ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन

१. काटकसरीपणा

अ. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर

शीव सेवाकेंद्रात संगणकीय प्रती काढण्यासाठी एकच डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होता. त्याच्या शाईची रिबिन वारंवार रिफील करून अनेक वर्षे तोच प्रिंटर वापरला. पुढे पुढे तीच तीच रिबिन पुन्हा वापरल्यामुळे संगणकीय प्रतींवरील अक्षरे जरा पुसट येत असत. मग लेखणीने (पेनने) ती अक्षरे गडद करून घ्यावी लागत. सारखे सारखे नवीन रिबिनवर पैसे व्यय (खर्च) व्हायला नकोत, यासाठी जितके दिवस जुन्या रिबिनवरच काम चालू शकते, तितके दिवस काम चालवायचे, असा यामागे परात्पर गुरु डॉक्टरांचा
काटकसरीपणाचा दृष्टीकोन असायचा.

आ. पाठकोरे कागद

परात्पर गुरु डॉक्टर ग्रंथांची सूत्रे लिहिण्यासाठी आजही औषधांच्या खोक्यांची आतील कोरी बाजू, पावत्यांची मागची बाजू, रद्दी कागद यांसारख्या वस्तूंचा पाठकोरे कागद म्हणून उपयोग करतात. शीव सेवाकेंद्रात असतांना मुंबईतील काही साधक स्वत:च्या कार्यालयातून उपलब्ध होणारे पाठकोरे कागद परात्पर गुरु डॉक्टरांना ग्रंथसेवेसाठी आणून देत असत.

इ. कट-पेस्ट

पूर्वी ग्रंथ छपाईला देण्यासाठी ग्रंथाचे बटर पेपर काढावे लागत. यानंतर बटर पेपर पडताळण्याची (तपासण्याची) सेवा असे. त्या वेळी काही पानांवर सुधारणा लक्षात आल्या, तर त्या सर्व पानांचे परत बटर पेपर काढण्यामध्ये अधिक पैसे व्यय होत असत. ते टाळण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व पानांवरचे असे चुकलेले शब्द, ओळी किंवा परिच्छेद यांची एका बटर पेपरवर एकत्रित प्रत काढून नंतर तेवढीच सुधारणा मूळ बटर पेपरवर कट-पेस्ट करण्याची युक्ती शोधली. ही कट-पेस्ट करण्याची सेवा पुष्कळ किचकट असून काळजीपूर्वक करावी लागे.जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांसारखी विभूती निःस्वार्थी भावाने पै पै वाचवून धर्मकार्यासाठी धनसंचय करतेे, तेव्हा ते कार्य त्या विभूतीचे रहात नसून ईश्‍वराचेच होते आणि ईश्‍वरच ते कार्य चालवतो ! आज सनातन संस्था हेच अनुभवत आहे.

 

२. समाजाला ग्रंथ अल्प मूल्यात देण्याची तळमळ

ग्रंथ-निर्मितीच्या आरंभीच्या काळात काही ग्रंथ एका मुद्रणालयात छापून घेतले. त्या ग्रंथांचे छपाईमूल्य पुष्कळ जास्त असायचे, उदा. अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना या ग्रंथाचे छपाईमूल्य ३१ रुपये इतके पडले होते. सर्वसामान्य वाचकांना ग्रंथ महाग पडतील; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या वेळी अल्प मूल्यात ग्रंथ छापून देऊ शकेल, असे मुद्रणालय शोधायला सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या तळमळीमुळे पुढे चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील एक मुद्रक स्वतःहून शीव सेवाकेंद्रात आले आणि धर्मकार्याला साहाय्य म्हणून त्यांनी ग्रंथ अल्प मूल्यात छापून देण्याची सिद्धता दर्शवली. यामुळे ३१ रुपयांना पडणारा अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन हा ग्रंथ केवळ ७ रुपयांना पडला ! अशा प्रकारे सनातनचे ग्रंथ स्वस्त झाले.पुढे मुंबई येथील सुप्रेसा ग्राफिक्स या मुद्रणालयानेही अल्प मूल्यात ग्रंथ छापून दिले. लोकमान्य टिळकांनी स्वतःचा गीतारहस्य हा ग्रंथ पुष्कळ मोठा असूनही सर्व समाजाला वाचता यावा, यासाठी त्याचे मूल्य अत्यंत अल्प ठेवले होते. लोकमान्यांसारखी लोककल्याणाची विलक्षण कळकळ परात्पर गुरु डॉक्टरांमध्येही दिसून येते. ईश्‍वरी कार्य असेल, तर ते सुकर होण्यासाठी ईश्‍वरच त्या कार्यातील अडचणी कशा सोडवतो, हेही वरील उदाहरणातून शिकता येते.

 

३. ग्रंथसेवेशी एकरूप झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

अ. प्रवासातही ग्रंथसेवा

परात्पर गुरु डॉक्टर प.पू. बाबांच्या दर्शनासाठी इंदूरला जात असत किंवा अध्यात्मप्रसारासाठी दौर्‍यावर जात असत, तेव्हा प्रवासातही ते ग्रंथांचे लिखाण आणि मुद्रितशोधन करण्याची सेवा करत असत.

आ. क्षणही वाया न घालवणे

परात्पर गुरु डॉक्टर अन्य धार्मिक ग्रंथ किंवा मासिके यांच्या कात्रणांमधील लिखाण सनातनच्या ग्रंथांत घेण्यासाठी त्या कात्रणांवर खुणा करत असतात. ते जेवतांनाही खुणांच्या दृष्टीने ही कात्रणे पहाण्याची सेवा करतात.

 

४. सर्वस्वाचा त्याग

सनातन संस्थेच्या स्थापनेनंतर आरंभीच्या काळात संस्थेचे कार्य दूरवर पोचले नव्हते. त्यामुळे संस्थेला मिळणारे अर्पण तुटपुंजे होते. ग्रंथ-निर्मितीला आरंभ केल्यानंतरही अर्पणनिधी विशेष नसायचाच. अशा वेळी ग्रंथछपाईसाठी लागणारे पैसे परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच देत असत. याचसह शीव सेवाकेंद्र चालवण्यासाठी होणारा प्रतिदिनचा व्यय आणि अन्य अध्यात्मप्रसार कार्यासाठी होणारा व्यय हाही परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच करत असत. असे असतांनाही परात्पर गुरु डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी शीव सेवाकेंद्राची द्वारे साधकांसाठी सदैव उघडी ठेवली आणि सेवेला येणार्‍या साधकांच्या खाण्या-पिण्यापासून निवासापर्यंतच्या सर्व गोष्टींची प्रेमाने काळजी घेतली.

परात्पर गुरु डॉक्टर आणि सौ. कुंदाताई यांनी अशा प्रकारे सर्वस्वाचा त्याग केला नसता, तर आज सनातन संस्थेचे कार्य आकाशाला गवसणी घालण्याइतके वाढू शकलेच नसते. याचे स्मरण ठेवून साधकांनी नेहमी त्यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहायला हवे.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक

 

अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही संगणकावर ग्रंथांचे लिखाण पडताळण्याची सेवा अविरत करणे

वर्ष २००७ पासून विविध आजारांमुळे आणि प्राणशक्ती अत्यल्प असल्यामुळे बहुतेक वेळा परात्पर गुरु डॉक्टरांना सलग काही वेळ बसणेही शक्य नसते. त्यामुळे त्यांना बर्‍याचदा पलंगावर पडून ग्रंथसेवा करावी लागते. असे असले, तरी जरा बरे वाटायला लागले किंवा एखादे तातडीचे लिखाण पडताळायचे असेल, तर अत्यंत कठीण अशा शारीरिक स्थितीतही ते संगणकावर ग्रंथांचे लिखाण पडताळण्याची सेवा करण्यासाठी येतात. काही वेळा अगदी बसणेही शक्य नसेल, तर ते आसंदीचा आधार घेऊन उभे राहून लिखाण पडताळण्याची सेवा करतात. सेवा करतांना थकव्यामुळे ग्लानी येत असेल, तर तोंडवळ्यावर (चेहर्‍यावर) पाणी मारणे, तोंडात काहीतरी चघळणे आदी कृती करून सतत
सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

परात्पर गुरु पदावर पोचलेल्या महान विभूतीचे सूक्ष्मातून एवढे प्रचंड कार्य चालू असतांना त्या विभूतीला खरं तर स्थूलातून कार्य करण्याची काहीच आवश्यकता नसते. मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातूनही साधकांपुढे आदर्श निर्माण करत आहेत !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात