केस विंचरण्याच्या संदर्भात पाळावयाचे आचार

प्रस्तूत लेखात आपण ‘केस विंचरून मगच आंघोळ का करावी ?’, केस विंचरल्यानंतर गळलेले केस लगेच बाहेर न टाकण्यामागील शास्त्र, ‘रात्री केस विंचरणे का टाळावे ?’ इत्यादींविषयीचे अध्यात्मशास्र पाहू. यांतून ‘केस कसे विंचरावे’ यांसारख्या लहान-लहान कृतींमागेही हिंदु धर्माने शास्त्र सांगितले आहे, हे लक्षात येते.

१. केस विंचरून मगच आंघोळ करणे आवश्यक

‘कित्येक स्त्रिया केस विस्कटतात; म्हणून आंघोळ झाल्यानंतर केस विंचरतात. केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून देहात जे काही रज-तमात्मक लहरींचे संक्रमण झालेले असते, ते आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होते. त्यामुळे आधी केस विंचरून मग आंघोळ करण्याची पद्धत आहे. याउलट आंघोळीनंतर केस विंचरल्यास देह परत अशुद्ध होतो. यावरूनच असे लक्षात येते की, कलियुगातील मनुष्य केवळ बाह्य स्वच्छतेकडे, म्हणजेच देहाच्या बाह्य सौंदर्याकडे पहाणारा बनलेला असून तो जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याच्या सिद्धांतापासून, म्हणजेच खर्‍या आचारापासून दूर गेलेला आहे.

२. वेणी घालून झाल्यानंतर लहान मुलीने आईला नमस्कार करणे

वेणी घालून झाल्यानंतर लहान मुलीने आईला नमस्कार करणे, या प्रक्रियेत देहात संवर्धित झालेल्या रज-तमात्मक लहरींचेही त्या त्या वेळी देवत्वरूपी भावामुळे उच्चाटन होत असे. वेणी घातल्यानंतर वाहत्या पाण्यातच हात धुतले जात; कारण केसांतील रज-तमात्मक लहरींच्या स्पर्शाने मलीन झालेल्या कृतीतील पापयुक्त परिणामाचेही त्यायोगे परिमार्जन होत असे.

३. केस विंचरल्यानंतर गळलेले केस लगेच बाहेर का टाकू नयेत ?
(केस विंचरल्यानंतर गळलेले केस बाहेर टाकले, तर मांत्रिक त्या जिवाला त्रास देऊ शकणे)

‘केस विंचरतांना निर्माण होणार्‍या घर्षणामुळे केसांतील रज-तम कणांचे संक्रमण वाढते. या संक्रमणामुळे केसांतून रज-तमात्मक वेगवान लहरी वातावरणात प्रक्षेपित होतात. विंचरतांना गळलेले केसही या लहरींनी भारित असल्यामुळे वातावरणात संचार करणार्‍या वाईट शक्ती या रज-तमात्मक लहरींकडे आकर्षित होतात. या लहरींच्या माध्यमातून काळी शक्ती सोडून मांत्रिक त्या जिवावर करणी करू शकतात; कारण केसांतील त्रिगुणांचे आणि त्या व्यक्तीच्या देहातील त्रिगुणांचे प्रमाण सारखेच असल्याने अघोरी विधीच्या माध्यमातून केसांचा माध्यम म्हणून उपयोग करून मांत्रिक एखाद्या जिवाला त्रास देऊ शकतात. दोन घंट्यांनंतर केसांतील रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणाचा वेग उणावून केस मृतवत होतात. घरातील वातावरणापेक्षा बाहेरचे वातावरण जास्त प्रमाणात रज-तमात्मक असल्याने केस विंचरल्यानंतर बाहेर टाकू नयेत.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.२.२००५, दुपारी २.२४ आणि २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

३ अ. विंचरतांना गळलेले केस लगेचच फेकल्यास
मांत्रिक त्यांच्या माध्यमातून त्रास देण्याची शक्यता असणे

‘केस विंचरतांना गळलेल्या केसांतील सूक्ष्म स्पंदनांच्या साहाय्याने मांत्रिक सूक्ष्मातून त्या व्यक्तीच्या केसांचा वापर सूक्ष्मातील अघोरी यज्ञासाठी करू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे केस गळण्याचे प्रमाणही प्रचंड वाढते. यासाठी विंचरतांना गळलेले केस लगेचच वातावरणात फेकणेही अशुभ मानले जाते. विंचरण्यातून गळलेल्या केसांना एकत्र गुंडाळून ठेवावे आणि दोन दिवसांनी त्यांच्यातील स्पंदने पूर्णतः नष्ट झाल्यानंतर त्यांना दूर फेकून द्यावे.’

– ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २८.३.२००६, सायं. ४.१०)

(विंचरतांना गळलेल्या केसांतील रज-तमात्मक लहरींच्या संक्रमणाचा वेग २ घंट्यांनंतर उणावतो. असे असले तरीही केसांतील रज-तमात्मक स्पंदने काही अंशी शिल्लक रहाण्याची शक्यता असते. विंचरतांना गळलेल्या केसांतील रज-तमात्मक स्पंदने दोन दिवसांनंतर पूर्णतः नष्ट होत असल्याने त्या केसांची गुंतवळ दोन दिवसांनी बाहेर टाकणे इष्ट ठरते. – संकलक)

३ आ. गुंतवळ्याच्या जुडीवर थुंकून ती जाळणे

‘पूर्वी वेणी घातल्यानंतर गुंतवळ्याच्या जुडीवर थुंकून मगच ती बाहेर पाणी तापवण्याच्या ठिकाणी असलेल्या अग्नीत टाकली जात असे. तिच्यावर थुंकल्याने वेणी घालतांना त्या वेळी देहात संक्रमित झालेल्या आपल्या देहाशी संबंधित रज-तमात्मक लहरी गुंतवळ्याच्या जुडीत जाऊन केसांतील रज-तमात्मक लहरींना अधिकतम प्रक्षेपण अवस्थेत आणले जात असे आणि नंतर ती जुडी अग्नीत भस्मसात करून स्त्रीच्या अशा लहरींच्या संक्रमणालाही थोपवले जाई. थुंकण्याच्या माध्यमातून देहात कार्यरत झालेली वेगवान रज-तमात्मक स्पंदने आपोआपच उत्सर्जित होऊन ती जळल्याने त्याचा आपोआपच आपल्या देहावरही परिणाम होऊन देहावर उपाय होत असत.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

४. केस विंचरून झाल्यावर फणी आणि हात धुणे आवश्यक

‘पूर्वी केस विंचरून झाल्यावर फणी धुऊन ठेवली जात असे, तसेच हातही धुतले जात असत. यामुळे रज-तमात्मक लहरींच्या माध्यमातून स्पर्शाच्या साहाय्याने देहाला होणारा संसर्ग आपोआपच टाळला जात असे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

५. रात्री केस का विंचरू नयेत ? (वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असल्याने रात्री केस विंचरू नयेत.)

‘रात्री वायूमंडलात त्रासदायक लहरींचे प्रमाण जास्त असते. गतिमान अवस्थेत संचार करणार्‍या या त्रासदायक लहरींमुळे वातावरणात तप्त ऊर्जेची निर्मिती होत असते. ‘केस विंचरणे’ या घर्षणात्मक प्रक्रियेतून, तसेच केसांच्या हालचालींतून निर्माण होणार्‍या नादलहरींकडे वायूमंडलात भ्रमण करणार्‍या त्रासदायक लहरी आकृष्ट होतात. यामुळे जिवाला अस्वस्थता येणे, शरिराला जडत्व प्राप्त होणे, वाईट स्वप्ने पडणे, मुंग्या येऊन शरिराला बधीरता येणे, असे त्रास होतात. ’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.९.२००५, दुपारी १२.१२)

६. केस धुतल्यानंतर ते विंचरणे अन् न विंचरणे (सूक्ष्मातील प्रयोग)

६ अ. केस धुतल्यानंतर ते न विंचरल्याचा परिणाम

६ अ १. केस न विंचरल्याने वर आलेल्या लहान केसांतून काळ्या शक्तीच्या लहरी पसरून डोक्याभोवतीच्या काळ्या शक्तीच्या आवरणात वाढ होणे

‘चैत्र शुद्ध सप्तमी (१२.४.२००८) या दिवशी सकाळी मी केस धुतले; पण रात्रीपर्यंत ते विंचरले नव्हते. ईश्वराकडून येणार्‍या चैतन्याचा झरा डोक्यावरून खाली पूर्ण केसभर पसरला होता; पण केस न विंचरल्याने माझ्या डोक्यावरील लहान केसांतून काळ्या लहरी पसरत होत्या. त्यामुळे माझ्या डोक्याभोवतीचे काळ्या शक्तीचे आवरण वाढल्याचे अन् विरळ स्वरूपात काळा रंग वातावरणात पसरत असल्याचे मला दिसले.

६ अ २. केस विंचरल्यावर जाणवलेला परिणाम

मी केस नीट विंचरल्यावर मला माझ्या डोक्याभोवतीचे काळ्या शक्तीचे आवरण उणावल्याचे जाणवले.’

– सौ. रजनी, गोवा.

७. केस धुतल्यानंतर वेणी घालणे केस धुऊन
केसांची वेणी घातल्यावर मांत्रिकाचे प्रकटीकरण जास्त प्रमाणात
जाणवणे आणि वेणीच्या खाली केसांची गाठ मारल्यावर प्रकटीकरण न्यून होणे

‘वैशाख शुद्ध त्रयोदशी (१७.४.२००८) या दिवशी मी केस धुऊन केसांची वेणी घातली होती. त्या वेळी मांत्रिकाचे विचार आणि कृती जास्त प्रमाणात होत असल्याचे जाणवले. वेणीच्या खाली असलेल्या केसांची गाठ मारल्यावर मनाला शांत वाटू लागले.’ – सौ. रजनी, गोवा.

८. केस व्यवस्थित करतांना हातातून
वात्सल्यलहरींचे प्रक्षेपण होणे आणि त्यामुळे त्रास उणावून शांत वाटणे

‘एकदा सकाळी माझे विस्कटलेले केस नीट करण्यासाठी मी केसांवरून हात फिरवला. त्या वेळी तो हात माझा नसून ईश्वराचाच असल्याचे वाटले. केस व्यवस्थित करतांना त्या हातातून वात्सल्यलहरींचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे त्रास उणावून मला शांत वाटू लागले. त्रास उणावण्यासाठी देवानेच हाताच्या माध्यमातून कार्य केले.’ – सौ. रंजना गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment