‘डोळे येणे’ याची लक्षणे आणि त्‍यावरील उपाय

Article also available in :

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. सध्‍या अनेक भागांमध्‍ये डोळे येण्‍याच्‍या साथीने डोके वर काढले आहे. त्‍याचा संसर्ग झपाट्याने होत आहे. सर्व वयोगटांतील व्‍यक्‍ती प्रामुख्‍याने मुले या आजाराने त्रस्‍त आहेत. ‘डोळे येणे’ म्‍हणजे नक्‍की काय ? ते कशामुळे होते ? त्‍याची लक्षणे कोणती ? त्‍यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया. डोळे आले असल्‍यास कशी काळजी घ्यावी तसेच कुठला नामजप करावा याविषयी अवश्य जाणून घ्या.

डोळे आले असल्‍यास किंवा डोळे येऊ नये, यासाठी देवतांचा पुढील जप करा !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सध्‍या डोळ्‍यांची साथ (डोळे लालसर होण्‍याची साथ) सर्वदूर पसरत आहे. आपल्‍या परिसरात कोणाला डोळे आले असल्‍याचे लक्षात आल्‍यास या लेखात दिल्‍याप्रमाणे सर्वांनी डोळ्‍यांची काळजी घ्‍यावी. स्‍वतःला डोळे आले असल्‍यास डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने औषधही डोळ्‍यांत घालावे. आपल्‍याला झालेल्‍या डोळ्‍यांच्‍या साथीची लागण इतरांना होऊ नये, यासाठी आपणच काळजी घ्‍यावी.

डोळे आले असल्‍यास किंवा डोळे येऊ नये, यासाठी देवतांचा पुढील जप ‘प्रतिदिन १ घंटा’, याप्रमाणे निदान ७ दिवस करावा. हा नामजप सलग १ घंटा न करता अर्धा घंटा २ वेळाही करू शकतो.

ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’

येथे दिलेला नामजप त्‍या क्रमाने म्‍हटले की, तो एक नामजप झाला. असा हा नामजप नियोजित कालावधीपर्यंत (उदा. अर्ध्‍या किंवा १ घंट्यापर्यंत) पुनःपुन्‍हा करावा.

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा. (४.८.२०२३)

 

साधक, कार्यकर्ते, वाचक आणि धर्मप्रेमी यांना सूचना

डोळे आले असल्‍यास किंवा डोळे येऊ नये, यासाठी या लेखात दिलेला नामजप केल्‍यानंतर कुणाला काही अनुभूती आल्‍यास वा त्‍यांना काही वैशिष्‍ट्यपूर्ण जाणवल्‍यास त्‍या अनुभूती [email protected] या इ-मेलवर पाठवाव्‍यात, ही विनंती !

 

डॉ. निखिल माळी

 

१. डोळे येणे म्‍हणजे काय ?

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. यामध्‍ये डोळ्‍यातून चिकट स्राव येऊन डोळे लाल होतात.

 

२. शास्‍त्रीय भाषेमध्‍ये या आजाराला काय म्‍हणतात ?

या आजाराला ‘कन्‍जक्‍टिवायटिस’ (conjunctivitis) किंवा ‘रेड आईज्’ (red eyes) अथवा ‘सोर आईज्’ (sore eyes) असे म्‍हणतात. हा आजार सामान्‍यतः ‘बॅक्‍टेरियल’ (जीवाणू) किंवा ‘व्‍हायरल’ (संसर्ग) असतो; पण सध्‍या साथीच्‍या स्‍वरूपातील हा आजार ‘व्‍हायरल’ स्‍वरूपाचा आहे, जो ‘अ‍ॅडेनोव्‍हायरस’ (Adenovirus)  या विषाणूमुळे होतो.

 

३. या आजाराची लक्षणे कोणती ?

सर्वप्रथम डोळा लाल होऊन डोळ्‍यातून चिकट स्‍वरूपाचे पाणी येते. त्‍यानंतर पापण्‍यांना सूज येऊन पापण्‍या विशेषतः सकाळी एकमेकांना चिकटतात. एकूणच डोळ्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता निर्माण होते. स्राव अधिक असल्‍यास क्‍वचित् प्रसंगी भुरकट दिसू शकते.

 

४. या आजाराची इतर लक्षणे कोणती ?

या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्‍वचित् प्रसंगी ताप येऊ शकतो.

 

५. हा आजार कशामुळे पसरतो ?

हा आजार संसर्गजन्‍य असल्‍यामुळे पटापट एका व्‍यक्‍तीकडून दुसर्‍या व्‍यक्‍तीकडे पसरतो. डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या डोळ्‍यांना स्‍पर्श करून, तसेच त्‍या हाताने दुसर्‍या वस्‍तूंना स्‍पर्श केला असता आणि दुसर्‍या व्‍यक्‍तीने त्‍या वस्‍तूला स्‍पर्श करून तसाच हात डोळ्‍यांना लावल्‍यास हा आजार त्‍या दुसर्‍या व्‍यक्‍तीस होतो. उदाहरणार्थ डोळे आलेल्‍या व्‍यक्‍तीचा रुमाल, पेन, टॉवेल, चमचा, गॉगल्‍स इत्‍यादी वस्‍तू वापरल्‍यास हा आजार बळावतो.

 

६. डोळे आलेल्‍या रुग्‍णांनी कोणती काळजी घ्‍यावी ?

६ अ. डोळे आल्‍याचे लक्षात आल्‍यास सर्वप्रथम शक्‍य झाल्‍यास स्‍वतः वेगळे रहावे (आयसोलेट करावे).

६ आ. डोळ्‍यांना स्‍पर्श करू नये आणि डोळे चोळू नयेत.

६ इ. डोळे पुसण्‍यासाठी ‘टिश्‍यू पेपर’चा वापर करावा.

६ ई. वैद्यकीय सल्‍ल्‍यानेच उपचार चालू करावेत. स्‍वतः मनाने औषधांच्‍या दुकानांमधून कोणतेही ‘ड्रॉप’ विकत घेऊन ते घालू नयेत.उ. हलका ताजा आहार घ्‍यावा.

६ ऊ. वारंवार हात धुवत रहाणे.

६ ए. आपल्‍या वस्‍तू दुसर्‍यांना देऊ नका.

६ ऐ. लहान मुलांमध्‍ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्‍याने डोळे आलेल्‍या मुलांना शाळेत पाठवू नये.

६ ओ. वाटीत गरम पाणी घेऊन त्‍यात कापसाचा बोळा भिजवून त्‍याने डोळ्‍यांच्‍या पापण्‍यांना बाहेरून हलकासा शेक द्यावा.औ. प्रखर प्रकाशापासून संरक्षण होण्‍यासाठी काळा गॉगल वापरावा.

 

७. डोळा येऊ नये म्‍हणून निरोगी व्‍यक्‍तीने कोणती काळजी घ्‍यावी ?

डोळ्‍यांना उगीचच हात लावू नये किंवा डोळे चोळू नये. आजारी माणसाच्‍या संपर्कात आल्‍यास ठराविक अंतराने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा यथायोग्‍य वापर करावा. बाधित व्‍यक्‍तीच्‍या वस्‍तू वापरू नये.

 

८. हा आजार कितपत गंभीर आहे ?

हा आजार बिलकुल गंभीर नाही; परंतु योग्‍य काळजी न घेतल्‍यास किंवा दुर्लक्ष केल्‍यास, तसेच औषध उपचार न केल्‍यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात आणि मग हा आजार गंभीर स्‍वरूपात निर्माण होतो. यथायोग्‍य उपचार घेतल्‍यास हा आजार साधारणतः ३ ते ७ दिवसांमध्‍ये पूर्ण बरा होतो.
या प्रकारे योग्‍य काळजी घेतल्‍यास डोळ्‍यांच्‍या या समस्‍येवर आपण मात करू शकतो. वैद्यकीय सल्‍ल्‍याने पोटातून ठराविक आयुर्वेदाची औषधे घेतल्‍यास हा आजार बरे होण्‍यास साहाय्‍य होते.

– डॉ. निखिल माळी, आयुर्वेद नेत्ररोगतज्ञ, चिपळूण, जिल्‍हा रत्नागिरी.

 

९. ‘डोळे आले असल्‍यास पुढीलप्रमाणे आहार आणि औषध करावे

अ. डोळे बरे होईपर्यंत नेहमीचा आहार न घेता मुगाच्‍या डाळीचे वरण आणि भात, मुगाच्‍या डाळीचे कढण (डाळ शिजवून तिच्‍यात चवीपुरता गूळ आणि मीठ घालून बनवलेला पातळ पदार्थ), रव्‍याचा उपमा किंवा शिरा, लापशी, मूगडाळ घालून बनवलेली तांदळाची खिचडी, भाकरी यांसारखा पचायला हलका आहार घ्‍यावा.

आ. २ – २ चिमूट त्रिफळा चूर्ण दिवसातून ४ – ५ वेळा चघळून खावे.

इ. डोळ्‍यांची आग होत असल्‍यास झोपतांना डोळे बंद करून काकडीच्‍या चकत्‍या कापून त्‍या स्‍वच्‍छ धुतलेल्‍या रुमालाने डोळ्‍यांवर बांधाव्‍यात. काकडीप्रमाणे शेवग्‍याची वाटलेली पानेही डोळ्‍यांवर बांधता येतात.

ई. चिमूटभर भीमसेनी कापूर हातांच्‍या तळव्‍यांच्‍या मध्‍ये चोळावा आणि हाताचे तळवे डोळे उघडे ठेवून डोळ्‍यांच्‍या समोर जवळ धरावेत. तळवे डोळ्‍यांना टेकवू नयेत. या उपायाने डोळ्‍यांची जळजळ लगेच न्‍यून होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३)

Leave a Comment