शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !

शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या
चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी
करणार्‍यांना प.पू. पांडे महाराजांनी दिलेले समर्पक उत्तर !

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

शनिशिंगणापूर येथे भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करत तसा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हिंदु धर्माभिमानी आणि शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थ यांच्या प्रखर आंदोलनामुळे या धर्मद्रोही महिलांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते आणि त्याचे पालन करणे का आवश्यक आहे ? भक्ती म्हणजे काय ? मंदिरांचे महत्त्व आणि पावित्र्य राखण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि समानतेच्या नावाखाली महिलांनी शनिचौथर्‍यावर प्रवेश करणे कितपत योग्य आहे ? आदी सूत्रांवर प.पू. पांडे महाराज यांनी केलेला सखोल ऊहापोह आणि धर्मद्रोही महिलांना दिलेले सडेतोड उत्तर येथे देत आहोत.

१. देवघरातील आणि मंदिरातील
चैतन्य टिकवण्यासाठी नियम पाळणे अनिवार्यच !

     प्रत्येक हिंदूच्या घरात देवघर असते. कशासाठी, तर घरातील सर्वांना चैतन्य आणि शांती मिळावी म्हणून. आपल्या घरातील देवघरात आपण सोयर-सूतक, शौच-अशौच, मासिक पाळी इत्यादी नियम पाळतो. जसे देवघरातील चैतन्य टिकण्यासाठी आपण हे सर्व नियम आपण पाळतो, तसे मंदिरातील पावित्र्य, चैतन्य आणि शांती टिकवण्यासाठी आणि सर्वांनाच त्याचा लाभ घेता यावा, यासाठी तिथेही ठरवलेले नियम पाळणे आवश्यकच आहे.

 

२. मूर्तीतील चैतन्यशक्ती कार्य करते, हे आधुनिक
वैज्ञानिक पिप उपकरणामुळे सिद्ध झालेले असणे

     मंदिरातील देवतेची मूर्ती दगडाची असते; परंतु मूर्ती घडवलेला दगड, मंदिराच्या कळसाचा दगड आणि मंदिराच्या पायातील दगड हा एकसारखाच असूनही मंदिरात देव म्हणून प्रस्थापित केलेल्या दगडातच आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. त्यामुळे त्यामध्ये देवतेचे तत्त्व येऊन ते कार्यरत होत. सभोवतालचा परिसर आणि प्राणीमात्र यांना त्याचा लाभ होतो. त्यामुळेच मंदिरात आपल्याला चैतन्य आणि शांती यांची अनुभूती येते. मंदिरातील प्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीतील चैतन्यशक्ती ही वातावरणात दूरपर्यंत कार्य करते, हे सध्याच्या आधुनिक वैज्ञानिक पिप उपकरणामुळे सिद्ध झाले आहे.

 

३. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी
रज-तम टाळणे आवश्यक असणे

     स्त्री किंवा पुरुष यांना मंदिरात प्रवेश देण्याचा येथे प्रश्‍न नाही, तर मंदिराचे पावित्र्य टिकवण्याचा प्रश्‍न आहे; कारण मंदिरांचे पावित्र्य जोपासल्यासच तेथे चैतन्याचा स्रोत निर्माण होईल. पावित्र्य टिकवण्यासाठी रज-तम टाळणे आवश्यक आहे. येथे रज-तम टाळणे मंदिरात येणार्‍या प्रत्येकावरच, मग तो पुरुष असो वा स्त्री, बंधनकारक आहे. जर एखादा पुरुष मद्य पिऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यालाही मंदिरात प्रवेशबंदी असणारच; कारण मद्य पिऊन मंदिरात गेल्यास तेथील रज-तम वाढून त्याला, तसेच इतरांनाही तेथील चैतन्याचा लाभ होणार नाही, उलट तेथील पावित्र्य नष्ट होईल. तसेच स्त्रियांना येणारी मासिक पाळी, प्रसूती ही रज-तमामुळे अशुद्ध तत्त्वाची असते; म्हणून तो काळ निषिद्ध मानला जातो.

 

४. ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी सत्त्वगुण वाढवणे आवश्यक

      सात्त्विक वातावरणामुळे चैतन्य वाढते. रज-तमात्मक होऊन गेल्याने मंदिरातील पावित्र्याला बाधा पोचून तेथील चैतन्याला अवरोध होतो. ते कार्य करत नाही. आज युगायुगांपासून पवित्र तीर्थक्षेत्रांमुळे भारतात चैतन्याचे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत भारतात रज-तमाचे प्रमाण अल्प आहे. मंदिर हे चैतन्याचा स्रोत असल्यामुळे आपल्याला तेथे आनंद मिळतो.

     हा आनंद मिळण्यासाठी आणि ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी सत्त्वगुण वाढवणे आवश्यक आहे. सत्त्वगुण वाढवणे आणि रज-तम न्यून करणे, यांसाठीच हे नियम घालून दिलेले आहेत. मंदिरातील वातावरण जितके स्थुलातून तितकेच सूक्ष्मातूनही निर्मळ असणे आवश्यक आहे.

 

५. काही मंदिरांत महिलांना, तर काहींमध्ये
पुरुषांना प्रवेश निषिद्ध असणे, हे धर्मशास्त्रानुसारच असणे

५ अ. देवतेची कृपा संपादन करण्यासाठी
धर्मशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळून पूजा-अर्चा
करणे आणि मनापासून तिची भक्ती करणे आवश्यक

धर्मशास्त्रातील नियम हे सिद्धांत असून ते सिद्ध केलेले आहेत. देवतेची कृपा संपादन करण्यासाठी आपण तिची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतो आणि धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळतो. प्रत्येक देवतेच्या तत्त्वानुसार जे जे आवश्यक ते करतो, उदा. गणपतीला लाल फूल वहाणे, शिवाला बेल वाहणे इत्यादी. आपण हे कर्मकांडाचे नियम काटेकोरपणे पाळतो. ते पाळतांना आपण अंतर्बाह्य शूचिर्भूत होऊन पूजाअर्चा करतो. आतून शूचिर्भूत होणे म्हणजे मन निर्मळ करणे, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे. निर्मळ मनातच भक्ती उगम पावते आणि तेथेच भगवंत वास करतो, तर बाह्य शूचिर्भूतता म्हणजे शौच-अशौच पाळून रज-तम न्यून करणे होय. भक्तीची ही बंधने सर्वांनाच बंधनकारक असतात, मग ती स्त्री असो वा पुरुष ! तसे केले, तरच आपण त्या देवतेशी एकरूप होऊ शकतो.

५ आ. शनिदेवतेकडून प्रक्षेपित होणारी शक्ती स्त्रियांना
सहन होणार नसल्याने त्यांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश नसणे

ईश्‍वराने आत्मोन्नतीचा मार्ग सर्वांसाठीच खुला केलेला आहे. आत्मोन्नतीच्या मार्गात स्त्री किंवा पुरुष असा भेद नाही. केवळ मनुष्य प्राणीच नव्हे, तर पशू-पक्ष्यांनाही हा अधिकार हिंदु धर्माने दिलेला आहे. त्यामुळे तो दयाळू भगवंत स्त्रियांना या अधिकारापासून कसा वंचित ठेवील ? परंतु त्याचबरोबर त्या दयाळू परमेश्‍वराने स्त्रीशक्तीची काळजीही घेतली आहे. स्त्रियांची जननेंद्रिये आत असल्यामुळे काही ठिकाणची शक्ती स्त्रियांना पेलवत नाही. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश न देण्यामागे हे एक कारण आहे. शनिदेवतेकडून प्रक्षेपित होणारी शक्ती स्त्रियांना सहन होणारी नाही. त्यामुळे स्त्रियांना गर्भाशयाचे विकार उद्भवू शकतात. हे जाणून केवळ रूढी आणि परंपरा म्हणून नव्हे, तर हे धर्मशास्त्र सांगते; म्हणून स्त्रियांच्या भल्यासाठीच त्यांना चौथर्‍यावर जाण्यापासून दूर ठेवले आहे.

५ इ. शबरीमाला येथील श्री अय्यप्पास्वामींच्या जागृत
देवस्थानात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश निषिद्ध असणे

शबरीमाला येथील श्री अय्यप्पास्वामींच्या जागृत देवस्थानात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.

५ ई. राजस्थानच्या सावित्रीधाम मंदिरात पुरुषांना प्रवेश नसणे

स्त्रियांना देवाच्या जवळ (गाभार्‍यात) जाऊन पूजा करू न देण्याच्या नियमाने त्यांना कनिष्ठ वागणूक मिळते, असे मानले, तर राजस्थानच्या सावित्रीधाम मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. मग तिथे पुरुषांना कनिष्ठ वागणूक मिळते, असे म्हणायचे का ? देवीची ओटीही स्त्रियाच भरतात. पुरुषांच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही; म्हणून त्यांना तो अधिकार नाही. यावरून त्यांना कनिष्ठ वागणूक दिली जाते, असे होत नाही.

shanidev-.shignapur

 

६. शनिशिंगणापूर मंदिरात जाण्याचा
अट्टाहास करणार्‍या स्त्रियांनो, याचा विचार करा !

६ अ. धर्माचे नियम पाळण्याचे महत्त्व जाणा

वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीचे पुरुषांशी असलेले संबंध आणि विवाहित दांपत्याचे संबंध यात भेद असतो. विवाहित दांपत्याला अशा संबंधापूर्वी धार्मिक विधी होऊन धर्मशास्त्रानुसार मान्यता मिळालेली असते. त्याला तसेच त्याच्या अपत्यांनाही सामाजिक मान्यता मिळते; पण वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीने परपुरुषाशी ठेवलेले संबंध, हे धर्मशास्त्राविरुद्ध असतात. त्यामुळे त्यांच्या संबंधाला समाजात स्थान नसते, तसेच त्यांच्या अपत्यांनाही सामाजिक मान्यता मिळत नाही.

     प्रत्येक कृतीला धर्माचे अधिष्ठान असणे महत्त्वाचे असून त्यासाठी ती कृती ऋषीमुनींनी सांगितलेल्या धर्मशास्त्रानुसार होणे आवश्यक असते. त्यामुळे देवाची कृपा संपादन करण्यासाठी धर्माचे नियम पाळणे आवश्यक आहे.

६ आ. अन्य नियमांचे सहजतेने निमूटपणे पालन करणार्‍यांची
धार्मिक नियम पाळतांनाच स्त्रीवर अन्याय होतो अशी ओरड का असते ?

शनिशिंगणापूर मंदिरात जाण्याचा अट्टाहास, नव्हे हेका करणार्‍या स्त्रियांनो, शस्त्रकर्म कक्षात (ऑपरेशन थिएटरमध्ये) कोणी जायचे आणि कोणी नाही, हे आधुनिक वैद्यांनी ठरवलेले नियम आपण पाळतोच ना ? आपण कायद्यानुसार केलेले शासकीय नियम, वैद्यकीय क्षेत्रातील नियम, वाहतूकीचे नियम इत्यादी निमूटपणे पाळतो. मग शनिमंदिरात ठरवलेले नियम का पाळले जात नाहीत ? आपल्याला अन्य सर्व प्रकारचे सामाजिक नियम मान्य आहेत, मग धार्मिक नियम का मान्य नाहीत ? जेव्हा धार्मिक नियम पाळण्याची वेळ येते, तेव्हा स्त्रीवर अन्याय होतो अशी ओरड का केली जाते ?

६ इ. प्रकृतीतील भेद ईश्‍वरनिर्मित असल्याने
पुरुषांशी बरोबरी कुठे करावी, याचे भान ठेवा ! 

पुरुषांशी बरोबरी कुठे करावी, याचेही भान या स्त्रियांना उरलेले नाही. एखादा पुरुष ५० किलो गव्हाचे पोते उचलू शकतो; पण स्त्री ते उचलू शकत नाही; कारण प्रकृतीने तिला एवढी क्षमता दिलेली नाही. तिथे या स्टंट करणार्‍या स्त्रिया बरोबरीची भाषा का करत नाहीत ? ईश्‍वराने प्रत्येकाला त्याचे कार्य ठरवून दिलेले आहे. जर ताटलीने म्हटले की, मला पेल्यासारखे व्हायचे आहे, तर ताटलीचे कार्य होणार नाही. दोघेही स्टिलचेच घडवलेले असले, तरी त्यांचे गुणधर्म निराळे आहेत. देवाने प्रगतीचे मार्गही स्त्री आणि पुरुष दोघांना सारखेच दिले आहेत. देवाने प्रकृतीत भेद केला आहे; पण आत्मोन्नतीत भेद केलेला नाही.

६ ई. नास्तिकवादी स्त्रियांनो, समाजात
असे नास्तिकवादी विचार पसरवून तुम्ही
शनिदेवाची कृपा नाही, तर अवकृपाच ओढवून घेत आहात !

मंदिरातील प्रवेशासंदर्भात स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली अधिकार मागतांना आपण समाजस्वास्थ्य दूषित करत आहोत, याची जाणीव तुम्हाला आहे का ? शनिचौथर्‍यावर प्रवेश करण्याचा तुमचा दुराग्रह तुमच्यातील आस्तिकता नव्हे, तर नास्तिकतेचे प्रदर्शन करणारा आहे. तेथे देवाबद्दलची श्रद्धा नसून केवळ प्रसिद्धीचा हव्यास आहे. नास्तिकवादी स्त्रियांनो, समाजात असे नास्तिकवादी विचार पसरवून तुम्ही काय साध्य करणार आहात ? पुढील पिढीला काय देणार आहात ? अशाने तुम्ही शनिदेवाची कृपा नाही, तर अवकृपा (कोप) ओढवून घेत आहात, याची तुम्हाला जाणीव आहे का ?

 

७. नास्तिकवादी महिलांमधील
स्टंटबाजीचे प्रदर्शन केवळ प्रसिद्धीसाठी !

     या महिलांमध्ये कुठे भावभक्ती दिसते का ? जर ती असती, तर त्यांनी या सर्व नियमांचे पालन केले असते. त्यामुळे हे सर्व देवाच्या कृपेसाठी नसून प्रसिद्धी आणि उत्पात घडवून आणणे यांसाठी आहे, हे लक्षात येते. या नास्तिकवादी महिलांना देवाविषयी ना आत्मीयता आहे ना भाव ! त्यांचा हेका, हट्ट हे त्यांच्या भावभक्तीचे नव्हे, तर स्टंटबाजीचे प्रदर्शन आहे. यांना देवाने अनुभूती दिली, तरी त्या भक्तीभावाने देवाची पूजा करणार नाहीत; कारण गावातील लोकांनी यांना अनुभूती सांगूनही त्यावर या महिला विश्‍वास ठेवून आपला हट्ट मागे घेत नाहीत.

 

८. खरा भक्त कसा असावा, हे जाणून घ्या !

     आपल्याकडे खर्‍या भक्तीची अनेक उदाहरणे आहे. खर्‍या भक्ताला मंदिरात जाण्याची आवश्यकता असतेच, असे नाही. घरात राहून साधना करूनही ईश्‍वरप्राप्ती करून घेता येते. संत मीराबाईला कृष्णभक्तीसाठी घरातून तीव्र विरोध होता. त्याही परिस्थितीत तिने भगवंताच्या अनुसंधानात राहून ईश्‍वरप्राप्ती केली, तसेच संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनी नामसाधनेला महत्त्व दिले आणि त्यातून त्यांनी ईश्‍वरप्राप्ती केली.

     सर्वांत श्रेष्ठ भक्तीचे उदाहरण म्हणजे गोपीभाव. गोपींना कृष्णभक्तीसाठी मंदिरात जावे लागले नाही. केवळ अंतर्मनातून साधना करून त्यांना ईश्‍वरप्राप्ती झाली.

 

९. मंदिरातील नियमांचे पालन केल्याने हानी
झालेली नसतांना ते पालटण्याचा अट्टाहास का ?

      आतापर्यंत या मंदिराच्या नियमांचे पालन करून काही हानी झाली आहे का ? किंवा तेथील गावकर्‍यांना काही त्रास झाला आहे का ? नाही ना ? मग इतकी वर्षे चालत आलेल्या मंदिराचे नियम पालटण्याचा तुमचा अट्टाहास का ? जर वाईट परिणाम झाले असते, तर मान्य करता आले असते आणि तसा निर्णय घेणे योग्य ठरले असते; पण तसे काही झाले नसतांना ते पालटण्याचा दुराग्रह कशासाठी ?

      (प्रत्यक्षातही गावातील कुठल्याही स्त्रियांची अशी धर्मद्रोही मागणी नाही वा तिला पाठिंबाही नाही. उलट त्यांचा चौथर्‍यावरून दर्शन घेण्याला विरोधच आहे. हे त्यांचा देवावरील भक्तीभाव, श्रद्धा आणि रुढी परंपरा यांविषयी असलेल्या त्यांच्या आदरभावाचे प्रतीक आहे. या स्त्रियांप्रमाणे वा त्यांच्या समान वागून देवतेची कृपा संपादन करावी, असे भूमाता ब्रिगेडच्या महिलांना का वाटत नाही ? – संकलक)

 

१०. स्त्रियांना उपजतच मिळालेल्या
दैवी गुणांचा त्यांनी समष्टीसाठी
योग्य वापर केल्यास समष्टीची प्रगती लवकर होणे

     देवाने पुरुषांपेक्षाही सर्वाधिक गुण आणि क्षमता स्त्रियांना दिलेली आहे. ममता, प्रेम, आत्मीयता, त्याग, प्रजोत्पत्तीची शक्ती, मुलांचे संगोपन हे सर्व गुण स्त्रियांमध्ये आहेत. जेव्हा हे गुण ती समष्टीसाठी वापरते, तेव्हा तिची लवकर प्रगती होते. चांगल्या गुणांचा समष्टीसाठी उपयोग झाल्यास ती सर्वांची माऊली होऊन सर्वांना प्रेम देत समाज आणि राष्ट्र यांचा उद्धार करते; परंतु तिच्यात द्वेष, मत्सर हे विकार कार्यरत असल्यास त्यांचा दुष्परिणामही फार होतो.

      (माता ही सर्वांची माऊली झाली, तरच ती समाजात गौरवाचे स्थान प्राप्त करते; परंतु येथे स्वतःला भू-माता म्हणवणार्‍यांना मात्र भाविकांची त्यांच्या माऊलीविषयी, देवाविषयी असलेली श्रद्धाच समूळ नाहीशी करावीशी वाटते, हे दुर्दैवच नाही का ? – संकलक)

 

११. हिंदु स्त्रियांना धर्माने जेवढे मानाचे
स्थान दिले आहे, तेवढे अन्य कोणत्याही धर्मात नसणे

      हिंदु धर्मातील स्त्रियांना धर्माने धार्मिक कार्यात जेवढे स्थान दिले आहे, तेवढे अन्य कोणत्याही धर्मात दिले जात नाही, हेही या स्त्री-पुरुष समान संधी मागणार्‍या महिलांनी लक्षात घ्यायला हवे. आजही देवतांची नावे घेतांना सीताराम, लक्ष्मीनारायण अशीच घेतात, म्हणजे स्त्रीला प्रथम स्थान दिलेले आहे. कोणताही धार्मिक विधी स्त्रीविना अपूर्ण आहे. मनूनेसुद्धा स्त्रियांचा विचार अधिक केलेला आहे. पुरुषांनी धन कमवावे, ते पत्नीकडे द्यावे आणि तिने त्याचा विनियोग करावा. पिता, पती, पुत्र यांनी स्त्रीचे रक्षण केले पाहिजे, हेही मनूने ठासून सांगितले आहे. या सगळ्यावरून हिंदु स्त्रीचे समानत्वच नव्हे, तर समाजातील सर्वोच्च स्थानच लक्षात येते.

      (मान मागून मिळत नसतो, तर तो मिळवावा लागतो. स्वैराचारी स्वातंत्र्य उपभोगण्याची लालसा असलेल्यांनी घेतलेले ही स्त्री-पुरुष समानतेचे वेड हास्यास्पद असून त्यांच्या उथळ बुद्धीचेच (कि कुबुद्धीचे ?) दर्शक आहे. समानता कुठे असायला हवी, इतकेही सामान्य ज्ञान नसलेल्या या महिलांची कींव करावी, तेवढी थोडीच आहे. अनिर्बंध स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या महिलांनो, स्त्री-पुरुष समानतेचे हे जोखड प्रथम इंग्रजांनी, नंतर तथाकथित बुद्धीवाद्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या मानेवर ठेवले आहे, हे जाणा ! त्याचे दुष्परिणाम जाणण्यासाठी तरी बुद्धीचा वापर करा; अन्यथा या दांभिकतेमुळे तुमच्या समानतेच्या या भूलभूलैय्यात तुम्हीच फसणार ! – संकलक)

 

१२. विज्ञानाने केलेली धार्मिकतेची हानी

विज्ञानाच्या बरोबर जायचे, असे आपण म्हणतो; पण विज्ञानाने केलेली मानवाची दु:स्थिती आपण का पहात नाही ? विज्ञानामुळे मानवाचे जीवन सुकर होण्याऐवजी प्रतिदिन दुष्कर होत आहे. विज्ञानामुळे धार्मिकतेचीही हानी होत आहे. कारखान्यातून येणारे अशुद्ध पाणी आणि अन्य कचरा टाकून आपण आपल्या पवित्र नद्यांचे तीर्थ दूषित करत आहोत. आज गंगानदीची अशुद्धता सार्‍यांच्याच चिंतेचा विषय आहे. विज्ञानाचा आधार घेऊन आपण धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करत आहोत. विज्ञानयुगात स्त्री-पुरुष समानता हवी; म्हणून मंदिरांचे पावित्र्य नष्ट करत आहोत.

      एरव्ही सुखी जीवनासाठी विज्ञानाची कास धरावयाच्या गोष्टी करणार्‍यांनी विज्ञानाच्या प्रगतीसाठी निसर्गसंतुलन तर बिघडवले आहेच; परंतु त्याच्या आधारावर मानवातील धार्मिकतेचा र्‍हास करण्याची वृत्तीही आता दिसून येत आहे.

      (भौतिक सुखे मिळवून देणार्‍या विज्ञानाची कास धरल्याने पाश्‍चात्त्यांची होत असलेली अधोगती आणि आपल्याकडेही सुखाच्या हव्यासातून अन् त्यामुळे होणार्‍या नैतिक मूल्यांच्या र्‍हासातून उद्भवणार्‍या सामाजिक समस्या आपल्याला प्रतिदिन भेडसावत आहेत. आस्तिक आणि धर्माचरणी लोकच स्वतः आनंदी जीवन जगून समाज सुदृढ, संयत आणि सक्षम बनवतात. यासाठीच समाजातील आस्तिकता नष्ट करण्याचा विडा उचलणार्‍यांनी सामाजिक समतोल म्हणजे संतुलन राखण्यासाठी समाजमनाला आस्तिकतेच्या सुरक्षाकवचाची किती आवश्यकता आहे, याचा आपल्या वैज्ञानिक बुद्धीचा कस लावून अभ्यास करणे योग्य ठरेल. तेव्हाच त्यांना श्रद्धांची चौकट मोडून आपण समाजाची केवढी हानी करत आहोत, याची जाणीव होईल. – संकलक)

 

१३. जीवन-मरणाचा प्रश्‍न समोर
उभा असतांना नको तिथे वेळ घालवणे योग्य आहे का ?

सध्या आपल्या देशाला अनंत समस्या भेडसावत आहेत. इसिसचा (ISIS चा) राक्षसी प्रभाव सर्वत्र ऑक्टोपससारखा फैलावतांना दिसत आहे. भारतावर पाकिस्तानद्वारे निरनिराळ्या माध्यमांतून होत असलेली आक्रमणे, धर्मांतर, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी दैनंदिन समस्यांना भारतीय हिंदूंना तोंड द्यावे लागत आहे. लव्ह जिहादचा भस्मासूर हिंदु स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. स्त्रीहक्कासाठी लढणार्‍या या वीर स्त्रियांना त्याविषयी बोलावेसे वाटत नाही का ? त्यासाठी काही करावेसे वाटत नाही का ? स्त्रीपुरुष समतेच्या नावाखाली आंदोलनाचा दिखावा करणार्‍यांनो, बुरखा सक्ती, तीन वेळा तलाक देऊन सोडणे, हे पाहून तुम्हाला महिला सक्षमीकरण, महिलांना समान अधिकार देणे आठवत नाही का ? कि केवळ हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवरच घाला घालण्यापुरताच महिलांविषयीच्या समान अधिकारांचा कळवळा आहे ?

      (हिंदूंनीच आता हिंदु धर्मावर येणार्‍या या संकटाचा सामना करण्यासाठी एकजूट व्हायला हवे. सनातन संस्था नेहमीच धर्मशास्त्र सांगते आणि शास्त्रानुसार वर्तन केल्याने होणारे लाभ-अपलाभ यांची जाणीवही करून देते. ज्या उदात्त परंपरांनी ही भारतीय संस्कृती समृद्ध झाली आणि विश्‍वात गौरवशाली अन् चिरंतन ठरली, त्या परंपरा हिंदूंनी जिवापाड जपल्या आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रत्येक हिंदू त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यास बांधील आहे. यासाठी हिंदूंनो, आता एकजूट करा आणि अशा धार्मिक प्रथा – परंपरांवर घाला घालणार्‍या धर्मविध्वंसक कृतींना वैध मार्गाने विरोध करण्यास सज्ज व्हा ! त्यासाठीच अनिवार्य असलेल्या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सक्रीय व्हा ! – संकलक)

 

१४. चर्चेने तोडगा काढणे, हा तर मूर्खतेचा अतिरेकच

धर्म-अधर्माच्या लढ्यात धर्माचे पारडे जड आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भूमाता ब्रिगेडच्या या महिलांच्या संदर्भात जे नियम आहेत, रुढी परंपरा आहेत, त्या पाळल्याच पाहिजेत, अशी भूमिका घेण्याऐवजी त्यावर चर्चेने तोडगा काढणे म्हणजे मूर्खतेचा अतिरेकच ! धर्मशास्त्र हे सिद्ध प्रयोग आहे. केवळ साधनेच्या बळानेच हे कळू शकते. अशा प्रकारे समझोता करून विकृतीला साहाय्य करणे चुकीचे आहे.
– कु. अदिती पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.२.२०१६)

(येथे नसे भक्ती । नसे देवाचा वास ।
मनात आहे केवळ । प्रसिद्धीचा हव्यास ॥
देवाच्या जवळ नाही । तर सत्तेच्या जवळ जाणे ।
समता नव्हे ही । तर लोकांच्या श्रद्धेशी खेळणे ॥
तोंडघशी पडल्यावर । भूमातीच मुखात येणे ।
समजेला का आम्हाला । तुम्ही कुणाच्या हातातील खेळणे ॥
– संकलक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात