मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी समाजातील संभ्रम !

१. मराठी भाषा शिकण्यासाठी येणार्‍या अडचणी

अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे. इंग्रजीचे वाढते प्रस्थ आणि त्या भाषेला मिळणारा सन्मान, त्यामुळे इंग्रजीकडे सगळ्यांचा ओढा असतो. इंग्रजी लिहिता-बोलता आली, तर त्याचे भवितव्य अन् प्रभाव आणि तसे नाही झाले, तर त्याचा आत्मविश्‍वासावर होणारा परिणाम, हे प्रतिदिन आसपास पहाता येते. इंग्रजी शिकवण्यासाठीचे वर्ग आणि उपाय यांनी बाजारपेठ भरलेली आहे. एखाद्याला मराठी शिकायचे असेल, तर त्याला काही सापडत नाही.

२. अमराठी शब्दांचा अस्खलितपणे वापर केल्याने तेच शुद्ध वाटू लागणे

     तक्रार हा शब्द मराठी माणसाला शुद्ध मराठी वाटेल; पण उर्दू बोलणार्‍या माणसाला हा शब्द उर्दू वाटेल. तक्रार, टेबल, खुर्ची, महसूल, हे शब्द मराठी नाहीत, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण ते शुद्ध मराठीत मोडतात आणि बर्गर, चॅटींग हे अशुद्ध समजले जातात.

    भाषा प्रवाही आहे. ती सभोवतालचे रंगढंग उचलत पुढे वहात असते. आज हिंदी आणि इंग्रजी शब्दांच्या प्राबल्याने मराठी भाषेची काळजी करणारे चिंताग्रस्त आहेत. लवकरच चिनी अन् स्पॅनिश भाषेचा अंतर्भाव चालू झाला की, या मंडळींना म्हणता येईल, आजची भाषा किती शुद्ध होती !

– इब्राहीम अफगाण (संदर्भ : मासिक विवेक, १३.१.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात