षोडशोपचार पूजाविधी (भाग २)

लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी षोडशोपचार पूजाविधी (भाग १) यावर ‘क्लिक’ करा !

 

विशेष पूजनाची कृती

काही देवतांची पूजा करतांना त्या देवतेच्या वैशिष्ट्यानुसार किंवा देवतांची विशिष्ट पूजा करतांना नेहमीच्या षोडशोपचार पूजेत थोडाफार पालट (बदल) केला जातो. उदाहरणादाखल पुढे दिलेल्या उत्सवाच्या वेळी केल्या जाणार्‍या देवीच्या महापूजेवरून हे लक्षात येईल.

१. प्रारंभ

‘आचमन, देशकाल, संकल्प, श्री गणपतिपूजन, शरीरशुद्धीसाठी न्यास आणि कलश, शंख, घंटा आणि दीप यांची पूजा झाल्यावर देवीच्या महापूजेला प्रारंभ होतो.

२. वैशिष्ट्य

या पूजेत प्रत्येक उपचार समर्पित करतांना वैदिक मंत्रांनंतर त्या उपचाराशी संबंधित अर्थाचा पुराणोक्त मंत्र म्हटला जातो.

३. उपचार

आवाहन, देवीचे स्वागत आणि आसन यांनंतरच्या काही उपचारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अ. पाद्य (चरणांवर पाणी घालणे) : या उपचारात पाण्यात दूर्वा आणि फुले एकत्रित करून ते पाणी देवीच्या चरणांवर वहातात.

आ. अर्घ्य : पाण्यात गंध, फुले, दूर्वा, दर्भ, सवाद (सातू), मोहरी, तीळ (पांढरे) आणि अक्षता एकत्रित करून ते पाणी देवीला अर्पण करतात.

इ. आचमन : पाण्यात जायफळ, लवंग, कंकोळ (मिरीसारखे एक फळ) आणि गंध एकत्रित करून ते पाणी देवीला अर्पण करतात.

ई. स्नान

ई १. मधुपर्कस्नान : दही, मध आणि तूप एकत्र करून त्याने देवीला स्नान घालतात.

ई २. फलोदकस्नान : विविध फळांचे पाणी (रस) एकत्र करून त्या पाण्याने देवीला स्नान घालतात.

ई ३. पुष्पोदकस्नान : विविध फुले पाण्यात घालून त्या पाण्याने देवीला स्नान घालतात.

ई ४. रत्नोदकस्नान : सुवर्णधातू आणि माणिक, पुष्कराज, मोती, हिरे इत्यादी रत्ने यांच्या पाण्याने देवीला स्नान घालतात.

उ. अलंकार : वेगवेगळे मंत्र उच्चारून देवीला अलंकार समर्पित करतात.

ऊ. दर्पण : देवीला आरसा दाखवतात किंवा आरशातून सूर्याचे किरण देवीकडे परावर्तित करतात.

ए. पत्रपूजा : देवीला आघाडा, तुळस, माका, दवणा, दर्भ, धोतरा, मोगरा, बेल इत्यादींची पाने वहातात.

ऐ. पुष्पपूजा : देवीला चाफा, केवडा, बकूळ, जाई, जुई, कमळ इत्यादी फुले वहातात. तसेच देवीला फुलांची वेणी आणि हार अर्पण करतात.

ओ. कुंकुमार्चन

१. ।। रजताचल शृङ्गाग्र गृहस्थायै नमो नमः ।।

२. ।। हिमाचल महावंश पावनायै नमो नमः ।।

(देवीच्या नावांच्या आरंभी घातलेले १ आणि २ आकडे हे देवीच्या १०८ नावांपैकी १ आणि २ क्रमांकांची नावे दर्शवतात.) अशा देवीच्या १०८ वेगवेगळ्या नावांचा उच्चार करून देवीवर एकशे आठ वेळा कुंकू वहातात.

औ. आवरण पूजा : या पूजेत देवीची वेगवेगळी नावे उच्चारून देवीवर अक्षता वाहिल्या जातात. अशी पूजा नऊ वेळा केली जाते.

अं. देवीला धूप ओवाळतात.

क. देवीला दीप ओवाळतात.

ख. देवीला नैवेद्य (पायस आणि विविध पक्क्वानांनी युक्त महानैवेद्य) दाखवतात.

ग. विडा : सुपारी, कंकोळ, खजूर, जायफळ, वेलदोडा, लवंग इत्यादी जिन्नस एकत्र करून, ते कुटून सिद्ध केलेला विडा देवीला अर्पण करतात. (एरव्हीच्या नित्य पूजेत विडा म्हणून विड्याची दोन पाने आणि सुपारी ठेवतात.)

घ. राजोपचार

१. छत्री, चामर (देवीला वारा घालायची वस्तू), दर्पण (आरसा), गीत, वाद्य, नृत्य आणि आंदोलन (पाळणा किंवा देवाला बसून न्यायचे आसन) हे उपचार मंत्रपूर्वक प्रत्यक्ष समर्पित करतात. (नित्य पूजेत त्याऐवजी अक्षता वहातात.)

२. शिबिका (पालखी), अश्वरथ, अंबारी (हत्तीचा रथ), मोराच्या पिसांचा वारा आणि व्यजन (पंखा) हे समर्पित करतात.

च. दंड समर्पण : देवीला सुवर्णदंड आणि रौप्यदंड प्रत्यक्ष समर्पण करतात.

छ. आरती : देवीला सर्व उपचार अर्पण केल्यानंतर तिची महाआरती करतात. त्यानंतर कर्पूरआरती ओवाळून मंत्रपुष्पांजली वहातात.

ज. देवीची स्तुती : सप्तशतीमधील पहिल्या आणि चौथ्या अध्यायातील काही श्लोक उच्चारून देवीची स्तुती करतात.

झ. वेदपाठ : देवीसमोर वेदांतील निवडक मंत्र म्हणतात.

त. शास्त्रचर्चा : देवीसमोर शास्त्रचर्चा आणि पुराणश्रवण करतात.

थ. सप्तशतीपाठ : देवीसमोर सप्तशतीच्या पाठातील निवडक श्लोक म्हणतात.

द. प्रदक्षिणा आणि नमस्कार : देवीला प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात आणि देवीला अर्घ्य देऊन पूजेची सांगता करतात.

ध. तीर्थ आणि निर्माल्यधारण : देवीचे तीर्थ प्राशन केल्यावर थोडे तीर्थ स्वतःच्या डोक्यावर शिंपडतात. तसेच देवीच्या अंगावरील फूल मस्तकावर धारण करतात. शंखातील पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडतात.’ – श्री. दामोदर वझे, सनातनचे साधक-पुरोहित, फोंडा, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’