परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लिखाणावर समाजातील एका जात्यंध व्यक्तीने केलेली एकांगी टीका आणि तिचे खंडण

(म्हणे) ‘सनातन जातीचा उदोउदो करते !’

८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदरात ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, या मथळ्याखाली एक चौकट प्रसिद्ध झाली होती. सामाजिक संकेतस्थळांवर या चौकटीतील लिखाणावर एकांगी टीका करणारा एक संदेश प्रसारित करण्यात येत होता.

८.१.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’

ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या !

‘वर्ष १९४८ मध्ये महात्मा गांधींची हिंदु धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी नथुराम गोडसे या ब्राह्मणाने हत्या केली. तेव्हा तथाकथित गांधीप्रेमींनी (ब्राह्मणद्वेष्ट्यांनी) सहस्रो ब्राह्मणांची घरे जाळली आणि त्यांच्यावर आक्रमण केले. आक्रमणकर्ते खरंच गांधीप्रेमी होते का ? ते खरे गांधीप्रेमी असते, तर त्यांनी अहिंसा तत्त्वाचे पालन केले असते. ते जर हिंदु धर्माभिमानी असते, तर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी त्यांनी काही कृती केली असती. ती त्यांनी केली नाही, म्हणजे ते हिंदु धर्माभिमानी नव्हते. पेशव्यांनी देहलीवरही राज्य केले. याचा उल्लेखही ब्राह्मणद्वेष्टे करत नाहीत; कारण पेशवे ब्राह्मण होते !

युगायुगापासून सर्व मानवजातीला आदर्श असलेला हिंदु धर्म केवळ ब्राह्मणांमुळे टिकून आहे. ब्राह्मण नसते, तर एव्हाना पृथ्वीवर हिंदु धर्मच उरला नसता. बहुसंख्य हिंदूंनी हिंदु धर्माचा त्याग केला असल्यामुळे त्यांची स्थिती जगात सर्वांत केविलवाणी झाली आहे. हे सत्य समजून घेऊन आतातरी हिंदूंनी एकत्र येऊन साधना केल्यास हिंदु धर्माला आणि हिंदूंना पूर्वीचे महत्त्व प्राप्त होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ही टीका आणि त्याचे खंडण पुढीलप्रमाणे…

टीका

धर्माच्या नावाखाली काम करणार्‍या सनातनसारख्या संस्थेने ‘जातीचा उदोउदो करणे’, हे त्यांच्यातील दांभिकतेचे लक्षण नाही का ? थोर लोकांना जातीत बांधून तुम्ही त्यांच्या कार्याचा अपमान नाही का करत ? जातीचाच उदोउदो करायचा आहे, तर ‘धर्मजागृती’ ‘हिंदु राष्ट्ररक्षण’ हे शब्द कोणत्या अधिकाराने वापरता ? सनातन जर थोर महापुरुषांना जातीत अडकवत आहे, तर ते कोणत्या तोंडाने बिग्रेडला विरोध करतात ? हा त्यांचा दुटप्पीपणा नाही का ? त्यामुळे धर्माच्या नावाखाली जातीचा उदोउदो करणार्‍या सनातनसारख्या संस्थेला कितपत किंमत द्यायची, हे आता प्रत्येक धर्माभिमानी हिंदुने ठरवावे.

खंडण

१. टीकाकाराने दैनिक सनातन प्रभातमधील चौकटीतील ‘युगायुगापासून सर्व मानवजातीला आदर्श असलेला हिंदु धर्म केवळ ब्राह्मणांमुळे टिकून आहे. ब्राह्मण नसते, तर एव्हाना पृथ्वीवर हिंदु धर्मच उरला नसता’, या वाक्यांच्या आधीचा पूर्ण परिच्छेद गाळून ही दोनच वाक्ये निवडून त्याविषयी अपप्रचार करणे अयोग्य आणि द्वेषपूर्ण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हे विचार जात्यंध ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या विरोधातील आहेत. हे ब्राह्मणद्वेष्टे ब्राह्मण घराण्यात जन्मलेल्या थोर पुरुषांचेही कर्तृत्व केवळ ते जन्माने ब्राह्मण आहेत; म्हणून नाकारतात. त्यामुळे लिखाणाचा मथळाही ‘ब्राह्मणद्वेष्ट्यांनो, हे लक्षात घ्या’, असा आहे.

२. ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेल्या काही ब्राह्मणांनी हिंदु धर्माची आधारशिला असलेले वेद, उपनिषदे मुखोद्गत करून त्यातील ज्ञान युगानुयुगे टिकवले आहे. हे ज्ञान टिकले, तरच हिंदु धर्म टिकेल. बहुसंख्य हिंदू टिकले; पण हिंदु धर्मातील ज्ञान टिकले नाही, तर हे बहुसंख्य हिंदू धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु धर्मापासून दूर जाऊन कालांतराने हिंदु धर्म नामशेष होईल. या अर्थानेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ब्राह्मण नसते, तर एव्हाना पृथ्वीवर हिंदु धर्मच उरला नसता’, असे म्हटले आहे.

३. ‘पेशवे ब्राह्मण होते’ एवढ्या तीनच शब्दांवरून ‘सनातन थोर पुरुषांना जातीत बांधून त्यांच्या कार्याचा अपमान करते’, असे म्हणणे हे विरोधासाठी विरोध म्हणून सनातनवर जातीयतेचा आरोप केल्यासारखे आहे. प्रत्यक्षात ‘पेशव्यांनी देहलीवरही राज्य केले. याचा उल्लेखही ब्राह्मणद्वेष्टे करत नाहीत; कारण पेशवे ब्राह्मण होते !’, असे मूळ वाक्य आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खालोखाल पेशव्यांची कारकीर्द पराक्रमी होती आणि ‘पेशव्यांच्या या कर्तृत्वाचा पेशवे जन्माने ब्राह्मण असल्यामुळेच ब्राह्मणद्वेष्टे उल्लेखही करत नाहीत’, असा अर्थ आहे अन् यातून ब्राह्मणद्वेष्ट्यांची जात्यंधता दाखवून देण्यात आली आहे. यात दुटप्पीपणा कसला ?

४. सनातन संस्था जातीव्यवस्था नाही, तर गीतेत श्रीकृष्णाने उल्लेख केलेली हिंदु धर्मातील वर्णव्यवस्था मानते. हिंदु धर्मात जाती नाहीत, त्या मनुष्याने निर्माण केल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे हिंदु धर्मातील चार वर्ण गुणकर्मानुसार आहेत; परंतु जन्मानुसार जातीचा पगडा समाजावर खूप मोठ्या प्रमाणात असल्याने सध्याच्या काळात मूळ धर्मातील ही वर्णव्यवस्था समजून घेणे आणि स्वीकारणे समाजाला कठीण जाते. सर्वांना धर्मशिक्षण मिळाल्यास जातीव्यवस्था नष्ट होईल आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याचा वर्ण ठरेल.

सनातनवर जातीयतेचा आरोप करणार्‍यांचा जात्यंधपणा !

टीका करणार्‍याने याच लिखाणात ‘हिंदु धर्म टिकून आहे तो केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे आणि मराठ्यांमुळेच’, असेही विचार मांडले आहेत.(छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माचे रक्षण केले, हे सनातनही मानते; परंतु ‘केवळ मराठ्यांनीच रक्षण केले’, असे म्हणणे ही जात्यंधताच नव्हेे का ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीही हिंदु धर्मावर अन्य धर्मियांकडून आक्रमणे झाली आहेत. आद्य शंकराचार्यांच्या वेळीही हिंदु धर्म म्हणजेच वैदिक धर्म संकटात होता आणि तो टिकवून ठेवण्यात आद्य शंकराचार्यांचे योगदान वादातीत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रशिक्षण देणारे दादोजी कोंडदेव, पन्हाळखिंड लढवून छत्रपती शिवाजी महाराज यांना सुखरूपपणे विशाळगडावर पोचू देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे ब्राह्मणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत होते’, असेही कोणी म्हणू शकतो; पण हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे जात पाहून लढत नव्हते. ते धर्म आणि राष्ट्र कार्य म्हणून लढत होते. असे असतांना त्यांना जातीच्या चष्म्यातून पहाणे, हा जात्यंधपणाच नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment