एकादशी व्रत

Article also available in :

१. एकादशी व्रत केल्याचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झालेले असणे अन् होणार असणे

केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रत केल्याचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात. पहिल्या पंधरवड्यात ‘स्मार्त’ ही शंकराची आणि दुसर्‍या पंधरवड्यात ‘भागवत’ ही विष्णूची एकादशी येते. हिंदु धर्माच्या सर्व मासांतील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावास्या ते पौर्णिमा यांच्या मधल्या पंधरवड्यास ‘शुक्ल पक्ष’ आणि पौर्णिमा ते अमावास्या यातील पंधरवड्यास ‘कृष्ण पक्ष’, असे संबोधतात. यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रती मासाला दोन एकादशी येतात.

 

२. गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगणे

महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने ‘गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे ?’, असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने ‘एकादशी व्रत केल्याने गोत्रहत्यादोष नाहीसा होईल’, असे त्याला सांगितले. या व्रताचे आचरण केले असता, महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील.

 

३. पौराणिक कथांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून
व्रतवैकल्यांमध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणे

आपल्या पौराणिक कथांमध्ये एक वैचारिक सूत्र असते. त्याचप्रमाणे त्यांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते. इतकेच नव्हे, तर या व्रतवैकल्यांमध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते.

सरळ रूपाने ‘एकादशी उपवास करा’, असे सांगितले, तर लोक सिद्ध होतातच असे नाही; म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसंदर्भात सांगितले जाते. ‘या उपवासांनी सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर्य अन् आरोग्य संपन्नता प्राप्त होईल’, असे लोकांना सांगितले जाते.

 

४. शरीर निरोगी रहाण्यासाठीही एकादशी महत्त्वाची !

आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्त्वे आपल्या शरिरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर (अनिष्ट) परिणाम करत असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी रहाण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे.

 

५. शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन्
चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक !

‘एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथी येतात. त्या वेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि अस्तंगत चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यांवरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्त्व आणि मन यांवर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेपरे येणे, ‘फिट्स’ येणे, शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे अन् चंद्राच्या कारकत्त्वाला प्रतिकार करणे यांसाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे.’

– श्री. काशीनाथ थिटेकाका (एक हिंदुत्ववादी), पंढरपूर (कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया, कलियुग वर्ष ५११४ (१५.११.२०१२))

एकादशीचे प्रकार, वैशिष्ट्ये, एकादशी व्रताचे महत्त्व आणि त्याचे लाभ, एकादशी व्रत करण्याची पद्धत, तसेच एकादशीच्या दिवशी तुळस पहाण्याचे लाभ यांविषयीची माहिती वाचण्यासाठी एकादशी (हरिदिनी) या लेखावर क्लिक करा!

2 thoughts on “एकादशी व्रत”

Leave a Comment