धर्माचे महत्त्व आणि निर्मिती

आज बहुतांश हिंदूंचे शिक्षण आंग्लछायेत सिद्ध झालेल्या शिक्षणपद्धतीत झालेले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘निधर्मीपणा’चा संस्कारच त्यांच्यावर झालेला दिसतो. प्रस्तूत लेखात आपण धर्माचे जीवनातील महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया. तसेच धर्माची निर्मिती आणि रहस्य यांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहितीही पाहूया. या लेखातून ‘धर्म हा आपल्या जीवनाचा प्राण आहे’ हे आपल्याला लक्षात येईल.

आचारमूलक धर्माने वागल्यास मनुष्याच्या आयुष्याची वृद्धी होणे

१. श्वासाविना जीवन नाही, तसेच धर्माविना जीवन हे खरे जीवन नसून प्राण्यांप्रमाणे केवळ अस्तित्व आहे.

२. धर्म बुद्धीमान होण्यासाठी नाही, तर शीलवान होण्यासाठी आहे.

३. आगमानां हि सर्वेषाम् आचारः श्रेष्ठ उच्यते ।
आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ।।
– महाभारत, अनुशासनपर्व, अध्याय १०७, श्लोक १४७

अर्थ : सर्व विद्यांपेक्षा प्रत्यक्ष सदाचरण हे श्रेष्ठ म्हटले जाते; कारण धर्म हा आचारमूलक आहे. या आचारमूलक धर्माने वागल्यास मनुष्याच्या आयुष्याची वृद्धी होते.

४. धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत् ।।
– वाल्मीकिरामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ८, श्लोक २६

अर्थ : धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख होते. धर्मापासून सर्वकाही प्राप्त होते. हे जग धर्माच्या आश्रयावर आहे.

५. ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते ।।
– महाभारत, स्वर्गारोहणपर्व, अध्याय ५, श्लोक ४६

अर्थ : (महर्षी व्यास म्हणतात,) मी भुजा उभारून आक्रोश करत आहे; पण माझे कोणी ऐकत नाही. (हे मानवांनो,) धर्मामुळे अर्थ आणि काम हे दोन्ही साध्य होतात. असे असतांना तुम्ही धर्माची कास का धरत नाही ?

६. सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।
सुखं च न विना धर्मात् तस्माद्धर्मपरो भवेत् ।।
– वाग्भट (अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक १९)

अर्थ : सुखासाठीच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व क्रिया चालू असतात (अधर्मसुद्धा सुखासाठीच करतात); परंतु धर्माविना सुख नाही; म्हणून नेहमी धर्माचे आचरण करावे.

७. ‘ऐहिक सुख वास्तविक खोटेच आहे, काल्पनिक आहे, तरीसुद्धा अज्ञानामुळे जिवाला ते हवेसे वाटते. धर्माची रचना अशा अज्ञान्यांसाठीच आहे. खोटे का असेना, ते सुख मिळत मिळत त्याविषयी जिवाला वैराग्य प्राप्त होऊन खर्‍या सुखाची प्राप्ती होण्यासाठी धर्म आहे. आत्मलाभी मनुष्य अज्ञान्यांसाठीच धर्माचरण करत असतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

८. सुखस्य मूलं धर्मः । धर्मस्य मूलमर्थः । अर्थस्य मूलं राज्यम् ।
राज्यमूलम् इन्द्रियजयः । इन्द्रियजयस्य मूलं विनयः ।
विनयस्य मूलं वृद्धोपसेवा । वृद्धोपसेवया विज्ञानम् ।
विज्ञानेन आत्मानं सम्पादयेत् । सम्पादितात्मा जितात्मा भवति ।
– चाणक्यसूत्रे, अध्याय १, सूत्र १ ते ९

अर्थ : सुखाचे मूळ धर्म (धर्माचरण करण्यात) आहे. धर्माचे मूळ सन्मार्गाने धन कमावण्यात आहे. अर्थाचे मूळ राज्य मिळवण्यात आहे. राज्य नीट चालवण्यासाठी इंद्रिये आणि मन यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. इंद्रिये आणि मन यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नम्रता असणे आवश्यक आहे. नम्रता अंगी बाणवण्यासाठी ज्ञानवृद्धांची सेवा करणे आवश्यक आहे. ज्ञानवृद्धांच्या सेवेने आत्मज्ञान प्राप्त होते आणि या आत्मज्ञानाने आत्मप्राप्ती होते. आत्मप्राप्ती झालेला माणूस जितात्मा होतो.

९. लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः ।
– महाभारत, शांतीपर्व, अध्याय २५९, श्लोक ५

अर्थ : लोकव्यवहार सुरळीतपणे चालावा एवढ्यासाठीच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे.

१०. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
– महाभारत, वनपर्व, अध्याय ३१४, श्लोक १२८

अर्थ : धर्माचे पालन न करणार्‍याचा विनाश होतो आणि जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (म्हणजे ईश्वर) करतो.

११. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४०

अर्थ : धर्माचे थोडेसे पालन केले, तरी तो मोठ्या भयापासून रक्षण करतो.

१२. धर्मेणैव जगत्सुरक्षितमिदं धर्मो धराधारकः ।
धर्माद्वस्तु न किचिदस्ति भुवने धर्माय तस्मै नमः ।।

अर्थ : धर्माप्रमाणे वागण्यानेच जग सुरक्षित रहाते; म्हणून धर्माला पृथ्वीचा धारणकर्ता असे म्हटले आहे. या जगात धर्माइतकी इतर योग्य वस्तू कोणतीही नाही; म्हणून त्या धर्माला माझा नमस्कार.

१३. अधर्म एव मूलं सर्वरोगाणाम् ।

अर्थ : अधर्म हेच सर्व रोगांचे मूळ आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे रोग (त्रास) मानले आहेत. आधिभौतिक रोग म्हणजे भौतिक कारणांमुळे उद्भवणारे रोग; धरणीकंप, अवर्षण आदी संकटे. आधिदैविक रोग म्हणजे ग्रहबाधा, ऋषीमुनींचे शाप, देवतांचा कोप इत्यादी. आध्यात्मिक रोग म्हणजे भूत-पिशाचादी वाईट शक्तींचे त्रास, प्रारब्ध इत्यादी. (एका विचारसरणीनुसार आधिदैविक त्रासात वर उल्लेखलेले ‘आध्यात्मिक’ त्रासही अंतर्भूत आहेत. ‘आध्यात्मिक’ त्रास म्हणजे वात, पित्त आणि कफ यांच्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक त्रास.)

१४. धर्माची प्रतिज्ञा : ‘माणसाच्या मनावर धर्माने अमर्याद स्वामित्व गाजवले आहे. याला कारण धर्माची प्रतिज्ञा हे होय. धर्म माणसाला असे आश्वासन देतो की, सगळ्या जीवनाचा आणि ईश्वराचा अर्थ मी तुला उलगडून सांगेन आणि परम कल्याणही मीच तुला प्राप्त करून देईन.’

१५. धर्म एको मनुष्याणां सहायः पारलौकिकः ।
– महाभारत, अनुशासनपर्व, अध्याय १११, श्लोक १७

अर्थ : एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकातील साथी आहे.

१६. प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
यः स्यात्प्रभवसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
– महाभारत, शांतीपर्व, अध्याय १०९, श्लोक १०

अर्थ : जिवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. ‘जो उत्कर्षाने युक्त असेल, तोच धर्म’, असा सिद्धान्त आहे.

१७. न जातु कामान्न भयान्न लोभाद् धर्मं त्यजेज्जीवितस्यापि हेतोः ।
नित्यो धर्मः सुखदुःखे त्वनित्ये नित्यो जीवो धातुरस्य त्वनित्यः ।।
– महाभारत, स्वर्गारोहणपर्व, अध्याय ५, श्लोक ४७

अर्थ : कामाने, भयाने, लोभाने अथवा जिवाच्या आशेने धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे आणि सुख-दुःखे क्षणिक आहेत. जीव नित्य आहे अन् शरीर अनित्य आहे.

१८. अत्यंत सुखी, तसेच अत्यंत दुःखी मनुष्य मोक्षप्राप्ती करू शकत नाही; म्हणून धर्माची योजना आहे.

१९. यतो धर्मस्ततो जयः । – महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३९, श्लोक ७

अर्थ : जिकडे धर्म तिकडे जय.

२०. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ७८
अर्थ : (संजय धृतराष्ट्राला म्हणतो,) ‘‘जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन आहे, तिथेच लक्ष्मी (ऐश्वर्य), विजय, असामान्य सामर्थ्य, अखंड वैभव आणि नीती ही रहाणार, असे माझे ठाम मत आहे.’’ (श्रीकृष्ण हा ईश्वराचा पूर्णावतार, म्हणजेच स्वतः ईश्वर (धर्मी) असल्याने हे साहजिकच आहे.)

२१. ‘हिंदु धर्माप्रमाणे आचरण न केल्यामुळे सध्या सर्वत्र वादळे, भूकंप, अपघात, अतीवृष्टी, अनावृष्टी, स्वचक्र, परचक्र इत्यादी उत्पात घडत आहेत.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

२२. ‘प्रत्येक जण धर्माने वागल्यास निसर्ग मानवसुखाला अनुकूल होईल. ज्ञानेश्वरमाउलीला ‘जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।’ या पंक्तीतून हेच सांगायचे आहे. येथे प्राणिजात म्हणजे केवळ मनुष्य नव्हे, तर त्यात इतर प्राणीसुद्धा आले. इतकेच नव्हे, तर त्यात अचर सृष्टीसुद्धा आली; कारण आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला स्थावर जन्मसुद्धा येऊ शकतो. मनुष्य सुधारला, तरच इतर चर आणि अचर सृष्टी सुखी होऊ शकेल अन् सुधारला नाही, तर चराचर सृष्टीला दुःख देण्याचे पाप त्याला लागेल.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

धर्माची निर्मिती

अनादी काळी ईश्वराने सृष्टीची उत्पत्ती केली, तेव्हाच धर्माचीही निर्मिती केली.

चात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत्तः पश्चादन्ये शेषभूताश्च धर्माः ।
– महाभारत, शांतीपर्व, अध्याय ६४, श्लोक २०

अर्थ : मूळ धर्म आदिदेवापासून (परमेश्वरापासूनच) निर्माण झाला. इतर सर्व धर्म (पंथ) त्यानंतर निर्माण झाले.

 

धर्म आणि धर्मी (ईश्वर)

अ. साखरेचा (गुण)धर्म आहे गोडी. जिच्यात गोडी हा धर्म आहे, त्या साखरेला ‘धर्मी’ म्हणतात. धर्म आणि धर्मी यांचा अभेद असतो, तादात्म्यसंबंध असतो. जसे साखरेपासून तिची गोडी निराळी करता येत नाही, तसेच ईश्वर आणि धर्म यांचे नाते आहे. ईश्वर हा धर्मी आहे. त्याच्या गुणधर्मालाच ‘धर्म’ म्हणतात. ‘धर्मो नारायण स्मृतः ।’ अर्थात ‘धर्म म्हणजे नारायण’, असे एक वचन आहे.

ईश्वराचे धर्म भिन्न भिन्न असू शकत नाहीत; म्हणून धर्म एकच असतो. तो आहे सनातन धर्म; म्हणूनच धर्माचा इतिहास हा ईश्वराच्या शोधाचा इतिहास आहे.

आ. धर्म शास्त्रनिष्पन्न आहे, तर ईश्वर, ब्रह्म हे शास्त्रप्रकाश्य म्हणजे शास्त्राला प्रकाश देणारे आहेत.

 

धर्माचे रहस्य

‘इंद्रिये विषयभोगासाठी नसून ते जिंकण्यासाठी आहेत. जितेंद्रिय म्हणजे आपली मूळ पूर्णस्थिती. आपण ती लगेच प्राप्त करू शकत नाही; म्हणून ऐहिक सुखाचे सर्वच सोहळे भोगत असतांना हळूहळू त्या सुखाविषयी वैराग्य आणत धर्म आपल्याला पूर्णपदाची प्राप्ती सुखाने करून देतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

१. ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही आवश्यक

‘वासनाराहित्य (वासना नसणे) आणि त्याला आवश्यक असलेले शरीरस्वास्थ्य ही दोन निःश्रेयस लक्षणे धर्माची मुख्य अंगे ठरतात. ही दोन्ही प्राप्त झाल्याविना आत्मसुखाचाही अनुभव येत नाही. विषयांविषयी वैराग्य हे वासनेच्या अभावाला आवश्यक असते. हे वैराग्य विषयांचा अस्थिरपणा, त्यांचे पराधीनत्व आणि आत्मसुख यांचे ज्ञान झाल्याने प्राप्त होते. शरीरस्वास्थ्य हे शरिराला आवश्यक अशा खाणे, पिणे, वस्त्र, निवारा इत्यादी वस्तू मिळाल्याने प्राप्त होते. या वस्तू तर कर्म केल्यावाचून मिळणे अशक्य आहे; म्हणून ज्ञान आणि कर्म या दोहोंच्या समुच्चयानेच उच्च सुखाचा किंवा आत्मसुखाचा अनुभव मिळवता येतो. ‘केवळ ज्ञानाने किंवा केवळ कर्माने ही गोष्ट साध्य करून घेऊ’, असे म्हटले, तर ते शक्य होत नाही.

कर्तव्यकर्मे करतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा करावी. यावाचून (अर्थात कर्मजनित वासनांपासून) अलिप्त रहाण्याचा दुसरा मार्ग नाही. जे नुसत्या कर्माचे सेवन करतात, ते गाढ अंधकारात शिरतात. तसेच जे केवळ विद्येतच रममाण होतात, ते त्याहीपेक्षा गाढतर अशा अंधकारात प्रवेश करतात. विद्या आणि अविद्या ही दोन्ही एकमेकांसह जाणली पाहिजेत. तशी ती जो जाणतो, तो अविद्येने (कर्म) मृत्यूला तरून जातो आणि विद्येने (ज्ञानवैराग्य) अमृत (आत्मसुख) मिळवतो.
(ईशावास्योपनिषद् १, श्लोक ११)

यावरून कर्म आणि ज्ञान ही दोन्ही मिळून आत्मसुखाला कारणीभूत होतात, असे ठरते. यापैकी कर्मांना प्रवृत्ती म्हणता येईल आणि ज्ञान अन् तज्जनित वासना यांना निवृत्ती म्हणता येईल. हा प्रवृत्ती-निवृत्तीसंयोग हेच धर्माचे खरे रहस्य आहे. भगवद्गीतेत जे निष्काम कर्म सांगितले आहे, तोही प्रवृत्ती-निवृत्तीसंयोगच आहे.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment