नामजपाचे महत्त्व

Article also available in :

 

अनुक्रमणिका

१. देवाला नाव असण्याचे महत्त्व
१ अ. आपल्या नामाने (नावाने) इतरांना आपल्या रूपाला ओळखता येणे,
तसेच ईश्वराच्या नामाने त्याला ओळखता येणे आणि त्याच्याइतकी महती निर्माण होणे

१ आ. नामामुळे भगवंतापर्यंत पोहोचता येणे
१ इ. देवाला हाक मारण्यासाठी त्याचे नाम आवश्यक
१ ई. जे काम भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते
२. भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे
२ अ. भगवंताच्या रूपाला बंधने आहेत, तर भगवंताचे नाम हे बंधनातीत आहे
२ आ. रामापेक्षा रामनाम महत्त्वाचे, तसे स्वत:पेक्षा स्वत:ची स्वाक्षरी महत्त्वाची !
३. नामामुळे ध्येयनिश्चिती होणे
४. भगवंताच्या नामाने भगवंताप्रती प्रेम वाटणे
५. सर्वांसाठी सुलभ अशी साधना
५ अ. बंधनविरहित
५ आ. मंत्रजपात असतो तसा नामजपात उच्चार महत्त्वाचा नसणे
५ इ. अपंगासाठी नामजप हीच तीर्थयात्रा
५ ई. काही एकत्रित सूत्रे (मुद्दे)
६. नाम सदाचारी आणि पापी या सर्वांचे तारक असणे


नामाने असाध्य असे काहीच नाही. या लेखात आपण ईश्वराच्या नामाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. ‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.

 

१. देवाला नाव असण्याचे महत्त्व

१ अ. आपल्या नामाने (नावाने) इतरांना आपल्या रूपाला ओळखता येणे,
तसेच ईश्वराच्या नामाने त्याला ओळखता येणे आणि त्याच्याइतकी महती निर्माण होणे

‘मी’ जन्माला आलो, तेव्हा प्रथम रूप आले. नामाभिधान नंतर झाले. नामकरणानंतर जग त्या नामाने त्या रूपाला (‘मला’) ओळखू आणि संबोधू लागले. वास्तविक ‘मी’ (रूप) आणि त्याला लाभलेले नाम यांचा काहीच संबंध नाही; कारण या शरिराला ‘राजा’ म्हटले काय किंवा ‘गोविंदा’ म्हटले काय, त्या शरिरात काही अंतर (फरक) पडणार आहे का ? नाही ना! मग या संबंधाने जर एवढी महती निर्माण होते, तर ज्याने ‘मला’ (‘माझ्या रूपाला’) निर्माण केले, त्या जगत् नियंत्याच्या नामजपाने केवढी महानता निर्माण होईल! जर ‘मी’ माझे नाम विसरून ईश्वराचेच नाम जपावयास लागलो, तर त्यातील महत्त्वपूर्ण संबंधाने माझी महतीसुद्धा साहजिकच वाढणार नाही का ?’

१ आ. नामामुळे भगवंतापर्यंत पोहोचता येणे

भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.

कोठे लपशी नारायणा । तरी नाम कोठे नेशी ?
आम्ही अहर्निशी । तेचि घोकू ।। – संत तुकाराम महाराज

भावार्थ : संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, तू कोठेही लपला असलास, तरी आम्ही तुला तुझ्या नामजपाच्या बळावर शोधून काढू.’ ‘एखादा माणूस आपल्या ओळखीचा असेल, तर प्रथम त्याचे रूप आपल्या दृष्टी पुढे येते अन् नंतर नाम (नाव) येते; पण त्याची ओळख नसेल अन् आपण त्याला बघितलेले नसेल, तर आपल्या मनात त्याचे नाव आधी येते आणि नंतर त्याचे रूप येते. (`शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असते’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार नाम (शब्द) आणि रूप एकत्रित असतात, म्हणून नाम आठवले की, रूप हे डोळ्यांपुढे येतेच. – संकलक) आज आपल्याला भगवंताची ओळख नाही; म्हणून त्याचे रूप ठाऊक नाही; परंतु त्याचे नाम घेता येईल. त्याचे नाम घेतांना त्याचीच आठवण होते, इतरांची नाही. हा आपला अनुभव आहे. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात आणि त्यांपैकी कोणत्याही नावाला तो ‘ओ’ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली, तरी एकच भगवंत ‘ओ’ देतो.’

१ इ. देवाला हाक मारण्यासाठी त्याचे नाम आवश्यक

‘जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला हाक मारावयाची असेल आणि तिचे नाव ज्ञात (माहिती) नसेल, तर हाक कशी मारणार ? थोडक्यात हाक मारू शकणार नाही. (असेच देवाच्या नावाच्या संदर्भातही आहे.) नेमका हाच भाव व्यक्त करण्यासाठी माऊलींनी ‘ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।’ म्हणजे `सर्वांचे मूळ असणार्‍या आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणार्‍या ‘हे श्री ओंकारा, तुला नमस्कार असो’, या शब्दांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ केला आहे. त्यामुळेच हे मंगलाचरण एकमेवाद्वितीय असे झाले आहे.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

१ ई. जे काम भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते

`मोठा अधिकारी आपल्या स्वाक्षरी शिक्का करतो. तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो, तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाच्या इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या संदर्भातही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते.’

 

२. भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे

‘भगवंताचे नाम घेत असतांना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ‘तुला काय पाहिजे’, असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’, हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता. रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल; पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की, त्याला इकडे (नामाकडे) यावेच लागेल.’

२ अ. भगवंताच्या रूपाला बंधने आहेत, तर भगवंताचे नाम हे बंधनातीत आहे

‘भगवंताचे रूप हे जड (स्थूल) आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती-स्थिती-लय, स्थळ इत्यादी बंधने त्याला असतात; पण नाम हे दृश्याच्या पलीकडचे, म्हणजे सूक्ष्म असल्याने त्याला देशकालमर्यादा इत्यादी विकार नाहीत; म्हणून नाम आज आहे आणि पुढेही तसेच राहील; कारण ते सत् स्वरूप आहे.’

२ आ. रामापेक्षा रामनाम महत्त्वाचे, तसे स्वत:पेक्षा स्वत:ची स्वाक्षरी (लिखित नाव) महत्त्वाची !

श्री रामचंद्राचे नाम घेऊन वानरांनी समुद्रात दगड फेकून सेतू बांधला. नामामुळे समुद्रात दगड तरंगू शकले; पण स्वतः रामचंद्रांनी दगड फेकला तेव्हा तो बुडाला, म्हणूनच म्हणतात, ‘रामसे बडा रामका नाम ।’ ‘आजकाळच्या काळीही अक्षरांचा अनुभव येतो. बँकेत १ कोटी रुपये असणारा लक्ष्मीपुत्र बँकेत जाऊन १०० रुपये मागू लागला, तर त्याला ते मिळत नाहीत; परंतु त्याने स्वतःची स्वाक्षरी करून, म्हणजे नाव लिहून कागद, म्हणजे धनादेश दिला, तर त्याला पैसे मिळतात.’

२ इ. सगुण अवतार करू शकत नाही, ते भगवंताच्या नामाने शक्य होणे

‘सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य केवळ भगवंताच्या नामातच आहे.’

 

३. नामामुळे ध्येयनिश्चिती होणे

३ अ. ‘एका यात्रेकरूला एका क्षेत्री जायचे होते. तो स्टेशनमास्तरला म्हणाला, ‘‘मला ज्या क्षेत्री जायचे आहे त्याचे नाव मला आठवत नाही; पण मी ते क्षेत्र पाहिले आहे. मी त्याचे वर्णन करतो – ‘वारुणा’ आणि ‘असि’ या नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र आहे. या नद्यांच्या पुढच्या प्रवाहाला ‘गंगा’ म्हणतात. येथे देवांची वसती होती; म्हणून या क्षेत्राला ‘देवनगरी’ म्हणत आणि येथील लिपीला ‘देवनागरी’ म्हणत. हे विद्येचे माहेरघर आणि भारतीय संस्कृतीचे मर्मस्थान आहे. आयुष्यात एकदा तरी हिंदू येथे येऊन गंगास्नान करून येथील विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याविना रहात नाहीत. या क्षेत्री मृत पावलेल्यास मुक्ती मिळते. येथे किडा-मुंगी जरी मेली, तरी तिला मुक्ती मिळते. इतकेच नव्हे, तर गरीब, आंधळा-पांगळा अशा ज्यांना या क्षेत्री जाता येत नाही, त्यांनाही या क्षेत्राच्या स्मरणाने मुक्ती मिळते.’’ यात्रेकरूने इतके वर्णन करूनही त्याला शेवटी आरक्षण (तिकीट) मिळाले नाही. दुसरा एक माणूस त्या क्षेत्री गेलेला नव्हता; पण त्याला त्या क्षेत्राचे नाव ज्ञात होते. त्याने ‘काशी’ असे नाव सांगितल्यावर त्याला आरक्षण मिळून तो काशी क्षेत्री गेला.

३ आ. एका रुग्णाला डॉक्टरांनी तपासून त्याला एक गोळी दिली. त्याने त्या गोळीचा आकार आणि रंग पाहून, तसेच गोळीची चव घेऊन मग ती गोळी घेतली. डॉक्टरांनी त्या गोळीचे नाव कागदावर लिहून त्याला औषधालयातून (केमिस्टकडून) काही गोळ्या घेण्यास सांगितल्या. तो औषधालयात गेला आणि डॉक्टरांनी दिलेला कागद काढू लागला; पण त्याला तो मिळाला नाही. तेव्हा त्याने औषधालयातील कर्मचार्‍याला (केमिस्टला) त्या गोळीचा आकार, रंग आणि चव या गोष्टी सांगितल्या; परंतु तो कर्मचारी (केमिस्ट) म्हणाला, ‘‘मी तुम्हाला गोळ्या देऊ शकत नाही. तुम्ही नाव सांगितले, तर मी गोळ्या देऊ शकीन.’’

एखादी गोष्ट प्राप्त करायची असल्यास त्या संदर्भात ‘नाम’ किती उपयुक्त ठरते, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते. भगवंताच्या नामाच्या संदर्भातही असेच आहे. त्याच्या नामजपाने ईश्वरप्राप्तीचे ध्येय निश्चित होते.

 

४. भगवंताच्या नामाने भगवंताप्रती प्रेम वाटणे

‘साध्या शब्दांचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन, तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो. मग भगवंताच्या नामाने भगवंताप्रती प्रेम का वाटणार नाही ?’

 

५. सर्वांसाठी सुलभ अशी साधना

५ अ. बंधनविरहित

यज्ञ, दान, स्नान, जप इत्यादींना कालशुद्धीची आवश्यकता असते; पण नामजपाला देशकालाचे बंधन नाही, तसेच शुचित्व-अशुचित्व किंवा सोवळे-ओवळे यांचाही निर्बंध नाही.

५ आ. मंत्रजपात असतो तसा नामजपात उच्चार महत्त्वाचा नसणे

वाल्मीकी हा ब्राह्मणाचा पुत्र होता; पण भिल्लांच्या कुसंगाने तो दरोडेखोर आणि मारेकरी झाला. त्याला नंतर नारदमुनींचा सत्संग लाभला. रामाच्या नामाचा कसातरी जप करून, उलटे नाम घेऊन, तो महर्षी वाल्मीकि झाला. सर्वसाधारण साधक तर कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे प्रयत्नपूर्वक भावासह नाम घेतो. वाल्या कोळ्यासारखा तो दरोडेखोर किंवा मारेकरीही नसतो; म्हणून थोड्या नामजपानेही त्याची आध्यात्मिक उन्नती जलद होऊ शकते.

५ इ. अपंगासाठी नामजप हीच तीर्थयात्रा

‘पांगळा किंवा आंधळा तीर्थक्षेत्राला जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी ‘रामनामकथा गंगा । श्रवणे पावन करी जगा ।’ हे सूत्र महत्त्वाचे ठरते.’

५ ई. काही एकत्रित सूत्रे (मुद्दे)

१. नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापें जन्मांतरींची ।
न लागती सायास जावें वनान्तरा । सुखे येतो घरा नारायण ।।
ठायींच बैसोनि करा एक चित्त । अंतरां अनंत आठवावा ।
‘रामकृष्ण हरि मुकुंद केशवा’ । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। – संत तुकाराम

२. ‘नामसाधना ही अत्यंत सोपी आहे. इतर योगयागादी साधनांत जसे शरिराला कष्ट पडतात, तसे नामस्मरणामध्ये कोणतेच कष्ट पडत नाहीत. नुसते वाणीने ‘नामोच्चार’ करणे, एवढे केले की पुरे आहे. नामस्मरणाकरिता निराळा स्वतंत्र वेळ काढायला नको. कोणतेही लौकिक व्यवहार करत असतांनादेखील नामस्मरण होऊ शकते. संसारात आपण रात्रंदिवस जेवढे कष्ट घेतो तेवढे जर नामस्मरणात घेतले, तर सर्वच साधते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (श्रीमद्भागवतातील अजामिळाच्या आख्यानावरून, स्कंध ६, अध्याय १ ते ३)

३. ज्ञानमार्गाने साधना करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी लागते, तर ‘चहूं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लहान थोर । जडमूढ पैलपार । पावती नामे ।।’ असे श्री दासबोधात (दशक ४, समास ३, श्लोक २४) म्हटले आहे. दासबोधातील या वचनाचा भावार्थ याप्रमाणे आहे – चारही वर्णांतील लोकांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे. नामस्मरणाच्या संदर्भात लहान-थोर असा भेद नाही. नामाच्या आधारे अडाणी आणि मूर्ख लोकसुद्धा सुखाने संसार सागर तरून जातात.

 

६. नाम सदाचारी आणि पापी या सर्वांचे तारक असणे

‘आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती पहिल्या वर्गाची, दुसर्‍या वर्गाची किंवा विनाआरक्षित (बिनतिकिटाची) असोत, त्यांनी गाडी सोडली नाही, तर ती सर्व इच्छित स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे नाम घेणारी माणसे सदाचारी (तिकीट असलेली) किंवा पापी, दुष्ट आणि दुराचारी (बिनतिकिटाची) जरी असली अन् त्यांनी नाम सोडले नाही, तर मोक्ष मिळवतात. मात्र सर्वांनी नामगाडी सोडता कामा नये.’

६ अ. ‘आपण पुष्कळ पाप करूनही देवाचे नाम घेण्याचा आपल्याला अधिकार आहे, हीच भगवंताची केवढी कृपा आहे !’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment