हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

अंनिसवाले आणि धर्मद्रोही यांना हिंदूंचे सण आणि उत्सव आले की, पर्यावरण रक्षणाचा उमाळा येतो. गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करायची नाही, कारण प्रदूषण होते म्हणणारे मूर्ती मातीचीच करून नैसर्गिक रंग द्या, असा कधी प्रचार करत नाहीत. तसेच आता दसरा आल्यावर सोनं लुटण्याच्या प्रथेमुळे आपट्याचे झाड ओरबाडले जाते असे सांगून निसर्गाच्या रक्षणाचे ठेकेदार असल्याप्रमाणे हे धर्मद्रोही सरसावले आहेत. असाच एक संदेश गेल्या वर्षी दसर्‍याच्या आदल्या दिवशीपासून व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता.

व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत असलेला धर्मद्रोही संदेश !

येत्या विजयादशमीपासून सोनं लुटणे म्हणजेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं मी ठरवलंय. निसर्ग अक्षरशः ओरबाडला जातोय. पूर्वी माणसं कमी आणि झाडं मुबलक होती, तेव्हा ही प्रथा ठीक होती. आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे; म्हणून निसर्गाचे रक्षण व्हायला हवे आणि त्याचा प्रारंभ आपल्यापासूनच करायला हवा. मला भेटायला येणार्‍यांनाही मी हे समजावून सांगणार आहे. हळूहळू निश्‍चितच जागृती होऊन झाडं ओरबाडणे थांबेल.

लक्षात असुद्या पाने झाडासाठी अन्न बनवितात आणि आपल्याला अमृततुल्य प्राणवायू देतात. तर या वर्षीपासून सोनं न लुटता केवळ शुभेच्छा देऊया ! निसर्ग वाचवा !

खंडण : अनधिकृतरित्या होणारी झाडांची तोडणी, कारखान्यांतील टाकाऊ वायू आणि जलाशयांत सोडण्यात येणारे रासायनिक पाणी यांमुळे झाडे मरत आहेत. औद्योगिकरणाच्या नावाखाली पर्यावरण संवेदनशील भूमीतही उद्योग उभारण्याचा अट्टाहास चालू आहे. खाणींतून पंपाद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे बागायती, शेती नष्ट झाली आहे, हे निसर्गाला ओरबाडणे दिसत नाही कि जाणूनबुजून डोळेझाक केली जाते ? निसर्गाचे रक्षण करण्याची एवढीच तळमळ असलेले वर्षभरात किती झाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात ? केवळ हिंदूंच्या सणावारी झाडांची पाने तोडू नका असे नकारात्मक सांगणारे झाडे लावा असे सकारात्मक का सांगत नाहीत ?

हिंदूंनो, आपट्याचे पान
देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या

१. एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. आपट्याचे पान एकमेकांना देणे, हे आपल्याकडील सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तू दुसर्‍याला देण्यासारखे आहे. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

२. दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते.

हिंदु धर्मातील सण आणि उत्सव हे निसर्गाचा समतोल राखणारेच आहेत !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात