते. यांपैकी जवळपास अर्ध्या प्रकरणांत अत्याचार करणार्‍याने, अत्याचाराला बळी पडलेल्याने किंवा दोघांनीही मद्यपान केलेले असते. एकीकडे आपण अमेरिकेतील समाज हा मद्यपानाच्या दुष्परिणामांच्या विळख्यात अडकला असून तेथे लैंगिक अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे, असे म्हणतो आणि दुसरीकडे त्या मद्यपरंपरेशी स्पर्धा करतो, हे कशासाठी ?

पुरुष ग्राहकाशी जवळीक साधण्यासाठी मद्यपान करणे आवश्यक असते, असे औद्योगिक जगतातील काही स्त्रियांचे म्हणणे असल्याचे माझ्या कानावर आले आहे. ही प्रगती आहे कि अधोगती ?

महाविद्यालयात मद्यपान करण्यासाठी श्रुतीवर दबाव आणला असतांना तिने तो धुडकावून लावणे : ‘ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे’, असे सांगून मी एकतरी घोट घ्यावा; म्हणून माझ्यावर ते बळजोरी करत होते. माझा एक मित्र जर माझ्या बाजूने उभा राहिला नसता, तर त्यांनी मला ते पिण्यास भाग पाडले असते. ते सांगत होते, हा एक वेगळाच अनुभव आहे. घे आणि वेगळे जग अनुभव. मुली तर मला अधिकच आग्रह करत होत्या’, असे श्रुतीने सांगितले.

५. लैंगिक अत्याचार आणि घटस्फोट यांचे प्रमाण
सर्वाधिक असलेल्या समाजाकडे आपण आदर्श म्हणून पहायचे ?

चांगल्या कुटुंबातील स्त्रिया मद्यपान करत नाहीत, असा एक समज आहे. पाश्‍चिमात्य ज्या गोष्टीवर नियंत्रण मिळवू पहात आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून त्या विषयाकडे शांतपणे पाहिले जाते आणि त्याच वेळी ज्या महिला मद्यपानाला विरोध करतात, त्यांचा ‘सतीसावित्री’, असे म्हणून उपहास केला जातो.

सावित्री कोण आहे ? सावित्री आणि सत्यवान यांची गोष्ट ही एका धैर्यवान स्त्रीची गोष्ट आहे. तिने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी मृत्यूला आव्हान दिले. सावित्री दायित्व, निष्ठा, भक्ती, धैर्य आणि खरे प्रेम यांचे प्रतिनिधित्व करते. सावित्रीच्या या मूल्यांचा अवमान केला जात असेल, तर मग पर्यायी समाज कसा आहे ? ज्या समाजाकडे आपल्याला आदर्श म्हणून पहायला सांगितले जाते, त्या समाजात लैंगिक अत्याचारांचे प्रमाण २५ टक्के आहे. जे भारतापेक्षा १० पटींनी अधिक आहे. तेथे घटस्फोटाचे प्रमाण २० ते ४० पटींनी अधिक आहे. नात्यामध्ये दायित्वाची जाणीव नसेल, तर त्याचा कोणाला लाभ होईल ?

अमेरिकेत स्त्रिया घटस्फोटाचे आघात सहन करत आहेत. विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, लेनोअर वेट्झमॅन यांच्या ‘डायव्होर्स रिझोलेशन’ या ग्रंथाप्रमाणे घटस्फोटानंतर महिलांच्या जीवनमानाचा दर्जा ७३ टक्क्यांनी घटतो, तर पुरुषाचे जीवनमान ४२ टक्क्यांनी वाढते. विवाहापासून माघार घेणे हे मुलांच्या दृष्टीने चांगले नाही, याविषयीही सर्वांचे एकमत आहे.

६. मद्यपानाच्या दबावाला बळी न पडणार्‍या
भारतीय महिला आणि पुरुष यांचा आदर केला पाहिजे !

जैविकदृष्ट्या स्त्रियांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. गर्भधारणा झाली असता काही वेळा महिलांना हाकलून दिले जाते. त्या वेळी तिला एकतर औषधे घेऊन किंवा शस्त्रकर्म करून गर्भपात करून घ्यावा लागतो अथवा नको असलेल्या गर्भधारणेच्या परिणामांना सामोरे जाऊन एकटेपणाचे जीवन जगावे लागते. पुरुष गुन्हा करून पळून जाऊ शकतो. त्यांनी दायित्वशून्य असावे, असे माझे म्हणणे नाही; परंतु त्यांना अधिक परिणामांना सामोरे जावे लागत नाही.

विवाहसंस्था ही प्रामुख्याने महिलांसाठी आहे. पुष्कळसे पुरुष हे आपल्या पत्नीसोबत सुखी असतात; परंतु ज्यांना महिलांशी केवळ खेळायचे असते, त्यांना मद्यपान करणार्‍या महिलांना जाळ्यात ओढणे सोपे असते; कारण त्या फारसा प्रतिबंध करत नाहीत. पुरुषांना मद्यपान संस्कृती आणि मुक्त संभोग आवडतो; परंतु महिलांना प्रचंड दायित्व पेलावे लागते.

अडचणीत असलेल्या पाश्‍चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करण्याकरता स्त्रीमुक्तीवाले आणि पुरोगामी सावित्रीची चेष्टा करण्यासाठी पुरुषप्रधानतेवर अनवधानाने टीका करतात. ज्याप्रमाणे प्रक्षोभक वेशभूषा केली म्हणून महिलांवर टीका करू नये, त्याचप्रमाणे महिलांनी पारंपरिक वेशभूषा केली म्हणून किंवा मद्यपान केले नाही म्हणून त्यांची ‘सतीसावित्री’ अशी हेटाळणीही करू नये. ज्या भारतीय महिला आणि पुरुष मद्यपानाच्या दबावाला बळी पडत नाहीत, त्यांचा आदर केला पाहिजे.’

– संक्रांत सानू (संदर्भ : ‘रेडिफ’चे संकेतस्थळ)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment