‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ करून शरिरावरील आवरण काढण्‍याची पद्धत

Article also available in :

अनुक्रमणिका

आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायविषयक सर्व लेख संग्रही ठेवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आपत्‍काळात आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय उपचार उपलब्‍ध नसतील. तेव्‍हा स्‍वत:साठी आणि इतरांसाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करता येण्‍यासाठी उपायविषयक सर्व लेख संग्रही ठेवा अन् या उपायांचा आजपासून सराव करा ! ’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१७.७.२०२३)

 

१. ‘मनोरा (टॉवर) मुद्रे’चा शोध सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लावलेला असणे

दोन्‍ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्‍याला दोन बाजूंनी टेकवून मनोर्‍याप्रमाणे केलेली मुद्रा दाखवतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सप्‍टेंबर २०१८ मध्‍ये एक दिवस एका साधकाला वाईट शक्‍तींचा पुष्‍कळ त्रास होत असल्‍याने मी त्‍याच्‍यासाठी नामजपाद्वारे उपाय करत होतो. कोणत्‍याही शारीरिक कारणामुळे नव्‍हे, तर केवळ वाईट शक्‍तींच्‍या त्रासामुळे त्‍याच्‍या पोटात असह्य दुखत होते आणि ३ घंटे उपाय करूनही त्‍याचा तो त्रास थोडाही अल्‍प होत नव्‍हता. ही गोष्‍ट मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितल्‍यावर त्‍यांनी अभिनव अशी ‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ मणिपूरचक्रासमोर पोटाचे दुखणे दूर होईपर्यंत धरण्‍यास सांगितली. तेव्‍हा मी त्‍या साधकाचा त्रास दूर होण्‍यासाठी स्‍वतःच्‍या मणिपूरचक्रासमोर ती मुद्रा धरली आणि नामजप केला. ती मुद्रा करतांना मी माझ्‍या दोन्‍ही हातांची मनगटे पोटावर टेकवली. तशा पद्धतीने अर्धा घंटा उपाय केल्‍यावर त्‍या साधकाचे पोट दुखणे पूर्णपणे थांबले. अशा प्रकारे नाविन्‍यपूर्ण अशा ‘मनोरा मुद्रे’चे महत्त्व माझ्‍या लक्षात आले.

 

२. शरिरावर आलेला आवरणाचा पट्टा दूर करण्‍यासाठी ‘मनोरा मुद्रे’चा उपयोग करण्‍याचा शोध प्रथम गुरुकृपेने लागणे

दुसर्‍या दिवशी पुन्‍हा त्‍या साधकाच्‍या पोटात असह्य दुखत होते. तेव्‍हा मला लक्षात आले, ‘त्‍या साधकाच्‍या आज्ञाचक्रापासून ते मणिपूरचक्रापर्यंत आवरणाचा पट्टा आला आहे.’ असे आवरण मी प्रथम अनुभवत होतो. मी तो आवरणाचा पट्टा ‘मुठींनी आवरण काढणे’ या पद्धतीने काढण्‍याचा प्रयत्न करत होतो; पण तो दूर होत नव्‍हता. तेव्‍हा मला देवाने मला ‘मनोरा मुद्रा’ डोक्‍यापासून पोटापर्यंत नामजप करत फिरवायला सुचवले. अशा प्रकारे उपाय केल्‍यावर शरिरावरील आवरण १० मिनिटांत दूर झाले आणि त्‍या साधकाचा त्रासही पुष्‍कळ प्रमाणात अल्‍प झाला. तेव्‍हा मला आवरण काढण्‍यासाठी ‘मनोरा मुद्रे’चा उपयोग करण्‍याचा शोध प्रथम लागला. अर्थात् ही गुरुदेवांचीच कृपा होती.

 

३. ‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवण्‍याची आवश्‍यकता

पूर्वी वाईट शक्‍ती शरिरावर आवरण आणायच्‍या, तेव्‍हा ते आवरण एखाद्या चक्रावर किंवा अधिकाधिक २ चक्रांवर असायचे; पण आता सूक्ष्मातील युद्धाचा स्‍तर वाढला आहे. सहाव्‍या आणि सातव्‍या पाताळांतील मोठ्या वाईट शक्‍ती आक्रमण करत आहेत. त्‍यामुळे त्‍या शरिरावर एखाद-दुसर्‍या चक्रांवर आवरण न आणता डोक्‍यापासून छातीपर्यंत किंवा डोक्‍यापासून कटीपर्यंत (कमरेपर्यंत) आवरण आणून अनुक्रमे ४ चक्रे (सहस्रार ते अनाहतचक्र) किंवा ६ चक्रे (सहस्रार ते स्‍वाधिष्‍ठानचक्र) आवरणाने भारीत करतात. तसेच त्‍यांनी आणलेले आवरण वरून खालपर्यंत सलग असते. हे त्‍यांचे निर्गुण स्‍तरावरील आक्रमण असते. त्‍यामुळे ते आवरण ‘मुठींनी आवरण काढणे’ या पद्धतीने दूर होत नाही. त्‍यासाठी ‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ शरिरावरून फिरवणे’ या पद्धतीचाच उपयोग करावा लागतो.

 

४. ‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवण्‍याची पद्धत

दोन्‍ही हातांची मधली बोटे एकमेकांना जोडून आणि मनगटे डोक्‍याला दोन बाजूंनी टेकवून ‘मनोरा मुद्रा’ करावी आणि ती मुद्रा कुंडलिनीचक्रांवरून (सहस्रार ते स्‍वाधिष्‍ठानचक्र यांवरून) ‘वरून खाली आणि खालून वर’ अशी ७ – ८ वेळा फिरवावी.

 

५. ‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवतांना नामजप करणे आवश्‍यक असणे

‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवण्‍यापूर्वी ‘प्राणशक्‍तीवहन उपाय पद्धती’ने (‘शरीर आणि शरिराची चक्रे यांवरून हाताची बोटे फिरवून बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या प्राणशक्‍तीद्वारे आध्‍यात्मिक त्रास किंवा विकार याला कारणीभूत असलेले शरिरातील अडथळ्‍याचे स्‍थान शोधणे. त्‍यानंतर त्‍या स्‍थानावर अडथळ्‍याच्‍या तीव्रतेनुसार हाताच्‍या बोटांची मुद्रा अन् नामजप शोधून त्‍यांद्वारे उपाय करणे’) ‘कोणता जप करायचा ?’ हे शोधावे. ‘मनोरा मुद्रा’ शरिरावरून फिरवतांना शोधून मिळालेला जप करावा. तो जप केल्‍यास मुद्रा करतांना दोन्‍ही हातांच्‍या एकमेकांना जोडलेल्‍या मधल्‍या बोटांच्‍या टोकांतून (मनोरा केलेल्‍या बोटांच्‍या रचनेतून) नामजपाची स्‍पंदने दोन्‍ही हातांच्‍या तळव्‍यांच्‍या मधल्‍या भागात येऊन ती शरिरावर पसरतात, तसेच चक्रांच्‍या माध्‍यमातून शरिरामध्‍येही जातात. नामजपाच्‍या स्‍पंदनांमुळे शरिरामधील आवरण नष्‍ट होण्‍यास साहाय्‍य होते. त्‍यामुळे शरिरामधे आणि शरिरावर सलग आलेले आवरण भंग पावते. मनोरा केलेली मुद्रा शरिरावरून ७ – ८ वेळा फिरवल्‍यामुळे बरेचसे आवरण नष्‍ट झालेले असते. पुढे उर्वरित आवरण आपण ‘मुठींनी आवरण काढणे’ (‘शरिरावर आलेले त्रासदायक शक्‍तीचे आवरण दोन्‍ही हातांच्‍या मुठींमध्‍ये गोळा करणे आणि ते शरिरापासून दूर फेकणे’) या पद्धतीने दूर करू शकतो.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (२९.६.२०२३)

 

सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होणे

‘शरिरावर आलेले त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढण्‍यासाठी ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा) कशी लाभदायक आहे, हे साधक अनुभवतच आहेत. प्रयोगातून आलेला नामजप करत आपले सहस्रारचक्र ते स्‍वाधिष्‍ठानचक्र यांवरून ‘मनोरा’ मुद्रा वरून खाली आणि खालून वर अशी ५ – ६ वेळा सावकाश फिरवली, तर शरिरावर आलेले आवरण दूर होते. आध्‍यात्मिक उपाय करतांना मला ‘मनोरा’ मुद्रेचा आणखी एक लाभ लक्षात आला.

आपल्‍या शरिरावरील आवरण दूर झाल्‍यानंतर ‘मनोरा’ मुद्रा करून ती आपल्‍या सहस्रारचक्रावर, म्‍हणजे डोक्‍याच्‍या वर छायाचित्रात दाखवल्‍याप्रमाणे ४ – ५ मिनिटे धरली आणि नामजप केला, तर ‘आपल्‍याला होत असलेला वाईट शक्‍तींचा त्रास गतीने दूर होतो’, असे माझ्‍या लक्षात आले. याचे कारण म्‍हणजे सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा, तसेच नामजप यांमुळे ईश्‍वराकडून आलेले चैतन्‍य आपल्‍या ब्रह्मरंध्रातून आत जाऊन ते आपल्‍या सर्व चक्रांमध्‍ये अन् शरीरभर पसरते. त्‍यामुळे आपल्‍याला होत असलेला वाईट शक्‍तींचा त्रास गतीने दूर व्‍हायला साहाय्‍य होते.

‘मनोरा’ मुद्रेचा हा परिणाम अनुभवत असतांना मला आठवले, ‘पूर्वीच्‍या काळी ऋषीमुनी तपश्‍चर्या करतांना डोक्‍याच्‍या वर दोन्‍ही हात सरळ ठेवून नमस्‍काराची मुद्रा करायचे.’ तिला ‘पर्वतमुद्रा’ म्‍हणतात. मी ती मुद्रा करून पाहिली असता ‘त्‍या मुद्रेमुळेही पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍याचा प्रवाह आपल्‍या शरिरावर प्रवाहित होतो’, असे लक्षात आले. या मुद्रेमुळेही आपल्‍याला होत असलेला वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होते.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा. (१४.६.२०२३)

वाईट शक्ती

वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास

याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म

व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment