महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती होणे,
हे तत्कालिन काँग्रेस शासनाच्या मराठीद्वेषी कारभाराचे फलित !

घराघरातील मुलांनी मराठीकडे पाठ फिरवून
इंग्रजी भाषा शिकणे, हा शिक्षणात राजभाषेला
(मराठीला) ऐच्छिक करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या (तत्कालिन काँग्रेस शासनाच्या) निर्णयाचा दुष्परिणाम ! 

महाराष्ट्रात राज्यभाषा असलेल्या मराठीचे जसे उच्चाटन होत आहे, तसे देशातील इतर राज्यांमध्ये तेथील राज्यभाषेचे कधीच होणार नाही. तेथील शिक्षणपद्धत मुळातच राज्यभाषेला ऐच्छिक ठरवत नाही. जेव्हापासून महाराष्ट्र शासनाने मराठी विषय हा ऐच्छिक केला, तेव्हापासून या भाषेेला इंग्रजी अन् हिंदी भाषा समांतर ठरल्या. या ऐच्छिकतेचा परिणाम म्हणून आता घराघरातील मुले मराठीकडे पाठ फिरवून इंग्रजी भाषा शिकत आहेत. (२०.५.२०१०)

 

मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे
त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा 
वाटत नाही, हे मराठी भाषेचे दुर्दैव ! 

वर्ष १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. हिंदी भाषिकांनी आजही अभियांत्रिकी शिक्षण संपूर्ण हिंदी भाषेत देण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा वाटत नाही, हे मराठी भाषेचे दुर्दैव म्हणावे लागेल. (२०.५.२०१०)

 

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराच्या प्रगतीविषयी
अहवाल सादर करण्याचा आदेश 
द्यावा लागतो, हे
(तत्कालिन) काँग्रेस शासनाच्या मराठीद्वेषी कारभाराचे फलित !
 

कनिष्ठ न्यायालयात मराठीचा वापर आणि त्यासाठी त्यांना विविध सुविधा देण्याविषयीचे आदेश महाराष्ट्र राज्यशासन अन् उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. या आदेशाच्या कार्यवाहीचा अहवाल सहा महिन्यांत सादर करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने विधी आणि न्याय विभागाला दिला होता. (१२.६.२००९)

 

आजचे मराठी साहित्यिक हेच तर मराठीचा गळा आवळत नाहीत ना ? 

एक हे मराठीचे मोठे कवी आहेत. त्यांची पत्नी ख्रिश्‍चन आहे. या कवींनी त्यांचा एक कविता संग्रह त्यांच्या नातवाला अर्पण केला आहे. अर्पण पत्रिका इंग्रजी भाषेत आहे. मित्रांनी त्यांना विचारले, असे का ? हे कविराज म्हणाले, नातू इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो. त्याला कळावे; म्हणून इंग्रजी लिहिले.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जानेवारी २०१०) 

 

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व न जाणणार्‍या मातृभाषाद्रोही शासनाच्या कारभाराचा दुष्परिणाम !

भारतीय भाषांमध्ये शिकणार्‍या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीतच शिक्षण घेण्याची इच्छा असल्याची माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनच्या वतीने मुंबईतील पालिका शाळांच्या शिक्षणावर आधारित बनवलेल्या अहवालात हे वास्तव समोर आले आहे. मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका शाळांतील शिक्षणाच्या सद्यस्थितीबाबत हा अहवाल सादर करण्यात आला. 

१. या अहवालात अ ते इ अशी उतरत्या क्रमाने सामाजिक आणि आर्थिक गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. 

२. वर्ग अमधील ९५ टक्के विद्यार्थी खाजगी शाळांत, तर ५ टक्के विद्यार्थी पालिका शाळांत शिकत असल्याचे दिसून आले आहे. 

३. विशेष म्हणजे, वर्ग ड मधील ७८ टक्के विद्यार्थी खाजगी शाळांत धडे घेत असून वर्ग इ मधील तब्बल ९८ टक्के विद्यार्थी खाजगी शाळांना पसंती दर्शवत आहेत. 

४. भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेणार्‍या एकूण ८६ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम इंग्रजीत असावे, अशी इच्छा आहे, तर वर्ग अ मधील ९६ टक्के विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. वर्ग इ मधील ६७ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीत शिक्षण घेणे आवश्यकतेचे वाटते. (१७.१२.२०१३)

 

कुठे विदेशातील मराठीप्रेमी जनता आणि कुठे त्याच भाषेला तुच्छ लेखणारी भारतातील मराठीद्रोही !

१. कतार या मुस्लिम देशात भारतीय भाषा शिकवणार्‍या ८ शाळा आहेत. त्यांपैकी ५ शाळांमध्ये मराठी शिकवली जाते. नवी पिढी आपुलकीने मराठी भाषा शिकत आहे.

२. रत्नागिरीच्या साखरप्यातून अमेरिकेत वास्तव्याला गेलेले श्री. मंदार मोरेश्‍वर जोगळेकर यांनी अमेरिकेत रहाणार्‍या भारतियांना इंटरनेटच्या माध्यमातून मराठी साहित्य वाचायला मिळावे; म्हणून बूकगंगा डॉट कॉम हे संकेतस्थळ चालू केले आहे. या संकेतस्थळावर ७ सहस्र मराठी पुस्तके उपलब्ध आहेत.

३. वर्ष १९७० मध्ये अमेरिकेतील ४ मराठी कुटुंबांनी एक हस्तलिखित सिद्ध केले. तेव्हा मराठी फाँटही उपलब्ध नव्हते. वर्ष १९७७ मध्ये एकता नावाचे मासिक चालू केले.

४. सध्या अमेरिकेत २५ मराठी नियतकालिके प्रसिद्ध होत असून ५० मराठी मंडळे तेथे कार्यरत आहेत, अशी माहिती श्री. मंदार जोगळेकर यांनी दिली.

५. विदेशातील मराठीचा वाचकवर्ग वाढत असून फिलाडेल्फियामध्ये मराठी शाळा चालू करण्यात आली आहे. सध्या या शाळेत ७५ मुले-मुली मराठी शिकत आहेत ! (१६.३.२०१५)