हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम ‘!

गडहिंग्लज येथे नगराध्यक्ष आणि
नगरसेवक यांच्याकडून गणेशमूर्ती विसर्जनाची कौतुकास्पद कृती !

Gadhigalg---2
विसर्जनासाठी सिद्ध केलेले प्लॅटफॉर्म

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १३ सप्टेंबर (वार्ता.) – १० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर (बॅरलवर) फळी बसवून (होडीसारखे) प्लॅटफॉर्म बनवले होते. यावर स्वतः जाऊन या दोघांनी भाविकांनी दिलेल्या श्री गणेशमूर्तींचे हिरण्यकेशी नदीमध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची कृती करणारे श्री. राजेश बोरगावे आणि श्री. नरेंद्र भद्रापूर यांचे अभिनंदन ! – संपादक)

गडहिंग्लज येथे गणेशचतुर्थीनिमित्त ७ गावांमध्ये प्रबोधन केले. नूल, मुगली, हणिमणाल, जक्केवडी, ऐनापूर, सरोली, कौलगे आणि गडहिंग्लज येथे बैठका घेणे, निवेदने देणे, काही मंडळांना संपर्क करणे, प्रत्यक्षात ५ ठिकाणी मूर्तीविसर्जन करण्याचे नियोजन करणे अशा कृती केल्या. यांपैकी सरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्तीदान होत होते. तेथे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जनाविषयी प्रबोधन केल्यानंतर सर्व मूर्तींचे विसर्जन झाले. नूलमध्ये दान झालेल्या सर्व मूर्ती हिंदु जनजागृती समितीच्या ५ धर्माभिमानी कार्यकर्त्यांनी विसर्जित केल्या. गडहिंग्लजमध्ये मूर्तीदानाला पुष्कळच अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीपेक्षाही अधिक प्रतिसाद मूर्ती विसर्जनाला मिळाला. ऐनापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्तीदान करण्यात आले; मात्र तेथे प्रबोधन करून भाविकांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.