परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झालेली गुरुप्राप्ती आणि त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !

ppdr_adhyatmaprasar_600
जाहीर सभांतून साधनाविषयक मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (१९९७-१९९८)

 

अध्यात्मशास्त्र शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गुरुप्राप्ती

संमोहन उपचारांनी सुधारणा होऊ न शकणारे मनोरुग्ण संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर बरे होतात, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ ३० संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.

 

अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची
स्थापना आणि स्वतः केलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

जीवनातील अत्युच्च आनंद देणारे अध्यात्मशास्त्र हे वैद्यकीय शास्त्रांपेक्षा उच्च प्रतीचे शास्त्र आहे, याची प्रचीती आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राचा प्रसार करण्यासाठी १.८.१९९१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना केली. वर्ष १९९४ मध्ये त्यांनी अध्यात्मप्रसाराचे कार्य पूर्णवेळ करण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय बंद केला.

वर्ष १९८७ ते वर्ष १९९५ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत अध्यात्माचे अभ्यासवर्ग आयोजित करणे, अध्यात्माचे शिक्षण देणार्‍या ग्रंथांचे संकलन करणे, तसेच जिज्ञासू अन् साधक यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी साहाय्य करणे, हे कार्य केले.

सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधकांना गुरुसेवेची संधी उपलब्ध व्हावी, याकरता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मुंबई (वर्ष १९९२), गोवा (वर्ष १९९३) आणि कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग (वर्ष १९९५) या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुपौर्णिमा सोहळे आयोजित केले. वर्ष १९९५ मध्ये इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव सोहळा आयोजित केला.

वर्ष १९९६ ते वर्ष १९९८ या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत साधना आणि क्षात्रधर्म या विषयावर शेकडो जाहीर सभा घेतल्या.

 

‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून चालू असलेला अध्यात्मप्रसार

अध्यात्मप्रसाराच्या कार्याची व्याप्ती वाढल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मप्रसाराचे कार्य करू शकणार्‍या सहस्रो साधकांची सिद्धता झाल्यामुळे आता साप्ताहिक सत्संग, प्रवचने, दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संग, बालसंस्कारवर्ग, गुरुपौर्णिमा सोहळे आदी माध्यमातून सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. प्रयाग (वर्ष २००१ आणि वर्ष २०१३), नाशिक (वर्ष २००३ आणि वर्ष २०१५), उज्जैन (वर्ष २००४ आणि वर्ष २०१६) आणि हरिद्वार (वर्ष २०१०) येथे झालेल्या सिंहस्थपर्वाच्या (कुंभमेळ्यांच्या) ठिकाणी सनातन संस्थेने मोठ्या प्रमाणात अध्यात्मप्रसार केला. सनातन संस्थेच्या Sanatan.org या संकेतस्थळाद्वारे साधनेविषयी मार्गदर्शन आणि शंकानिरसन केले जाते, तसेच सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे धर्मशिक्षणाचा प्रसारही केला जातो.