सनातन संस्थेने राबवलेल्या ‘प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमाचा अन्वेषण यंत्रणांनी केलेला विपर्यास आणि वास्तव !

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांच्या निमित्ताने अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. चौकशीतील अनेक प्रश्‍न मूळ हत्या प्रकरणाशी संबंधित नसतात. पोलीस त्याचा हेतूत: बागुलबुवा निर्माण करतात आणि साधकांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. सनातन संस्थेने राबवलेल्या प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाविषयीच्या अपसमजातून पोलिसांना पडणारे प्रश्‍न ‘शंकासुर’ असल्याप्रमाणे भासतात.

 

पोलिसांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्राविषयी
प्रश्‍न विचारल्यास या लेखातील सूत्रांच्या आधारे त्यांना उत्तर

१. प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम आणि हत्या प्रकरण यांचा संबंध काय ?

सनातन संस्थेच्या वतीने वर्ष २००० च्या आसपास गोव्यातील एका खेडेगावात चालवलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रात लाठी-काठी, कराटे प्रशिक्षणासह मंकी क्रॉल, बर्मा ब्रिज, उंचावर चढणे आदी प्रशिक्षण दिले जात असे. ‘सनातनच्या साधकांना अशा सैनिकी प्रशिक्षणाची आवश्यकता काय ?’, असा प्रश्‍न अन्वेषण यंत्रणेतील तपास अधिकारी साधकांना विचारत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या करणार्‍यांनी ‘मंकी क्रॉल’ करून किंवा उंचावर चढून, उंचावरून चालत येऊन या हत्या केल्या आहेत, असे नाही. त्यामुळे या प्रशिक्षणाचा या प्रकरणांशी काही संबंध नाही. तरीही पोलीस हे प्रश्‍न सातत्याने साधकांना विचारत आहेत.

२. साधकांना प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यामागचा सनातनचा उद्देश

समाजातील वाढते रज-तम पहाता अनेक संतांनी तिसरे विश्‍वयुद्ध आणि गृहयुद्ध यांचे भाकीत मागील १५-२० वर्षांत वारंवार केले आहे. विशेष म्हणजे या भीषण काळाची चुणूक दाखवणार्‍या घटना मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, गोध्रा हत्याकांड, आझाद मैदान (मुंबई) येथे रझा अकादमीने केलेली दंगल आदी अनेक प्रकरणांमधून दिसून आली आहे. दुर्दैवाने अशा आक्रमणांमध्ये पोलीस आणि सामान्य नागरिकही मारले गेले. भारतात आयसिसचा शिरकाव हा आगामी काळात अशा कारवाया आणखीनच वाढणार असल्याचे द्योतक आहे. सनातनचा स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम केवळ गुंड, रोडरोमिओ यांचा प्रतिकार करण्यापर्यंत मर्यादित नव्हता. आगामी काळात परकीय आणि देशविघातक शक्तींनी देशहिताच्या विरोधात सामूहिक आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार सामान्य नागरिकांनाही करता येणे आवश्यक आहे, ही त्यामागील भूमिका होती. हॉटेल ताजवर आतंकवादी आक्रमण झाले, त्या वेळी अवघ्या ४-५ अतिरेक्यांनी भारताच्या सहस्रो सैन्याला तब्बल दोन दिवस खिळवून ठेवले होते. अशा वेळी हॉटेलमध्ये अडकलेल्या नागरिकांपैकी दहा टक्के नागरिकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले असते, तर युक्त्या प्रयुक्त्या लढवून ते आतंकवाद्यांना थोपवू शकले असते आणि जीवितहानी अल्प झाली असती. देश आणि समाज संकटात असतांना अशी बघ्याची भूमिका घेणारा समाज नको, तर स्वसंरक्षणासह राष्ट्ररक्षणात स्वत:चे योगदान देणारा समाज घडायला हवा, या भूमिकेतून सनातनने ‘प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रा’च्या माध्यमातून पूर्वसिद्धता केली होती. आतापर्यंत आतंकवादी आणि धर्मांध यांनी केलेल्या आक्रमणांत पोलीस अपयशी ठरले, हे वास्तव आहे. हा भूतकाळ पहाता अशी आक्रमणे पुन्हा होतील, त्या वेळी त्या ठिकाणी पोलीस आणि सैन्यदल नसेल. आतंकवाद्यांचे शिकार होण्यासाठी सर्वसामान्य जनता मात्र असेल. अशा प्रसंगांत समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती योगदान देण्याची वेळ आल्यास एका सैनिकासारखे लढण्याची शारीरिक क्षमता सामान्य नागरिकाकडेही असणे आवश्यक आहे. त्यामुळे सनातनने साधकांना प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले.

गुन्हा घडत असतांना पोलीस समोर असतात; पण ते निष्क्रीय किंवा हतबल असतात, त्यामुळे निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ‘संकटकाळात पोलीस माझे किंवा माझ्या परिवाराचे रक्षण करतील’ इतके निर्धास्त रहाण्याची स्थिती आज नाही. अशा प्रसंगात स्वसंरक्षणासाठी सैन्याप्रमाणे प्रगत विद्या आत्मसात करण्यास भारतीय कायदेही मज्जाव करत नाहीत. त्यामुळे ‘सैन्याप्रमाणे प्रशिक्षण तुम्हाला का हवे ?’ हा पोलीस साधकांना विचारत असलेला प्रश्‍न बाष्कळपणा ठरतो. असे प्रशिक्षण पोलीस घेत नाहीत किंवा घेतलेल्या प्रशिक्षणाचा वापर करत नाहीत; म्हणूनच पोलिसांना जाळून मारले जाते, पोलिसांच्या गाड्या जाळल्या जातात आणि पोलीस ठाण्यांवर आक्रमणे होतात. सनातनने दिले तसे प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण जनतेने घेतल्यास त्याचा लाभ पोलिसांनाच होईल, हे अन्वेषण यंत्रणांना समजेल तो सुदिन !

अर्थात् स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यामागे समाजहिताचा उद्देश होता; मात्र अल्प साधक संख्या आणि समाजाचा प्रतिसाद अल्प असल्यामुळे वर्ष २००३ मध्ये हा उपक्रम बंद करण्यात आला.

३. ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ हा सनातनचा छुपा उपक्रम नव्हता, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे !

साधकांची चौकशी करतांना ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण हा उपक्रम आतंकवादी निर्माण करण्यासाठी राबवला गेला’, असा पोलिसांचा सूर असतो. खालील सूत्रांचा विचार केल्यास पोलिसांचा हा दावा तकलादू आहे, हे लक्षात येईल.

३ अ. सनातनने स्वसंरक्षण प्रशिक्षण हा उपक्रम जाहीरपणे राबवला

१. सनातनने स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम समाजात पोेचवण्यासाठी त्याचा जाहीर प्रचार केला. त्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये फलक लावले, हस्तपत्रके वाटली, पथनाट्याद्वारे जागृती केली, वृत्तपत्रांतून लेखन केले, मिरवणुका आणि जाहीर कार्यक्रमांची व्यासपिठे यांमध्ये प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली, उपक्रम तळागाळात पोचावा यासाठी ग्रंथ आणि ध्वनीचित्र-तबकडी (व्हीसीडी) यांची निर्मिती केली.

२. वेगवेगळ्या ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे उद्घाटन लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी यांच्या हस्ते आणि पत्रकारांच्या समक्ष करण्यात आले. या सर्वांना हे प्रशिक्षण देशविरोधी आणि आतंकवादी निर्माण करणारे वाटले असते, तर त्यांनी त्या वेळी त्याला स्वीकारले असते का ?

४. सनातनने स्वसंरक्षण प्रशिक्षण चालू करण्यामागचे काही अन्य उद्देश

४ अ. देशसेवेसाठी सैन्यभरती होण्याची स्फूर्ती प्रशिक्षणार्थींना देणे :

सैन्यदलात भरती होण्यास देशातील तरुण इच्छुक नसतात. त्यामुळे सैन्यदलातील बर्‍याच जागा रिक्त रहातात, अशा बातम्या मागील अनेक वर्षांपासून येत आहेत. सनातन ही धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटना आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल मजबूत असणे आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे, अशी सनातनची विचारसरणी आहे. या भूमिकेतूनच प्रशिक्षणार्थींपैकी काही जणांमध्ये तरी सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, असा सनातनचा उद्देश होता. ती स्फूर्ती प्रशिक्षणार्थींमध्ये निर्माण करण्यासाठी सैन्य गणवेश आणि एअर रायफल यांचा वापर केला जात होता. त्यामुळे सनातनच्या शिबिरात सैनिकी गणवेश आणि एअर रायफल यांचा वापर होत असे. पोलिसांनी मात्र प्रगत स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रातील साधकांचे सैनिकी गणवेशातील आणि एअर रायफल घेतलेली छायाचित्रे दाखवून ‘याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आणि सनातनच्या राष्ट्रप्रेमाविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.

४ आ. चोर आणि धर्मांध यांपासून मंदिरांचे रक्षण करणे :

सनातनने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू केले, त्या काळी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात चोर्‍या होत होत्या आणि धर्मांध मंदिराच्या पावित्र्याला बाधा येईल, अशा कारवाया करत होते. अशा असुरक्षित मंदिरांचे रक्षण करणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे. अशा नागरिकांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, हा उद्देश होता.

४ इ. मुलींनी रोडरोमिआेंपासून स्वत:चे रक्षण करणे :

शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय या निमित्ताने मुली, महिला यांना प्रतिदिन घराबाहेर रहावे लागते आणि त्यांना अत्याचारही सहन करावे लागतात. अशा अत्याचाराच्या प्रसंगात महिलांना स्वसंरक्षण कला आत्मसात असणे आवश्यक आहे, या उद्देशाने महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षणवर्ग घेण्यात येत होते.

४ ई. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये व्यायामाची आवड अन् प्रतिकारक्षमता निर्माण करणे :

शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये व्यायामाची आवड आणि प्रतिकारक्षमता निर्माण व्हावी, यासाठी सनातनने शाळांमध्ये नियमित आणि विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित केले होते.

४ उ. मुलांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून धर्मशिक्षण देऊन सन्मार्गाला लावणे :

स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात येणारे बहुतांश तरुण-तरुणी असतात. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये धर्मशिक्षण अंतर्भूत नसल्यामुळे ते त्यापासून वंचित रहातात. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवड असणार्‍या इच्छुकांना प्रशिक्षणवर्गातील काही वेळ साधना आणि धर्मशिक्षण दिले जाते. त्यामुळे वाममार्गाला लागलेल्या मुलांनीही चांगले आचरण चालू केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment