पू. भगवंतकुमार मेनराय यांनी श्वासासह नामजप जोडता यावा, यासाठी केलेले मार्गदर्शन

Article also available in :

‘साधकांनी अखंड नामजप करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी नामजपाला अखंड होणार्‍या एखाद्या कृतीशी जोडायला हवे. आपल्या शरिरात चालू असणारा श्वासच केवळ अखंड चालू असल्याचे जाणवत असल्याने आपण नामजप अखंड करण्यासाठी तो श्वासोच्छ्वासाच्या क्रियेशी पुढीलप्रमाणे जोडू शकतो.

पू. भगवंतकुमार मेनराय

 

१. श्वासाशी नामजप जोडण्याची प्रक्रिया

१. कोणतीही कृती न करता डोळे उघडे ठेवून शांत बसावे.

२. डोळे मिटून स्वत:च्या श्वासाकडे लक्ष द्यावे.

३. स्वत:चा श्वास कोणत्या लयीत चालू आहे, याचे निरीक्षण करून नामजप श्वासाच्या लयीशी जोडावा, उदा. ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप श्वासाशी जोडतांना श्वास घेतांना ‘ॐ नम:’ म्हणावे आणि श्वास सोडतांना ‘शिवाय’ म्हणावे. अशा प्रकारे श्वासाशी नामजप जोडल्यामुळे तो अखंड चालू होतो.

 

२. श्वासाशी नामजप जोडतांना लक्षात ठेवायचे सूत्र

साधकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना नामजप श्वासाशी जोडायचा आहे आणि श्वास नामजपाशी जोडायचा नाही, म्हणजे नामजपाच्या लयीत श्वासोच्छ्वास करायचा नाही, तर श्वासाच्या लयीत नामजप करायचा आहे.

 

३. श्वासाशी नामजप जोडल्यामुळे होणारे लाभ

३ अ. श्वासाशी संबंधित त्रास उणावणे

वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांना श्वास घेतांना त्रास होतो. श्वासासह नामजप जोडल्यामुळे वाईट शक्तींना साधकांच्या श्वासावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे साधकांना होणारे श्वासाशी संबंधित त्रास अल्प होतात.

३ आ. मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण उणावणे

श्वासासह नाम जोडल्यामुळे साधकांच्या मनात प्रत्येक श्वासाबरोबर केवळ भगवंताचाच विचार येतो. त्यामुळे त्यांच्या मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण न्यून होते.

३ इ. झोपेतही नामजप चालू रहाणे

श्वासासह नामजप जोडल्यामुळे नामजप सलग चालू रहातो. त्यामुळे तो केवळ जागृतावस्थेतच नव्हे, तर स्वप्नावस्थेतही, म्हणजे झोपेतही नामजप चालू राहतो.

३ ई. सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होणे

देवाच्या नामजपात त्याची शक्ती आणि चैतन्य कार्यरत असते. अखंड नामजप केल्यामुळे साधकांभोवती देवाची शक्ती आणि चैतन्य यांचे अभेद्य संरक्षणकवच कार्यरत रहाते. त्यामुळे त्यांचे सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होते.

३ उ. वाईट शक्तींचे विविध त्रास उणावणे

भगवंताच्या नामामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्रासदायक शक्ती नष्ट होते. साधकांचा अखंड नामजप चालू असेल, तर वाईट शक्तींना साधकांच्या जवळ जाता येत नाही. त्यामुळे साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास उणावतात.

३ ऊ. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती घेता येणे

भगवंताच्या नामजपासह त्याचे गुणही कार्यरत असल्यामुळे अखंड नामजप केल्याने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती साधकांना घेता येते.

३ ए. विविध वाणीतील नामजप अनुभवता येणे

त्यामुळे साधकांना वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींतील नामजप कशा प्रकारे चालू होतो, हे अनुभवण्यास मिळू शकेल.’

– (पू.) श्री. भगवंतकुमार मेनराय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१७)

Leave a Comment