अखिल मानवजातीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी धर्माधिष्ठित जीवनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे अनिवार्य !

१९.५.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील देवी, कृतज्ञते परत ये मज दर्शन देण्याला ही काव्यमय प्रार्थना वाचली आणि एका साधकांनाही वाचायला सांगितली. तेव्हा त्यांनी काही समजले नसल्याचे सांगितले. तेव्हा मला त्यांना केवळ ६ ओळींच्या प्रार्थनेचा भावार्थ सांगत असतांना कितीतरी शब्द वापरावे लागले. त्यावरून मला पुढील विचार सुचले.

१. भगवद्गीतेतील श्‍लोकांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्या नंतरच्या काळातील संतांना त्यापेक्षा अधिक श्‍लोक लिहावे लागणे

भगवद्गीतेतील श्‍लोकांचा अर्थ सांगण्यासाठी श्रीज्ञानेश्‍वरमाऊलींना त्यापेक्षा अधिक श्‍लोक असलेली भावार्थदीपिका, म्हणजे श्रीज्ञानेश्‍वरी लिहावी लागली. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तीही आकलन होईना; म्हणून संत सोनोपंत दांडेकर किंवा संत साखरे महाराज आदींना गीतेचे आजच्या मराठी भाषेत विवेचन करावे लागले. त्या ग्रंथातही मूळ श्रीज्ञानेश्‍वरी या ग्रंथापेक्षा कितीतरी अधिक शब्दांचा वापर करावा लागला.

२. आजच्या पिढीला मराठी भाषेतील विवेचनही कळत नसणे, यावरून दिवसेंदिवस मानवाच्या बुद्धीला जडत्व येत आहे किंवा त्याच्या आकलनक्षमतेत वेगाने घट होत आहे, असे दिसून येणे

आजच्या पिढीला तर मराठी भाषेतील विवेचनही कळत नाही. यावरून दिवसेंदिवस मानवाच्या बुद्धीला जडत्व येत आहे किंवा त्याच्या आकलनक्षमतेत वेगाने घट होत आहे, असे दिसून येते. याचे मूळ कारण आताच्या शिक्षणपद्धतीत दडले आहे. आता अशा प्रकारच्या धार्मिक ग्रंथांचे शिक्षण शाळेतही देत नाहीत आणि घरातही मिळत नाही.

३. पूर्वी बालपणापासूनच जिवाकडून
धर्माचरण होत असल्याने जिवाला सतत चैतन्य मिळत असणे

दुसरे कारण म्हणजे पूर्वीची गुरुकुल शिक्षणपद्धत ही धर्मसंस्कारयुक्त होती. त्यामुळे घरातून, शिक्षणाद्वारे आणि सामाजिक व्यवहारातून होणार्‍या धर्मसंस्कारांनुसार बालपणापासूनच जिवाकडून धर्माचरण होत असे. त्यामुळे जिवाला सतत चैतन्य मिळत असे. त्यामुळे सर्वसामान्य जीवही न्यूनतम ५० टक्के आध्यात्मिक पातळीचे असत.

४. संस्कृत ही देववाणी चैतन्याच्या स्तरावर
कार्य करत असल्याने अत्यल्प शब्दांत सांगूनही जिवाला त्याक्षणीच सर्व ग्रहण होत असणे

दुसरे अधिक सूक्ष्म कारण, म्हणजे संस्कृत ही देववाणी असल्यामुळे मुळातच ती चैतन्याच्या स्तरावर कार्य करते. त्यामुळे ७० ते ८० टक्के पातळीच्या श्रीगुरूंनी ५० ते ५५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सामान्य विद्यार्थ्यांनाही संस्कृत या चैतन्यमय भाषेतील अत्यल्प शब्दांत सांगूनही विद्यार्थ्यांचा जीव त्याक्षणीच सर्व ग्रहण करत असे.

५. प्राचीन काळातली हिंदूंची धर्माचरणावर आधारित समाजव्यवस्था आणि गुरुकुल शिक्षणपद्धत पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य !

येथे श्रीगुरु शब्दांतून जे सांगतील, ते ज्ञान मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर समजून घेण्यापेक्षा जीव ते ज्ञान चैतन्याच्या स्तरावर ग्रहण करत असल्यामुळे मन आणि बुद्धीचा अडथळा येत नसे. यातूनच प्राचीन काळातली हिंदूंची धर्माचरणावर आधारित समाजव्यवस्था आणि गुरुकुल शिक्षणपद्धत यांचे मानवी जीवनातील अत्युच्च स्थान लक्षात येते. त्यामुळे अखिल मानवजातीचा सर्वांगीण ऐहिक उत्कर्ष आणि आध्यात्मिक उन्नती यांसाठी अशा प्रकारची धर्माधिष्ठित अत्युच्च जीवनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे, हाच एकमेव उपाय आहे आणि त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे.

– सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०१६ दुपारी २.४५ वाजता)