साधकांना भावविश्‍वात नेणारे भावसत्संग !

भाव तेथे देव’ ही उक्ती आपण ऐकलेली आहे. भाव स्वतःमध्ये निर्माण करणे कठीण आहे. दुसर्‍यामध्ये तो निर्माण करणे त्याहून कठीण आहे; तरीही ही किमया रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात घेतल्या जाणार्‍या भावसत्संगात साध्य होते, याची अनुभूती आली. या भावसत्संगाचे वर्णन करणारा हा लेख.

सनातन संस्थेमध्ये ५ ऑक्टोबर २०१६ मध्ये राष्ट्रीय भाववृद्धी सत्संग चालू झाले. सनातनच्या भाव असणाऱ्या साधिका, तसेच श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या साक्षात् दैवी वाणीतून प्रसारित होणाऱ्या या भाववृद्धी सत्संगांमुळे सनातनच्या साधकांची भावओंजळ भरभरून वाहिली आणि साधक भावभक्तीच्या एका टप्प्यावर येऊन पोचले !

या भाववृद्धी सत्संगांनी साधकांना अगणित भावक्षणांचे मोती देऊन, त्यांची भावझोळी भरून त्यांना श्रीमंत केले ! अनेक भावार्चनांच्या माध्यमातून देवतांचे आणि विविध दैवी लोकांचे अस्तित्व अनुभवायला देऊन अलौकिक अशा भावविश्वात नेले ! आदिशक्तीसह सर्व देवतांच्या सगुण-निर्गुण रूपाच्या भाववर्णनाने साक्षात् त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती दिली ! गुरुमाऊलीच्या भावप्रीतीच्या फुलांनी बहरलेली झालर साधकांच्या मनःपटलावर पांघरली ! साधकांचे भावविश्व समृद्ध करून त्यांच्या हृदयमंदिरात गुरुदेवांचे अस्तित्व कायमचे कोरले !

भाववृद्धी सत्संगांनी काय दिले नाही ?… साधकांना त्यांचे सर्व सगेसोयरे, सहसाधक यांना समजून घेऊन त्यांच्याविषयी भावसंवेदना निर्माण करण्यास उद्युक्त केले ! इतकेच काय महाशक्ती पंचमहाभूतांविषयी अपार शरणागतभाव वृद्धींगत केला ! गुरूंनी दिलेल्या प्रत्येक वस्तूविषयी, ते करून घेत असलेल्या साधनेविषयी, ते देत असलेल्या अनुभूतींविषयी त्यांच्याप्रती अपार आणि अमर्याद कृतज्ञताभाव निर्माण करण्यास शिकवले ! कृतज्ञतेच्या भावाश्रूंनी साधकांना ओलेचिंब केले !

भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले ! साधकांच्या भाववृद्धीतील अडथळे असणाऱ्या दोषांवर मात कशी करायची ? ते वारंवार सांगितले ! साक्षात् वैकुंठातील भावचैतन्याचा तेजोमय प्रकाश साधकांना अनुभवायला देऊन त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने ‘भावपूर्ण’ (भावाने परिपूर्ण) केले !

असे भाव आणि भक्ती सत्संग अनुभवण्यास देऊन साधकांचा साधनाप्रवास भावचैतन्याच्या दीपज्योतीने उजळून टाकणाऱ्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! आणि त्यांच्या माध्यमातून साधकांना दैदिप्यमान भावविश्वाची ओळख करून देऊन त्यात डुंबत ठेवणाऱ्या साक्षात् श्रीमन्नारायण परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !

 

१. भावजागृतीचा प्रयोग

yadnesh_sawant
श्री. यज्ञेश सावंत

‘गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत’, हे ऐकल्यावर सर्व साधक पुष्कळ उत्सुकतेने आणि कृतज्ञताभावाने गुरुमाऊलीच्या येण्याची वाट पहात आहेत. ‘आता गुरुमाऊलींचे दर्शन होणार; म्हणून साधक त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांची कृपा प्राप्त व्हावी; म्हणून प्रार्थना करत आहेत आणि एवढ्यात निरोप मिळतो की, ते आता काही कारणामुळे येऊ शकणार नाहीत. हे कळल्याबरोबर साधकांना थोडे वाईट वाटले आहे. ‘आमचे काही चुकले का ? आमची तळमळ अल्प पडली का ?’ अशा प्रकारे विचार करतांना साधक खंत व्यक्त करत आहेत आणि शरणागतीने याचना करत आहेत. एवढ्यात एका साधकाचे लक्ष गुरुमाऊलीच्या चरणांकडे जाते आणि पहातात तर काय गुरुमाऊली तेथे उपस्थित आहे. सर्वांनाच ते लक्षात येते आणि सर्वांच्या आनंदाला पारावार रहात नाही आणि साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू दाटून येऊन कृतज्ञताभावाने ते मनोमन नमस्कार करत आहेत…’, असे विविध प्रयोग घेऊन साधकाला भावविश्‍वात घेऊन जाणारा भावसत्संग रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.

 

२. भावसत्संगाद्वारे साधकाच्या मनाची निर्मळतेच्या दिशेने वाटचाल होणे

भावनिर्मितीसाठी घेतल्या जाणार्‍या अशा प्रयोगांमुळे साधक अंतर्मुख होतो, तसेच देवाचे अस्तित्व अनुभवून तात्पुरत्या कालावधीकरता का असेना, भावस्थितीची अनुभूती घेतो. साधकाच्या अंतर्मनातील विचार प्रतिक्रिया, तसेच स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे विचार बाहेर पडू लागतात. पुढे मनाची निर्मळतेच्या दिशेने वाटचाल होऊ लागते आणि ती जागा चैतन्य, कृतज्ञता नि भावभक्ती यांद्वारे भरली जाते. मायेतील सुख-दुःखाच्या विचारांपासून दूर जाऊन देवाच्या आनंददायी विचारांमध्ये साधक हरवून जातो. या काही मिनिटांच्या प्रयोगामुळे तो देवाला भेटण्यासाठी आतूर होतो आणि त्याला साधनेसाठी अनेक हत्तींएवढे आध्यात्मिक बळ मिळाल्याची जाणीव होते.

 

३. भावजागृतीच्या प्रयत्नांसाठी दिशा मिळणे अन् काही वेळ
भावजागृती होताच अनमोल गोष्ट गवसल्याचा आनंद मिळणे

प्रत्येक जण दिवसभर भाववृद्धीसाठी करायचे प्रयत्न निश्‍चित करतो. तो कुणा साधकामध्ये श्रीकृष्णाला अनुभवायला जातो, कुणी कर्तेपणा अर्पून ‘श्रीकृष्णच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे’, अशा आनंददायी विचारांमध्ये रमतो, कुणी ‘गुरुमाऊली माझ्याकडे पहात आहे’, या भावाने प्रत्येक कृती करतो, तर कुणी ‘गुरुमाऊलीसाठीच करत आहे’, याच तल्लीनतेने प्रत्येक कृती करतो अन् ‘आज काहीतरी अनमोल गोष्ट प्राप्त झाली’, या आनंदात पुढील भावसत्संगाची आतुरतेने वाट पहातो.

 

४. भावसत्संगाद्वारे साधकाच्या अंतर्मनाची कवाडे उघडणे,
त्यात भगवंताला स्थान देण्याचा प्रयत्न होणे अन् नकळतपणे
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन होऊन साधकाच्या मुखावर आनंद विलसणे

एरव्ही मनातील प्रतिक्रिया किंवा अहंचे विचार मोकळेपणाने सांगायला काही साधकांना संकोच वाटतो; पण भावसत्संगात विचारलेल्या प्रश्‍नांना ते मनापासून उत्तरे देतात. त्यामुळे त्यांच्याकडून मनातील पूर्वग्रह, कर्तेपणा आदींसंबंधी विचार व्यक्त होतात आणि पुढे ते देवाच्या चरणी त्यांचे मन अर्पण करण्यास प्रारंभ करतात. नंतर तो स्वतःच्या अंतर्मनाची कवाडे उघडून भगवंताला तेथे स्थान देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे ‘कधी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाली ?’, हे त्यालाही कळत नाही; मात्र संतांच्या सहवासात क्वचित अनुभवता येणारा मनाचा हलकेपणा किंवा पूर्ण ताणविरहीत स्थितीचा आनंद त्याच्या मुखावरच विलसतो.

 

५. भाव जागृत करणार्‍या गृहपाठाला आरंभ करताच
साधक ‘देव भावाचा भुकेला आहे’, हे अनुभवण्यास शिकणे

साधकाची दिवसभर भावाची स्थिती टिकून रहावी, यासाठी त्याला गृहपाठ देण्यात येतो. गृहपाठातून साधक स्वतःच्या मनाच्या स्थितीकडे पाहू लागतो. त्यामुळे त्याला कधी मनाच्या संघर्षामध्ये देवाचे दर्शन होते, तर कधी नियमित समवेत असलेल्या साधकामध्ये देवाचे दर्शन होते. साधकाला ‘एरव्ही बर्‍याच श्रमाने करत असलेली कृतीही त्याच्याकडून सहज होत आहे. समवेत ईश्‍वरी शक्ती आहे. आनंदपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे किंवा मनात येणार्‍या विचारांमध्ये सकारात्मक पालट झाला आहे’, अशी जाणीव होऊ लागते. अशा प्रकारे तो विविध प्रसंग, सजीव-निर्जीव गोष्टी यांच्या माध्यमातून होणारे देवाचे साहाय्य अनुभवू लागतो. साहजिकच साधक ‘देव भावाचा भुकेला आहे’, असे प्रत्यक्ष अनुभवण्यास शिकतो.

 

६. कृतज्ञता

‘भावाची स्थिती अथवा त्या वेळी मनाची कशी प्रक्रिया होते ?’, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. ‘ती स्थिती प्रत्येकाने अनुभवणे’, हेच त्याचे उत्तर आहे. साधकांना भावविश्‍वात नेणारे हे भावसत्संग चालू केल्याविषयी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात