पूजासाहित्याचे आध्यात्मिक महत्त्व

१. पूजासाहित्यात देवतेचा अंशात्मक वास असणे

‘ज्याप्रमाणे मंदिर देवतेचे स्थान असून त्यास पवित्र मानले जाते, त्याचप्रमाणे देवपूजेतील पूजासाहित्य आणि सामग्री यांमध्येही देवतेचा अंशात्मक वास असल्याने ते सर्व पवित्र, शुभ अन् मंगलमय आहेत.

 

२. देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व
अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्यांचे पूजन करणे योग्य असणे

देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते. तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे, म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे.

 

३. पूजासाहित्यात देवत्व येण्याची कारणे पुढीलप्रमाणे

कु. मधुरा भोसले

३ अ. पूजासाहित्य मुळात सात्त्विक असणे

पूजासाहित्य मुळात सात्त्विक असेल, तर त्याचा देवपूजेसाठी उपयोग करतांना त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात सात्त्विकता जाणवते, उदा. दूर्वा, तुळशीपत्र, बिल्वपत्र, जास्वंदीचे फूल इत्यादी.

३ आ. कोणत्या पदार्थापासून पूजासाहित्य
बनवले आहे यावर त्याची सात्त्विकता अवलंबून असणेे

कोणत्या पदार्थापासून पूजासाहित्य बनलेले आहे, हे महत्त्वाचे आहे. संगमरवर किंवा शाळीग्राम यांसारख्या सात्त्विक दगडांपासून बनवलेल्या मूर्ती जशा सात्त्विक असतात, तसेच सात्त्विक धातूंपासून बनवलेले पूजासाहित्यही सात्त्विक असते, उदा. पंचधातू, चांदी किंवा पितळे यांपासून बनवलेली घंटा, निरांजन, पंचारतीपात्र, एकारतीपात्र इत्यादी.

३ इ. पूजासाहित्याचा आकार किंवा रंग यांनुसार त्यांची सात्त्विकता वाढणे

घंटा, शंख, निरंजन, ताम्हण, समई, कलश, सुपारी, विड्याची पाने, केळीची पाने इत्यादींचा आकार आणि रंगछटा सात्त्विक असल्यामुळे त्यांमध्ये वायूमंडलातील सात्त्विकता आकृष्ट करून ती प्रक्षेपित करण्याचे सामर्थ्य इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते.

३ ई. पूजासाहित्याच्या उपयोगानुसार त्यांची सात्त्विकता अवलंबून असणे

पूजासाहित्य सात्त्विक असण्याचे कारण म्हणजे त्यांचा उपयोग केवळ देवपूजेसाठी केला जातो. कार्यासाठी त्यांचा उपयोग केल्यास त्यांच्यातील सात्त्विकता अल्प होते. पूजासाहित्याला देवपूजेतील चैतन्य मिळाल्याने ते अधिक सात्त्विक आणि चैतन्यमय बनते.

३ उ. ऋषिमुनी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संकल्पशक्तीमुळे
पूजासाहित्य सात्त्विकता अन् चैतन्य यांना ग्रहण करून त्यांचे प्रक्षेपण करणारे स्रोत बनलेले असणे

षोडशोपचारपूजा आणि पंचोपचारपूजा करण्याविषयीचे शास्त्र ऋषिमुनींनी लिहून ठेवलेले आहे. तसेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगतांना भक्तीयोगांतर्गत कर्मकांडाचे महत्त्व विशद केलेले आहे. त्यामुळे कर्मकांडाला ऋषिमुनी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संकल्पाचे पाठबळ मिळालेले आहे. ऋषिमुनी आणि भगवान श्रीकृष्ण यांची संकल्पशक्ती पूजेची पूर्वसिद्धता, प्रत्यक्ष पूजा आणि पूजेनंतरही कार्यरत असते. ईश्‍वराच्या संकल्पशक्तीला सगुणाच्या माध्यमातून कार्यान्वित होण्यासाठी पूजासाहित्यामुळे साहाय्य मिळते. पूजासाहित्याच्या माध्यमातून ईश्‍वरी तत्त्व कार्यरत झाल्यामुळे ते सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करून त्यांचे प्रक्षेपण करणारे स्रोत बनतात.

३ ऊ. भावामुळे पूजासाहित्य अधिक सात्त्विक आणि चैतन्यमय बनणे

पुरोहित आणि पूजक यांच्यातील देवाप्रतीच्या भावामुळे ते हाताळत असलेल्या पूजासाहित्यांतील देवत्व जागृत होऊन त्यांतून सात्त्विकता अन् चैतन्य यांचे प्रक्षेपणाचे पुष्कळ प्रमाणात होते. पूजासाहित्य भावपूर्णरित्या हाताळल्यामुळे त्याला देवत्व प्राप्त होते.

३ ए. साधना करणारे सात्त्विक निर्जीव

ज्याप्रमाणे सजीव साधना करतात, तसेच निर्जीवही साधना करत असतात, उदा. तेलाचा दिवा आणि तुपाचे निरांजन.

 

कृतज्ञता

देवाने पूजासाहित्याचे महत्त्व सांगून पूजासाहित्याप्रती असणारा भाव वृद्धींगत होण्यास साहाय्य केले, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्रीगुरुचरणांशी जाण्यासाठी आसुसलेली,

कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०१७, रात्रौ. ८)

Leave a Comment