‘चला बोलूया…नैराश्य संपवूया !’

मानसशास्त्र मनाचा अभ्यास करण्याचे एक शास्त्र !

दैनंदिन जीवनात नैराश्य (डिप्रेशन), (ताण) स्ट्रेस, फोबिया हे शब्द आपण सर्रास वापरतो आणि ‘सायकॉलॉजी’ हा केवळ मनाचा अभ्यास नसून ते एक शास्त्र आहे. शास्त्र म्हटले की, त्यात प्रयोग येतात. तर्क आणि त्यावरून आलेले अनुमानही येतात. हे शास्त्र मानवाच्या मनाचा, वागण्याचा, त्याच्या सभोवताली असणा-या वातावरणाचा आणि अनुभवातून घडलेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करते.

 

नैराश्य म्हणजे काय ?

मनोरुग्ण किंवा मानसिक आजार ही गंभीर समस्या सर्वसामान्यांच्या विनोदी चौकटीतून बाहेर पडलेली नाही. मनोरुग्ण आणि इतर मानसिक आजारांवरील चित्रपट आजही ‘आर्ट फिल्म’ पुरतेच मर्यादित आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची मागणी निर्माण झाली की, आपले मन ही मागणी पूर्ण करायला आपण किती सक्षम आहोत, याचा विचार करायला लागते. जेव्हा मागणी आणि क्षमता यात भेद आढळतो, तेव्हा त्यातून जी भावना निर्माण होते, ती भावना म्हणजेच तणावातून निर्माण होणारी नैराश्याची भावना.

 

नैराश्य ! प्रत्येकाने अनुभवलेली एक भावना

दैनंदिन जीवनात येणा-या सामाजिक आणि मानसिक समस्यांकडे जागरूकतेने पहाण्याची दृष्टी आपण हरवली आहे. विशेषतः नैराश्यासारख्या समस्यांकडे असंवेदनशील दृष्टीने पहाण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत आहे. समाजात या आजाराचे प्रमाण जवळपास १० टक्के आहे. म्हणजे शंभर लोकांमधील १० लोक हे नैराश्याने ग्रासलेले असू शकतात. नैराश्य एक भावना म्हणून आपण काही ना काही कारणाने अनुभवलेली असते. अगदी साध्या कारणानेही आपले मन निराश होते; पण या निराशेच्या भावनेतून आपण कालांतराने बाहेर पडतो. ताणतणाव, स्पर्धा, शहरीकरण, नातेसंबंध, अशा विविध कारणांमुळे नैराश्यग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच रहाणार आहे.

 

आपल्या सुख आणि दु:ख यांचे मूळ कारण आपले दृष्टीकोन !

नैराश्य एक लक्षण म्हणून अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये, इतर आजारांमध्ये इतर लक्षणांच्या बरोबरीने आढळते. नैराश्य हा एक मानसिक आजार म्हणून समजून घेतांना त्याचा अधिक सखोल आणि गांभीर्याने विचार करायला हवा, नाहीतर भविष्यात नैराश्यग्रस्त व्यक्तींची संख्या कितीतरी लाखात वाढेल यात अजिबात शंका नाही. नैराश्यग्रस्त व्यक्तीची समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मनोरुग्णालयाची स्थापना करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. मानसिक आरोग्याच्या उपचारपद्धतीत आज क्रांतीकारक पालट झालेले आहेत. त्यांचा स्वीकार करण्याची मानसिकता मात्र समाज दाखवायला सिद्ध नाही. ‘आपल्या सुखाचे आणि दुःखाचे मूळ आपल्या दृष्टिकोनात आणि आत्मभानातच असते. त्यासाठी दुसरी कुणी व्यक्ती वा परिस्थिती (पूर्णतः) उत्तरदायी नसते. या सर्वांचा असलाच, तर सहभाग असतो.’

 

मानसिक ताणाचे दुष्परिणाम !

नैराश्य हा असा आजार आहे, त्यावर उपाय आणि विचार उपलब्ध आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे माझ्या जीवनात घडणा-या घटनांपेक्षा मी जी प्रतिक्रिया देतो, ती महत्त्वाची असते. किंबहुना मी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या घटनेचे महत्त्व ठरत असते. जी गोेष्ट आपण पालटू शकत नाही, ती पालटण्याचा आटापिटा करण्यापेक्षा किंवा आपण ती का पालटू शकत नाही, यावर काथ्याकुट करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीवर मार्ग काढल्यास नैराश्येची भावना बोथट होण्यास साहाय्य होते. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. त्यामध्ये मानसिक तणावामुळे चयापचय संस्थेवर विपरीत परिणाम होऊन निद्रानाशाची समस्या जाणवायला लागते. कालांतराने वजन वाढ, परिणामी लठ्ठपणा किंवा वजन कमालीचे अल्प होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. अस्वस्थता, पुरेशा शक्तीची कमतरता, थकवा, चिडचिड, लक्ष विचलीत होणे, सततच्या चिंतेने किंवा काळजीने नैराश्यावस्था, एकटेपणाची भावना, आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा तसा प्रयत्न करणे, असे मानसिक ताणाचे दुष्परिणाम आहेत.

 

नकारात्मक (निराशा) भावनांपासून दूर रहाण्यासाठी मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत

निराश जीवनात स्वतःच्या मनाने औषधांचा वापर करणे टाळावे. ‘डॉक्टर शॉपिंग’ (एखाद्या आजारावर एका डॉक्टरचे उपचार चालू असतांना ते पूर्ण न करता त्याच आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाणे) करणे टाळावे. नैराश्येच्या लक्षणातून चमत्काराने सुटका होईल, असा समज करून घेऊ नये. आवश्यकता भासल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासावेत. दिवसभरात आपल्यासाठीही थोडा वेळ राखून ठेवावा. जेव्हा नैराश्य जाणवते, तेव्हा स्वस्थ बसण्याचे टाळा. काहीतरी नवीन करा. अपयश हे घटनांमध्ये असते, व्यक्तीमध्ये नसते. अपयश म्हणजे जीवनाच्या उतारवयातील स्वल्पविराम, पूर्णविराम नव्हे. आपल्याला आलेले अपयश हे ‘टेपरेकॉर्ड’मधील ‘पॉज’चे (थोड्या वेळासाठी थांबणे) बटन होय. याचा अर्थ गाणे संपणे नव्हे. असे काही ना काही कारणाने प्रत्येकजण नैराश्याने ग्रासलेलाच असतो; पण त्यातून वेळीच बाहेर पडून तणावमुक्त आयुष्य जगणे सर्वांत महत्त्वाचे आहे. नकारात्मक भावनांपासून नेहमी दूर रहाणे, हा यातला पहिला उपाय आहे. सुख-दुःख एकमेकांना सांगितल्यामुळे मन हलके होते. मनाला दिलासा देण्यासाठी बोलले पाहिजे.

 

जीवनात ‘सांभाळा’ असा सूचक सल्ला देणारी स्थिती म्हणजे नैराश्य !

रस्त्यावरील पिवळ्या सिग्नलप्रमाणे नैराश्य हासुद्धा जीवनातील पिवळा सिग्नलच आहे, जो म्हणतो सांभाळा ! आपल्याला आलेले नैराश्य म्हणजे निकाल नव्हे. नैराश्य म्हणजे स्वतःचे महत्त्व नाकारणे, स्वतःला न्यून लेखणे आणि आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःचे गुण आणि दोष पारखणे होय. जीवनातील वाईट अनुभवांकडे नैराश्याने पाठ फिरवू नका, तर आत्मनिरीक्षणाच्या दृष्टीने त्यांना सामोरे जा. शारीरिक रोगाइतके मानसिक आरोग्याला उपचारामध्ये महत्त्वाचे स्थान मिळणे महत्त्वाचे आहे. या विषयाची लपवाछपवी दूर होणे, हा मानसिक आरोग्याविषयी खूप महत्त्वाचा सामाजिक टप्पा आहे.

थोडक्यात सांगायचे म्हणजे मी घेतलेले माझ्या मनावरील भूतकाळाचे ओझे, जर मी उतरवले आणि मी वर्तमानात जगत रहिलो, तर भविष्यकाळ मला अधिक सुखदायक घडवता येईल.

– रेश्मा भाईप, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग

सनातन सांगत असलेल्या साधनेतही वर्तमानकाळात रहाणे, मनमोकळेपणा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आदी सूत्रे समाविष्ट आहेत. मुळात आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीवनातील दैनंदिन प्रसंगांत मन सातत्याने अयोग्य प्रतिसाद देत राहिल्याने मनाची ऊर्जा न्यून होत जाते. स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्यास आपले प्रतिसाद उत्तरोत्तर योग्य होत गेल्याने मनाची ऊर्जा वाचते अन् त्या ऊर्जेचा संचय होत जातो. त्यामुळे अनिवार्य असलेल्या संघर्षाच्या किंवा कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी व्यक्तीकडे मुबलक ऊर्जेचा साठा रहातो. मानसिक समस्या अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असल्यास देवतांच्या नामजपाचाही लाभ होतो. म्हणूनच मानसिक समस्यांवर साधना हाच मूलभूत आणि सर्वंकष उपाय आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment