छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती : राजमाता जिजाऊ !

राजमाता जिजाऊंना अभिवादन

वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्यांना रामायण-महाभारत आणि पुराणे यांतील कथा अतिशय आवडत होत्या. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात मोगल अन् विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. राष्ट्ररक्षणासाठी सुपुत्र दे, अशी प्रार्थना जिजाऊंनी भवानीदेवीला केली. बाल शिवाजीच्या जन्मानंतर त्यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार होण्यासाठी जिजाऊंनी त्यांना प्रभु श्रीराम, मारुती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या, तसेच महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगून राष्ट्र अन् धर्म भक्तीचे बाळकडूच पाजले. पुण्यात रहाण्यासाठी आल्यानंतर त्यांनी कसब्यात गणपतीची स्थापना केली आणि जोगेश्‍वरी अन् केदारेश्‍वर यांचा जीर्णोद्धार केला. तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाबाई सतत लक्ष घालत होत्या. राजमाता जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्यूमुखी पडले होते. एकटे शिवाजी महाराज जगले आणि त्यांच्यावरही अनेक संकटे ओढावत होती; पण तशाही स्थितीत मन कठोर करून त्या शिवरायांना यशस्वी होण्याचे आशीर्वाद देत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे जातांना सर्व राज्यकारभार जिजाऊंच्या स्वाधीन केला होता. जिजाबाई या केवळ माताच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्तीही होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष १६७४ मध्ये त्यांनी पाचाड येथे देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना विनम्र अभिवादन करूया.

(भारतीय संस्कृतीकोष)

jijamata_palana
शिवनेरी किल्ल्यावरील या पाळण्यात आई जिजाऊंनी शिवबांना क्षात्रतेजपूर्ण पाळणे ऐकवले
jijamata_samadhi_pachad
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील राजमाता जिजाऊ यांची समाधी

अत्यंत प्रतिकूलतेतही पाच पातशाह्यांचा निःपात करून हिंदवी स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरे तर हिंदूंचे प्रेरणास्थान ! ३५० वर्षांनंतरही छत्रपतींचे केवळ नावही घेतले, तरी नसानसांत हिंदुत्व संचारते, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण होते, अशा युगपुरुषाला ज्यांनी घडवले, त्या राजमाता जिजाऊ खरोखरीच धन्य आहेत ! त्यांच्यामुळे आपल्याला हिंदूसूर्य छत्रपती शिवाजी महाराज लाभले. २९ जून या दिवशी राजमाता जिजाऊ भोसले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांची पाचाड (जिल्हा रायगड) येथील समाधी, जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिलेले स्थान येथील छायाचित्रांद्वारे त्यांच्या अमूल्य स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

shivneri
शिवनेरी किल्ल्यावरील बाल शिवबा आणि मातोश्री जिजाऊ यांचे स्मारक

 

उच्च दृष्टीकोनांद्वारे छत्रपती शिवाजी
महाराजांसारखे नररत्न घडवणारी थोर विभूती : राजमाता जिजाऊ !

श्री. प्रथमेश अजित कोटगी

‘श्रीमान योगी’ ग्रंथवाचन चालू होते. जिजाऊंची स्मृती स्मृतीपटलावर झळकू लागली. आतापर्यंत जिजाऊंविषयी जेवढे ऐकले वा वाचले होते, तेवढे सारे डोळ्यांसमोर येऊ लागले. आईने लहानपणी शिवरायांच्या कथा सांगतांना केलेला जिजाऊंचा उल्लेख ऐकून ‘मलासुद्धा अशी आई पाहिजे’ म्हणून केलेला हट्ट असो वा आता शिवचरित्र वाचतांना जिजाऊंसारख्या थोर विभूतीचे एका नव्या दृष्टीकोनातून घडणारे दर्शन असेल ! हे सर्व आठवतांना हात आपोआप लेखणीकडे वळले. जिजाऊंचे व्यक्तीमत्त्व शब्दांतून उतरवायचा निर्धार केला; परंतु विचारांचा वेग आणि शब्दांचे सामर्थ्य त्या महतीपुढे तोकडे भासू लागले, ती कीर्ती इतिहासात कशी अजरामर आहे, याची साक्ष पटली.

राजमाता जिजाऊंविषयीची माहिती सर्वश्रुत आहेच, त्यांच्या कीर्तीचा सुगंध अखंड भारतवर्षात, तसेच संपूर्ण जगतात सदैव दरवळत आहे. तो तसाच दरवळत राहील ! त्यांच्यासारख्या तेजस्वी, अफाट, महान अशा व्यक्तीमत्त्वाचे काही पैलू आपल्यासमोर मांडावेत, जेणेकरून त्यातून आपल्याला शिवरायांसारखी प्रेरणा मिळेल आणि त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होईल.

१. समर्थ रामदासस्वामी यांनी जिजामातेचा केलेला गौरव !

स्वतः समर्थ रामदासस्वामी यांनी जिजामाता यांना ‘आईसाहेब’ असे संबोधले होते. शेवटच्या क्षणात जिजाऊंनी समर्थांना ‘शिवबाचे दायित्व आता आपले. त्याला सांभाळा’, असे विनवले, तेव्हा गंभीर मुखाने समर्थ म्हणाले, ‘‘आई ! हे दायित्व पेलण्याचे सामर्थ्य आमचे नाही. प्रत्यक्ष सूर्य जर आमच्या हाती दिला, तर तो पेलणार कोण ? ती योग्यता तुमची होती. ती तुम्ही पार पाडली.’’ असे सांगून समर्थ त्या थोर मातृत्वाचे दर्शन घडवतात.

‘साधू-संतांनीही ज्यांची महती वर्णावी, अशा त्या थोर पुण्यात्माच असल्या पाहिजेत’, याची निश्‍चिती पटते.

२. असे घडवले छत्रपती शिवरायांना !

२ अ. छत्रपती शिवरायांना राज्य चालवण्याचे प्रत्यक्ष धडे !

पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. त्या वेळी राजमाता जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांच्या साहाय्याने अत्याचारित, ओसाड अशा पुणे प्रांताचे परिवर्तन करून पुणे परगणा केला. वस्ती-शेती वाढवल्या, भूमीवरून सोन्याचा नांगर फिरवला. पुणे परगणा वसवतांना त्या स्वतः जातीने सदरेवर न्यायनिवाडा करत. दोषींना कठोर शासन देऊन चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला. त्यांनी प्रजेकडे लक्ष दिले. त्यातूनच शिवबांना राजकारणाचे धडे, संस्कार, शिक्षण देऊन स्वराज्याचे स्वप्न दाखवले.

यामागची पार्श्‍वभूमी अशी की, शिवबांच्या वेळी जिजाऊ ७ महिन्याच्या गरोदर असतांना शहाजी राजांनी त्यांना नाईलाजास्तव शत्रूमुलुखात ठेवले होते. एकट्या जिजाऊंनी हे सारे सोसून शिवबांना घडवले. ओसाड पुणे प्रांताचे नंदनवन केले. यातून स्त्री शक्तीची खरी जाणीव मनाला होते.

२ आ. संपत्तीचा अहंकार न बाळगता कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करण्याची बहुमोल शिकवण !

राजे साधारण १६-१७ वर्षांचे असतांनाची गोष्ट ! दसर्‍याचे सीमोल्लंघन करून सोने लुटून राजे वाड्यात आले, तेव्हा जिजाऊ त्यांना म्हणाल्या, ‘‘राजे, तुम्ही आता लहान राहिला नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मीमागे धावून ती कधीच प्रसन्न होत नसते, ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठी आपोआप येते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे कायम समोर पहावीत.’’

संपत्तीचा अहंकार वाढू नये; म्हणून किती सोप्या पद्धतीने उपदेश केला आहे. आजच्या घडीलाही हा १०० टक्के उपयुक्त आहेच. प्रत्येक माणसाने तो आचरणात आणायला हवा.

२ इ. राज्यात विहार करतांना राज्याच्या सेनेमुळे रयतेला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यास सांगणार्‍या प्रजावत्सल जिजाऊ !

स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभी राजांनी रोहिडेश्‍वर घेतला, त्यानंतर ते रोहिडेश्‍वराला भेट देण्यासाठी निघाले, त्या वेळी मासाहेबांनी त्यांना बारीक बारीक तपशील विचारले. तुम्ही गावात आधी वर्दी दिलीय का ? कुठे वस्ती करणार ? तुमच्यासमवेत येणार्‍या फौजफाट्याचे काय ? त्यांच्या खाण्यापिण्याचे कोण बघणार ? जनावरांच्या दाणापाण्याचे कोण पहाणार ? ‘तुमच्यामुळे त्या गावाला नाहक त्रास नको व्हायला’, असे म्हणून त्यांनी राजांसह फौजेसाठी शिधा आणि जनावरांचे वैरण पाठवले.

पुढे राजांनी तीच पद्धत कायम ठेवली, त्यामुळे रयतेला कधीच त्रास झाला नाही.

२ ई. अपयशाकडेही सकारात्मकतेने पहायला शिकवणारी धीरोदात्त माता !

आदिलशाहीने शहाजीराजांना कैद केले होते. त्यासाठी राजांना आदिलशाहीशी तह करून शहाजीराजांची सुटका करून घ्यावी लागली होती. त्या तहासाठी कोंढाण्यासारखे किल्ले खर्ची पडले. त्या पराजयाने दुःखी झालेल्या राजांना जिजाऊ म्हणाल्या, ‘‘शिवबा, जरा आठवा महाधनुर्धर अर्जुनाने बृहन्नडा होऊन पायात चाळ बांधले असतील, तेव्हा त्याच्या पौरुषाला किती यातना झाल्या असतील ? सर्वशक्तीशाली भीमाने जेव्हा हाती पाटा-वरवंटा घेतला असेल, तेव्हा त्याला किती कष्ट पडले असतील ? साक्षात् युधिष्ठिराने जेव्हा किचकाचा पडलेला जोडा स्वतःच्या हाताने समोर ठेवला असेल, तेव्हा त्याच्या धर्मभावनेचे काय झाले असेल ? जे संकट सहन करतात, त्यांचाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो. या जगात माणसाचा मोठेपणा कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर आहे. ज्यांनी सोसले, त्यांनाच भवानीचा आशीर्वाद मिळाला. तेव्हा भवानीच्या आशीर्वादावर विश्‍वास ठेवा.’’

मनाची सकारात्मकता, खंबीरता, स्थिर आणि स्थितप्रज्ञ वृत्ती, अशा विविध पैलूंनी जडलेला जिजाऊंचा स्वभाव ! त्यातच इतिहासातील अचूक उदाहरणे देऊन प्रोत्साहन देणे, यातून त्यांचा सखोल अभ्यासही दिसून येतो.

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम, अशा सात्त्विक अन् राजस गुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होत्या. अशा या पुण्यात्म्याला माझे त्रिवार वंदन आणि शतकोटी प्रणाम !’

– श्री. प्रथमेश अजित कोटगी, विद्यार्थी, गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रिसर्च सेंटर, गोवा.