जपमाळ कशी वापरावी ?

Article also available in :

japamaleche_niyam_inner_banner_bk

१. जपमाळेचे मणी ओढण्याचे नियम

अ. मेरुमणी ओलांडू नये

प्रश्न : मेरुमण्यापर्यंत आल्यावर माळ उलट का फिरवितात ?

प.पू. भक्तराज महाराज : जप करण्याची क्रिया विसरण्यासाठी !

ज्याप्रमाणे डावीकडची इडा किंवा उजवीकडची पिंगळा नाडी नव्हे, तर मधली सुषुम्ना नाडी चालू असणे
साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे नुसत्या एका दिशेने माळ फिरविणे साधकाच्या दृष्टीने योग्य नाही. इडा आणि पिंगळा नाड्यांच्या मधे सुषुम्ना नाडी असते, तसे माळेच्या उलट-सुलट फिरण्याच्या मधे मेरुमणी असतो. चुकून जर मेरुमणी ओलांडला गेला, तर प्रायश्चित्त म्हणून सहा वेळा प्राणायाम करावा.

आ. माळ आपल्याकडे ओढावी

Crossing_Merumani

जपमाळ आपल्या दिशेला ओढण्यापेक्षा बाहेरच्या दिशेला ढकलल्यास काय वाटते त्याची अनुभूती घ्या. बहुतेकांना त्रासदायक अनुभूती येते. याचे कारण आपल्याकडे माळ ओढतांना प्राणवायू कार्यरत असतो, तर बाहेरच्या दिशेला माळ ढकलतांना समानवायू कार्यरत होतो. समान वायूपेक्षा प्राणवायूचे कार्य चालू असतांना जास्त आनंद होतो.

इ. उद्देशानुसार

साधना म्हणून उजव्या हातात पुढीलप्रमाणे माळ धरून जप करावा.

१. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे अंगठ्याने ओढावेत. माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये.

२. अनामिकेवर माळ ठेवून अनामिका आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडावी. नंतर मधल्या बोटाने माळ ओढावी.

 

२. वेळ

अ. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी दिवसातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा सात्त्विकता जास्त असली आणि बरेच योगी साधना करून सात्त्विकता वाढवीत असले, तरी त्या वेळी सात्त्विकता केवळ ०.०००१ टक्के एवढीच वाढलेली असते; म्हणून ब्राह्ममुहूर्ताच्या काळात हट्टाने उठून नामजप करण्याची आवश्यकता नाही. तसेच ब्राह्ममुहूर्ताला झोप येत असली, तर त्या वेळी अट्टहासाने नामजप करण्यापेक्षा ज्या वेळी चांगला नामजप होऊ शकतो ती ती वेळ त्या त्या प्रवृत्तीच्या साधकासाठी सर्वोत्तम होय. चांगल्या नामजपाने सात्त्विकता ५ टक्के वाढते; तर झोप येत असतांना (झोप तमप्रधान आहे.) केलेल्या नामजपाने जेमतेम १ टक्का एवढीच वाढते.

आ. काळ-वेळ ही देवानेच निर्माण केलेली असल्याने अमुक एका वेळी जप करू नये असे नाही, तर सदासर्वकाळ करावा.

 

३. स्थळ

अ. देवळात नामजप करणे, योग्य आसन वापरून नामजप करणे इत्यादी गोष्टींमुळे साधकाची सात्त्विकता केवळ ५ टक्के + ०.०००१ टक्के एवढीच वाढते, तर कोठेही केलेल्या नामजपाने ५ टक्के वाढते; म्हणून नामधारकाने या बाह्य गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा सतत नामजप होत आहे ना, इकडे जास्त लक्ष द्यावे.

देवळात किंवा योग्य आसनावर बसून सतत नामजप करणे बहुतेकांना आवश्यक असते; कारण त्यांच्यात रजोगुण जास्त असतो. एकाच ठिकाणी बसण्याच्या सवयीने रजोगुण अल्प होण्यास साहाय्य होते. दुसरे असे की, सर्व ठिकाणे देवानेच निर्माण केलेली असल्याने कोठेही, अगदी संडासातही नामजप करावा.

आ. ‘एकाच ठिकाणी बसून नामजप करण्यापेक्षा सर्व कामे करीत असतांना नामजप करणे, ही जास्त श्रेष्ठ प्रतीची साधना आहे, कारण त्यात एकतर साधना अखंड चालू रहाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती व्यवहारातील सर्व कामे करीत असतांना, अखंड नामजपामुळे मायेत असूनही नसल्यासारखी असते.

अशा प्रकारे सर्व स्थितीत भगवंताशी अनुसंधान साधून रहाणे यालाच ‘सहजस्थिती’ किंवा ‘सहजावस्था’ असे म्हणतात.’ – प.पू. भक्तराज महाराज

 

४. शरीरप्रकृती

अ. थकवा आणि कंटाळा

शरीर थकले की झोप येते. मन थकले की कंटाळा येतो. अशा वेळी जास्त ताप घेऊन जप करू नये.

आ. मासिक पाळी

भक्तीयोगानुसार मासिक पाळीही देवानेच निर्माण केलेली असल्याने त्या वेळीही नामजप करावा. मासिक पाळीच्या वेळी रजोगुण ०.०००१ टक्के इतकाच वाढत असल्याने नामजपाने वाढणार्‍या ५ टक्के सात्त्विकतेवर फारसा परिणाम होत नाही.

 

५. विश्वास हवा

केवळ यंत्राप्रमाणे मंत्राचे प्राणहीन उच्चारण करणे, म्हणजे जप नव्हे. मंत्रोच्चार असा व्हावा की, ज्यायोगे जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे. पतंजलीने अशा जपाला ‘मंत्राची भावना’ असे म्हटले आहे. एखाद्या द्रव्याला एखाद्या रसात वारंवार बुडवणे म्हणजे त्या द्रव्याला त्या रसाची ‘भावना देणे’, असे म्हणतात. त्याचप्रमाणे मंत्रार्थाच्या अखंड भावनेने जपकर्ता हळूहळू मंत्रमय होत गेला पाहिजे, हाच जपाचा मुख्य उद्देश आहे.

 

६. नाम श्वासाला जोडणे

आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते, श्वास नामाला जोडायचा नसतो. नामजप आपोआप होत आहे, त्यांनी तो श्वासाला जोडण्याची आवश्यकता नाही.

 

७. सद्वर्तनासह श्रद्धेने नाम घेणे

नामधारकाने सद्वर्तनाची पथ्ये पाळली नाही, तर त्या अपराधांचे परिमार्जन करण्यात आपली सर्व साधना फुकट जाते आणि आध्यात्मिक उन्नती होत नाही, उदा. एकदा शिवी दिली तर तीस माळा, लाच घेतली तर पाचशे माळा जप फुकट जातो.

 

८. दैनंदिन जीवन आणि अखंड नामजप

अखंड नामजप करीत राहिल्यास दैनंदिन जीवन जगणे कठीण होईल, असे काही जणांना वाटते. ‘नामजपात मन गुंतले तर इतरांशी बोलणे, कार्यालयात काम करणे, अपघात न होता मार्ग (रस्ता) ओलांडून जाणे इत्यादी कसे शक्य आहे’, असे त्यांना वाटते. तसे वाटणे चूक आहे. नेहमीही मार्ग ओलांडून जातांना डोळ्यांनी रहदारी (वाहतूक) पहाणे, कानांनी गाड्यांचे ध्वनी ऐकणे इत्यादी चालू असतांनाही दुसर्‍यांशी बोलणे किंवा मनात विचार येणे हे चालू असते. हे सर्व करीत असतांनाही आपण अपघात न होता मार्ग ओलांडू शकतो. तसेच नामजप करीतही आपण सर्व गोष्टी करू शकतो.

 

९. टप्प्याटप्प्याने नामजप वाढविणे

नामजप पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाढवावा. प्रत्येक टप्प्यासाठी साधकाच्या पातळीप्रमाणे त्याला सहा मास (महिने) ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.

अ. प्रतिदिन न्यूनतम ३ माळा किंवा १० मिनिटे जप करावा.

आ. काही काम करीत नसतांना जप करावा.

इ. आंघोळ करणे, स्वयंपाक करणे, चालणे, गाडी किंवा आगगाडी यांनी प्रवास करणे इत्यादी शारीरिक कामे करतांना जप करावा.

र्इ. वर्तमानपत्र वाचणे, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे इत्यादी दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नसलेली मानसिक कामे करतांना जप करावा.

उ. कार्यालयीन कागदपत्रांचे वाचन अथवा लिखाण करतांना म्हणजे दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने महत्त्व
असलेली मानसिक कामे करतांना जप करावा.

ऊ. दुसर्‍यांशी बोलतांना जप करावा.

टप्पा ५ अन् ६ मध्ये शब्दातील नामजप अभिप्रेत नसून श्वास किंवा नामाने होणार्‍या आनंदाच्या अनुभूतीकडे लक्ष असणे अभिप्रेत आहे. हे झाले की झोपेतही नामजप चालू रहातो, म्हणजेच चोवीस घंटे
अखंड नामजप होतो.

 

१०. गायत्री मंत्राचे पथ्य

गायत्री मंत्र ही तेजतत्त्वाची उपासना आहे. पृथ्वीतत्त्वाच्या उपासनेआधी तेजतत्त्वाची उपासना केल्यास त्यापासून त्रास होऊ शकतो. दहावी उत्तीर्ण न होता पदवी परीक्षा देणे कठीण असते, तसेच हे आहे. मात्र गुरूंनी सांगितले असल्यास गायत्री मंत्राचा जप करावा

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामसंकीर्तनयोग’