विकार-निर्मूलनासाठी नामजप – १

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील विकार-निर्मूलनासाठी नामजप (२ भाग) या नूतन ग्रंथाचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत. ही नामजप उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. या ग्रंथाचे दोन्ही भागही वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे. प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते. नामजपामुळे केवळ विकार बरे होतात असे नाही, तर विकारांमुळे निर्माण होणार्‍या वेदना आणि दुःख सहन करण्याचे मनोबल आणि शक्तीही मिळते.

नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी उपायपद्धत आहे. नामजपाला देशकाल, शौच-अशौच, मंत्रजपाप्रमाणे योग्य उच्चार यांसारखी बंधने नाहीत. नामजपात योगयागादी साधनांत असते तशी कठीणताही नाही. भावी आपत्काळात एखाद्या वेळी औषधी वनस्पती मिळू शकणार नाहीत; पण नामजपाचे उपाय मात्र त्रिकाळ कोठेही करता येतील.

विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग १) या ग्रंथामध्ये नामजपाचे विविध प्रकार (उदा. देवतेच्या गुणवैशिष्ट्यांनुसार नामजप, देहातील त्रिदोषांनुसार नामजप, इंद्रियांना होणारे विकार दूर करण्यासाठी त्या त्या इंद्रियांच्या देवतांचे नामजप, ज्योतिषशास्त्रानुसार नामजप) आणि त्यांमागील शास्त्र सांगितले आहे. शास्त्र कळल्यामुळे नामजपांविषयी श्रद्धा निर्माण व्हायला साहाय्य होते. या विविध प्रकारांवरून प्रत्येक विकारावर उपयुक्त असे विविध नामजप प्राप्त होतात.

विकार-निर्मूलनासाठी नामजप (भाग २) या ग्रंथात प्रत्येक विकारावरील विविध नामजप एकाच दृष्टीक्षेपात कळण्यासाठी ते सूचीच्या स्वरूपात दिले आहेत. या भागात प्रामुख्याने देवतांचे नामजप दिले आहेत. त्याचप्रमाणे पुढच्या पुढच्या टप्प्याचे शब्दब्रह्म (गायत्री मंत्रातील शब्दांचे नामजप), अक्षरब्रह्म (देवतेचे तत्त्व / शक्ती संपुटित झालेल्या अक्षरांचे नामजप), बीजमंत्र आणि अंकजप हेही दिले आहेत. ग्रंथाच्या या दुसर्‍या भागात एखाद्या विकारासाठी दिलेले सर्वच नामजप विकार- निर्मूलनाच्या संदर्भात योग्य आहेत; पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याला त्या नामजपांपैकी एका नामजपाने सर्वाधिक लाभ होईल. विविध नामजपांपैकी ज्या नामजपाने स्वतःला अधिक लाभ होईल, असा नामजप कसा निवडावा, हेही ग्रंथाच्या दुसर्‍या भागात सांगितले आहे. प्रत्येकाची स्वतःच्या उपास्यदेवतेप्रती दृढ श्रद्धा असते. विकार-निर्मूलनासाठी स्वतःच्या उपास्यदेवतेचा नामजप करायचा असल्यास तो अधिक श्रद्धेने केला जात असल्याने त्याने विकार लवकर दूर होण्यास साहाय्य होते. या दृष्टीने भाविकांना काही देवतांचे नामजप कोणकोणत्या विकारांत उपयुक्त आहेत, हे एकाच दृष्टीक्षेपात कळण्यासाठी तेही या ग्रंथाच्या दुसर्‍या भागात सूचीच्या स्वरूपात दिले आहे.

नामजपाचे उपाय करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत, ही श्री गुरुचरणी आणि विश्‍वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र आणि भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !