‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्‍चात्त्य कुप्रथांचे उच्चाटन करून हिंदु संस्कृती जोपासा !

हिंदु युवक-युवतींनो, व्हॅलेंटाईन डेसारख्या
पाश्‍चात्त्य कुप्रथांचे उच्चाटन करून हिंदु संस्कृती जोपासा !

पू. अतुल दिघे
श्री. अतुल दिघे

व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो ? या दिवसाचा इतिहास काय आहे ? असे अनेक प्रश्‍न आपल्या मनात निर्माण होतात. दुर्दैवाने याविषयीच्या कोणत्याही प्रश्‍नाचे योग्य उत्तर कुठेही उपलब्ध नाही. विविध संकेतस्थळांवर व्हॅलेंटाईन डेचा इतिहास मिस्ट्री म्हणून संबोधला गेला आहे. आपण हिंदु संस्कृती म्हणतो; तसे पाश्‍चात्त्य संस्कृती म्हणू शकत नाही; कारण ती सुसंस्कृत नाही, तर बहुधा विकृती असते; म्हणून पाश्‍चात्त्य विचारसरणी असे लेखात दिले आहे.

 

१. व्हॅलेंटाईन डे विषयीची माहिती : हिस्ट्री.कॉम या
संकेतस्थळावर या दिवसाविषयी पुढील माहिती दिली आहे.

१ अ. व्हॅलेंटाईन नावाच्या पाद्य्राने राजाज्ञेचा
अवमान केल्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळणे

तिसर्‍या शतकात रोम येथे व्हॅलेंटाईन नावाचा एक पाद्री (प्रीस्ट) होता. त्या काळातील क्लॉडीयस २ नावाच्या राजाने एक नियम लागू केला की, बायका-मुले असलेल्या पुरुषांपेक्षा अविवाहित पुरुष चांगले सैनिक असतात; म्हणून युवा मुलांनी विवाह करू नये. व्हॅलेंटाईनला हे अयोग्य वाटले आणि त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता लपूनछपून प्रेमींचे लग्न लावणे चालू केले. जेव्हा राजा क्लॉडीयस २ ला हे कळले, तेव्हा त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश दिला.

१ आ. व्हॅलेंटाईन तुरुंगाधिकार्‍याच्या तरुण मुलीच्या
प्रेमात पडणे आणि मृत्यूपूर्वी तिला पाठवलेले पत्र आजही उपलब्ध असणे

रोमच्या कारागृहात असलेला व्हॅलेंटाईन कारागृहातील तुरुंगाधिकार्‍याच्या तरुण मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला पत्र पाठवले. व्हॅलेंटाईनच्या मृत्यूपूर्वी त्याने तिला एक पत्र पाठवले आणि त्यात तुझ्या व्हॅलेंटाईनकडून असे लिहिले. तेव्हापासून आजही असे लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत.

 

२. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तथाकथित कारणे

अ. काही लोकांचे मत आहे की, व्हॅलेंटाईनची पुण्यतिथी साजरी करायला फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

आ. पाचव्या शतकाच्या शेवटी पोप जीलेसियसने १४ फेब्रुवारी या दिवसाला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केला. या दिवसाचा प्रेमाशी संबंध बर्‍याच काळानंतर स्थापित झाला.

 

३. पाश्‍चात्त्य देशांसमवेत भारतातही व्हॅलेंटाईन डे
सणासारखा साजरा होत असल्याने धनाचा होणारा अपव्यय !

व्हॅलेंटाईन डे विश्‍वभरात विशेषतः अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत साजरा केला जातो आणि आताच्या काळात हा दिवस भारतातही इतर सणांसारखा साजरा होतो. अमेरिकेच्या एका सर्वेक्षणानुसार ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन डेसाठी तेथील लोकांनी एकूण १८ सहस्र कोटी डॉलर्सचा व्यय केला; तर भारतातील सर्वेक्षणानुसार येथील लोकांनी एकूण १५ सहस्र कोटी रुपयांचा व्यय केला.

३ अ. फुलांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारून होणारी लूट !

या दिवशी लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांना विशेष महत्त्व असते. ख्रिस्ताब्द २०१२ मध्ये देहली आणि जवळपासच्या भागांतील फूल विक्रेत्यांनी १० कोटी रुपयांच्या फुलांची विक्री केली. अन्य दिवशी एका गुलाबाच्या फुलाचे मूल्य १२ ते १५ रुपये असते; पण व्हॅलेंटाईन डे ला एका फुलाची मूल्य २५ ते ३० रुपये इतके असते. काही ठिकाणी एक फूल १०० रुपयांपर्यंत विकले जाते. यावरून फुलांच्या विक्रीच्या माध्यमातून लोकांना लुटले जाते, असे लक्षात येते.

३ आ. पर्यटन

भारतात व्हॅलेंटाईन डे साजरा करणार्‍यांसाठी केरळ, गोवा, मसुरी, माऊंट अबू इत्यादी ठिकाणी विशेष पर्यटनाचे ५ ते ५० सहस्र रुपयांचे पॅकेजेस उपलब्ध असतात.

३ इ. शुभेच्छापत्रे

पाश्‍चात्त्य देशांत वाढदिवस, लग्न, मृत्यू इत्यादी प्रसंगी आणि नाताळ या सणाला लोक एकमेकांना शुभेच्छापत्रे पाठवतात. भारतात व्हॅलेंटाईन डे च्या काळात आर्चीझ नावाच्या शुभेच्छापत्र बनवणार्‍या आस्थापनाची शुभेच्छापत्रांची विक्री १० पटींनी वाढते. या काळात शुभेच्छापत्र बनवणार्‍या आस्थापनांचा सुमारे ८० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.

(शुभेच्छापत्र पाठवणे, ही पाश्‍चात्त्य विचारसरणी असून इ.स. १९२० ते १९३० या कालावधीमध्ये ती भारतात आली असावी. सध्याच्या काळात शुभेच्छापत्रांसाठीची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रुपयांची होते आणि ती प्रतिवर्षी वाढतच आहे. शुभेच्छापत्र पाठवण्याच्या प्रथेमुळे लोकांचे एकमेकांना वैयक्तिक भेटणे न्यून झाले आहे. काही वेळा शुभेच्छापत्र पाठवणे, ही एक औपचारिकता होते; कारण त्यात खरे प्रेम नसून पाठवायचे म्हणून ते पाठवले जाते. – संपादक)

३ ई. उपाहारगृहात खाणे-पिणे

पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे भारतातही उपहारगृहात खाण्या-पिण्याचा संस्कार विकसित झाला आहे. भारतात या कालावधीत उपाहारगृहात खाण्या-पिण्यासाठी एकूण २ ते ३ सहस्र कोटी रुपये व्यय होतात.

थोडक्यात, व्हॅलेंटाईन डेच्या कालावधीत भारतात अंदाजे साडे चार ते पाच सहस्र कोटी रुपयांची उधळपट्टी होते.

(पाश्‍चात्त्य विचारसरणीचे अनुकरण करण्यासाठी एका निरर्थक दिवसाला ५ सहस्त्र कोटी रुपये व्यय केल्याने देशाच्या खर्‍या विकासासाठीचा पैसा पाण्यात गेल्यासारखा होतो. – संपादक)

 

४. भारतियांनो, व्हॅलेंटाईन डे साजरा करून
हानीच होत आहे, हे तुमच्या लक्षात येत नाही का ?

४ अ. विदेशातही साजरे न होणारे डे साजरे करणे

पाश्‍चात्त्यांनाही आश्‍चर्य वाटेल, असे ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत रोझ डे, प्रपोझल डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, किस डे, हग डे आणि व्हॅलेंटाईन डे असे एकूण आठ दिवस लागोपाठ भारतात साजरे केले जातात. एवढे दिवस विदेशातही साजरे केले जात नाहीत. यावरूनच भारताची सामाजिक स्थिती किती खालवली आहे ? हे लक्षात येते.

४ आ. फुले देऊन खरे प्रेम व्यक्त होत नसणे

पाश्‍चात्त्य देशांतील मुली आणि स्त्रिया यांना फुलांचा गुच्छ मिळणे अतिशय आवडते. त्यांना वाटते की, फुले देणारा खरोखर त्यांच्यावर प्रेम करतो. भारतातही या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण मुले मुलींना गुलाबाचे फूल अथवा गुच्छ देतात. हिंदु धर्मात प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही गुलाबाचे फूल किंवा फुलांचा गुच्छ दिला जात नाही. फुले देवतांना वाहिली जातात. दारावर फुलांचे तोरण बनवून लावले जाते. सात्त्विकता वाढवायला गजरा करून डोक्यात घालतात, तसेच ती शुभप्रसंगी वापरली जातात.

४ इ. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनैतिकतेने गाठलेली परिसीमा

कामवासनेची पूर्ती करण्याच्या उद्देशाने अधिकांश मुले-मुली व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. एका सर्वेक्षणानुसार सुमारे ३० टक्क्यांहून अधिक मुले मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक बनवणार्‍या आस्थापनाच्या मतानुसार इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी गर्भनिरोधकांची विक्री अधिक होते. अर्थातच, अविवाहित मुले-मुली या दिवशी लैंगिक संबंध ठेवतात. याचा परिणाम म्हणून अविवाहित मुलींना गर्भपातही करावा लागतो. थोडक्यात यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. हिंदु धर्मात लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे निषिद्ध मानले गेले आहे.

४ ई. मुलींना त्रास देऊन त्यांचा छळ करणारे रोड रोमिओ !

इंग्लंड, यू.के.च्या बी.बी.सी.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार व्हॅलेंटाईन डेच्या काही आठवड्यांपूर्वीच रोड रोमिओ बॉलीवूड चित्रपटातील नायक-नायिका यांच्या भेटीच्या गोष्टींप्रमाणे वागायला लागतात आणि मुलींना त्रास देतात.

मुलींना या काळात घरातून बाहेर निघणे कठीण जाते. मुलाच्या इच्छेला नाकारल्यास काही मुले शिव्या देणे, शारीरिक आणि मानसिक छळ करणे, बलात्कार करणे, पळवून नेणे, तोंडावर आम्ल फेकणे अशा प्रकारे मुलींना त्रास देतात. अशा प्रकारच्या घटना एरव्हीही होतात; पण या काळात त्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समजते.

(अशा प्रकारच्या त्रासांना सामोरे जाण्यासाठी मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक झाले आहे. मुलींनी अशा घटनांचा प्रतिकार न केल्यास येणार्‍या काळात अशा घटना आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपादक)

 

५. हिंदु संस्कृतीप्रमाणे सण साजरे केल्याने देवतांच्या तत्त्वाचा
लाभ होणे आणि व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करून कोणताही लाभ होत नसणे

व्हॅलेंटाईन डे ख्रिस्ती पंथाशी निगडित आहे. हिंदु धर्मात जे काही सण, उत्सव साजरे केले जातात, त्यांना आध्यात्मिक तत्त्वांचा आधार असतो, उदा. दत्त जयंती, गणेश चतुर्थी, श्रीरामनवमी इत्यादी. या दिवशी त्या त्या देवतांचे तत्त्व (दत्ततत्त्व, गणेशतत्त्व, श्रीरामतत्त्व) पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात येत असल्याने सर्वांना त्याचा लाभ होतो. हिंदु धर्मातील संतांच्या पुण्यतिथीला त्या त्या संतांचे तत्त्व सर्वांना मिळते.

व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे, पाश्‍चात्त्य विचारसरणीचे (ख्रिस्ती पंथाचे) आहेत. या दिवशी प्रेम, माता, पिता आणि मैत्री यांचे तत्त्व पृथ्वीवर येत नसल्यामुळे त्याचा कुणालाही लाभ होत नाही; म्हणूनच असे दिवस साजरा करणे म्हणजे आपण आणि देश यांची आर्थिक, सामाजिक अन् कौटुंबिक हानी करणे आहे.

 

६. तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !

६ अ. हिंदु धर्मात प्रेमाला निषिद्ध मानलेले नसणे

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ?

(हिंदूंचा विरोध व्हॅलेंटाईन डेसारख्या असभ्य, असांस्कृतिक आणि असामाजिक प्रथेला आहे. असे डे साजरा केल्याविनाही मनुष्य आवश्यक ते साध्य करू शकतो. व्हॅलेंटाईन डे साजरा करून समाजात अनैतिकता पसरते, स्त्रियांचे शील भ्रष्ट होते, त्यांच्यावर अत्याचार होतात. यासाठी लोकांना त्याची जाणीव करून देणे, त्यांचे प्रबोधन करणे आणि अशा कुप्रथा थांबवणे, हेच स्वाभिमानी हिंदूंचे कर्तव्य आहे. – संकलक)

६ आ. व्हॅलेंटाईन डे साजरा करून प्रेम आपोआप वाढत नाही !

केवळ असे दिवस साजरे केल्याने आपल्यात प्रेम आणि मैत्री आपोआप कशी काय वाढणार ? आपल्यात प्रेमभाव वाढण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे काही काळाने आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो.

६ इ. व्हॅलेंटाईन डेलाच प्रेम व्यक्त करता येते, असे नाही !

मुला-मुलींचे एकमेकांवर प्रेम होणे नैसर्गिक आहे. व्हॅलेंटाईन डे नसला, तरीही ते एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करू शकतात. व्हॅलेंटाईन डेला मुला-मुलींनी प्रेम व्यक्त केले नाही, तर पुढे कधीही ते प्रेम व्यक्त करू शकणार नाही, असे होऊ शकत नाही.

६ ई. व्हॅलेंटाईन डे भारतात साजरा
होत नव्हता; तेव्हा मुला-मुलींमध्ये प्रेम नसायचे का ?

६ उ. हिंदूंच्या कृतीतूनच प्रेम व्यक्त होत असल्याने त्यांना
पाश्‍चात्त्यांप्रमाणे मी तुझ्यावर प्रेम करतो, असे सतत सांगण्याची आवश्यकता नसणे

पाश्‍चात्त्य विचारसरणीत नवरा, बायको आणि मुले एकमेकांना मी तुझ्यावर प्रेम करतो (I love you), असे सतत सांगतात. कुणी घराबाहेर निघत असेल, तेव्हा पापी घेऊन वरील वाक्य म्हणतात. मुळातच पाश्‍चात्त्यांमध्ये स्वकेंद्रितपणा आणि स्वार्थीपणा अधिक असल्यामुळे त्यांना असे वाक्य सतत म्हणून स्वतःचे प्रेम सिद्ध करावे लागते. याउलट हिंदु धर्मात त्याग, व्यापकत्व आणि प्रीती कशी वाढवावी ? हे शिकवले गेल्यामुळे हिंदु माता, पिता आणि मुले यांना एकमेकांना मी तुझ्यावर प्रेम करतो (I love you), असे सतत सांगावे लागत नाही. त्यांच्या कृतीतूनच सर्व काही व्यक्त होत असते.

 

७. हिंदु युवक-युवतींनो, हे लक्षात घ्या !

७ अ. आपले यौवन देशासाठी अर्पण
करणार्‍या क्रांतीकारकांना विसरू नका !

आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश जास्त महत्त्वाचा आहे. हाच दृष्टीकोन ठेवून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्या अनेक विरांनी आपले यौवन अर्पण केले आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा संदेश मानून ते लग्न करून बसले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते का ?

७ आ. समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे साजरा
करण्याच्या मागे आपण का लागलो आहोत ? याचा विचार करा !

इंटरनॅशनल बिझिनेस टाइम या इ-दैनिकानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुसाईड हेल्पलाईनला सर्वांत जास्त फोन येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत.

असा हा समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा आणि अनेकांना निराशेत घेऊन जाणारा दिवस साजरा करण्यामागे आपण का लागलो आहोत ? आपल्याकडे एक म्हण आहे, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. आपण पाश्‍चात्त्यांच्या चुकांतून शिकणार आहोत कि नाही ?

७ इ. हिंदु धर्माच्या आचरणाने जन्म-मृत्यूच्या
पलीकडे जाता येते, हे लक्षात घेऊन धर्माचरण करा !

व्हॅलेंटाईन डे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्‍चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्या सुखाच्याही पुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदु धर्माच्या शिकवणीत आहे; म्हणूनच व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्त करा. लक्षात ठेवा, जो धर्माचे पालन करतो, त्याचे धर्म पालन (पोषण) करतो.

– संकलक : श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०१४)

Leave a Comment