कुंभमेळा

कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा ! कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक माहात्म्य आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो. गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’, सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असतांना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वणी हिंदु धर्मदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. तेथे गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. हा श्रद्धावानांचा मेळाच आहे. केवळ भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अदि्वतीय आहे.

‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते. हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदु धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो. कुंभमेळ्यात धर्मश्रद्धायुक्त आचरण करणार्‍या भाविकांनाच कुंभपर्वाचा खर्‍या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो.

 

१. कुंभमेळा

अ. मानवी देहाचे प्रतीक असलेला कुंभ !

‘कुंभ म्हणजे मातीचा घडा (मडके) ! माणसाच्या शरिराला ‘पार्थिव’ (पृथ्वीतत्त्वप्रधान) म्हणतात. शरीर मातीपासून निर्माण झाले आहे आणि मृत्यूनंतर मातीतच विलीन होत असते; म्हणून कुंभाला, अर्थात् घड्याला मानवी देहाचे प्रतीक मानले आहे.

 

आ. पाप, वासना आणि कामक्रोधादी विकार यांनी भरलेले
देहरूपी कुंभ रिकामे करण्याचा काळ म्हणजे कुंभमेळा !

‘आपण देवाचे लाडके आहोत’, ‘देव आपल्याशी बोलतो’, ‘आपल्यासह नाचतो’, या विचारांचा संत नामदेवांना अहंकार होता. म्हणूनच संतांच्या सभेत संत मुक्ताबाई म्हणाली, ‘‘नामदेवाचे मडके (कुंभ) अहंकाराने भरलेले आहे. म्हणून नामदेव अजून कच्चाच राहिला आहे.’’ आपल्या सर्वांचीही मडकी (कुंभ) ही कच्चीच आहेत; कारण आपले रूप, श्रीमंती, कर्तृत्व इत्यादींचा अथवा यांपैकी एकाचा आपल्याला अहंकार असतो. तसेच आपले मन कामक्रोधादी अनेक स्वभावदोषांनी भरलेले असते. असे आपले अनेक पापांनी, वासनांनी, कामक्रोधादी विकारांनी भरलेले देहरूपी कुंभ रिकामे करण्याचे सर्वोत्तम स्थळ आणि काळ म्हणजे कुंभमेळा !

 

इ. साधनेचे १,००० पट फल देणारे कुंभपर्व !

कुंभमेळ्याच्या स्थळ आणि काळात केलेल्या दानादी सर्व धार्मिक कृतींचे आणि नामस्मरणादी साधनेचे फळ इतर स्थळ-काळाच्या तुलनेने १,००० पट अधिक मिळते. कुंभमेळ्यात अनेक देवता, ब्रह्मज्ञानी, तसेच विविध योगमार्गांतील साधूसंत एकत्र येत असल्याने त्यांचा सत्संग आणि मार्गदर्शन यांचा लाभ अल्पावधीत अन् एकाच ठिकाणी मिळतो; म्हणून कुंभमेळा म्हणजे भगवंताने आपली शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी दिलेली सुवर्णसंधी होय. कुंभमेळ्यात जाऊन नुसते स्नान करून घेण्याने विशेष लाभ होणार नाही, तर आपले वासना, स्वभावदोष आणि अहंकार यांनी भरलेले मन, बुद्धी अन् अहं यांचे कुंभ तीर्थक्षेत्री कुंभमेळ्यात रिकामे केले, तरच आपल्याला देवता आणि साधूसंत यांचे आशीर्वाद मिळून आपल्या जीवनाचे सार्थक होईल !’

– डॉ. वसंत आठवले (प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), मुंबई

 

२. ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ

1374845329_kumbh_kalash

अ १. प्रचलित अर्थ :‘कलश’ वा ‘घट’ किंवा ‘घडा’.

अ १ अ. कलश : ‘कलश’ हे पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक आहे. धर्मशास्त्रानुसार (ऋग्वेदीय ब्रह्मकर्मसमुच्चय, पूजाविधीच्या अनुसार) कलशाच्या मुखात भगवान श्रीविष्णु, कंठामध्ये रुद्र (महादेव), मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी मातृकागण, तसेच कुक्षीमध्ये सात समुद्र आणि सात द्वीप यांनी युक्त अशी पृथ्वी सामावलेली आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद त्यांच्या अंगांसह कलशात वास करतात.

अ २. ज्योतिषशास्त्रानुसार : कुंभ म्हणजे १२ राशींपैकी एक रास. कुंभपर्वाच्या संदर्भात वरील दोन्ही अर्थ ग्राह्य धरले जातात.

 

३. कुंभपर्व : अर्थ आणि उत्पत्तीची कथा

३ अ. अर्थ

प्रत्येक १२ वर्षांनी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे येणारा पुण्ययोग.

३ आ. उत्पत्तीची  कथा

samudra_manthan

अमृतकुंभप्राप्तीसाठी देव आणि दानव (राक्षस) यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले. या समुद्रमंथनार्थ मेरु (मंदार) पर्वत घुसळण्यासाठी सर्पराज वासुकीला दोरी होण्याची विनंती करण्यात आली. वासुकी नागाने दोरी होऊन मेरु पर्वताला गुंडाळल्यानंतर त्याच्या मुखाच्या दिशेने दानव आणि शेपटीच्या दिशेने देव या पद्धतीने समुद्रमंथन करण्यात आले. त्या वेळी समुद्रमंथनातून अनुक्रमे हालाहल विष, कामधेनु (गाय), उच्चैःश्रवा (शुभ्र घोडा), ऐरावत (चार दंत असलेला हत्ती), कौस्तुभमणी, पारिजात कल्पवृक्ष, रंभा आदी देवांगना (अप्सरा), श्री लक्ष्मीदेवी (श्रीविष्णुपत्नी), सुरा (मद्य), सोम (चंद्र), हरिधनु (धनुष्य), शंख, धन्वंतरि (देवतांचा वैद्य) आणि अमृतकलश (कुंभ) ही चौदा रत्ने बाहेर आली धन्वंतरि देवता अमृतकुंभ हाती घेऊन समुद्रातून वर येताच देवांच्या मनात आले की, दानव अमृत पिऊन अमर झाले, तर उत्पात माजवतील. यासाठी त्यांनी इंद्रपुत्र जयंत याला खूण केली. त्यासरशी तो धन्वंतरीच्या हातातील अमृतकुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने रवाना झाला. हा अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी देव-दानव यांच्यात १२ दिवस आणि १२ रात्री, म्हणजे मनुष्याची १२ वर्षे युद्ध झाले. या युद्धात १२ वेळा अमृतकुंभ खाली पडला. या वेळी सूर्यदेवाने अमृतकलशाचे रक्षण केले आणि चंद्राने कलशातील अमृत उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली आणि गुरूने राक्षसांचा प्रतिकार करून कलशाचे रक्षण केले. त्या वेळी ज्या १२ ठिकाणी अमृतकुंभातील थेंब पडले, त्या ठिकाणी वरील ग्रहांच्या विशिष्ट योगाने कुंभपर्व मानले जाते. या १२ स्थानांत भूलोकातील प्रयाग (अलाहाबाद), हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक यांचा समावेश होतो. उर्वरित स्थाने अन्य लोकांत आहेत. कुंभपर्वात या अमृत कलशाचेही स्मरण केले जाते.

 

४. कुंभमेळा

प्रयाग (अलाहाबाद), हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभपर्वानिमित्त हिंदूंची धार्मिक यात्रा भरते. तिला ‘कुंभमेळा’, असे म्हणतात.

 

५. ग्रहगणितानुसार चार कुंभक्षेत्री भरणारे कुंभमेळे

कोणत्या ठिकाणचा कुंभमेळा कधी आयोजित करावा, याला ग्रहगणिताचा आधार आहे. देव-दानवांच्या लढाईत चंद्र, रवि आणि गुरु यांनी देवांना विशेष साहाय्य केल्याने त्यांच्या विशिष्ट स्थितीवर कुंभपर्वाची कालनिश्चिती होते. त्यात ‘गुरु’ या ग्रहाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. गुरु एका राशीत जवळजवळ तेरा मास (महिने) रहातो.

५ अ. प्रयाग कुंभमेळा

वृषभ राशीत गुरु आणि मकर राशीत चंद्र अन् सूर्य असतात, तेव्हा प्रयागच्या त्रिवेणी संगमावर कुंभपर्वणीसाठी भाविक जमतात.

१. प्रयाग कुंभमेळ्याच्या वेळी चंद्राकडून येणार्‍या लहरी मनाच्या विकासास पूरक असणे, तर सूर्याकडून येणार्‍या लहरी बुद्धीच्या उन्नयनास पूरक असणे

‘वृषभ राशीत गुरु आणि मकर राशीत चंद्र अन् सूर्य असतात, तेव्हा या स्थितीत मकर राशीतील चंद्राकडून येणार्‍या लहरी मनाच्या विकासास पूरक  असतात, तर मकर राशीतील सूर्याकडून येणार्‍या लहरी बुद्धीच्या उन्नयनास पूरक असतात. वृषभ राशीतील गुरुकडून येणार्‍या लहरींमध्ये आपतत्त्वरूपी चैतन्य असल्याने या तीनही लहरींच्या एकत्रिकरणाच्या ऊर्जेने पृथ्वीमंडल प्रयागक्षेत्रात त्या त्या काळात दैवी तत्त्वाने भारीत होते.

प्रयागक्षेत्रात याच काळात याच लहरींना आकृष्ट करून घेण्याची आकर्षणशक्ती निर्माण झालेली असते. या आकर्षणशक्तीच्या भोवर्‍यात त्या त्या ग्रहाकडून येणारी ती ती दैवी ऊर्जा बद्ध झाल्याने नेमकेपणाने याच काळात याच क्षेत्री कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या
माध्यमातून, आश्विन कृष्ण पक्ष २, कलियुग वर्ष ५११४, ३१.१०.२०१२़)

५ आ. हरद्वार (हरिद्वार) कुंभमेळा

सूर्य मेष राशीत असतांना आणि गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो, त्या वेळी हरद्वारचा (हरिद्वारचा) कुंभमेळा असतो.

१. हरद्वार (हरिद्वार) कुंभमेळ्याच्या वेळी सूर्याकडून येणार्‍या तेजलहरींमध्ये स्थूलदेहाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असणे, तर गुरुकडून येणार्‍या लहरी मनोदेहाचे शुद्धीकरण करण्यासाठी पूरक आणि
पोषक असणे

‘हरद्वार (हरिद्वार) कुंभमेळ्यात सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो. या अवस्थेत मेष राशीतील सूर्याकडून येणार्‍या तेजलहरींमध्ये स्थूलदेहाचे शुद्धीकरण करण्याची क्षमता अधिक असते, तर कुंभराशीतील गुरुलहरी या याच वेळी मनोदेहाचे शुद्धीकरण करण्यासाठी पूरक आणि पोषक असतात.
या दोहोंच्या संयोगाने जी ऊर्जा ब्रह्मांडमंडलात निर्माण होते, ती क्रियाशक्तीयोगे हरद्वार (हरिद्वार) क्षेत्री त्या काळात निर्माण झालेल्या आकर्षणशक्तीच्या भोवर्‍याकडे आकृष्ट केली जाऊन तेथे पुण्यक्षेत्र तयार होते. या ठिकाणी त्या त्या पुण्यरूपी ऊर्जेचे घनीकरण अधिकतम (कमाल) प्रमाणात झाल्यावरच ‘हरिद्वार कुंभमेळा’ भरवण्याचे आयोजन केले जाते.’ – एक विद्वान  (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आश्विन कृष्ण पक्ष २, कलियुग वर्ष ५११४ ड३१.१०.२०१२़, सकाळी १०.२२)

५ इ. उज्जैन कुंभमेळा

जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु सिंह राशीत असतो, तेव्हा उज्जैनचा कुंभमेळा असतो.

१. उज्जैन कुंभमेळ्याच्या वेळी मेष राशीतील सूर्य हा बुद्धीतील तेजतत्त्व जागृत करून देणारा, म्हणजेच तिला प्रज्ञाजागृतीकडे नेणारा असणे, तर सिंह राशीतील गुरु चित्तशक्तीला जागृती देणारा असणे

‘उज्जैन कुंभमेळ्याच्या वेळी सूर्य मेष राशीत आणि गुरु सिंह राशीत असतो. मेष राशीतील सूर्य हा बुद्धीतील तेजतत्त्व जागृत करून देणारा, म्हणजेच तिला प्रज्ञाजागृतीकडे नेणारा असतो, तर सिंह राशीतील गुरु चित्तशक्तीला जागृती देणारा, म्हणजेच चित्तातील संस्कारात घट करून त्या ठिकाणी चैतन्याचे संकरण करून देणारा असतो.या दोन ग्रहांकडून येणार्‍या त्या त्या दैवीलहरींच्या ऊर्जेला पृथ्वीमंडलात ‘उज्जैन’ या पुण्यक्षेत्री त्या त्या काळात निर्माण झालेला तेजरूपी आकर्षणशक्तीचा भोवरा आपल्या कार्यरत ऊर्जेच्या साहाय्याने खेचून घेतो आणि अवघ्या काही घंट्यांतच स्वतःच्या वायूमंडलात आपल्यातील कार्यरत शक्तीने बद्ध करून ठेवतो. अशा प्रकारे उज्जैनक्षेत्री पुण्यकाल आणि पुण्यक्षेत्र बनते. नेमके हेच औचित्य साधून उज्जैनच्या कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आश्विन कृष्ण पक्ष २, कलियुग वर्ष ५११४, ३१.१०.२०१२़)

५ ई. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा

गुरु आणि सूर्य हे दोन्ही सिंह राशीत येतात, तेव्हा त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ समजतात.

१. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी सिंह राशीतील गुरु आणि सूर्य यांच्याकडून बलिष्ठ रूपात येणार्‍या तेजलहरींच्या वेगवान प्रवाहाला आकृष्ट करून घेणारे प्रकाशतरंग ‘त्र्यंबकेश्वर-नाशिक’क्षेत्री निर्माण झालेले असणे

‘त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी गुरु आणि सूर्य हे दोन्ही सिंह राशीत येतात. या योगात दोन्ही ग्रहांकडून बलिष्ठ रूपात तेजलहरींचा वेगवान प्रवाह पृथ्वीमंडलाकडे वेगाने धावत असतो. याच काळात ‘त्र्यंबकेश्वरनाशिक’ क्षेत्री भूगर्भातील तेजरूपी शक्ती प्रकाशलहरींयोगे तरंगाच्या रूपात त्या ठिकाणी कार्यरत झालेली असते. ही तरंगरूपी प्रकाशऊर्जा सिंह राशीतील गुरु आणि सूर्य यांच्याकडून येणार्‍या तेजोमय लहरींना आकृष्ट करून घेते आणि स्वतःतील कार्यशक्तीत बद्ध करते. हाच मेळ साधून पुण्यक्षेत्राची निर्मिती झालेल्या या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आश्विन कृष्ण पक्ष २, कलियुग वर्ष ५११४ ड३१.१०.२०१२़)

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’