पूजा करतांना भाव कसा ठेवावा ?

पूजा करतांना देवता, संत किंवा गुरु तिथे प्रत्यक्ष आहेत, असा भाव ठेवून त्यांची पूजा करा !

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale

प.पू. डॉ. जयंत आठवले

 

१. पूजेच्या वेळी होणार्‍या अयोग्य कृती

पुढील अयोग्य कृती घडत असल्याचे घरोघरी आढळून येते.

अ. देवतेचे चित्र किंवा मूर्ती डोक्याकडून एका हाताने उचलली जाते आणि लोंबकळत धरली जाते.

आ. देवतेचे चित्र / मूर्ती किंवा संत / गुरु यांचे छायाचित्र कसेही पुसले जाते.

इ. गंध, कुंकू कसेही लावले जाते. ते देवतेच्या डोळ्यांत गेलेले असते किंवा कुंकवाने, गंधाने तिचा तोंडवळाच झाकून गेलेला असतो.

ई. फुले कशीही वाहिलेली असतात. ती चित्र किंवा मूर्ती यांना साजेशा आकाराची नसतात. त्यामुळे चित्र किंवा मूर्ती झाकून जाते.

उ. पूजा करतांना इतरत्र लक्ष असते किंवा इतरांशी अनावश्यक बोलले जाते.

ही सर्व उदाहरणे म्हणजे पूजा करायची म्हणून केल्याची आणि भावाचा अभाव असल्याची लक्षणे आहेत. त्यामुळे पूजा करायचा आध्यात्मिक लाभ तर होत नाहीच, उलट देवाची अवकृपा होते. यावरून लक्षात येते, हिंदूंना किती बारीक-सारीक गोष्टींचेही धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

 

२. पूजेच्या वेळी करावयाच्या योग्य कृती

पुढीलप्रमाणे पूजा केल्यास पुजेचा लाभ निश्चित होतो.

अ. देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांना दोन्ही हातांनी, अलगद आणि मध्यभागी धरून उचलावे.

आ. देवता, संत किंवा गुरु यांना पुसतांना ते तिथे प्रत्यक्ष आहेत, असा भाव ठेवून आणि आपण पुसत असल्याचे त्यांना सांगून त्यांचे वरून खालपर्यंत एकेक अंग हळूवार पुसावे. आई बाळाला कशी आंघोळ घालते ? त्याला सांगते, आता तुला आंघोळ घालते हं. तू डोळे मिट, म्हणजे डोळ्यांत पाणी जाणार नाही. अशा प्रकारे त्याच्याशी बोलत बोलत, त्याला कल्पना देत आणि त्याची काळजी घेत त्याला आंघोळ घालते. त्याचप्रमाणे आपणही देवतेचे चित्र / मूर्ती किंवा संत / गुरु यांचे छायाचित्र पुसायला हवे. ती कृती भावपूर्ण करायला हवी. चित्र किंवा छायाचित्र पुसतांना आधी त्यातील देवता, संत किंवा गुरु यांना पुसावे आणि मग त्यातील इतर भाग पुसावा.

इ. गंध, कुंकू देवतेला किंवा गुरूंना लावतांना ते बरोबर कपाळावर आणि डोळ्यांत जाणार नाही, अशा योग्य आकाराचे लावावे. मूर्तीवर कुंकू वाहायचे असल्यास ते चरणांवर वहावे.

ई. योग्य ती आणि योग्य त्या आकाराची फुले वहावीत. त्यांची रचना सात्त्विक करावी.

उ. पूजा करतांना इतरत्र लक्ष नसावे. तल्लीन होऊन मनोभावे पूजा करावी.

असे केल्यानेच ती देवता, संत किंवा गुरु यांचे तत्त्व जागृत होऊन आपल्याला त्याचा लाभ होईल.

– (प.पू.) डॉ. आठवले (२०.१.२०१४)

 

खरी क्षमायाचना !

पूजेच्या शेवटी क्षमायाचना करतांना पुढील श्लोक म्हणतात.

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्‍वर ॥

अर्थ : हे भगवंता, मी प्रतिदिन सहस्रावधी अपराध करत असतो. हे परमेश्‍वरा, मी तुझा दास आहे, असे समजून मला क्षमा कर !

मी भगवंताचा दास आहे, या उत्कट जाणिवेसह अपराधीभाव जागृत होऊन अहंभाव न्यून झाला, तरच खर्‍या अर्थाने क्षमा मागितली जाते आणि त्याच वेळी ईश्वरही क्षमा करतो. अन्यथा क्षमा मागणे, हा केवळ शाब्दिक सोपस्कार होतो.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०१४)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment