नालासोपारा येथील घटनेशी काडीमात्र संबंध नसतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अपकीर्ती करण्याचा ‘एबीपी न्यूज’चा अश्‍लाघ्य प्रकार !

‘एबीपी न्यूज’ वृत्तवाहिनीवरून सनातन
संस्थेला आतंकवादी संघटना ठरवण्याचा घृणास्पद प्रकार

जगभरातील लाखो जणांना योग्य साधना सांगून त्यांचे जीवन आनंदी करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या संतांवर अश्‍लाघ्य टीका करण्याचा ‘एबीपी न्यूज’सारख्या वृत्तवाहिन्यांचा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रयत्न होय ! नाहक अपकीर्ती करणार्‍या अशा वाहिन्यांवर कायदेशीर कारवाईसाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – ‘५ मोठ्या शहरांवर खुनी लक्ष’, ‘घरामध्ये बॉम्ब सिद्ध करण्याची फॅक्टरी’, ‘दुकानामध्ये स्फोटकांचे गोदाम’, ‘हत्येच्या षड्यंत्राचे स्पष्टीकरण’, ‘सनातन संस्थेची विस्फोटक योजना’, अशा प्रकारचे भडक मथळे देऊन ‘एबीपी न्यूज’ वृत्तवाहिनीने १० ऑगस्ट या दिवशी प्रसारित केलेल्या वृत्तात निरपेक्ष आणि त्यागी वृत्तीने अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ ठरवण्याचा घृणास्पद प्रकार केला. नालासोपारा येथील प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे वृत्तामध्ये सातत्याने दाखवून त्यांची आणि सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा अश्‍लाघ्य प्रकार या वृत्ताद्वारे करण्यात आला. सनातन संस्थेचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्देश म्हणजे फार मोठा गुन्हा आहे, तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर हिंदु धर्माविषयी देण्यात आलेली शास्त्रीय माहिती म्हणजे धर्मांधता पसरवण्यात येत असल्याचे या वृत्ताद्वारे भासवण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने देण्यात येणारे स्वरक्षण प्रशिक्षण म्हणजे जणूकाही आतंकवादी प्रशिक्षण दिले जात असल्याचे चित्र वृत्ताद्वारे उभे करून अत्यंत खोटारडे आणि एकांगी वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले. याद्वारे ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीची पीतपत्रकारिता उघड झाली आहे. (अशा प्रकारच्या तथ्यहीन वृत्तांना कोणताही जनाधार न मिळता उलट सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य देशात जलदगतीने वाढत आहे, ही संस्थेच्या कार्याची पोचपावती आहे. अशा प्रकारचे खोटे वृत्त दाखवणार्‍या ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

सनातन संस्थेने श्री. वैभव राऊत हे संस्थेचे साधक नसल्याचे स्पष्ट करूनही या वृत्तामध्ये श्री. राऊत यांना सनातनचे साधक असल्याचे भासवण्यात आले आहे. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची छायाचित्रे, तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली अध्यात्मविषयक संशोधनाची छायाचित्रे दाखवून त्याविषयी अभ्यासहीन टीका करण्यात आली. या वृत्तात डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सनातनला लक्ष्य करण्यात आले.(या प्रकरणांत धर्मद्रोह्यांनी सातत्याने चहुबाजूने सनातनला लक्ष्य केले; मात्र प्रत्येक वेळी न्यायव्यवस्थेने कोणत्याही प्रकरणात संस्थेला दोषी ठरवलेले नाही. यातून वृत्तवाहिनीचा पराकोटीचा सनातनद्वेषच दिसून येतो ! – संपादक)

वृत्ताशी काडीचाही संबंध नसलेल्या गोष्टी ठासून
बोलून सनसनाटी वृत्ताचा पोकळ आभास निर्माण करण्याचा प्रयत्न !

वृत्तात पुढे असे सांगण्यात आले आहे, ‘डॉ. आठवले यांच्या चमत्काराची कहाणी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. ज्या सनातन संस्थेवर व्यक्तींना संमोहित करण्याचा आरोप केला जातो, ज्या संस्थेवर पाखंड आणि अंधश्रद्धा यांचा प्रचार करत असल्याचा आरोप आहे, ज्या संस्थेमध्ये आत्मरक्षणाच्या नावावर सैनिकी प्रशिक्षण दिले जाते, जी संस्था बॉम्बस्फोट, सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येचे आरोप यांनी घेरली आहे, ती संस्था पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सनातन संस्थेवरून पुन्हा एकदा विस्फोटक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा हत्येच्या एका भयानक षड्यंत्राचा भाग आहे. आतंकवादविरोधी पथकाने सनातनशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या घरातील ‘बॉम्ब फॅक्टरी’ उघड केली आहे. अन्वेषणानंतर आतंकवादविरोधी पथकाने जे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे संपूर्ण शहरात सनसनाटी निर्माण झाली आहे’, अशा प्रकारचे जनतेच्या मनात भय निर्माण करणारे शब्दप्रयोग वापरून या ‘एबीपी न्यूज’ने स्वत:चा ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या वृत्तामध्ये जे स्थानिक माहिती देण्यासाठी पुढे आले आहेत, त्यांनी वैभव राऊत यांचे समर्थन केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया त्रोटक स्वरूपात दाखवून उर्वरित सर्व वृत्त एकांगी दाखवले आहे. तसेच वैभव राऊत हे सनातनचे साधक नाहीत, तरीही सनातन संस्था त्यांना वाचवण्यासाठी पुढे आली आहे, याविषयी वृत्तामध्ये प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. (याविषयी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी ‘वैभव राऊत हे सनातनचे साधक असोत वा नसोत, जो हिंदुत्वासाठी कार्य करतो, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू’, अशी भूमिका प्रसारमाध्यमांपुढे स्पष्टपणे मांडली आहे ! – संपादक)

या वृत्तामध्ये, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हातावर आढळलेले दैवीकण, त्यांच्या केसांना आलेला सोनेरी रंग, त्यांच्या शरिरावर उमटलेली ‘ॐ’च्या आकाराची चिन्हे दाखवण्यात आली. हे दाखवतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची विविध छायाचित्रे वृत्तामध्ये दाखवून त्यांची आणि सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (याविषयीची शास्त्रीय माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर सविस्तरपणे देण्यात आली आहे. तसेच या दैवी कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले आहे. आय.आय.टी. मुंबईने केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. ही संशोधनात्मक माहिती वाचण्याचे शहाणपण वृत्त देणार्‍यांनी केले असते, तर त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली असती; मात्र ज्यांनी सनातन संस्था आणि हिंदु धर्म यांची अपकीर्ती करण्याचे ठरवलेच आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ होय ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment