प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेले नामजपाचे श्रेष्ठत्व

Article also available in :

सनातनचे श्रद्धास्थान इंदोरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितलेले नामाचे श्रेष्ठत्व आपण या लेखातून जाणून घेऊ.

 

१. शारीरिक व्याधींमुळे साधनेत खंड नाही

ध्यानाकरिता विशिष्ट आसनात बसावे लागते. त्यामुळे पाठदुखीसारखी शारीरिक व्याधी झाली असता, त्यात खंड पडू शकतो. नामजपाला असे कोणतेही बंधन नसल्यामुळे साधनेत अखंडत्व रहाते. तसेच ध्यानात आसनसिद्धीसाठी लागणारा वेळही नामजपाच्या संदर्भात लागत नाही.

 

२. साधनेत अखंडत्व

ध्यान (समाधी) दिवसभर अखंड नसते, तर नामसाधना अखंड चालू राहू शकते. तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी अखंड साधनाच आवश्यक असते.

 

३. आवड-नावड न्यून होणे

जेवतांना देवाचे नाव घ्यावे. नामात मन रमले की, काय खातो तिकडे लक्ष रहात नाही. त्यामुळे आवड-नावड न्यून व्हायला साहाय्य होते. ध्यान करणार्‍याचे तसे होत नाही. त्याचे सर्व संस्कार तसेच रहातात. याउलट सर्वकाही करतांना नामजप केला की, सर्व संस्कार हळूहळू न्यून होत जातात.

 

४. अखंड ‘जागृतावस्था’ अनुभवणे (ईश्वराची अनुभूती / आत्मानुभूती घेणे)

ध्यानातून साधक जागृतावस्थेत येतो; कारण त्याला जडत्वाची ओढ असते. याउलट अखंड नामजप करणारा अखंड ‘जागृतावस्थेतच’ असतो, म्हणजे त्याचे एकप्रकारे अखंड ध्यानच लागलेले असते !

 

५. चित्तावरील संस्कार उणावणे

ध्यानातील जडत्वाची ओढ ही चित्तावरील संस्कारांमुळे असते; म्हणजेच ध्यानावस्थेत ‘चित्तवृत्ती निरोधः’ होते, ‘निर्मूलनः’ होत नाही. नामजपाने मात्र बहुतांशी निर्मूलन होते.

 

६. सूक्ष्म विचार उफाळून न येणे

मन निर्विचार ठेवणे म्हणजे बाह्य आणि अंतर् या दोन्ही ठिकाणी लक्ष नसणे. ते योग्य नाही, कारण त्या अवस्थेत सूक्ष्म संस्कार कधी ना कधी उफाळून येतातच. नामावर लक्ष असले म्हणजे सूक्ष्म संस्कार उफाळून येत नाहीत; म्हणूनच विचाररहित मनापेक्षा नामजप जास्त महत्त्वाचा.

 

७. आध्यात्मिक पातळी दर्शवणा-या अनुभूती येणे

ध्यानातील अनुभूती या आध्यात्मिक पातळीच्या दर्शक नसतात. याउलट नामजप करणार्‍याच्या अनुभूती त्याच्या आध्यात्मिक पातळीच्या दर्शक असतात.

 

८. अनुभूती येणे

नामाने येणारी अनुभूती खरी असते; कारण नाम घेणारा नाममय झालेला असतो. याउलट ध्यानात येणारी शून्याची अनुभूती म्हणजे भास आहे; कारण यात केवळ मनोलय झालेला असतो.

 

९. चैतन्यावस्था अनुभवणे

ध्यान म्हणजे मृतावस्थेची अनुभूती घेणे, तर नामजप करतांना चैतन्याची अनुभूती येते.

 

१०. नाम, ध्यान आणि अहं

ध्यानयोगात ‘मी ध्यानाला बसतो’, ‘मी ध्यान करतो’, ‘मी समाधीतून जागृतावस्थेत आलो’, अशा सूक्ष्म विचारांमुळे अहं रहातो, तर नामजपात ‘सद्गुरु आपल्याकडून नामजप करवून घेत आहेत’, या भावामुळे साधनेचा अहं निर्माण होत नाही, उलट अहं नष्ट व्हावयास साहाय्य होते. ध्यानामुळे साधनेचा अहं निर्माण होण्याची शक्यता ३० टक्के असते, तर नामामुळे केवळ १० टक्के असते.

 

११. सहजावस्था प्राप्त होणे

ध्यान ही कृत्रिम अवस्था आहे, तर नामाने सहजावस्था प्राप्त होते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment