चंद्रोदय कधी होतो ?

Article also available in :

‘सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या बाबतीत तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.

 

१. चंद्र प्रतिदिन सुमारे ५२ मिनिटे उशीरा उगवणे

चंद्र सुमारे २७.३ दिवसांत आकाशाचे ३६० अंश भ्रमण करतो (पृथ्वीची एक प्रदक्षिणा घालतो); म्हणजेच २४ घंट्यांत आकाशाचे सरासरी १३ अंश भ्रमण करतो. त्यामुळे पृथ्वीने स्वतःभोवती २४ घंट्यांत पूर्ण फिरून वर अधिकचे १३ अंश फिरल्यानंतरच चंद्रोदय होतो. पृथ्वीला स्वतःभोवती १३ अंश फिरण्यासाठी सरासरी ५२ मिनिटे लागतात. त्यामुळे चंद्र प्रत्येक दिवशी सरासरी ५२ मिनिटे उशीरा उगवतो (टीप), उदा. एखाद्या पौर्णिमेला चंद्रोदय सायंकाळी ६.३० वाजता झाल्यास त्याच्या पुढील दिवशी तो सायंकाळी ७.२२ च्या सुमारास उगवेल, त्याच्या पुढील दिवशी तो रात्री ८.१४ च्या सुमारास उगवेल इत्यादी.

टीप – चंद्राची पृथ्वीभोवती भ्रमण करण्याची गती एकसारखी नसते; कारण चंद्राची भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार असून ती पृथ्वीच्या अगदी केंद्रस्थानी नाही. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळून जातांना त्याची गती वाढते अन् पृथ्वीपासून दूर अंतरावरून जातांना त्याची गती न्यून होते. त्यामुळे चंद्र प्रतिदिन ४६ ते ५८ मिनिटे उशीरा उगवतो. याची सरासरी वेळ ५२ मिनिटे येते.

श्री. राज कर्वे

 

२. खगोलीयदृष्ट्या महत्त्वाच्या तिथींना चंद्रोदय होण्याची वेळ

‘अमावास्या, शुक्ल अष्टमी, पौर्णिमा आणि कृष्ण अष्टमी’ या ४ तिथी खगोलीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत; कारण सूर्य आणि चंद्र यांच्यातील कोन (angle) अमावास्येला ‘० अंश’, शुक्ल अष्टमीला ‘९० अंश’, पौर्णिमेला ‘१८० अंश’ आणि कृष्ण अष्टमीला ‘२७० अंश’ असतो. समुद्राला भरती-ओहोटी प्रतिदिन येते; पण अमावास्या आणि पौर्णिमेला भरती-ओहोटीची तीव्रता सर्वाधिक असते, तर शुक्ल आणि कृष्ण अष्टमीला भरती-ओहोटीची तीव्रता सर्वात अल्प असते. या ४ तिथींना चंद्रोदय स्थानिक वेळेनुसार सामान्यतः कधी होतो, ते पुढील सारणीत दिले आहे.

तिथी चंद्रोदय होण्याची वेळ
अमावास्या सूर्याेदयी
शुक्ल अष्टमी माध्यान्ही
पौर्णिमा सूर्यास्ताला
कृष्ण अष्टमी मध्यरात्री

वरील सारणीवरून लक्षात येते, की अमावास्येला चंद्र सूर्याेदयी उगवत असल्याने चंद्राची मागची बाजू प्रकाशित होऊन पुढची बाजू अप्रकाशित रहाते; त्यामुळे तो दिसत नाही. शुक्ल सप्तमीअष्टमीला चंद्र माध्यान्ही (दुपारी) उगवतो, त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर तो सुमारे ६ तास दिसतो. पौर्णिमेला चंद्र सूर्यास्ताला उगवतो, त्यामुळे तो रात्रभर दिसतो. कृष्ण सप्तमीअष्टमीला चंद्र मध्यरात्री उगवतो, त्यामुळे सूर्याेदय होण्यापूर्वी तो सुमारे ६ तास दिसतो.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (१२.१.२०२३)

 

Leave a Comment