सुखदुःखाचे प्रकार (भाग १)

अनुक्रमणिका

१. जिवंतपणीचे सुखदुःखाचे प्रकार

१ अ. जिवंतपणीचे सुखदु:ख : धर्मग्रंथांनुसार

१ आ. जिवंतपणीचे सुखदु:ख : क्रियमाणकर्म आणि प्रारब्धकर्म यांमुळे शारीरिक आणि मानसिक दुःखे

 


कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात ७५ प्रतिशत दु:ख तर २५ प्रतिशत सुख असते. माणसाच्या वाट्याला येणार्‍या या सुखदु:खाचे विविध प्रकार आपण या लेखात सविस्तररीत्या पहाणार आहोत. यांतून जीवनातील विविधप्रसंगी होणार्‍या सुखदु:खांची कारणे तसेच त्यांच्या कारणमीमांसेची व्याप्ती आणि सखोलता आपल्याला लक्षात येईल. विविध दृष्टीकोनांतून सुखदु:खाचे पुढील प्रकार आहेत –

१. जिवंतपणी आणि मृत्यूनंतर

२. ऐहिक, पारलौकिक आणि आध्यात्मिक

३. सापेक्ष

४. व्यष्टी आणि समष्टी

 

१. जिवंतपणी सुखदुःखाचे प्रकार

१ अ. जिवंतपणीचे सुखदु:ख : धर्मग्रंथांनुसार

आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक हे धर्मग्रंथांनुसार प्रकार होत. ज्या कारणानुसार सुखदुःख होते, त्यानुसार हे प्रकार आहेत. एखादे उदाहरण घेतल्याने या तिन्ही शब्दांचा अर्थ समजणे सुलभ जाईल; म्हणून सूर्याचे उदाहरण घेऊ.

१. आधिभौतिक

सूर्य हा तेजरूप असून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. अशा सूर्याचे तप्त किरण हिवाळ्यात सुखदायक असतात; मात्र उन्हाळ्यात तेच किरण शरिराला दाहक ठरतात. अशा प्रकारे पंचमहाभौतिक गोष्टींपासून शरिराला अनुभवाला येणार्‍या सुखदुःखांना ‘आधिभौतिक सुखदुःखे’ म्हणतात. आग, अवर्षण, अतीवृष्टी, तसेच प्राणी आणि मनुष्य यांपासून होणार्‍या सुखदुःखांचा समावेश या प्रकारात होतो.

२. आधिदैविक

सविता नामक देवतेकडून सूर्याच्या सर्व क्रिया नियंत्रित केल्या जातात. या देवतेचा मंत्र जपणार्‍या व्यक्तीवर ही देवता प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते. त्यामुळे व्यक्तीला मिळणार्‍या सुखाला ‘आधिदैविक सुख’ असे म्हणतात; मात्र ही देवता रागावल्यास शाप देते आणि त्यामुळे व्यक्तीला दुःख भोगावे लागते. थोडक्यात, देवतांच्या कृपेने किंवा क्रोधाने होणारे सुखदुःख, भूत-प्रेतादींपासून होणारी सुखदुःखे, मरणोत्तर यातना इत्यादींचा समावेश या प्रकारात होतो.

३. आध्यात्मिक

अ. शारीरिक : वात, पित्त आणि कफ या तीन धातूंच्या वैषम्यामुळे

आ. मानसिक : काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड्रिपूंमुळे. हे रिपूही वात, पित्त आणि कफ यांवर अवलंबून असतात. आधिभौतिक आणि आधिदैविक दुःखांचे निवारण करण्यासाठी बहुधा बाह्य उपाय करावे लागतात, म्हणजेच ती बाह्योपायसाध्य दुःखे आहेत. मानसिक दुःखे आंतरोपायसाध्य आहेत.

१ आ. जिवंतपणीचे सुखदु:ख : क्रियमाणकर्म आणि प्रारब्धकर्म यांमुळे शारीरिक आणि मानसिक दुःखे

१. शारीरिक दु:खे

अ. क्रियमाणकर्म : समजा ‘अ’ला सांगितले की, अमूक ठिकाणी पाणी दूषित असल्याने उकळून पी; पण त्याला जर आपल्या शारीरिक क्षमतेची घमेंड असली, तर तो म्हणेल, ‘‘कोणतेही जंतू पचवण्याची माझ्यात शक्ती आहे. मला काही होणार नाही.’’ नंतर ते पाणी प्यायल्यावर त्याला रेच (जुलाब) झाले, तर ते त्याने स्वतः ओढवून घेतल्यामुळे, म्हणजे क्रियमाणकर्मामुळे झालेले असतात.

आ. प्रारब्धकर्म : आता प्रारब्धामुळे रेच होणार असतील, तर असे घडेल की, एरव्ही स्वतःच्या शारीरिक क्षमतेची घमेंड नसणार्‍यालाही नेमकी त्याच वेळी ‘बुद्धी (प्रारब्ध) कर्मानुसारिणी’ या नियमाने घमेंड वाटेल किंवा अशी परिस्थिती निर्माण होईल की, त्याला ‘पाणी उकळून पी’, असे सांगणारा कोणी भेटणार नाही. मग ते पाणी प्यायल्यामुळे त्याला रेच होतील.

२. मानसिक दुःखे

अनुरूप नसलेल्या स्त्रीशी लग्न होऊन एखाद्या पुरुषाला मनस्ताप भोगायला लागणे, हेही क्रियमाण आणि प्रारब्ध अशा दोन्हींमुळे वरीलप्रमाणेच होऊ शकते. कोणाचेही न ऐकता स्वतःच्या बुद्धीने एखादीशी लग्न करणे, म्हणजे क्रियमाणकर्म होय. लग्न ठरवण्याच्या वेळी प्रारब्धानुसार बुद्धी भ्रष्ट होऊन अनुरूप नसलेल्या स्त्रीला होकार देणे, हे प्रारब्धकर्म होय.

आपण जिवंतपणीचे सुखदु:खे पहात आहोत. या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण जिवंतपणीचे सुखदु:ख यांतील आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक दुःखे यांविषयी तसेच इतर काही सुखदु:खांचे प्रकार ‘भाग २’ या लेखामध्ये दिले आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’

Leave a Comment