देव

‘देव’ हा शब्द आपण अनेक वेळा विविध कारणांसाठी ऐकलेला आणि वापरलेलाही असतो. ‘देव’ म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा असते. प्रस्तुत लेखात आपण ‘देव’ आणि ‘देवी’ या शब्दांचे अर्थ तसेच देवांना अनेक नावे असण्यामागील कारणे पाहू.

 

१. देव

अ. व्युत्पत्ति आणि अर्थ

दिव्यदेह धारण करणारा एक वर्ग. या शब्दाची व्याख्या यास्काने दिली आहे, ती अशी –

देवः दानात् वा दीपनात् वा द्योतनात् वा ।
द्युस्थानो भवति इति वा । यो देवः सा देवता ।

अर्थ : दान देणे, चकाकणे, प्रकाश देणे अशा अर्थाच्या दा, दीप् किंवा द्युत् या धातूपासून देव हा शब्द बनला आहे. द्युलोकात रहातात म्हणून देव. जो देव तीच देवता होय. – निरुक्त ७:१५

 

२. देवी

अ. अर्थ

देवी शब्दाचे पुढील अर्थ आहेत.

१. स्त्रीदेवता

उदा. चौसष्ट योगिनी.

२. देवपत्नी

उदा. शिवाची पत्नी पार्वती. प्रत्यक्षात देव आणि देवी हे निराळेच असतात. त्यांची लग्ने भक्तांनी लावलेली असतात !

३. देवाच्या शक्तीचे मूर्तरूप

देव बीजरूप आहेत, तर देवी शक्तिरूप आहेत. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. शाक्तसंप्रदायात या शक्तिरूपाला सर्वश्रेष्ठ देवता मानतात, उदा. आदिमाया.

आ. शक्तीचे प्रकार

अ. सौम्य आणि उग्र

१. सौम्य : पार्वती, अंबा, गौरी, उमा इत्यादी.

२. उग्र : काली, चंडी, चामुंडा, दुर्गा इत्यादी.

आ. तारक आणि मारक

१. तारक : भक्तांच्या रक्षणासाठी हिचा वापर होतो.

२. मारक : दुर्जनांच्या नाशासाठी हिचा वापर होतो.

 

३. देवता

देवता हा शब्द देव आणि देवी या दोन्ही अर्थी वापरतात.

अ. देवांची नावे

देवांना पुढील दोन कारणांमुळे अनेक नावे असतात.

१. देवांचे निरनिराळे गुण वर्णन करणारी निरनिराळी नावे असतात, उदा. लंबोदर, हरि, शिव इत्यादि. (व्यक्तींची नावे नाव ठेवणार्‍याच्या आवडीनुसार ठरवलेली असतात.)

२. भक्ताच्या प्रकृतीनुसार त्याने एखाद्या देवाच्या विशिष्ट शब्द असलेल्या नावाचा जप करणे जास्त उपयुक्त ठरणार असल्यास तसे नाव त्याला उपलब्ध असावे.

 

श्री. राम होनप

 

१. श्री. राम होनप

१ अ. उपास्यदेवता

ही देवता मनुष्याचे हित चिंतणारी असते. साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक आणि व्यावहारिक जीवन जगण्यासाठी किमान गरजांची पूर्तता व्हावी, यांसाठी ती पूरक असते. उपास्यदेवतेच्या साधनेने साधक मायेतून मुक्त होतो. ती गुरूंची भेट घडवून आणण्यास साहाय्य करते. थोडक्यात मनुष्य जीवनाचे आध्यात्मिकदृष्ट्या सार्थक करण्याचे कार्य उपास्य देवता करते.

१ आ. देवी

देवीला वरदायिनी असे म्हणतात. मनुष्याने जे काही देवीकडे मागितले, त्याची ती पूर्तता करते; कारण इच्छित गोष्टी साध्य करण्यासाठी साधकाने ठराविक साधना केलेली असते. त्या साधनेवर प्रसन्न होऊन देवी साधकाची इच्छित मनोकामना पूर्ण करते; परंतु असे केल्याने साधक मायेत अडकू शकतो. साधकाने सकाम अथवा निष्काम ज्या उद्देशासाठी देवीची उपासना केली, त्यानुरूप देवी त्याला त्याचे फळ देते.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०१७)

 

कु. मधुरा भोसले

 

२. कु. मधुरा भोसले

२ अ. उपास्य देवतांचा वर्ण भिन्न असल्यामुळे त्या विविध वर्णांशी संबंधित असणे

उपास्य देवतांच्या वर्णानुसार संबंधित वर्णातील व्यक्ती त्यांची उपासना करतात. उदा. शूद्रदेवतेचा वर्ण शूद्र, वैश्‍वेदेव आणि कुबेर यांचा वर्ण वैश्य, इंद्रादी देवतांचा वर्ण क्षत्रिय आणि अग्नीदेव अन् उच्च देवता यांचा वर्ण ब्राह्मण आहे. विविध वर्णांच्या देवतांप्रमाणे संबंधित वर्णातील (जातीतील नव्हे) व्यक्तींना त्यांची उपासना करावीशी वाटते.

२ आ. देवींकडून प्रक्षेपित होणारी शक्ती भिन्न असणे आणि त्या कार्यानुमेय विविध कामनांची पूर्ती करू शकणे

देवींची उपासना त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि पूर्ण होणारी मनोकामना यांच्याशी संबंधित आहे. देवी त्यांच्या कार्यानुरूप शक्ती प्रक्षेपित करून भक्तांच्या कामना पूर्ण करतात, उदा. लक्ष्मीच्या उपासनेने धनाची प्राप्ती होत असल्याने धनाची कामना मनात असणार्‍या वैश्य वर्णातील व्यक्तींकडून तिची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे शक्ती प्राप्त करण्याची मनोकामना असणार्‍या क्षत्रिय वर्णातील व्यक्तींकडून शक्तीस्वरूपिणी श्री दुर्गादेवीची उपासना केली जाते. ब्राह्मण वर्णातील व्यक्तींच्या मनात ज्ञानप्राप्तीची कामना असल्याने ती पूर्ण करणार्‍या

श्री सरस्वतीदेवीची उपासना त्यांच्याकडून केली जाते. विविध वर्णातील व्यक्तींना त्यांच्या वर्णांशी संबंधित आणि कामनापूर्ती करणार्‍या देवतांची उपासना करण्याची प्रेरणा मिळत असते.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०१७, रात्री १०.३५)

Leave a Comment