सुखदुःखाचे प्रकार (भाग २)

अनुक्रमणिका

१. जिवंतपणीचे सुखदु:ख : आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक दुःखे

२. ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक

३. सापेक्ष

४. व्यष्टी आणि समष्टी

लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

 

१. जिवंतपणीचे सुखदु:ख : आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक दुःखे

प्रारब्धामुळे जे घडत असते, ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत असते. वाईट शक्तीने भारलेले रस्त्यावर टाकलेले लिंबू एखाद्याने प्रारब्धामुळे अनवधानाने ओलांडले, तर त्यालाही त्रास होऊ शकतो. कधी कधी क्रियमाणानेही आध्यात्मिक, म्हणजे बुद्धी-अगम्य अशा गोष्टी घडतात, उदा. एखाद्याला सांगितले की, अमूक एका ठिकाणी जाऊ नकोस. ते ठिकाण पछाडलेले आहे आणि अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने स्वतःच्या घमेंडीत तो तेथे गेला, तर कधी त्याला तेथील वाईट शक्तीचा त्रासही होऊ शकतो.

दुःखाच्या काही आध्यात्मिक कारणांचे विवरण आणि उदाहरणे

१. प्रारब्ध

२. वाईट शक्तींचा त्रास

३. चांगल्या शक्ती

४. शरिरातील शक्तीशी संबंधित

५. इतर

१. प्रारब्ध

प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठी तर आपला जन्म असतो.

२. वाईट शक्तींचा त्रास

अ. वाईट शक्ती

एखादी व्यक्ती अंगात आल्यासारखे वागत असली आणि तिच्यात चांगली स्पंदने जाणवली, तर ‘चांगली क्षुद्र देवता तिच्या अंगात आली आहे’, असे समजावे. जास्त त्रासदायक स्पंदने जाणवली, तर तिला वाईट शक्तींचा त्रास असल्याचे निदान करावे. जराशी त्रासदायक स्पंदने जाणवली किंवा कोणतीच स्पंदने जाणवली नाहीत, तर ती व्यक्ती मनोरुग्ण आहे, असे समजावे. २० प्रतिशत आध्यात्मिक पातळीच्या व्यक्तींना सूक्ष्मातील स्पंदने जाणवत नाहीत. साधनेने ३५ प्रतिशतपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी झाल्यामुळे सूक्ष्मातील स्पंदने कळायला लागली की, मगच हे समजू शकते.

१. व्यसन 

अ. व्यसनी माणसाचे व्यसन हे बहुधा त्याला व्यसनी भुताने पछाडल्याने निर्माण झालेले असते; म्हणूनच आधुनिक वैद्य ८०-९० प्रतिशत व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्त करू शकत नाहीत, तर संत करू शकतात; कारण संत त्या भुतांना दूर करू शकतात.

आ. एका स्त्रीला प्रतिदिन रात्री १२ ते २ या काळात अंगाला भरपूर कंड यायची. रक्त निघेपर्यंत खाजवावे लागायचे. त्वचारोगतज्ज्ञांकडून ४ वर्षे उपचार करून घेऊनसुद्धा ती बरी झाली नाही. साधनेने ती ३ मासांत बरी झाली.

२. करणी : निर्वंश शक्तीमुळे त्रास झाल्याची उदाहरणे –

अ. एका गृहस्थांची २३ वर्षांची मुलगी अपघातात मरण पावली, २७ वर्षांच्या मधल्या मुलाचा साखरपुडा दोन वेळा आणि २९ वर्षांच्या मोठ्या मुलाचा साखरपुडा तीन वेळा मोडला. हे सर्व ६ मासांच्या कालावधीत घडले.

आ. एका तरुणाचे सात भाऊ आणि दोन बहिणी आत्महत्या करून वारले होते.

३. पूर्वजांचे लिंगदेह : यांच्या त्रासामुळे लग्न न होणे, पतीपत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मुलात काहीतरी व्यंग असणे, इत्यादी समस्या आढळून येतात.

४. ग्रहपीडा : शनि, मंगळ इत्यादींमुळे कसा त्रास होतो, हे ज्योतिषशास्त्र सांगते. कर्मयोगाप्रमाणे प्रत्यक्षात ग्रह कुठलाही त्रास देत नाहीत. कोणत्या काळी कोणते सुखदुःख भोगावे लागेल, हे प्रारब्धानुसार ठरलेले असते. जीवनातील घटनाक्रम मोजण्याचे केवळ एक मोठे घड्याळ, एवढेच ग्रहांचे महत्त्व आहे.

३. चांगल्या शक्ती

अ. कुलदेवता : पुढील दोन गोष्टींमुळे कुलदेवता त्रास देण्याची शक्यता असते.

१. कुलाचारांचे पालन न केल्यास कुलदेवतेला राग येण्याची शक्यता असते.

२. एखाद्यात आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता असली आणि तरीही तो साधना करत नसला, तर कुलदेवता रागावते. अभ्यासाची क्षमता असलेल्या; पण अभ्यास न करणार्‍या मुलाला आई-वडील रागावतात, तसेच हे आहे.

आ. वास्तूदेवता : निद्रानाशाचा १० वर्षे विकार असलेल्या आणि मनोविकारतज्ज्ञ यांकडून उपचार करून घेऊनही लाभ न झालेल्या रुग्णाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बिछान्याची दिशा पालटल्यावर तो त्या रात्रीपासूनच झोपू लागला. पुढे वास्तूशांत झाल्यावर बिछान्याची दिशा कशीही असली, तरी तो झोपू लागला.

४. शरिरातील शक्तीशी संबंधित

अ. कुंडलिनीचक्र आणि नाडी यांतील प्राणशक्तीच्या प्रवाहात अडथळा : सहस्त्रारचक्र सोडून अन्य प्रत्येक चक्र आणि नाडी शरिराच्या कोणत्यातरी भागाशी संबंधित असते. त्यांच्यातील प्राणशक्तीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास त्यांच्याशी संबंधित शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतात.

१. एका साधकाच्या छातीत दुखायचे; म्हणून डॉक्टरांनी त्याचा हृदयस्पंदन-आलेख काढला. त्यात हृदयविकार आढळून आला नाही; म्हणून ‘कार्डिअ‍ॅक न्युरोसिस’ असे निदान करून त्याच्यावर मनोविकारतज्ज्ञांनी ६ वर्षे उपचार केले. तरी तो बरा झाला नाही. पुढे एका अध्यात्म जाणणार्‍याने ‘अनाहतचक्रातील अडथळ्यामुळे छातीत दुखत आहे’, असे निदान करून तो अडथळा दूर करायची साधना त्याला सांगितली. ३ मास साधना केल्यावर अडथळा दूर झाला आणि साधक बरा झाला.

२. स्वाधिष्ठानचक्रात अडथळा असला, तर नपुंसकत्व येऊ शकते.

आ. प्राणशक्ती अल्प : याची शारीरिक थकवा, मनाला उत्साह न वाटणे, इत्यादी लक्षणे असतात. थकवा इत्यादी तक्रारींसाठी असा रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यास ते त्याला शक्तीवर्धक औषधे देतात किंवा उत्साह वाटत नाही, इत्यादी तक्रारींसाठी गेल्यास निराशा न्यून करण्याच्या गोळ्या देतात. या दोन्ही प्रकारच्या उपचारांनी तो अर्थातच बरा होत नाही.

५. इतर

अ. कपडे : एका मुलीला ‘निळे कपडे घालू नको’, असे सांगितल्यावर तिची अभ्यासातील एकाग्रता वाढली.

आ. काळ आणि समष्टी पाप : समष्टी पाप वाढल्यामुळे जगात काय होत आहे, हे आपण वर्तमानपत्रात प्रतिदिन वाचतोच !

मृत्यूनंतरची सुखदु:खे

जन्मभर ज्या गोष्टींनी सुख मिळते, त्या गोष्टी मृत्यूनंतर न मिळाल्याने दुःख होते.

 

२. ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक

अ. ऐहिक (इहलोकातील) : विषयसापेक्ष

आ. पारलौकिक (परलोकातील) : विषयसापेक्ष

इ. आध्यात्मिक : विषयनिरपेक्ष

 

३. सापेक्ष

अ. दुःखसापेक्ष

रोगातून बरे होण्याने सुख वाटणे किंवा एखाद्याला अज्ञानाचे दुःख असल्यास आणि ज्ञान झाल्याने ते नाहीसे झाल्यास त्याला ‘दुःखसापेक्ष सुख’, असे म्हणता येईल. ज्ञान झाल्याने बुद्धीला मिळणारे सुख केवळ अज्ञान नाहीसे झाल्याने मिळणारे सुख असते.

आ. सुखसापेक्ष

सुखवस्तू माणसाला अचानक मोठा धनलाभ होऊन जास्त सुख वाटणे, हे सुखसापेक्षाचे उदाहरण झाले. याउलट पाहिले असता सुखसापेक्ष आणि दुःखसापेक्ष दुःख होते.

 

४. व्यष्टी आणि समष्टी

‘व्यक्तीप्रमाणे समाजाचे ध्येयही सुख हेच असले पाहिजे. सर्व व्यक्तींचे किंवा जास्तीतजास्त व्यक्तींचे सुख म्हणजेच समाजाचे सुख. हे ध्येय ठेवूनही समाजाला मानसिक सुख हेच श्रेष्ठ मानावे लागते. शारीरिक सुखाच्या संबंधी असे दिसून येते की, एक मनुष्य जास्त सुख भोगू लागला, तर ते दुसर्‍याच्या सुखावर आक्रमण होते. अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या प्राथमिक आवश्यकता आहेत. या आवश्यकता सर्वांना भरपूर प्रमाणात पुरवणे समाजाला शक्य होत नाही. सर्वांना न्यूनतम (कमीतकमी), तसेच समप्रमाणात अन्न देता येईल, असे गृहित धरले, तर एकाने जास्त वाटा मिळवण्याचा प्रयत्न केला की, ते दुसर्‍याला अपुरे पडते.

मानसिक सुखाची स्थिती वेगळी आहे. एक मनुष्य मानसिक सुख जसजसा जास्त भोगू लागेल, तसतसा तो दुसर्‍याच्या सुखाला कारणीभूत होतो, उदा. उत्तम चित्र काढणे, उत्तम कादंबरी वा नाटक लिहिणे, उत्तम नृत्यगायन करणे, इत्यादी. त्यामुळे इतरांनाही सुखच मिळते आणि त्यामुळेच कलाकारांना कीर्ती लाभते. कीर्ती हे अत्यंत लोभनीय मानसिक सुख आहे. शारीरिक सुख न्यून (कमी) करून माणसाने चंदनासारखे दुसर्‍यासाठी झिजावे आणि त्याविषयी समाजाने त्याची स्तुती करावी, अशी व्यवस्था असून त्यामुळे दोघांचेही हित होते अन् समाजाची प्रगती होते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment